एखाद्याच्या चांगल्या कृतीची, बोलण्या, वागण्याची लगेच पोचपावती दिल्याने त्या व्यक्तीला आपण योग्य केल्याचे समाधान मिळते. डोळ्यांमधला कौतुकाचा भाव, अभिनंदनाच्या शब्दांचे बोल, पाठीवर मारलेली कौतुकाची थाप नात्यात गोडवाच निर्माण करत नाही तर त्या व्यक्तीमध्ये योग्य आणि चांगले जगण्याची उमेद वाढवते. नात्यातली प्रेमाची ओल जपून ठेवतात. आपण एकटे नाही ही भावना जगण्यावर प्रेम करायला शिकवते.

मीना आणि राजेशच्या नात्यामधला मनमुटाव हळूहळू कमी होत होता. ज्या छोटय़ा छोटय़ा अगणित गोष्टी एकमेकांना जाचक वाटत होत्या, त्यांची संख्या पुष्कळच कमी झाली होती. एकमेकांच्या काही त्रासदायक वाटणाऱ्या पक्क्या सवयींकडे थोडंसं दुर्लक्ष करायला आता त्यांना जमू लागलं होतं. घरातलं नेहमी तंग असणारं वातावरणही आता निवळलं होतं. पूर्वी कुणाच्या बोलण्याचा अर्थ दुसऱ्याकडून कसा घेतला जाईल आणि त्यामुळे वादाची ठिणगी पडून मोठा जाळ कधी तयार होईल याची काही शाश्वती नव्हती. त्याचा एक प्रकारचा धसकाच दोघांनी घेतला होता. पण समुपदेशनाचा परिणाम आता दिसू लागला होता. मीना आणि राजेश हे दोघे मनापासून त्यांचे पती-पत्नीचे नाते सुधारायचा प्रयत्न करत होते.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

एक दिवस मीना मोठी खुशीत दिसली. म्हणाली, ‘‘काल राजेशला सुट्टी होती. सुट्टीत त्याचा पेपर वाचणं, टीव्ही पाहणं आणि आराम करणं असाच ठरलेला कार्यक्रम असतो. पण काल दुपारी तो झोपून उठला होता. चहा घेत टीव्ही पाहत होता. मग मी बरेच दिवस राहिलेलं कपाट आवरायचं काम करायला घेतलं. काही तरी घ्यायला राजेश आतल्या खोलीत आला आणि त्याने मी कपाट आवरतेय हे पाहिलं. मग त्याने बाहेर जाऊन टिव्ही बंद केला आणि चक्क मला कपाट आवरायला मदत करू लागला. मला तर आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मग आवरताना हरवल्या असं वाटलं होतं, त्या वस्तू मिळाल्या. खूप वर्षांपूर्वीचे आमचे राजस्थानच्या ट्रिपचे फोटो मिळाले. माझा एक मॅचिंग ब्लाऊज गायब झाला होता, तो मिळाला. राजेशचा त्याला खूप आवडणारा आणि ‘हरवलेला’ टी-शर्ट मिळाला. त्यामुळे तो खूप खूश झाला. पण मला मात्र मजा आली. खरं तर एकदा मोठं भांडण झालं होतं तेव्हा मी तो टी-शर्ट रागाने एका खणात पार खाली खुपसून ठेवला होता. त्याला हे माहीत नव्हतं. पण खरं सांगू का? मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे आवरण्याचं काम हे काम वाटलंच नाही. मजेदार वाटत होतं. किती काळानंतर आणि दोघं मिळून काही काम करत होतो.

‘‘मग तू हे तुला छान वाटल्याचं राजेशला सांगितलंस का?’’ मी विचारलं. मीना म्हणाली, ‘‘नाही. त्याला कशाला सांगायचं?’’ मी म्हटलं, ‘‘यापूर्वी तू सतत राजेशचं कसं चुकलं ते त्याला सांगत होतीस ना? तेही अगदी तत्काळ! मग आता त्याने स्वत:हून काही चांगली कृती केली तर तेही त्याला त्याच तत्परतेने सांगायला नको का?’’

मीनासारखं आपणही कधी कधी करतो. म्हणजे वेगवेगळ्या नातेसंबंधात आपल्या मनाप्रमाणे घडलं नाही, कुणी वागलं नाही की लगेच तक्रार करतो, वाद घालतो, नावं ठेवतो, भांडणही करतो. पण जर कुणी मनाप्रमाणे वागलं, आपल्याला आवडेल अशी गोष्ट केली, आपल्याला होणारा त्रास, कटकट कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची पोचपावती द्यायला मात्र विलंबच करत नाही तर विसरूनही जातो. ‘वा! हे तू छान केलंस!’, ‘बरं झालं हं तुम्ही याचा विचार केलात. मला सुचलं नव्हतं!’, ‘तुमच्यामुळे या गोष्टी फार सोप्या झाल्या. आवाक्यात आल्या.’, ‘धन्यवाद. तुम्ही मला वेळेवर केवढी मदत केलीत याची तुम्हालाही कल्पना नाही!’, ‘मला हे तुमचं वागणं आवडलं.’ यासारखे साधे सोपे वेळेवर काढलेले उद्गार कोरडय़ा होत जाणाऱ्या नातेसंबंधावर जणू संजीवनीजलाचा शिडकावाच करतात.

एकदा कमळताई म्हणाल्या, ‘‘आम्ही नाही हल्लीच्या पिढीसारखं येता जाता थँक्यू म्हणत.’’ वसंतराव हसत म्हणाले, ‘‘नको ना म्हणू. पण गोडबोलेंचा रोहन तुला नीट जमत नाही म्हणून तुझ्या भाजीच्या पिशव्या पटकन हातात घेऊन धडाधड जिने चढून घरात आणून टाकतो. तो पठ्ठय़ा तुझ्या थँक्यूसाठी थांबतही नाही. पण दर दोन-चार दिवसांनी तू त्याला आवडतो म्हणून मुद्दाम शिरा, थालीपीठ, ढोकळा असलं काही खाण्यासाठी हाक मारतेस की नाही? हे तुझं थँक्यू आहे. हे तुला आणि त्यालाही कळतं!’’

परस्पर नात्यांमध्ये काढलेल्या चुकांच्या तक्रारी मारक ठरतात तर चांगल्या कृती आणि उक्ती नातेसंबंध छान राखायला मदत करतात. एखाद्या पार्टीला नीता जाऊन आली की दुसऱ्या दिवशी आवर्जून त्या पार्टीच्या होस्टला फोन करते. पार्टी छान झाल्याचं, तिला आवडलेल्या पदार्थाचं, डेकोरेशनचं, मजा आल्याचं मनापासून सांगते. पार्टी देणाऱ्यांनाही आपण घेतेलेल्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं. शरदला सिगरेट ओढण्याचं व्यसनच लागलं होतं. त्याची आई फार काळजीत होती. त्याने ती आजारी पडली. आपल्या व्यसनामुळे आई आजारी पडली हे जाणवून शरदने प्रयत्नपूर्वक सिगरेट सोडली. मग एकदा बोलता बोलता आई म्हणाली, ‘‘शरू ये तुझ्या कपाळाचा पापा घेते. तू शाळेत असताना घ्यायचे तसा! तुला माहितेय का तुझे आजोबा सिगरेटच्या व्यसनामुळेच कर्करोगाने गेले. म्हणून तुझ्या सिगरेट ओढण्याचा मी धसका घेतला होता. तू सिगरेट सोडलीयना आता तर माझ्या मनावरचं जणू मणभर ओझं कमी झालं बघ!’’

एखादं बाळ नवं काही शिकून करू लागलं की कौतुकाच्या शब्दांच्या अपेक्षेने आई-बाबांकडे पाहतं. एखादं छोटं मूल शाळेतील नवीन शिकवलेलं गाणं साभिनय करून दाखवतं तेव्हा आई-बाबांना वाटलेला आनंद ते व्यक्त करतात. वर्गात परीक्षेत मिळालेल्या चांगल्या गुणांच्या कौतुकाची थाप विद्यार्थ्यांला अपेक्षित असते. कॅम्पस इंटरव्ह्य़ू चांगली नोकरी मिळालेल्या मुलाचं जसं आई अभिनंदन करते तसंच अभिनंदन ऐंशीच्या घरातल्या सासऱ्यांनी त्यांचा फिजिओथेरपिस्टने शिकवलेला व्यायाम पूर्ण केला की सूनबाई करते! घरातल्या गृहिणीने केलेला स्वयंपाक आवडल्याचे जेवणाऱ्यांनी सांगितले की, तिला पहिला घास घेण्याआधीच तृप्त वाटते. वयात आलेला प्रणव प्रयत्नपूर्वक राग आवरायला शिकला तेव्हा बाबांनी त्याला एक मस्त कॅमेरा देऊन शाबासकी दिली.

एखाद्याच्या चांगल्या कृतीची, बोलण्या, वागण्याची लगेच पोचपावती दिल्याने त्या व्यक्तीला आपण योग्य केल्याचे समाधान मिळते. डोळ्यांमधला कौतुकाचा भाव, अभिनंदनाच्या शब्दांचे बोल, पाठीवर मारलेली कौतुकाची थाप नात्यात गोडवाच निर्माण करत नाही तर त्या व्यक्तीमध्ये योग्य आणि चांगले जगण्याची उमेद वाढवते. योग्य करण्याचे प्रोत्साहन देतात कौतुकाचे, अभिमानाचे बोल, सहजपणे हातात हात घेऊन व्यक्त केलेली कृतज्ञता, कपाळाचा घेतलेला पापा, म्हाताऱ्या आजी-आजोबांची रोज केलेली विचारपूस, संकटकाळी केलेल्या मदतीचे मानलेले आभार, वाईट प्रसंगी डोळ्यातले पाणी पुसून दिलेला धीर- वेळेवर केलेल्या यासारख्या गोष्टी आपलेपणा वाढवतात. आपलं अस्तित्व लोकांना हवंसं आहे याची नकळत ग्वाही देतात. नात्यातली प्रेमाची ओल जपून ठेवतात. आपण एकटे नाही ही भावना जगण्यावर प्रेम करायला शिकवते.

मनातली निराशा, हताशपणा, दु:ख, हतबलता घालवायला मदत करते दुसऱ्यांनी केलेल्या मदतीची, चांगल्या वागण्याची, चांगल्या बोलण्याची, कामाची कदर करून वेळच्या वेळी केलेलं कौतुक आणि पाठीवरची शाबासकी हळूहळू आपल्या माणसांचा परीघ नक्कीच वाढवत नेते! परस्पर नातेसंबंधांतला गोडवा वाढवते. मुख्य म्हणजे जगण्यावरचे प्रेम कायम ठेवायला मदत करते!

अंजली पेंडसे manobal_institute@yahoo.co.in