शिक्षण घेण्यासाठीचा संघर्ष असो की नोकरीसाठी बाहेर पडण्याचा, प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला संघर्ष करावा लागला. एका पिढीने तो केला आणि नंतरच्या पिढीने त्याची फळं चाखली. पिढय़ान्पिढय़ा स्त्रीमधून तिची प्रगतीही झिरपत राहिली. नोकरीसाठी बाहेर पडून, काम आणि कुटुंब याच्यातली कसरत करत, प्रसंगी कुटुंबीयांना हाताशी घेत, सपोर्ट सिस्टीम तयार करत काम करण्यालाही आता दशकं लोटली आहेत.. तरीही काहींचा संघर्ष अजूनही त्याच पातळीवर सुरू आहे, पण खरा संघर्ष त्यापुढचा आहे.. पुढच्या पिढीचा आहे.. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठ पदे मिळवण्याचा.. ग्लास सिलिंग वा काचेचं छत भेदण्याचा! ‘आजही अडवतंय काचेचं छत?’ या लेखावर वाचकांनी पाठविलेल्या पत्रांसह या स्थितीचा आढावा..

आजही असंख्य स्त्रियांना पारंपरिकता की आधुनिकता यासाठी झगडावं लागत आहे. कधी मानसिक पातळीवर तर कधी सामाजिक. आधुनिक विचार तर पटत आहेत परंतु वर्षांनुर्वष चालत आलेल्या परंपरेचं जोखड झुगारून देणं मनाच्या पातळीवर अनेकींना शक्य झालेलं नाही. हजारो वर्षांची परिस्थितीशरण मानसिकता रक्तांमधून पिढय़ान्पिढय़ा झिरपली गेली असल्यानं बाई म्हणून वाटय़ाला आलेली दुय्यमता झिडकारणं अनेकींना शक्य झालेलं नाही. ज्यांना ते शक्य झालं त्यांनी आपल्या आयुष्याला आकार दिला. स्त्री म्हणून मागे राहाणं नाकारलं. शिक्षण घेण्यासाठीचा संघर्ष असो की नोकरीसाठी बाहेर पडण्याचा, प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला संघर्ष करावा लागला. एका पिढीने तो केला आणि नंतरच्या पिढीने त्याची फळं चाखली. पिढय़ान्पिढय़ा स्त्रीमधून तिची प्रगतीही झिरपत राहिली. नोकरीसाठी बाहेर पडून, काम आणि कुटुंब याच्यातली कसरत करत, प्रसंगी कुटुंबीयांना हाताशी घेत, सपोर्ट सिस्टीम तयार करत काम करण्यालाही आता दशकं लोटली आहेत.. तरीही काहींचा संघर्ष अजूनही त्याच पातळीवर सुरू आहे, पण खरा संघर्ष त्यापुढचा आहे.. पुढच्या पिढीचा आहे.. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठ पदे मिळवण्याचा.. ग्लास सििलग वा काचेचं छत भेदण्याचा!

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

आर्थिकदृष्टय़ा स्त्री स्वावलंबी झाली आहेच.. होते आहेच.. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जगातल्या १०० सर्वाधिक पगार घेणाऱ्यांत भारतीय वंशांचे तिघेजण आहेत आणि त्यात पेप्सीकोच्या सीईओ इंद्रा नुयी २ कोटी २२ लाख डॉलर्स घेत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांना हे ग्लास सििलग भेदणं शक्य झालं. त्या वरिष्ठपदावर पोहोचलेल्या आहेत, महत्त्वाचे निर्णय घेत कंपनीला मोठं करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहेच, पण आजही कित्येकजणी या वरती जाण्याच्या शिडीच्या मध्यावरच थांबल्या आहेत तर काही अजून शिडी चढायचा प्रयत्नच करत आहेत. वरच्या पदावर जास्तीत जास्त स्त्रियांनी जावं यासाठी भारतात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. सेबीच्या २०१३ कंपनी अ‍ॅक्टनुसार प्रत्येक नोंदणीकृत कंपनीच्या बोर्डवर एक तरी स्त्री संचालक असणं सक्तीचं आहे. त्यानुसार अनेकजणी या पदावर पोहोचल्या, मात्र आजही ५६ टक्के कंपन्यांमध्ये संचालकपदावर स्त्री नाही. आज भारतात सुमारे १७ हजार स्त्रिया मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये वरच्या, महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. पण ही संख्या खूपच कमी आहे. आपल्याकडेच नाही तर अगदी परदेशातही एकतृतीयांश कंपन्यांमध्ये स्त्रिया वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. इतर कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर पोहोचलेल्यांची संख्या ५० टक्क्य़ांपर्यंत गेली, पण स्त्री सीईओंची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमीच आहे. हे का होतंय, याच्या कारणांपैकी काही कारणांचा ऊहापोह ‘अजूनही अडवतंय काचेचं छत?’ या प्रियदर्शनी हिंगे यांच्या लेखात ( ९ एप्रिल) मध्ये वाचला असेलच त्यावर केलेल्या आवाहनानुसार अनेक वाचक स्त्रियांनी आपापले अनुभव पाठवले. अर्थात अगदीच थोडे अपवाद वगळता सगळ्यांनीच परिस्थितीमुळे, विशेषत: नवऱ्याची बदली, नोकरी केली नाही पण स्वत:मधल्या गुणांना कसं वाढवलं त्यातून अर्थाजनही कसं शक्य झालं याची उदाहरणे दिली आहेत. या सगळ्यांच्या मतांचा, अनुभवांचा आम्ही आदरच करतो. मात्र काहीजणींना शक्य असूनही मागे राहणेच पत्करले आणि नंतर माझ्या गुणांचा वापर कसा केला याचेच गोडवे गायले आहेत. या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे मला आयुष्यात संसार करण्यापलीकडे वेगळं काही करायचं आहे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याबरोबरच माझ्यातल्या नेतृत्वगुणांचा, इतर गुणांचा उपयोग करायचा आहे या जाणिवेचा अभाव. अनेकींनी टय़ुशन क्लासेस सुरू केले, एकीने तर ऑनलाइन रेसिपी शोही सुरू केला, पण अनेकींसाठी ती तडजोडच होती. भले त्यातून आता समाधान मिळत असेलही, परंतु तो काही काळ मानसिक संघर्षच होता. अनेकजणींनी मात्र आयुष्य जसं नेतं तसं स्वीकारलं आहे, अर्थात त्यात काही वेळा मुलींचं आयुष्य चूल-मूल यांच्यापुरतंच असतं ही घट्ट मानसिकता, लहान वयामुळे क्षीण आवाज, शिक्षणाचा अभाव, माहेर-सासरची नकारात्मक मानसिकता, बंडखोरीची भीती यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता, त्यामुळे अनेकींनी तिथेच आपलं आयुष्य थांबवलं. यातल्या अनेकींच्या मनात जर संधी मिळाली असती तर मीही काही करून दाखवलं असतं, अशी अतृप्ती असतेच.
अर्थात काही जणींनी आपल्याला नोकरी-व्यवसाय काहीही करायचा नाही, विशेषत: लग्न वा मूल झाल्यावर, हे नक्की ठरवलेलं असतं. तसं ठरवायला काहीच हरकत नाही. एखादीला तसं वाटत असेल तर तिच्या मताचा आदर केलाच पाहिजे. माझ्या ओळखीतल्या एकीने असा निर्णय घेतला होता त्यामागे कारण होतं ते तिच्या आईची नोकरी. ही दुपारी शाळेतून घरी आली की कुलूप तिचं स्वागत करायचं, टेबलावर काढून ठेवलेलं थंडगार जेवण जेवायला लागायचं, गरजेच्या वेळी अनेकदा आई बरोबर नसायची. या सगळ्यांचा राग येऊन मी माझ्या मुलांवर अशी वेळ येऊ देणार नाही, असं ठरवत नोकरी न करण्याचा निर्णय तिने घेतला होता. पण अनेकींना कौटुंबिक अडचणींमुळे नोकरी करता येत नाही आणि त्या नाऊमेद होतात. पर्याय शोधत नाहीत, सगळा राग किंवा दोष परिस्थिती, कुटुंबीयांना देत घरी बसतात. अर्थात परिस्थिती बदलत चालली आहे. या लेखासोबत प्रकाशित होत असलेल्या पहिल्याच अंजली देसाई या सीईओ असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरचं पत्र याचं उत्तम उदाहरण आहे. मला आयुष्यात काय करायचं आहे, याचं नेमकं भान असेल तर थोडय़ा तडजोडी करत वरची पदे मिळवणं सहज शक्य असतं. किंवा डॉ. संजीवनी राहाणे यांचा अनुभव, घरातल्या जेष्ठाची मदत हवी असेल तर त्याचा गैरफायदा न घेता ते नातं अधिक सकस कसं करता येईल हे पाहिलं तर आयुष्यात जे मिळवायचं आहे ते मिळवता येईल हेच सांगतो.
अर्थात ‘.. काचेचं छत’ या लेखात स्त्रीचं स्त्री असणं किंबहुना आई होणं हेच अनेकदा तिच्या प्रगतीच्या आड येत गेलं, हा मुद्दा आला आहे. आणि वाचकांचा प्रतिसादही त्याच अनुभवातून आला. मात्र त्याही पलीकडचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तिच्या उच्च पदावर जाण्याचा. त्यासाठी ती स्वत: अडथळा ठरते आहे का? तिचा आत्मविश्वास, नेतृत्वगुणाची कमतरता तिला मागे खेचते का? फेसबुकच्या सीईओ शेरील सॅन्डबर्ग यांनी २०१३ मध्ये स्त्रियांना उद्देशून लिहिलेल्या आपल्या ‘लिन इन’ पुस्तकात हा मुद्दा चांगल्या पद्धतीने चर्चिला गेलाय. परंपरागत दुय्यमपणा स्त्रीच्या हाडामांसात इतका भिनलेला असतो की अनेकदा ती स्वत:ला पुरुषांच्या तुलनेत कमीच लेखते. २०१२ साली घेतलेल्या एका चार हजार जणांच्या सव्‍‌र्हेक्षणात ३८ टक्के पुरुषांनी वरिष्ठ पदावर जाण्याची इच्छा प्रकट केली होती तर त्या तुलनेत फक्त १८ टक्के मुलींनी पुढे जाऊ शकण्याची हिंमत दाखवली होती. जेव्हा वरिष्ठ पदाचा विचार होतो तेव्हा साहजिकच ते अतिमहत्त्वाचं, आव्हानात्मक आणि मोठमोठय़ा जबाबदाऱ्या असणाऱ्या असल्याने स्त्रियांपेक्षा पुरुषांचाच विचार अधिक होतो. स्त्रीला त्यासाठी गृहीतच धरलं जात नाही, वा नव्हतं. इतकंच कशाला ती अतिमहत्त्वाकांक्षी आहे, हे वाक्यही तिच्यासाठी कॉम्प्लिमेंट म्हणून कधी घेतलं गेलं नाही, असं शेरील सांगतात. लहानपणापासून लग्न याच गोष्टीकडे लक्ष ठेवण्याचा सामाजिक दबाब एक प्रकारे मुलींवर असतो. म्हणूनच बदलत्या काळात घरच्या पातळीवरच मुलीला वेगळं काही करून दाखवण्याची इच्छा रुजवणं गरजेचं झालं आहे.
एचएसबीसी इंडियाच्या देशातील प्रमुख आणि सरव्यवस्थापक पद भूषविलेल्या नैना लाल किडवई. १९८२ ला हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी मिळवलेली ही पहिली भारतीय स्त्री. त्यांच्या ३० र्वष आधीपासून भारतीय पुरुष तिथे शिकत होता. त्यांना जेव्हा पहिलं मूल झालं तेव्हा नोकरी सोडण्याचा दबाव त्यांच्यावरही आलाच, परंतु या टप्प्यावर नोकरी सोडली तर पुढे जाऊ पाहणाऱ्या स्त्रियांसाठी हा चुकीचा संदेश ठरला असता, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली नाही. उलट त्याचा फायदा असा झाला की, त्या व्यवस्थापक झाल्या तेव्हा स्त्रियांसाठी फ्लेक्झिबल अवर्स, मॅटर्निटी लीव्ह वाढवणे, योगा क्लासेस, पॅरेिन्टग क्लासेस, पॅटर्निटी लीव्हसारख्या सोयीसुविधा उपलब्ध करू शकल्या. अलीकडेच ‘लोकसत्ता’च्याच कार्यक्रमात बोलताना, पहिल्या फायर इंजिनीअर हर्षिणी कन्हेकरांनी आपला अनुभव सांगितला. ‘‘नागपूरच्या नॅशनल फायर सíव्हस कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी मी पहिली स्त्री होते. त्यावेळी या क्षेत्रात बाईचं काय काम अशीच सगळ्यांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी होती. ती दृष्टी बदलण्यासाठीच पुढची तीन वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता, पुरुषांनाही अवघड वाटणारं कठीण प्रशिक्षण घेतलं. त्यासाठी अपार मेहनत घेतली. त्याचं फळस्वरूप आज त्या कॉलेजमध्ये आणखी सहा मुलींनी प्रवेश घेतला आहे.’’ स्त्रीला वरच्या पदावर पोहोचण्यासाठी अशी किंमत मोजावी लागतेच आहे. पण त्यातून पुढच्या पिढीची वाट सोपी होते आहे.
वरची पदे देणारं पारंपरिक शिक्षणापलीकडचं शिक्षण घेण्याकडे मुलींचा कल वाढलेला आहे. महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशनचे संचालक (मुंबई) डॉ. सुभाष महाजन यांच्यानुसार गेल्या दोन-तीन वर्षांत मुलींचा टेक्निकल, इंजिनीअिरगकडे कल ३० टक्क्य़ांनी वाढला आहे. आय.टी., कॉम्प्युटर एज्युकेशन, टेलीकम्युनिकेशन यातही जवळ जवळ २० टक्के मुली असतात. इतकंच नाही तर मेकॅनिकल इंजिनीअिरग(७ टक्के), सिव्हिल इंजिनीअिरग (११ टक्के)कडेही मुली वळत आहेत. हल्ली परदेशात उच्च शिक्षण घ्यायला जाणंही वेगाने वाढते आहे.
मात्र या मुली आपलं शिक्षण नोकरी-व्यवसायात परावर्तित करतात का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहेच. कारण त्याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. शिक्षणाच्या तुलनेत नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुली कमी आहेत हे मात्र नक्की. त्याचे कारण पुन्हा पारंपरिक, लग्न आणि कुटुंब! यासाठीचा सुवर्णमध्य म्हणजे योग्य वयात लग्न करणं. आजकाल मुली नोकरीला प्राधान्य म्हणून लग्न लांबवतात. खरं तर काही गोष्टी वेळेत होणं हे स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाच्या आहेतच. तुम्ही जर लग्न करणारच आहात तर वेळेत का नको? २४-२५ वयात लग्न आणि मूलही झालं की योग्य वेळी तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून बाहेर पडू शकता. मूल वा मुलं लहान असतात त्यावेळी मुलांना आईची शारीरिक जवळीक गरजेची वाटते. त्यावेळी तुमचं वयही लहान असल्याने नोकरी आणि कुटुंब ही कसरत करण्याची ताकद असते. मूल मोठं होत जातं तसं तुमच्या प्रत्यक्ष असण्याची गरजही कमी होत जाते आणि तुम्हाला नोकरीतील आव्हाने स्वीकारणे, वरची पदे मिळवणे शक्य होते. पण मुलांसाठी नोकरीच सोडून बसणं हा पर्याय होऊ शकत नाही. अन्यथा मुलं मोठी झाली की एक मोठं शून्य समोर उभं राहातं. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे हे जर नक्की असेल, त्यावर तुम्ही ठाम असाल तर मार्ग निघतोच. त्यासाठी नुसतं उच्चशिक्षण घेऊन उपयोग नाही. त्या शिक्षणाचा उपयोग करायला हवा. कारण तो पर्यायाने देशालाही प्रगतीपथाकडे नेणारा असतो.
एडलवाईज फायनान्शियल सíव्हसेसच्या डायरेक्टर विद्या शहा याबाबतीत खूप सकारात्मक आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘आजची पिढी ही खूपच महत्त्वाकांक्षी आहे. त्यांना पक्कं माहीत आहे की कशा प्रकारे पुढे जायचं आहे. काही जणींचे तर पुढचे नियोजन खूप स्पष्ट असते. अनेक पर्याय समोर असतात. मात्र तरीही त्यांना सातत्याने ग्रुम करणे गरजेचे असते. आमचा एक वुमन मेंटॉर ग्रुपच आहे, जेथे आम्ही तरुण मुलींना सतत मार्गदर्शन करत असतो. कंपन्यांनीही स्त्रियांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तुमची पुढे जायची तयार पाहिजे, त्यासाठीची मेहनत पाहिजे, बाकी सर्व आपोआप होतच.’’ तर दीपक फर्टलिायझरच्या संचालिका
पारुल मेहता म्हणाल्या, ‘‘एके काळी खरंच असं होतं की स्त्री घरी असायची आणि पुरुष बाहेर पडायचा. ते स्वीकारलेलंच होतं, पण काळानुसार ते बदलत जातंय. आमच्या घरातून आम्हा भावंडांना प्रोत्साहनच मिळालं त्यामुळे आम्ही तिघंही वरिष्ठ पदावर आहोत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवं आहे, हे उच्चशिक्षण घेतानाच ठरवायला हवं. आजचे पालक मुलांना प्रोत्साहन देत असतात. आणि लग्नानंतरही तुम्ही ठरवलं तर कुटुंब आणि काम यांच्यात तोल साधता येतो. मुलांनाही त्यांना हवा तो वेळ देता येतो. हां काही वेळा तुमचे छंद, सण- सभारंभ, कार्यक्रम यांना तिलांजली द्यावी लागते. पण घरातच वातावरण तयार केलं तर काहीही अशक्य नाही.’’
हेच मत मांडलं सुप्रिया निकम यांनी, त्यांची बँकेतील नोकरी पती प्रकाशने पूर्णार्थाने समजून घेतली. त्या म्हणाल्या, ‘‘माझी नोकरी माझ्यासाठी गरजेची होती, ही गरज माझ्या पतीने समजून घेतली आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला म्हणूनच मी सहजपणे नोकरी करू शकले, पदं मिळवत गेले. त्याची शिफ्ट डय़ूटी त्यासाठी मदतीची ठरली. पण अनेकदा तो नाइट डय़ूटी घ्यायचा त्यामुळे मुली दुपारी घरी आल्या की त्यांना जेवण द्यायला, अभ्यास घ्यायला हा घरी असायचा. अनेकदा तर रात्री मला खूप उशीर झाला तर आल्या आल्या मला गरमागरम जेवण हातात मिळालेलं आहे. आम्ही दोघांनी मिळून सारं सांभाळलं, पण बढती मात्र मी मुली मोठय़ा झाल्यावरच घेतली. कारण त्याच्या अनुषंगाने बदली होणार हे मला माहीत होतं. मी बदलीच्या ठिकाणी एकटी जाऊन राहिले. तेव्हा मुली आणि प्रकाशमुळे निर्धास्त काम करू शकले.’’
तुमच्या नोकरी-व्यवसायाची घराला असणारी गरज जशी समजून घेतली जाते तसं तुमचं पुढे जाणं, उच्चपदस्थ होणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे घरच्यांनी समजून घेतलं तर आजच्या स्त्रीला कोणीच अडवू शकणार नाही. कारण मुली उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांच्यात आत्मविश्वासही वाढतो आहे. काही कंपन्यांनी सुरू केलंच आहे पण बहुतांश कंपन्यांनीही ‘वर्क फ्रॉम होम’, वेळेची लवचीकता, त्यांना विविध टप्प्यांवर प्रशिक्षण आदी सुविधा देऊ केल्या, तर जास्तीत जास्त मुली नक्कीच वरिष्ठ पदे भूषवू शकतील. कारण नोकरी-व्यवसाय करायला सुरुवात करून आता खूप वर्षे झालीत. आता पुढे जायचंय. मोठमोठी पदे मिळवत आपलं कर्तृत्व अधिक झळझळीत करायचं आहे. ते पर्यायाने स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि त्याच्या पार पलीकडे देशासाठीही खूप खूप महत्त्वाचं आहे. काचेचं छत भेदायलाच हवंय..
chaturang@expressindia.com