जेऊर या खेडेगावात रूपा कणमुसे यांनी सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राबरोबर बाहेरही नॅपकिन बनवण्याची युनिटे उभारून अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. साबण आणि तयार कपडय़ांच्या निर्मितीचा डोलाराही त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्यातल्या उद्योजिकेचा हा प्रवास.

अक्कलकोट जवळचं जेऊर हे एक खेडेगाव. या गावाचा लौकिक आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक व मध्य प्रदेश येथे पोहोचला आहे. ही किमया केली आहे महिलांना सक्षम बनवणाऱ्या जेऊर येथील ‘श्री जीवनज्योती महिला विकास बचत’ गटानं. रूपा इरण्णा कणमुसे या गटाच्या संस्थापिका. साधारणत: नऊ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या व्यवसायासाठी वेगळीच वाट निवडली, सॅनिटरी नॅपकिन बनविण्याची. त्याकाळी तरी ते मोठं धाडसाचं काम होतं. पण आज या कामाची उलाढाल कोटी रुपयांच्यावर गेली आहे. सॅनिटरी नॅपकिन बनवणारा महाराष्ट्रातील हा पहिला बचत गट होय.
रूपाताई लग्नानंतर जेऊरला आल्या. जुलै २००७ मध्ये येथील १४ महिलांना घेऊन त्यांनी बचतगट स्थापन केला. ग्रामीण स्त्रियांचे अनारोग्य आणि त्यामागे असणाऱ्या कारणांनी रूपाताई कायम अस्वस्थ होत्या. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं काम हाती घ्यायचं हे त्यांनी निश्चित केलं. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यानं जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून ‘शुद्ध पाणी स्वच्छ गाव’ हा प्रकल्प राज्यात राबविला जात होता. या प्रकल्पाचे तज्ज्ञ महादेव जोगदंड यांच्या मदतीनं त्यांनी तामिळनाडूतील ‘त्रिची’ गाठलं. तिथे ‘विमेन’ या स्वयंसेवी संस्थेकडून ३ दिवसांत नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं.

What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

‘प्रशिक्षण घेतलं पण बाया-बापडय़ांची मनं कशी वळवायची’ हा त्यांच्यापुढील गहन प्रश्न. हताश होऊन गप्प बसणं हा बायकांचा धर्म नोहेच. प्रथम त्यांनी बचत गटातील वयस्कर बायकांना विश्वासात घेतलं. आपल्या मुली, सुना यांना अस्वच्छ कपडय़ांमुळे होणारे आजार यांची माहिती दिली. सॅनिटरी नॅपकिनमुळे त्यांचे आरोग्य चांगलं कसं राहील हे त्यांना पटवून दिलं. त्याला यश आलं व १५ महिला तयार झाल्या. इतकंच नव्हे त्यांनी अडीच लाख रुपये जमा केले. सर्वात कठीण काम होतं पुरुषवर्गाला विश्वासात घेणे. तिथे त्यांनी युक्ती वापरली. सरपंचांनाच प्रथम विश्वासात घेतलं. सरपंच राजी झाल्यानं जागेचा प्रश्न सुटला. नाममात्र भाडय़ावर जागा मिळाली. २००९ पासून साध्या पद्धतीनं ‘निर्मल सॅनिटरी नॅपकिन’ची निर्मिती सुरू झाली. २५ लाख रुपयांचं कर्ज बँकेकडून घेतलं आणि ३२ लाख रुपयांचा प्रकल्प उभा केला.

आज त्यांनी महाराष्ट्रात २५ जिल्ह्य़ात सॅनिटरी नॅपकिननिर्मितीची युनिट्स स्थापन केली आहेत. शिवाय कर्नाटकात अफजलपुरम् येथे, सिक्कीममधील गंगटोक येथे, सिमला-बग्गी, बिहार कर्नानेपुरम्, छत्तीसगडमधील बिलासपूर अशा अनेक ठिकाणी ही युनिटस् दिमाखात उभी आहेत. प्रत्येक ठिकाणी रूपाताई आणि त्यांचे पती स्वत: जाऊन महिलांना प्रशिक्षण देतात. उत्पादन तयार येईपर्यंत सर्वतोपरी मदत करतात. त्या त्या गावापासून २० कि.मी. अंतरावरील सर्व घरांशी संपर्क साधून त्यातून कमीत कमी ५ हजार घरांशी व्यवहार साधला जातो. यासाठी त्यांना सरकारचीही मदत होते आहे. वेगवेगळ्या राज्यात किंवा महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा खर्च सरकार करत असते.

‘‘राज्याबाहेर लांबच्या ठिकाणी प्रशिक्षण किंवा युनिट स्थापनेसाठी जिल्हा पक्षनेते आणि सध्याचे उपसभापती मल्लिकार्जुन पाटील आमच्या बरोबर येत असतात. तसंच मंत्रालयापासून इतर सर्वच कामांत आम्हाला त्यांची मदत होत असते. त्यांच्या मदतीनेच एवढा लांबचा पल्ला गाठू शकलो,’’ असं रूपाताई सांगतात. युनिट उभं करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी जातो. प्रत्येक युनिटमध्ये पाच मशिनचा एक सेट. १० महिला नॅपकिन्स तयार करायला व १० महिला इतर सर्व कामं पार पाडतात. पुरुषांची कामेही या महिलाच करतात, रूपाताई अगदी उत्साहाने सांगत होत्या.

सर्वच महिला अगदी स्वच्छतेने, र्निजतुकीकरण करून पॅकेट बनवतात. अगदी अल्प दरात त्यांची विक्री होते. तरीही २५ लाख रुपयांचं कर्ज फिटून गेलं. या प्रकल्पातून या बचतगटाला महिन्याला ५० ते ६० हजार रुपये मिळतात. दर दिवसाला ४५०० ते ५ हजार पॅकेट बनवायची युनिटची क्षमता आहे. मात्र २ ते अडीच हजार पॅकेटच आम्ही बनवतो. कारण मालाला उठावही हवा ना, असं रूपाताई सांगतात. नॅपकिनची गुणवत्ता प्रत्येक युनिटमध्ये सारखीच सांभाळली जाते. त्यामुळे कितीही ऑर्डर आली तरी कोणीही डगमगत नाही. २०११ मध्ये महिला व बालकल्याण विभागातर्फे एक लाख ३६ हजार पाकिटांची तर २०१३ मध्ये ७८ लाख पकिटांची ऑर्डर मिळाली. ‘आम्ही खूपच उत्साहाने कामाला लागलो. आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त तीन महिन्यांत ७८ लाख पाकिटांची ऑर्डर पूर्ण केली. अर्थात सर्वच युनिटमधून माल उचलला गेला. हेही सर्व रोजच्या इतर ऑर्डर सांभाळून’, रूपाताई सांगतात. एवढय़ा सगळ्या युनिटला कच्चा माल कसा पुरवला जातो, असं विचारल्यावर, रूपाताई म्हणाल्या सर्व कच्चा माल कमी दरात मिळावा म्हणून आम्ही जेऊरमध्येच मागवतो. तेथूनच सर्व युनिटला पाठवतो. मलेशियाहून पल्प येतो. दमणहून नॉन ओवन फॅब्रिक येते व कोचीहून गम येतो. हा माल ठेवण्याच्या नियोजनाबद्दल रूपाताई सांगत होत्या, की सरपंच महालेश पाटील आणि माजी आमदार महादेव पाटील यांनी याबाबत फारच मदत केली. भक्तनिवासमध्ये भक्कम गोदाम बांधून दिलं. त्यात र्निजतुकीकरण करून माल अगदी बंदिस्त ठेवला जातो. पाऊस-पाणी, उंदीर-घुशी, पाली यांपासून उत्तम संरक्षण होतं. उत्पादन पाच वर्षे जसंच्या तसं राहू शकतं.

सरकारची भरभक्कम मदत आहे म्हणूनच आमचा हा वेलू गगनावरी चाललाय. शिवाय पती, सासू-सासरे, इतर नातेवाईक यांचीही भक्कम साथ आहे. शिवाय मीनलताई मोहाडीकर यांचा भक्कम आधार आहेच, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. पुढचं पाऊल म्हणून रूपाताईंनी ‘निर्मल साबण’ आणि ‘निर्मल वॉशिंग पावडर’ची निर्मिती सुरू केली आहे. हाही एक कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. बँकेकडून २५ लाख कर्ज घेतलंय आणि बाकी भांडवल कणमुसे परिवाराने उभं केलंय. सर्व मशीन अत्याधुनिक आहेत. येथे ८ तासांत ७ टन पावडर आणि २-३ टन साबण तयार होतो. येथेही १६ कामगार आहेत. यालाही खूप मागणी आहे.

रूपाताईंनी आता तयार कपडय़ांच्या व्यवसायातही पाऊल टाकलंय. शर्ट, शाळेचे गणवेश, गाऊन, परकर शिवून विक्री केली जाते. येथे ५० मशिन्स असून ५० महिला काम करतात. काजं-बटणं करण्यापासून सर्व गोष्टींसाठी अत्याधुनिक मशिन्स आहेत. तीनही व्यवसायांत त्यांचा चांगला जम बसलाय. सरकारने नॅपकिनची ऑर्डर मिळवून देण्यासाठी मदत केली तर आणखी खूप महिलांना सर्व रोजगार मिळेल.

सरकारची मदत घेण्यामागची भूमिका विचारली असता त्या म्हणाल्या, महिला आणि बालकल्याण विभागातर्फे तसंच सरकारी रुग्णालयांसाठी त्यांच्याकडून ऑर्डर मिळू शकतात.
रूपाताईंच्या उद्योगांचा पसारा पाहिला की, आत्मविश्वास, संवेदनशील मन आणि इच्छाशक्ती या गोष्टी जुळून आल्या तर यशाची वाटचाल सुकर होते हेच अनुभवता येते.
सुलभा आरोसकर sulabha.aroskar@gmail.com