खाण्यासाठी जगायचं की जगण्यापुरतं खायचं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, आनंदाचा भाग असू शकतो. पण अलीकडे खवय्येगिरी वाढत चालली आहे. लोक घरच्या पारंपरिक जेवणाबरोबरच इतर प्रातांतले, राज्यातले, देशातले पदार्थही चाखू लागले आहेत आणि म्हणूनच वेगवेगळे प्रयोग, फ्युजन यांना सुगीचे दिवस आले आहेत. अगदी पूर्णवेळ अन्नपदार्थाना वाहून घेतलेल्या दूरचित्रवाहिन्या जशा आहेत तसंच खाद्यपदार्थाचे अगदी कॉफी टेबल बुकपासून पॉकेट बुकही मिळतात. शाही मेजवान्यांचा आस्वाद एका ठिकाणी घेतला जातोय तर दुसरीकडे ढाब्यावरचा भेजाफ्राय रिचवला जातोय. एकेका जेवणाची दोन दोन दिवस चालणारी तयारी एका ठिकाणी तर दुसरीकडे टू मिनिट फूडही चवीनं खाल्लं जातंय. जेवणाच्या गप्पा कधी आईच्या हातची चव आठवायला लावणाऱ्या दुसरीकडे एखाद्या स्थळाशी नातं सांगणाऱ्या.. खाण्यावर बोलू तितकं थोडं. म्हणूनच हे सदर ‘खाऊ आनंदे’ दर पंधरवडय़ाला तुमच्या खाद्यानुभवाच्या आनंदासाठी.. चिअर्स !

लज्जतदार, स्वादिष्ट जेवण हा एक परिपूर्ण अनुभव असतो. नाक, डोळे, जिव्हा यांना तृप्त करत त्याचा आस्वाद जेव्हा शरीरभर पसरत मनभर विस्तारतो तो आनंद शब्दातीत! आणि तेही घरच्या अतिथ्यशील उबदार वातावरणात, आग्रही पाहुणचारात होत असेल, सोबतीला ‘खाण्यावर बोलू काही’ म्हणत आठवणींची मस्त मैफल जमत असेल तर तो साराच जेवणानुभव तृप्त करणारा! आणि त्याही पुढे जाऊन जर हे जेवण भारतातल्या विविध प्रातांची संस्कृती जपणारं असेल तर? जसं महाराष्ट्रीय, राजस्थानी, अवधी, गुजराथी किंवा अगदी बंगाली, त्यातही अगदी आत आत जायचं असेल तर जेवणांची नावच तोंडाला पाणी सुटायला लावणारं, काठियावाडी थाली, बनारस की रसोई, कोकणी मुस्लीम सीफूड, अवध का जायका, बेंगॉल लंच, गुजराथी जमन, बोहरी थाल, गोवन सारस्वत थाल, आंध्र ब्राह्मीन मील, पारसी किचन, दावत ए काश्मिरी, फ्लेवर्स ऑफ गोवा, आसामी.. यादी संपतच नाही.. आणि हे सगळं चाखायचं असेल तर फक्त मुंबईत तुमचं असणं पुरेसं असतं. अगदी एका क्लिकवर हा सारा आनंद तुम्हाला मिळू शकतो आणि याचे शिलेदार आहेत, अमेय देशपांडे, प्रियांका देशपांडे, अनीश धैर्यवान ही तरुणमंडळी.

भरगच्च पगाराची, मोठय़ा पदावरची नोकरी सोडून या तिघांनी ‘ऑथेन्टीकुक’नावाने स्टार्टअप सुरू केला आहे तो नाना संस्कृतीचं पारंपरिक जेवणाचा तृप्त करणारा अनुभव खवय्यांना देण्यासाठी. खरं तर खूपच नवीन आहे त्यांचा हा स्टार्टअप, पण गेल्या वर्षभरात त्यांना जितका भारत भेटला, समजला त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.. तो अनुभव सगळ्यांना मिळावा हीच त्यांची तळमळ अगदी बोलण्याबोलण्यातून जाणवते. याची सुरुवात झाली लडाखमध्ये असताना. अमेय सांगतो, ते जेव्हा लडाखला गेले होते तेव्हा साहजिकच लडाखी जेवण चाखण्यासाठी त्यांनी अनेकांना विचारलं पण दुर्देवाने पर्यटक तिथेही नूडल्स आणि पास्ताच आनंदाने खात होते. एखाद्या प्रदेशात गेल्यावर तिथलं स्थानिक जेवण जेवलो नाही तर सर्वागाने तो प्रदेश कळणार कसा? आणि लडाखी फूड म्हणजे नूडल्स असं समीकरण होणार असेल पारंपरिक खाणं टिकणार कसं? अमेयच्या डोक्यात हे बीज पडलं मग त्याची बायको प्रियांका आणि लहानपणापासूनचा मित्र अनीश यांचा त्यादृष्टीने विचार सुरू झाला. त्या त्या प्रातांतलं ‘ऑथेंटिक फूड’ हरवत चाललंय का? ते कसं टिकवता येईल? लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल? याचा विचार सुरू झाला. अनीशची बायको सईही त्यात पार्टटाईम सामील झाली. ती फोटोग्राफर आहे. त्यांनी चार पाच महिने अनेकांबरोबर चर्चा केली, मतं घेतली, सगळ्या सोशल मीडियाची मदत घेतली. कोण कोण ऑथेन्टिक, पारंपरिक परिपूर्ण जेवण करतं आणि कोणाला ते इतरांना खिलवायला आवडतं याचा शोध सुरू झाला आणि याला भरभरून प्रतिसाद मिळू लागला. पहिलं जेवण अर्थातच मित्राच्याच घरी! बोहरी थाळ हे एक परिपूर्ण जेवण. जेवण करणारी आणि आग्रहाने वाढणारी त्याची आईच. मग काय आठ जणांसह झालेलं पहिलच जेवण उत्साह वाढवणारं आणि ‘ऑथेन्टिकुक’ स्टार्टअप वेग घेणार याची ग्वाही देणारं ठरलं.

आज ‘ऑथेन्टिकुक’कडे ५५च्या वर शेफ वा होस्ट आहेत. ज्यांच्या घरी जाऊन तुम्ही जेवू शकता. अगदी २२ वर्षांच्या अभिषेकपासून ६५ वर्षांच्या रजनी कोळी वा झैतून शेख यांच्यापर्यंत. विविध प्रातांची ओळख घेऊन येणारे हे शेफ वा होस्ट. यात अगदी पुरुष शेफही आहेत, त्यांनाही स्वत:च्या घरी स्वत:च्या हाताने करून इतरांना खायला घालण्यातली गोडी कळलेली आहे. रजनी यांच्या पारंपरिक कोळी जेवणावर तर लगेचच ‘सोल्ड आऊट’चा बोर्ड लागलो तो केवळ जेवणाचा मेनू वाचून. त्यांच्या तीन पिढय़ाच आता यात गुंतल्या आहेत हे विशेष. तर गीता यांचं पाठारे प्रभूंकडचं माशांचं जेवण म्हणजे लाजवाब! त्यांच्याकडचं कोलंबीचं हिरवं कालवण, पापलेटचं भुजणं, कोलंबीचं लोणचं सोबतीला सोलकडी, गरमागरम भात म्हणजे पर्वणीच. गंमत म्हणजे जेवायला येणारे सुरुवातीला अनोळखी असणारे खवय्ये जेवण संपता संपता मैतर होऊन जातात कारण सगळ्यांचं एकच प्रेम – चमचमीत, चटकदार खाणं!

अर्थात हे सुरुवातीला थोडंसं कठीण वाटत होतं. प्रियांका सांगते, ‘‘खवय्यांची चविष्ट जेवणासाठी कुठेही जेवायला जायची तयारी असते, पण आपलं घर असं अनोळखी लोकांसाठी कोण उघडून देईल, अशी आम्हाला शंका होती. पण ती फोल ठरली.’’ भारतीय मुळातच ‘अतिथि देवो भव:’ मानणारे. खाणारे आणि खिलवणारे, त्यात आपलं जेवण कोणीतरी पोट भरून, दाद देऊन जेवतय म्हटलं की यजमानांचा विशेषत: त्या अन्नपूर्णेला कोण आनंद होतो. शाकाहारी असो मांसाहारी, त्यातही फक्त माशांचं जेवण देणारेही आहेत किंवा मग अगदी पारसी असो, बोहरी असो, सारस्वत, सीकेपी, पुणेरी ब्राह्मणी, गोवन, मलबारी, केरळी, बिहारी, अवधी, मंगलोरी प्रत्येकाच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या, चव वेगळी, आदरातिथ्याची पद्धत वेगळी. बोहरी थाळीत सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायची पद्धत. तर पाठारे प्रभू अगदी खाली बसायला लावून प्रत्येकाला स्वतंत्र ताट आणि चिंबोऱ्या वा खेकडे फोडायला अडकिता हातात देणारे. राजस्थानी थाळीत तर ३० च्यावर पदार्थ, ‘खाता किती खाल दो कराने, वा एका तोंडाने,’ असं म्हणायची वेळ. सगळे जण आपलं जेवण मनापासून इतरांना खिलवणारे, ‘दे आर अम्बेसेडर ऑफ देअर क्युझिन’, अमेय म्हणतो ते अगदी पटतं. पण यातले बहुतेक होस्ट हे मुलांची वा सुना-जावयांची फर्माईश असते. माझी आई किंवा माझी सासू उत्तम जेवण करते. तुम्ही त्यांच्या हातचं जेवण चाखाच म्हणून ‘ऑथेन्टीकुक’च्या टिमला आग्रह केला जातो. मग ही टिमही तिथे जाऊन जेवण तर चाखतेच, पण वातावरण घरच्यासारखं आहे ना माणसं अतिथ्यशील आहेत ना याची खात्री केली जाते आणि मग त्यांची वर्णी त्यांच्या वेबसाइटवर लागते. एकदा का त्यांचं नाव तिथे दाखल झालं आणि लोकांची त्यांच्या जेवणासाठी रिक्वेस्ट आली की जेवणाऱ्यांना यथेच्छ आस्वाद घेता येतो. याच्या उलट प्रियांका सांगते, ‘‘आम्हाला असेही होस्ट भेटतात जे सांगतात, आमच्या मुलांना आमचं जेवण अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुमच्यासारखी मंडळी जेव्हा बोटं चाटत मन भरून जेवतात तो आनंद आमच्यासाठी शब्दातीत असतो, हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलेलं असतं.’’ ‘‘साहजिकच अशा होस्टकडे अनेकदा जेवणाची पंगत बसते हे सांगायला नकोच. यातून महत्त्वाचं घडतं ते कल्चरल एक्स्चेंज’’, अनीश, प्रियांका सांगतात. पारसी जेवणातली धनसाक दाल ही फक्त कुणी गेल्यावर सुतकातच खाल्ली जाते, हे फक्त तिथे गेल्यावरच कळतं. पण अर्थात ते कारणही आता मागे पडलं आहे इतकं धनसाक दाल आणि पारसी जेवण याचं समीकरण झालं आहे. पण त्याच बरोबरीने जर्दाळू मटण, अकुरी चपाती, चिकन पुलाव, ततरीला झिंगा असल्याशिवाय पारसी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेता येणार नाही. नुकताच ‘ऑथेन्टीकुक’कडे मंगलोरी ख्रिसमस साजरा झाला. हे सारेच होस्ट जेवणाविषयी ‘पॅशिनेट’ असतात. जेवणाविषयीचं प्रेम ते सगळ्यांना बोलावून साजरं करतात. तुम्ही जायचं आणि जेवणाचा तृप्त अनुभव घ्यायचा. ज्यांना पैसे कमवायचे आहेत ते त्या दृष्टीनेही याकडे बघू शकतात. पॅशन आणि बिझनेस याचा पुरेपूर मेळ यात घालता येऊ  शकतो.

‘ऑथेन्टीकुक’चं एक वैशिष्टय़ म्हणजे, कुणालाही होस्ट बनता येतं, आपलं जेवण जेवायला बोलावता येतं आणि कुणालाही पाहुणा बनून आपल्या आवडीचं जेवण जेवायला जाता येतं. ज्यांना आपलं जेवण इतरांनी त्यांच्या घरी, त्यांच्या आदरातिथ्यात जेवावं असं वाटत असेल त्यांनी वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करायचं. ‘ऑथेन्टीकुक’ची टिम त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घेते आणि मग त्यांचा मेनू, तारीख, वेळ, ठिकाण आणि किती जणांसाठी जेवण आहे, एका ताटाची किंमत हे फोटोसह वेबसाइटवर टाकली जाते. ज्यांना वेगळ्या चवीचं, वेगळ्या प्रातांचं जेवायचं आहे त्यांनी त्या दिवशीच्या फर्माईशींवर नजर टाकायची. सोयीचं असेल तर बुक करायचं नाही तर दुसऱ्या तारखेची विनंती करायची. पण किमान चार जण तरी जेवायला असावे लागतात.

अनीश म्हणतो त्याप्रमाणे, आजकालचं जेवण म्हणजे, हॉटेलमधलं डब्यातलं जेवण. लोक जेवण मागवतात आणि जेवतात. त्यामागे ना आग्रह असतो ना प्रेमाने वाढणं. धावत्या जगात शांतपणे बसून गरमागरम जेवणंही अनेकदा शक्य होत नाही. अशा वेळी वेगवेगळ्या चवीचं जेवण तेही प्रेमाच्या उबदार वातावरणात मिळत असेल तर कुणालाही आवडेलच. शिवाय आजकाल करी म्हणजे ग्रीन करी किंवा रेड करी एवढंच लोकांना माहीत आहे. चिकन टिक्का म्हणजे भारतीय जेवण मानलं जाऊ  लागलय. किंवा साऊथ इंडियन म्हटलं की डोसा-इडली याच्या पलीकडे धाव जातच नाही. त्यामुळे दाक्षिणात्य जेवणात तमीळ, अय्यंगारी, मलबारी, केरळी, केरळी ख्रिश्चन असे नाना प्रकार खवय्यांसाठी वेगळाच अनुभव ठरतो. तर मराठी जेवणातही महाराष्ट्रीय ब्राह्मणी, पाठारे प्रभू, कोळी, सीकेपी, जीएसबी असं वैविध्य चाखायला मिळतं. अमेय सांगतो, आम्ही केरळला गेलो असतो तेव्हा नाश्त्याला आम्हाला इडली, डोसा मिळेल असं वाटलं होतं. तेथे कडाला करी आणि पुट्टू खायला मिळालं ज्याची आम्ही कल्पनाच केली नव्हती. एकतर काळे चणे हे उत्तर प्रदेशी खाणं असं वाटत होतं. तर राजस्थानमध्ये मटण स्टय़ूचा आस्वाद घेता येणं हेही कल्पनातीत होतं.

त्या त्या खाद्यसंस्कृतीत केवढं वैविध्य आहे, हे सांगत असतानाच याच्याही पलीकडे एक वेगळा अनुभव अमेय मांडतो, तो म्हणतो, ‘‘आमचं हे स्टार्टअप आहे, त्यामुळे त्यात पैसा कमावणे हा उद्देश आहेच, पण आम्ही त्याच्याही पलीकडे पोचायचा प्रयत्न करतो आहोत. मुख्य म्हणजे आमच्या तिशी बत्तिशीच्या पिढीचं जगणं खूप यंत्रवत झालय. ठरावीक जगणं जगतो आहोत. पण याच्या पलीकडे आपल्या देशाला मिळालेलं प्रांतीय संस्कृतीचं वैविध्य आहे ते आपण लक्षात घेतच नाही. आज मुंबईत राहणाऱ्यांनीही मुंबई किती पाहिली आहे याची शंकाच आहे. मला खात्री आहे वीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी एलिफंटा केव्हज् पाहिल्या नसतील पण मुंबईबाहेरचे मात्र आवर्जून ते बघायला जातात. आपल्या देशाचंही तेच आहे परदेशी लोकांनी जितका भारत पाहिला असेल तितका भारतीयांनी पाहिला असेल का? आपल्या संस्कृतीची ओळख या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणूनच मुंबईच्या बाहेर पुणे, गोवा, कोची आणि आता उदयपूर, जयपूर इथेही आम्ही ‘ऑथेन्टीकुक’ सुरू केलं आहे. आपल्या लोकांना त्या त्या प्रदेशात गेल्यावर तिथलं ऑथेन्टीक फूड खाता यावं हा उद्देश. म्हणजे तुम्ही राजस्थानात गेलात तर तिथलं ऑथेन्टीक  जेवण जेवायचं असेल तर मुंबईतून जातानाच ते ठरवून टाकायचं. उदयपूर आणि जयपूरमध्ये तसं जेवण मिळू शकतं. मुख्य म्हणजे, आम्हाला जितकी माणसं भेटली, खाद्यसंस्कृती समजली, आदरातिथ्याचे प्रकार कळले, तो आमच्यासाठी वेगळाच अनुभव होता, जो आमच्या नोकरीत कधीच मिळाला नसता. आम्हालाच नाही तर जेवायला येणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव थोडा बहुत तसाच असतो. जेवायला किमान चार जणं असतातच. आतापर्यंत सर्वात जास्त जेवण २८ जणांचं होतं, तेही आसामी, पण त्यामुळे अनेक अनोळखी माणसंही तिथे भेटतात. गप्पा जेवणावरूनच सुरू होतात, आमची आजी, आई असं जेवण बनवायची आमच्याकडे असं होतं पासून सुरू होत होत अगदी वैयक्तिक गप्पांपर्यंत पोहोचणं होतं.’’ एक वेगळाच अनुभव अमेय सांगतो, एकदा त्यांच्याकडे आयआयटी मुंबईची, केमिकल इंजिनीअिरगची (२०१४ ची बॅच) चार, पाच मुलं जेवायला आली होती आणि त्याच वेळी एक वयस्क जोडपंही जेवायला आलं होतं. गप्पा मारता मारता लक्षात आलं त्या जोडप्यातले ‘अहो’सुद्धा केमिकल इंजिनीअरच होते, आयआयटी मुंबईचे,  १९६६ ची बॅच. साहजिकच कॉलेजमधले ते दिवस आणि आजचे दिवस याच्या गप्पांमध्ये जेवणाची लज्जत अधिकच वाढली हे सांगायला नकोच. वीक एन्डला या जेवणाच्या फर्माईशी जास्त असतात. एकाच वेळी आठ ते नऊ  ठिकाणी जेवणं चालू असतात, इतकं आता या स्टार्टअपची मागणी वाढू लागली आहे..

अमेय, अनीश, प्रियांका या तिघांसाठी हा अनुभव समृद्ध करणारा ठरतो आहे. रोज नवीन अनुभव, नवीन माणसं, नवीन काही तरी शिकायला मिळणं, त्यामुळे तिघंही मनापासून यात रमली आहेत याचं कारण अनीश म्हणतो ते अगदी पटतं, लज्जतदार जेवण हा चवीच्या दृष्टीने फक्त ५० टक्केच अनुभव असतो. इतर पन्नास टक्के आनंद देतात ते घरच्या उबदार वातावरणात प्रेमाने, आग्रहाने वाढणारे यजमान आणि सोबतीला थांबूच नये असं वाटणारी गप्पांची मनसोक्त तृप्त करणारी मैफल..

http://www.authenticook.com

आरती कदम – arati.kadam@expressindia.com