शिक्षण घेण्यासाठीचा संघर्ष असो की नोकरीसाठी बाहेर पडण्याचा, प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला संघर्ष करावा लागला. एका पिढीने तो केला आणि नंतरच्या पिढीने त्याची फळं चाखली. पिढय़ान्पिढय़ा स्त्रीमधून तिची प्रगतीही झिरपत राहिली. नोकरीसाठी बाहेर पडून, काम आणि कुटुंब याच्यातली कसरत करत, प्रसंगी कुटुंबीयांना हाताशी घेत, सपोर्ट सिस्टीम तयार करत काम करण्यालाही आता दशकं लोटली आहेत.. तरीही काहींचा संघर्ष अजूनही त्याच पातळीवर सुरू आहे, पण खरा संघर्ष त्यापुढचा आहे.. पुढच्या पिढीचा आहे.. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठ पदे मिळवण्याचा.. ग्लास सििलग वा काचेचं छत भेदण्याचा! ‘आजही अडवतंय काचेचं छत?’ या लेखावर वाचकांनी पाठविलेल्या पत्रांसह या स्थितीचा आढावा..

मी वाणिज्य शाखेची प्राध्यापिका. माझ्या आयुष्यातील दुसरी बाजू म्हणजे माझं कुटुंब. नवरा र्मचट नेव्हीमध्ये, त्यामुळे नऊ महिने घराबाहेर. घरी मी, माझा मुलगा हनिश आणि सासूबाई-आई. आईंच्या रूपाने मला भक्कम सपोर्ट सिस्टीम लाभली. त्यांच्यावर मुलाला सोपवून मी नोकरी चालू ठेवली. प्रयत्नपूर्वक शिक्षणही पुढे चालू ठेवलं. एम. फिल केले. दीर्घ कालावधीनंतर पीएच.डी. मिळवली. आज विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
विद्यार्थी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सल्ला मागायला येत. त्यावेळी भीती असे – आपला सल्ला चुकला तर? म्हणून मी मानसशास्त्रीय समुपदेशनाची पदविका आणि ५६ व्या वर्षी मानसशास्त्रामध्ये एम.ए. केले. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनाविषयीचं सखोल ज्ञान मिळवलं. त्याबरोबरच अक्षरावरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जाणण्याचे शास्त्र, पुष्पौषधी याचाही अभ्यास केला.
‘काचेचे छत’ पार करताना एका घटकाचा विचार करणे जरुरीचे आहे. तो म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था. वाढणाऱ्या घटस्फोटांमध्येसुद्धा आपली कुटुंबसंस्था टिकून आहे. सामाजिक सामंजस्य टिकवून समस्या कमी करण्यामध्ये कुटुंबसंस्थेचा मोठा वाटा असून त्यात स्त्रियांचा सहभाग जास्त आहे हे मान्य करावेच लागेल.
भक्कम सपोर्ट सिस्टीमसाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य आई, वडील, सासू, सासरे इत्यादी. त्यासाठी एकमेकांशी सुसंवाद हवा. त्यांच्या जोरावर आपण नोकरी, व्यवसाय करू शकतो याची मुलींना जाणीव हवी. उदाहरणार्थ हनिशला निर्धास्तपणे आईंवर सोडून मी कॉलेजला जाई. पण काम सोडून माझ्या चैनीखातर मी आईंच्या मदतीचा गैरफायदा कधीच घेतला नाही. माझ्या कामांच्या वेळेशी मिळतीजुळती वेळ असलेली शाळा निवडली आणि आईंना थोडे रिकामपणं मिळालं. दुसरा पर्याय म्हणजे व्यावसायिक पद्धतीने चालवली जाणारी पाळणाघरे! तिसरा पर्याय प्रशिक्षित ‘आया’, त्यासाठी प्रशिक्षित आया पुरवणाऱ्या संस्था निर्माण व्हायला हव्यात. घरात कामात पुरुषांचा सहभाग, मुलांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून छोटी कामं करायची सवय लावणं आणि कुटुंबाने स्त्रीला प्रोत्साहन व मानसिक आधार देणं गरजेचं आहे. मुलगा लहान असताना अनेक संधी मी विचारपूर्वक सोडल्या. उदाहरणार्थ क्रमिक पुस्तकांचं लेखन. हे काम सुट्टीत असे, पण सुट्टीत मी, हनिश व कैलास (माझा नवरा) बोटीवरचे एकत्र राहणे हे सहजीवन आमच्या दृष्टीने फार मोलाचे होते.
स्त्रियांनी घरी व दारी ‘परफेक्शनिस्ट’ असण्याचा अट्टहास सोडला पाहिजे. स्त्रीच्या नोकरी/ व्यवसायाकडे केवळ आर्थिक संपन्नेचा मार्ग म्हणून न पाहता, त्या दोघांनी एकमेकांच्या व्यवसायाचा आदर केला पाहिजे. तर बढती, बदली यासाठीचा सपोर्ट स्त्रीला घरातूनच मिळेल.
वरच्या हुद्दय़ाची जागा स्वीकारताना बऱ्याच स्त्रिया तिथल्या ताणतणावाला घाबरतात, भावनांचे नीट नियोजन जमेल का ही भीतीही असते. भावनांकाचे महत्त्व आज सर्वश्रुत आहे. ताणमुक्तीची अनेक तंत्रे सहज शिकून आचरता येतात. प्रशिक्षण व स्व-प्रयत्नाने स्वत:च्या व इतरांच्या भावना ओळखणं, समजून घेणं, त्यावर नियंत्रित करणं अवघड आहे, अशक्य नाही. अशा रीतीने काचेचं छत भेदण्याचा एक अडसर दूर करता येईल.
– डॉ. संजीवनी राहणे, पुणे

पुरुषी अहंच्या पलीकडे
मी एक शिक्षिका, सासू- सासरे नोकरी करणारे, नवऱ्याचा व्यवसाय. आम्ही सर्व ८-१० तास बाहेर असणारे. पहिला मुलगा झाला तेव्हा पती चारुदत्तच्या सुनंदा मावशींनी आनंदाने मुलाला सांभळण्यास मदत केली. त्यांना शक्य नसे तेव्हा चारुदत्तने स्वत:ची कामं बाजूला ठेवून मुलाला तेलाने मसाज करणं, अंघोळ घालणं, दूध पाजून झोपवणं सर्वच कामं मोठय़ा आनंदाने आणि समजून उमजून केली. त्याला जर महत्त्वाची मीटिंग असेल तर बाळाला मस्त तयार करून तो गाडीत घालून आपल्याबरोबर न्यायचा. दुसरा मुलगा झाल्यावरही त्यांचं आजारपण, खाऊ-पिऊ घालणं, त्यांचं दुपटं धुणं अशा सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्याचा पुरुषी ‘अहं’ पणा कधीच आड आला नाही. दुसरा मुलगा दीड वर्षांचा असताना ‘यशदा’ पुणे येथे तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली, तेव्हाही मुलांना सोडून ८ दिवस कसं राहायचं अशी मनाची घालमेल सुरू झाली. पण याही प्रसंगी नवरा व सासूबाईंनी हिंमत दिली व मी हे ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण करू शकले.
– जुईली शेरीकर, नाशिक

नियोजनातून स्वप्नपूर्ती शक्य
मी सॉफ्टेवअर प्रॉडक्ट कंपनीत सीओओ म्हणून नोकरी करते आहे. मी इंजिनीअर असून गेली १६ वर्षे नोकरी करते आहे आणि त्यापूर्वी साधारण ६ वर्षे मी स्वत:चा व्यवसाय केला. मला दोन मुलगे असून ते आता १६ व १९ वर्षांचे आहेत.
माझा लहान मुलगा अगदी ८- ९ महिन्यांचा असल्यापासून मी नोकरीसाठी त्या वेळी पहाटे ६ वाजता घर सोडायचे आणि साधारण ६ वाजता संध्याकाळी घरी परत यायचे असा माझा दिनक्रम असायचा. नंतर मी एका सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीत वरच्या हुद्दय़ाचे पद स्वीकारले त्या वेळी माझ्या कामाच्या वेळा खूपच वेगळ्या होत्या. आमच्या कंपनीचे सगळे क्लायंट अमेरिकेत किंवा युरोपमध्ये असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत बैठका असत. हे पद स्वीकारताना आपण मुलांच्या अभ्यासाला वेळ देऊ शकू का असे वाटल्याने खूप विचारात पडले होते. पण त्यावर सकाळी उठून लवकर त्यांचा अभ्यास घ्यायचा उपाय सापडला. अनेक अनुभव, अडचणी या काळात आल्या. त्यावर त्या वेळी जे सुचले व बरोबर वाटले ते मार्ग काढले.
या सगळ्या प्रवासामध्ये मला सापडलेले हे खालील उपाय सांगायला मला आवडतील. – सर्वप्रथम मला वाटते स्त्रियांनी लहानपणापासून ‘आपल्या’ करिअरची स्वप्नं बघावीत. कारण तुमची स्वप्नंच तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायला मदत करतात. मी, माझे सासू-सासरे, आई-वडील यांनी या सगळ्या प्रवासात मला खूपच मदत केली. एकत्र कुटुंबात राहिल्याने मुलांचे संगोपन, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. त्यांची भावनिक वाढ होण्यासाठी हे सर्व खूप जरुरी आहे, असे मला वाटते. या सगळ्या काळात त्या वयस्करांवर शारीरिक ताण पडणार नाही याची मात्र आम्ही खात्री केली. घरात मदतीला पूर्णवेळ मुलगी ठेवली. तिला घरातल्या एका सदस्यासारखे वागवल्यामुळे तीपण माझ्या प्रगतीतील एक महत्त्वाचा घटक आहे.
माझ्या या प्रवासात काही गोष्टी मी प्रयत्नपूर्वक केल्या. त्या म्हणजे कधीही ‘सुपरवुमन’ व्हायचा प्रयत्न केला नाही किंवा कोणाला काही सिद्ध करण्यासाठी कुठलाही अट्टहास केला नाही. गेली ३-४ वर्षे मी स्वयंपाक करणे सोडून दिले आहे. कारण माझ्या सध्याच्या प्राध्यान्यक्रमामध्ये ते बसत नाही. प्राधान्यक्रम ठरवणे आणि प्रत्येक टप्प्यावर काय जास्त महत्त्वाचे आणि काय कमी महत्त्वाचे हे ठरवणे आणि तसे करणे करिअर वुमनसाठी खूप महत्त्वाचे असते. जेव्हा मुले लहान होती तेव्हा त्यांच्याबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवणे हे महत्त्वाचे होते. त्या वेळी करमणुकीचा वेळ, मित्र- मैत्रिणींना द्यायचा वेळ कमी केला. मुले पौगंडावस्थेत होती तेव्हा त्यांच्याशी भावनिकदृष्टय़ा जोडलं जाणं महत्त्वाचं होतं. त्यावर लक्ष केंद्रित केलं. अर्थात हे सगळं करत असताना काही गोष्टींना मी मुकले. जसे की मी मुलांच्या ‘ओपन डे’ला बऱ्याचदा जाऊ शकायचे नाही. पण त्याच्या तुलनेत खूप मोठय़ा गोष्टी असल्याने ती गोष्ट करू न शकण्याची खंत वाटत नाही.
मुलांच्या बाबतीत आणखी एक वेगळा विचार मला तुमच्याबरोबर शेअर करायचाय. माझा मोठा मुलगा जेव्हा दुसरी-तिसरी इयत्तेत होता तेव्हा इतर आयांप्रमाणे मलाही वाटायचे की आपण त्याचा अभ्यास नाही घेतला, आपण हे नाही केले, ते नाही केले तर त्याला यश मिळणार नाही. त्या वेळी विचार करता मला असे वाटले की प्रत्येक माणूस त्याच्या यशासाठी स्वत:च जबाबदार असतो. अगदी मुलंही. आई-वडील त्यांना सगळ्या सोयी, चांगले संस्कार, मार्गदर्शन देऊ शकतात, पण त्याला काय करायचे आहे त्यासाठीचे प्रयत्न करणे आणि त्याची जबाबदारी घेणे हे प्रत्येक मुलालाच करावे लागते. हे आधी मला स्वत:ला पटवून द्यावे लागले आणि ते जेव्हा मी प्रत्यक्षात आणू लागले माझ्या विचारातून, वागण्यातून तेव्हा दोन गोष्टी झाल्या. मला खूप मोकळे वाटले, माझ्या करिअरवर मी लक्ष केंद्रित करू शकले आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे मुले खूप जबाबदार झाली. आमच्या घरी मी माझ्या दोन्ही मुलांना तुम्ही आता अभ्यास करा किंवा तू अभ्यास का करत नाही आहेस हे कधीही सांगितले नाही. त्याची कधी गरजच पडली नाही.
शेवटी मला असे सांगावेसे वाटते, स्त्रियांनी त्यांच्या करिअरसाठी पैसे खर्च करावेत, दीर्घ मुदतीची गुंतवणूक म्हणून. म्हणजे खूप वर्षे करिअर करता यावे म्हणून स्वत:च्या तब्येतीवर वेळ आणि पैसा खर्च करावा. ज्याला आपण ‘चांगला खर्च’ म्हणतो ते करावेत. म्हणजे जीमला जाणं, स्वयंपाकासाठी बाई ठेवावी, रोजचा प्रवास सुखकर होण्यासाठी पैसे खर्च करावेत. हे सगळे खर्च उद्यासाठी गुंतवणूक ठरणार आहेत. कारण तुम्ही जर आनंदी, उत्साही, निरोगी राहिलात तर खूप काळ तुम्हाला हवे ते काम तुम्ही करू शकाल.
माझ्या अनुभवावरून मला असे वाटते स्त्रियांनी स्वप्नं पाहावीत, स्वप्नपूर्तीसाठी खूप मेहनत घ्यावी आणि हे करता करता स्वत:ला मानसिक व शारीरिकदृष्टय़ा फिट ठेवावे. There is no glass Celling if they think differently. ‘’go women go,sky is the limit”.
– अंजली देसाई, हाजीअली, मुंबई

नोकरीनंतर अनेक गोष्टी
कौटुंबिक कारणांसाठी मी नोकरी सोडली, आता पुढे काय? याचं उत्तर मात्र ‘आत्मविश्वासानेच’ दिलं. गेली आठ र्वष हा मिळालेला वेळ मी अक्षरश: निरनिराळ्या अंगांनी वापरला. साहित्याची लहानपणापासून आवड असूनही मी वाणिज्य शाखेची पदवीधर होते. पुस्तकांची साथ मात्र कधीच सोडली नव्हती. हातात वेळ आल्यावर मी चौफेर वाचन, लेखन, निवेदन, मुलाखती असा प्रवास चालू केला. सुदैवाने आकाशवाणी कट्टा इथे मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी लाभली. काही संस्थांमधून कथाकथनाचा एक आगळा प्रयोग केला. अनेक स्पर्धामधून भाग घेतला. पुस्तक परीक्षणांबद्दल दोन वेळा सुवर्णपदक, फिरता चषक मिळवले. पण मन समाधानी नव्हतं. मग मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाअंतर्गत दोन र्वष अभ्यासक्रमाची एम.ए. (मराठी साहित्य) ही पदवी उत्तम मार्कानी मिळवली आणि समाधानही.
समाजसेवा म्हणून बालगुन्हेगारांसाठी काही काम करते आहे. गेली दोन र्वष त्यातील काही मुलांना दहावीसाठी शिकवताना जे समाधान मिळतं आहे त्याचं मोजमाप अशक्य. ‘स्त्री’ने नोकरी सोडणं, हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. त्याला अनेक पैलू आहेत. आर्थिक बाजूचा विचार हा त्यातील महत्त्वाचा अडसर आहे. या सगळ्याची आजही मला जाणीव आहे. पण स्त्री असो किंवा पुरुष, नोकरी कोणीही सोडलीच तर कुटुंब संभाळून करता येण्यासारख्या अगणित गोष्टी आहेत. फक्त हवा आत्मविश्वास. तोच तुम्हाला वाट दाखवत राहतो.
– राधिका डोंगरे, माहीम

परस्परांच्या साहाय्याने प्रगती
स्त्रीने नोकरीसाठी बाहेर पडायचे असेल तर सर्वात महत्त्वाची भूमिका जोडीदाराची ठरते, कारण मुले व घरातील थोर मंडळी यांचा विरोध असलाच तर त्यांची समजूत काढणे, त्यांना विश्वासात घेणे खूप महत्त्वाचे ठरते. घरातील वातावरण सकारात्मक असेल तेव्हाच स्त्रिया बाहेरच्या जगात अधिक ताकदीने व आत्मविश्वासाने वावरू शकतात. ही झाली नाण्याची एक बाजू. जेव्हा घरातल्यांच्या विरोधामुळे स्त्रिया त्यांच्या मनाप्रमाणे करू शकत नसतील तेव्हा त्या घरातही खूश राहात असतील का? आणि जरी आनंदी दिसत असतील तरी मनात कुठेतरी सल मात्र कायम जपत असतील. वरील दोन्ही प्रकारांमध्ये, सुवर्णमध्य साधण्याचे काम खरं तर संसारातील दोन्ही चाकांचे असते, पण यांत जर मतांतरे झाली तर मात्र सारेच समीकरण बिघडते. हे सर्व साधण्यासाठी व्यक्ती उच्चशिक्षितच असाव्या लागतात का? तसे असते तर घटस्फोटांचे वाढीव प्रमाण दिसले नसते. यासाठी पराकोटीची सहनशीलता, समजूतदारपणा दोघांनीही दाखवण्याची गरज असते आणि हे समाजातल्या कुठल्याही स्तरातील व्यक्तींना जमू शकते. मी जिथे नोकरी करते त्या ठिकाणी एक चतुर्थ श्रेणी कामगार (आम्ही त्यांना मामा म्हणत असू) काम करीत होते. अंगकाठी अति किरकोळ आणि घरची परिस्थितीही अति साधारण, पण कधीही तक्रारीचा सूर नाही. नेहमी वेळेत हजर होऊन शांतपणे काम करणे हा त्यांचा स्वभाव. कधी कोणाशी वाद नाही आणि कामचुकारपणाही नाही. बऱ्याचदा त्यांना सायकलवरून येताना पहिले, पण त्यात वेगळेपण म्हणजे त्यांची पत्नी सायकल चालवीत असे व ते डबलसीट बसून यायचे. पत्नीची तब्येत व्यवस्थित म्हणून उभयतांनी हा नियम केलेला असावा. मामांना तब्येतीचा काहीतरी त्रास नक्कीच असावा, पण त्यांनी त्याबद्दल कधी वाच्यता केली नाही. हळूहळू त्यांच्या गप्पांमधून समजले की त्यांची पत्नी सकाळी घरचा स्वयंपाक करून दोन घरची स्वयंपाकाची कामे करण्यासाठी घराबाहेर पडत असे. त्यांना सात- आठ वर्षांचा एक मुलगा होता. साधारण परिस्थितीमुळे कुटुंबसंख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय दोघांनी मिळूनच घेतला होता. त्या घरातून बाहेर पडल्यावर बाकीची सर्व आवराआवर म्हणजे भांडी धुणे, कपडे धुणे, वाळत घालणे, पाणी भरणे व स्वयंपाकघर आवरणे हे करण्याचे मामांनी आपणहून स्वीकारले होते. यानंतर मुलाची तयारी करणे व त्याला शाळेत सोडणे हेही त्यांचेच काम. तोपर्यंत पत्नी घरी पोहोचलेली असे, ती पटापट तयार होऊन सायकलवरून प्रथम मामांना कामावर सोडायची व नंतर स्वत: एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक कामासाठी हजर व्हायची. मामींच्या कामाचे तास अधिक असल्यामुळे संध्याकाळी मामा परत घरकामांच्या तयारीला लागत. मामी घरी येईपर्यंत जुजबी स्वयंपाक तयार असायचा व घरही टापटीप लावलेले असायचे, त्यामुळे मामी खूश व्हायच्या. मामी अशी दोन-तीन कामे करीत असल्यामुळे अर्थातच त्यांची कमाई मामांपेक्षा जास्त होती, पण अतिशय कमी शिक्षण असलेल्या मामांना त्याबद्दल कधी असूया किंवा कमीपणा वाटला नाही. उलट त्यांना कायमच आपल्या कष्टाळू, कर्तृत्ववान पत्नीचा अभिमान वाटायचा. कुटुंबव्यवस्थेचा पाया असलेल्या पती व पत्नीमधील सुसंवाद हा निरोगी समाजजीवनाचा आधारस्तंभ आहे.
– साईली पोखरकर, नवी मुंबई

छंदातून व्यवसाय
४३ वर्षांपूर्वीचा तो काळ. मुलगा उच्चशिक्षित चांगला एम.टेक. झालेला. सर्व दृष्टीने अप्रतिम असे स्थळ त्यामुळे माझे लग्न लवकरच म्हणजे अठराव्या वर्षीच झाले. लग्नानंतर पुढे शिकायचा विचार केला. परंतु वारंवार होणाऱ्या यांच्या बदल्या आणि लहान मुले यामुळे तो विचार पूर्णत्वास जाऊ शकला नाही. आपण काहीतरी करावे हा विचार मला स्वस्थ बसू देईना. अतिशय सुंदर बाग मी तयार केली. तसेच तज्ज्ञ व्यक्तींकडून बोन्साय प्रशिक्षण घेतले. तीन-चार वर्षांतच माझ्याकडील बोन्साय आकर्षणाचा केंद्र ठरले. मी बागकाम आणि बोन्सायचे क्लासेस सुरू केलेत. मी घरच्या घरी छोटी नर्सरी सुरू केली. माझ्या बोन्सायला तसेच झाडांना अनेक बक्षिसे मिळालीत. त्यातूनच ‘इनोव्हेटिव्ह आयडिया’ची निर्मिती झाली. माझी सूनबाईपण इंटेरियर आणि डिझायनिंग केलेली. डेकोरेटिव्ह टेराकोटा पॉट्स, वुडन आर्टिकल हळूहळू बघता घरच्या घरी कलात्मक दालनच निर्माण झाले. १-२ मोठी प्रदर्शने भरविली. लग्न आणि इतर समारंभांकरिता रिटर्न गिफ्ट करून देऊ लागलो. २०१४ चा ‘आम्ही उद्योगिनी, मुंबई’ प्रतिष्ठानचा ‘आम्ही उद्योगिनी पुरस्कार’ मला मिळाला. माझ्या कामाने मला समाधान दिलं.
– उषा बुक्कावार, चंद्रपूर</p>

अभिनयामुळे समाधान
बार्शीसारख्या लहान गावात जन्म, बालपण आणि शिक्षण झालं. शिकतानाच ‘टायपिस्ट’ म्हणून नोकरीही केली. आपण कमावू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. लग्न होऊन पुण्यात आले. पदवी घेताच एका को- ऑप. बँकेत मला टायपिस्टची नोकरीही मिळाली. पण सासूबाई अर्धागवायूने आजारी व सासरे थकलेले असल्याने नोकरी करायला परवानगी मिळाली नाही. नाइलाजच झाला. नंतर मुलगी झाली. ती लहान असल्याने इतरही काही करू शकत नव्हते.
मग आमची बदली सोलापूरला झाली. पतीराजांचा बेताचा पगार आणि चमच्या चमच्यापासून नवीन संसार मांडायचा होता. मग शिवणाचे मशीन घेतले. लहानपणी आईच्या हाताखाली शिवण शिकल्याने आता झबली, टोपडी, कुंची असा बाळंतविडा शिवायला सुरुवात केली. मग परकर, ब्लाउज, पायजमे शिवायला लागले. हा माझा व्यवसाय जोरात सुरू झाला. मशीन एम्ब्रॉयडरी शिकून साडय़ा विणणेही सुरू झाले. याशिवाय बी.कॉम. असल्यामुळे ऑडिटरच्या हाताखाली हिशोब लिहिण्याचीही कामे केली. यानंतर मात्र आयुष्याला एकदम कलाटणीच मिळाली. सहज म्हणून ‘राज्य नाटय़ स्पर्धेच्या’ एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. शाळा-कॉलेजमध्ये नाटकातून, एकांकिकांमधून भूमिका केल्या होत्या, पण इतक्या वषांच्या गॅपनंतर मी पुन्हा हौशी रंगभूमीवर पाऊल ठेवले आणि ‘नाटय़ कलावंत’ अशी ओळख मिळाली. बालनाटय़ शिबिरे घेतली. लहान मुलांची अनेक नाटकं बसविली. मुलगी ‘संगीत विशारद’ही झाली. आज ती शाळेत संगीत शिक्षिका आहे. नोकरीची महत्त्वाकांक्षा असूनही जरी नोकरी करायला मिळाली नाही तरी इतर आवडीच्या बऱ्याच गोष्टी करता आल्या, अंगभूत गुणांमुळे अर्थार्जन करता आले. नाटकामुळे कितीतरी जिवाभावाच्या मित्रमैत्रिणी मिळाल्या. माझ्या सुखांत आणि आनंदात त्यांचा खूप मोठा वाटा आहे.
– वनिता म्हैसकर, सोलापूर

जे जे मिळेल ते शिकले
स्त्रियांना त्यांचे कुटुंब, त्यांचं घर म्हणजे श्वास. मुलगा शिशुवर्गात जाऊ लागला. त्यानंतर मी एसएनडीटीमधून बाहेरून बीए केले. त्याच दरम्यान माँटेसरी कोर्स केला. ईसीसी कोर्स केला. सेवासदन शाळेत ग्रॅन्टरोडला शिक्षिकेची पहिली नोकरी मिळाली. ‘मी’ कोणीतरी आहे, हे मानाने मला सांगता येऊ लागले. आकाशवाणी केंद्रावर, दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम बसवू लागले. माझा आत्मविश्वास वाढला. पुढे ‘रमाबाई परांजपे’ बालमंदिर विलेपार्ले शाळेत नोकरी मिळाली.
कधी पती तर कधी माझे वडील यांच्या मदतीमुळे मी उभी आहे. दरम्यान ‘नाटय़संगीत डिप्लोमा’ शुभदा दादरकरांनी सुरू केला. तो दोन वर्षांचा अभ्यासक्रम एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण केला. नाटय़संगीताचं निवेदन करण्याची संधी अनेक वेळा मिळाली. अलीकडे काही विषय घेऊन मी उत्तम रीतीने ‘कीर्तन’ करते. त्यासाठी गाण्याचा, बोलण्याचा, नाटय़मय रीतीने कथाकथन करण्याचा उपयोग मला करता येतो.
गावी कोणत्या सोयी नव्हत्या म्हणून रडत बसण्यापेक्षा शहरात आल्यावर जे मिळत गेले ते मिळवत राहिले. कारणे सांगण्यापेक्षा कृती केलेली केव्हाही चांगली.
– प्रणाली पटवर्धन, अंधेरी

स्त्रीच करते स्वत:कडे दुर्लक्ष
मातृत्त्वाच्या नैसर्गिक प्रेमापायी स्त्रीच्या पायात फारच जाडजूड बेडय़ा पडतात. मुलांचे हाल होऊ नयेत, मुले सुरक्षित राहावीत या भावनिक प्रेमापायी स्त्री आपल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करते व कळत असून सुद्धा मागे पडते. उलट पुरुषाला वयात आल्यावरसुद्धा कुठलीच भीती नसल्यामुळे रात्री-अपरात्री किंवा कुठेही दूर जाऊन काम करू शकतो. या सर्वामध्ये स्त्रीने मुले, संसार, नोकरी यांचा समतोल राखून, जोडीदाराला त्याच्या जबाबदारीचे भान देऊन तसेच आपल्याला योग्य अशी सपोर्ट सिस्टीम तयार केली तर स्त्री आपली जास्तीत जास्त प्रगती करू शकते.
– भाग्यश्री पारकर, ठाणे

या जन्मीच जन्मले मी!
लहानपणापासून आईच्या स्त्रीपणाची, बंधनांची, तिला मिळालेल्या दुय्यम वागणुकीची मी साक्षीदार होते. ही चौकट मला माझ्यासाठी मोडायची होती. यातूनच लग्नानंतर शिक्षण पूर्ण करण्याची उमेद जागी झाली. मुलाला पाळणाघरात ठेवत, घरचा व्याप सांभाळत, आईंच्या (सासूबाईंच्या) मनाविरुद्ध नोकरी करण्याचा निर्णय घेतला. ते पैसा कमावण्यासाठी नव्हे तर स्वत:चं अस्तित्व शोधण्यासाठी, स्वत:चा आत्मविश्वास टिकवण्यासाठी. यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, कौंटुंबिक वाद, ताणतणाव यातून स्वत:ला सावरता न आल्याने आत्महत्येचाही प्रयत्न झाला. पण मी त्यात वाचले आणि आमचं नवरा-बायकोचं नातंही तरलं गेलं. यावेळी माझ्या नवऱ्याने घेतलेल्या एका मोठय़ा निर्णयाने आमचं आयुष्य बदलून टाकलं. हा प्रयत्न मी केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझा एम.एसस्सी.चा पेपर होता आणि यांनी मला त्या परीक्षेला बसवलं. या शिक्षणाच्या जोरावरच मी नोकरी करू शकले. जगण्याला मोठं वळण देणारा निर्णय मी घेतला तो म्हणजे ७ वर्षांनी नोकरी सोडण्याचा. ज्यासाठी मी मोठय़ा तडजोडी केल्या होत्या ती नोकरी मुलांना पूर्णवेळ देता यावा आणि स्वत:चं ‘अवकाश’ शोधता यावं यासाठी सोडली ती माझ्या मुलीच्या जन्मानंतर. पण हा चार वर्षांचा थांबा होता. मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर मी एम.ए. सायकॉलॉजीला अ‍ॅडमिशन घेतलं. ज्यात मला स्वत:च्या समुपदेशनातून आवड निर्माण झाली होती. यातच मी आता पुढे माझं करिअर करणार आहे.
– सोनल, औरंगाबाद</p>

शिक्षणाचा उपयोग
माझं शिक्षण एम.एस्सी बायो केमिस्ट्री, बीएडही पूर्ण केलं. सर्व परीक्षेत प्रथम वर्ग होता. लग्न ठरलं तेव्हा मी नोकरी करणारच असं आग्रहपूर्वक सांगितलं नाही. लग्न झालं आणि पूर्णपणे संसारात रममाण झाले. कन्यारत्न झालं. मी क्लासेस घ्यायचा निर्णय घेतला आणि हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली. वयाच्या साठीला मी शांत, समाधानी आयुष्य जगत आहे. स्पर्धा- परीक्षांसाठी मी मार्गदर्शन करते. नुकत्याच आम्ही शाळांमधील प्रयोगशाळा अद्ययावत केल्या. या सर्व गोष्टींत मी मनापासून सहभाग घेते, मला आनंद मिळतो.
– सुषमा भानगांवकर
सोडावीच लागली नोकरी
मी १९७२ मध्ये अभियांत्रिकीची पदविका घेतली. त्या काळी अभियांत्रिकी शाखेकडे मुली तुरळकपणे वळत. त्यातही मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी कोणी विचारही करत नसे. कॉलेजमध्ये आम्ही फक्त दोन मुली होतो. शिक्षण पूर्ण केल्यावर आकाशवाणीवर अभियांत्रिकी विभागात रुजू होणारी मी पहिली मुलगी होते. कालांतराने लग्न झालं. मुंबईला आले. मुलांच्या जन्मानंतर तारेवरची कसरत सुरू झाली. घरून पाठिंबा नव्हता. नोकरी सोडायचं ठरवलं. आर्थिक स्वातंत्र गमावल्याची जाणीव झाली. माझ्या आई-वडिलांनी कठीण परिस्थितीत शिकवलं होतं. मुले मोठी झाल्यावर निसर्गाची आवड असल्याने पर्यावरणाचा अभ्यास केला. अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत काम करू लागले. मागे वळून पाहताना जाणवतं खूप काही गमावलं. पण अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिकले. समाधान मानते आहे.
– ममता निमकर, भांडुप

हेच तिचं भागधेय?
आज कितीतरी उच्चशिक्षित मुली लग्न झाल्यावर आपलं शिक्षणातून मिळवलेलं असामान्यत्व गुंडाळून ठेवून सामान्य गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी राजी होताना दिसतात. परमुलखात किंवा परदेशात नोकरीसाठी जाणं भाग पडलं तर प्रत्येक ठिकाणी पती-पत्नी दोघांनाही नोकरी मिळेल याची खात्री नसते अशा वेळी मूल झाल्यावर आई म्हणून जबाबदारी पार पाडायची असेल तर नोकरी सोडणं हाच एकमेव पर्याय मुलींच्या वाटय़ाला येतो. एका मुलीचं उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्यावर शासनाकडून किती खर्च केला जातो, तिचं कुटुंब त्यावर किती खर्च करतं, तिचे वैयक्तिक कष्ट आणि वेळ किती खर्च झाला आणि या सर्वाचं फलित म्हणून काही वर्षांनी केवळ गृहकृत्य आणि बाल संगोपन हेच तिचं भागधेय असावं का? त्यासाठी पालक आणि मुलींनी आधीच विचार करायला हवा. तिचं शैक्षणिक करिअर घडविण्याचं कर्तव्य पार पाडत असताना भविष्यात येणाऱ्या समस्या कशा रीतीने तिला हाताळाव्या लागतील त्यासाठी तिची मनोभूमी कशा प्रकारे तयार करून ठेवता येईल.
– मोहन गद्रे, कांदिवली मुंबई

सुवर्णमध्य गाठला
वीस-बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. उत्तम गुण असल्यामुळे वर्षभरातच ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेत ‘प्रोजेक्ट फेलो’ म्हणून रुजू झाले. पण मुलीच्या जन्माच्या वेळेस मात्र नोकरी सोडावी लागली. पती नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्यामुळे व घरी सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे पूर्णवेळ नोकरी करणं शक्यच नव्हतं. त्याच सुमारास महाविद्यालयात पर्यावरण व्यवस्थापन हा नवीन विषय शिकवायची संधी चालून आली शिवाय उन्हाळी शिबिरं सुरू केली. विविध वृत्तपत्रं आणि दिवाळीअंक, मासिकांमधून माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले. शैक्षणिक गुणवत्ता व अन्य क्षमता असूनही काचेचं छत फोडून छान करिअर करता आलं नाही हा विचार येऊन कधी कधी मन नाराज होतं. पण नोकरी व लिखाणाचा छंद, घरातील सर्व जबाबदाऱ्या, मुलीच्या उत्तम संगोपनासाठी धडपड यांचा सुवर्णमध्यही मी माघार घेतल्यामुळेच गाठता आला हे नाकारताही येत नाही.
– रेणुका मुजुमदार, नागपूर.

जाणिवांची ओळख पटणं गरजेचं
बालपण अतिशय खडतर आणि परंपरेच्या ओझानं दबलेल्या वातावरणातून गेलेलं. १९ व्या वर्षी लग्न झालं तेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होते. लग्नानंतर शिक्षणासाठी तसा व्यत्यय जरी कमी आला तरी नोकरी करण्याच्या धडपडीत मात्र अनेक अडचणी येत होत्या. बरेचदा मी न सांगता स्पर्धा परीक्षा देत गेले. घरच्यांना माझं बाहेर जाणं आवडत नव्हतं. पण न डगमगता नोकरी मिळवली. पण कुटुंबीयांनी नाउमेद केलं. कुटुंबातल्या कठीण प्रसंगांना उत्तर देत आजही मी माझ्या क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात बिनधास्त काम करते आहे. कारण स्त्रियांना स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि प्रथम एक व्यक्ती म्हणून जगताना तिच्या जाणिवांची ओळख तिलाच पटणं गरजेचं आहे, असं मी मानते.
– वैशाली शेंडे

पेरणी आपण करावी
मी व्यावसायिक आणि घरगुती जबाबदाऱ्या पेलताना माझी पुढची पिढी याबाबतीत संवेदनशील बनेल याची काळजी घेते आहे. माझ्या मुलाच्या जडण -घडणीच्या वयात मी त्याला भावी आयुष्यातील सहचारिणीच्या बरोबरीने घर सांभाळत व्यवसायात पुढे जाण्याची शिकवण दिली आहे. पेरणी मी केली आहे. त्यामुळे उद्या पीक चांगलंच येईल अशी अपेक्षा करतेय.
– डॉ. मंजुषा पाध्ये

पुढची पिढी घडावी
बी.आर्च.चं शिक्षण पूर्ण होताच लग्न केलं. नोकरी आणि संसार दोन्ही करायचं तर ओढाताण ही होणारच सासू-सासरे व नवरा यांनी साह्य़ केलं तरी ती मदतच असणार होती. मदत मागताना, घेताना मनात अपराधी भावना यायचीच. नंतर मुलीचा जन्म झाला. जणूकाही तिच्या संगोपनाची जबाबदारी फक्त माझीच आहे असं समजून साहजिकच तिला प्राधान्य दिलं. नवऱ्याने आणि मी विचारविनिमय करून घरीच एक छोटंसं ऑफिस थाटलं नि कन्सल्टसी सुरू केली. मात्र करिअरला दुय्यम स्थानच देण्यात आलं. नंतर नवऱ्याची मुंबईला बदली नि बढती झाली. अर्थातच मी आणि मुलगी त्यांच्यासोबत मुंबईला राहायला आलो. नवरा उच्च पदावर, ऑफिसर, त्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या तशा माझ्या घरातल्या. माझ्या कामांचा आलेख उतरायला लागला होता. थाटलेला संसार सांभाळून व्यस्त, अतिव्यस्त आयुष्याची ओढाताण स्वीकारायची तयारीही नव्हती. इतक्या वर्षांत पुढे निघून गेलेल्या जगात बाहेर पडून नोकरी परत करण्याची आत्मशक्ती राहिली नव्हती. वयाच्या
३८ व्या वर्षी महत्त्वाकांक्षेला गवसणी घालण्याची ताकद, आत्मविश्वास कमी झाल्याने घुसटम तर होणारच. सगळं असूनही समाधान हरवलं होतं. म्हणून वाटतंय की, कुटुंब हे ओझं नसून एक जबाबदारी आहे. जी कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवर समान आहे हे बाळकडू पुढच्या पिढीला पाजायला हवं.
– स्वप्ना साधनकर

वेगळ्या क्षेत्रातली भरारी
लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. डबल एम.ए. केले. मुंबई विद्यापीठातून इंग्लिश लिटरेचर आणि थिएटर आर्ट्स केलं, पण नवऱ्याच्या नोकरीमुळे आधी मुंबई सोडावी लागली आणि नंतर देश. भारतातून डेन्मार्कला आले आणि माझी ओळख म्हणजे एका इंजिनीअरची बायको आणि शौर्यची आई एवढीच राहिली.
हळूहळू शौर्य शाळेत जाऊ लागला. त्याला पौष्टिक व रोज नवनवीन पदार्थ बनवून देण्यासाठी इंटरनेट शोधायचे. एके दिवशी असाच सकाळी डब्बा भरत असताना शौर्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘आई माझे मित्र जेव्हा माझा जेवणाचा डबा पाहतात तेव्हा ते विचारतात की तुझी आई शेफ आहे का?’’ मनात यायला लागले आपण पण अशा रेसिपीज करून यु टय़ूबवर अपलोड केल्या तर? थिएटरची स्टुडंट असल्यामुळे कॅमेऱ्यासमोर रेसिपी करायला काही नाही वाटले. पहिली रेसिपी शूट करून एडिटिंग सॉफ्टवेअर वर स्वत: एडिटिंगला बसले. जवळ जवळ दोन आठवडय़ांनी माझा पहिला व्हिडीओ बनला आणि तो मी यू टय़ुबवर Tastebeat [http://www.youtube.com/user/tastebeat] या माझ्या स्वत:च्या चॅनेलवर अपलोड केला आणि तिथून सुरुवात झाली. घरबसल्या थोडे फार अर्थाजन सुरू झालेय. आता टेस्टबीट चालवता चालवता दुसरी प्रेग्नेंसी पण पार पडलीय. अक्ष आणि शौर्य या दोन मुलांना सांभाळून टेस्टबीटचे काम जोरदार सुरू आहे. मनात कोणतीही खंत नाही. घर सांभाळून मनासारखं काम करते आहे. लवकरच ब्लॉग आणि वेबसाइट पण काढायचा विचार आहे.
– सुप्रिया देवकर

बदल घडतो आहे
आमच्या पिढीने संसार केला. त्रास झाला, राग आला पण बंडखोरी केली नाही. स्त्रीमुक्ती सतत मान वर काढत होती, पण समाजाची मानसिकता बदलायला अवकाश पाहिजे. कामाची विभागणी गरजेची आहेच पण ती आनंदाने स्वीकारली तरच कामात मजा असते. पूर्वीची मानसिकता आता बदलली. आज पुरुष स्वयंपाक करतात, भाजी आणतात, घरातली इतर काही कामे करतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्थाच आता बदलते आहे. त्यापेक्षाही वेगळे चित्र पुढची पिढी भोगतेय. लग्न करून बदलीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणारे स्त्री-पुरुष आहेत. काही महिने/दिवस नोकरीमुळे घराबाहेर जाणारे आहेत. बदलत्या सुट्टय़ा, बदलत्या वेळा घराने स्वीकारल्या आहेत. काही कुटुंबात एक कॉमन सुट्टी नसते. (काहींना रविवारी कामावर जावं लागतं) हे सर्व सुधारलेल्या समाजाचं चित्र नाही का?
आजकाल स्त्रिया या लग्नानंतर नावही बदलत नाहीत. पासपोर्टपासून आधारकार्ड, पॅनकार्ड यावर पहिलंच नाव असतं, त्यामुळे ते बदलणं कठीण आहे हे पुरुषाने मान्य केलंय. आता स्त्रीची क्षमता फक्त घरातच राहून सिद्ध करण्याचे दिवस संपले.
– सुषमा फडके, कल्याण</p>

‘रूढी-परंपरेत बदल हवा’
नोकरी करताना स्त्रीला सतत वाटत असते की तिच्या नोकरीमुळे घरातल्या मंडळींची आबाळ होते आहे. मुलांच्या खाण्यापिण्याकडे तसेच अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आहे. मग ती स्वत:कडे लक्ष न देता कुटुंबाचे हित जोपासते. माझ्या बऱ्याच मैत्रिणी घरी सुग्रास स्वयंपाक करून जेवण्यास वेळ नाही म्हणून डबा घेऊन येतात. ज्यांच्या घरी सासू, सासरे आहेत त्यांना त्यांच्याआधी जेवण घेणे योग्य वाटत नाही. मग यायचे फक्त नाश्ता करून. सणासुदीचा स्वयंपाक करताना उशीर होऊन जातो आणि मग न जेवता आल्यामुळे अ‍ॅसिडीटी वाढते. माझ्या मैत्रिणीला अवेळी जेवताना बघून मला आश्चर्य वाटले. म्हणाली, ‘‘अगं स्वयंपाक केला. पण पूजा व्हायची होती आणि नैवेद्य पण राहिला. आता नैवेद्य दाखवल्याचा फोन आला त्यानंतर जेवतेय.’’ नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतेय. शंभर वर्षांपूर्वीचे चित्र होते ते पूर्णपणे बदलले आहे पण आमच्या रूढी-परंपरा? त्या तशाच आहेत. सण, समारंभ, व्रतवैकल्ये यांचा नेमका उद्देश काय? जाचक नियमांमुळे जर ते कष्टप्रद होत असतील तर ते साजरे करून आम्ही काय मिळवतो? आम्ही शिक्षित आहोत, प्रथेचा, रूढी-परंपरेचा योग्य उद्देश लक्षात घेऊन, समयोचित बदल करून आम्ही ते साजरे केले तर नोकरी, व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची ससेहोलपट कमी होईल.
– संगीता जोशी-विवरेकर

घरच्यांचा पाठिंबा
गेली तीस र्वष मी एका नामवंत कंपनीत नोकरी करते. पण मी एकटी कधीच पडले नाही. मी एक साधी ऑपरेटर आहे. अधिकाराच्या जागेवर नाही, तरीही २४ तास चालणाऱ्या अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या या कंपन्यांमध्ये काम करणे वाटते एवढे सोपे नाही. तेथे हजेरीला खूपच महत्त्व असतं. कंपनीतल्या सर्वाना मदत करून सगळे सण साजरे करावे लागतात. महत्त्वाची गोष्ट माझ्या सासूबाई व माझे पती गेली तीस र्वष पूर्णपणे सांभाळून घेतात. म्हणून मी ही नोकरी करू शकले. माझ्या यशात माझ्या सासूबाई व माझे पती यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून मी आजही उत्तमरीत्या माझे काम सांभाळत आहे. त्या दोघांचा मला अभिमान वाटतो.
– उषा ठाकूरदेसाई, डहाणू रोड

शलाका साठे (मुंबई), अंजली यावलकर (मुंबई), वासंती सिधये (पुणे), सुजाता मेहता (ठाणे), राम शेळके (नांदेड), लोटन पाटील (बदलापूर), नीलम, उज्ज्वला, नीलिमा पाटील, हेमंत घायाळ,(सिकंदराबाद), शलाका कुलकर्णी (सातारा), सरला शिंदे (अंधेरी, मुंबई), सुलोचना कुलकर्णी (डोंबिवली), डॉ. नूतनकुमार पाटणी (औरंगाबाद) याचीही पत्र आम्हाला मिळाली मात्र जागेअभावी ती घेता आली नाहीत.