विदर्भात सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे संकट दोन दशकांनंतरही टळलेले नाही. आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील पुढची पिढी म्हणजे लहान व किशोरवयीन मुले-मुली यांच्यात अस्वस्थता आहे, अस्थैर्य आहे, सतत भीतीचं सावटही आहे. त्यातच ते जगत आहेत. त्यांना समाजाकडून, कुटुंबीयांकडून भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला नाही तर ही मुलेही दु:खाच्या वाटेवरच जात आहेत.. जात राहतील. काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं झालेल्या घटनांना स्वीकारून आपलं आयुष्य पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी त्यांना अकाली प्रौढ व्हावं लागत आहे. घरची जबाबदारी घ्यावी लागत आहे.. अशाच काही मुलांच्या या कथा-व्यथा..

एखादे वादळ येते आणि संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाते. त्सुनामीच्या लाटा आल्या की होत्याचे नव्हते होऊन जाते, मात्र वादळ शमल्यावर गाव हळूहळू उभे राहू लागते. त्सुनामीच्या लाटांपासून बचावलेले लोक अधिक सुरक्षित जागा व मजबूत घरं कशी उभारता येतील याचा विचार करून विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न करतात. या सर्व संकटातून बळी गेलेल्यांच्या आठवणी जपत पुन्हा असं संकट येऊ नये म्हणून सर्वजण आपआपल्या परीने प्रयत्न करतात. विदर्भात सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे हे संकट दुसरे दशक संपत आले तरी टळले नाही. उलट आत्महत्यांचे प्रमाण लगतच्या राज्यांतही वाढते आहे..

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Farmer Protest
‘चलो दिल्ली’ २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगित, पण सरकारविरोधात ‘या’ कार्यक्रमांचं आयोजन; शेतकरी संघटनांची पुढची रणनीती काय?
farmer protest
गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार! शुभकरनच्या मृत्यूमुळे संतप्त शेतकऱ्यांचा ‘काळा दिवस’

आत्महत्या करणारा निघून जातो, पण पाठीमागे राहिलेल्यांना जर आधार नसेल, मग तो भावनिक असेल वा आर्थिक तर त्यांचे आयुष्य वादळवाऱ्यात हेलकावणाऱ्या तारूगत होऊन जाते. गेल्या दोन दशकांत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पुढची पिढी म्हणजे लहान व किशोरवयीन मुले-मुली ही भावनिक, आर्थिक, सामाजिक त्रास सहन करतच मोठी होताहेत. ही पिढी शेतीबद्दल काय विचार करते, त्यांच्या मनांत चाललेल्या कल्लोळाचे कोणते परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत आहेत? ही पिढी पुढे नेमके काय करू इच्छिते? तसेच प्रचंड निराशा, अव्यक्त राग आणि झाकोळलेले भविष्य यातून या मुलांना कसे बाहेर काढता येईल यासाठी ‘आनंदवन’ आणि ‘प्रकृति’ या दोन संस्थांनी काम सुरू केले आहे व त्याच अनुषंगाने आलेले अनुभव मांडायचा हा प्रयत्न.

अमरावती जिल्ह्य़ात चांदूर बाजार तालुक्यातील सुरळी गावाची अपर्णा अवधी दीड वर्षांची होती जेव्हा तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. वडिलांच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच आईही तिला सोडून दुसरीकडे निघून गेली. अपर्णा म्हाताऱ्या आजी-आजोबांजवळ राहिली. मुलाच्या जाण्याने दुखावलेले व उतारवयात पुन्हा संसार सुरू करावा लागल्यामुळे कष्टी असलेल्या आजी-आजोबांना अपर्णाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ व शक्ती दोन्ही नव्हते. दुर्लक्ष व आबाळ झाल्यामुळे अपर्णा अतिशय हट्टी, रागीट व आक्रस्ताळी झाली. चार वर्षांची झाली तरी तिला वाचा फुटली नाही. शेवटी आत्याने तिला स्वत:च्या घरी काही दिवसांसाठी मधे-मधे न्यायला सुरुवात केली. तेव्हा कुठे अपर्णाला वाचा फुटली, मात्र तिचा स्वभाव काही बदलला नाही. ती तशीच हट्टी, आक्रस्ताळीच राहिली. स्वत:चं आयुष्य तिच्यासाठी दु:ख आणि निराशेचा डोंगर उरला आहे.

अकोला जिल्ह्य़ातील कोमल वडिलांच्या आत्महत्येनंतर आजी-आजोबांनी हाकलून दिले तेव्हा आई व बहिणीसोबत आईच्या माहेरी येऊन राहिली. वडील गेल्यानंतर जन्मलेला भाऊ व दोन बहिणी आणि आई असे कोमलचे कुटुंब आजोबांच्या छत्राखाली राहतात. आजीने आपल्याला घराबाहेर काढले म्हणून मामा-मामींचे टोमणे सहन करत आपल्याला व आई-भावंडांना जगावे लागतेय याचा कोमलच्या मनात प्रचंड राग आहे. सध्या कोमल दहावीत आहे. तिच्या पाठची बहीण नववीत आहे. कोमल बऱ्याचदा आजीच्या गावी जाऊन तिच्याशी पशांसाठी भांडून येते पण तिच्या पदरी काहीच पडत नाही. लहानपणी वडील गेल्यावर भीतीपोटी शाळा बुडवून, आईच्या पदराला धरून शेतात जाणारी कोमल आज वयात आल्यावर रागाने धुमसते आहे. यात भर म्हणून नुकतेच तिच्या आजीने (वडिलांच्या आईने) कोमल व तिच्या धाकटय़ा बहिणीची सोयरीक जुळवण्याचा घाट घातला. या प्रसंगाने पुरती चिडलेली कोमल आजीकडे जाऊन कडाक्याचे भांडण करून आली. एवढेच नव्हे तर रागाच्या भरात तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून वडिलांसारखेच करण्याचा प्रयत्न केला. आधीच भीषण असलेल्या परिस्थितीत आणखी भर पडेल का? अशी धास्ती कोमलच्या आईच्या मनात सतत असते.

अपर्णा, कोमल वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा अजाण  होत्या. त्या कोमेजून गेल्या, पण वसंता.. अकोला जिल्ह्य़ातील विझोरा गावातील हा वसंता बारा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली. आता वसंता नवव्या वर्गात आहे व तो परिस्थितीमुळे दुर्बल झालेल्या त्याच्या आई व घरकामासाठी शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या बहिणीसोबत राहतो. अत्यंत अबोल असणारा वसंता हुशार व हरहुन्नरी आहे. त्याने त्याही परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न चालवला आहे. बकरीच्या एका पिलाचे संगोपन करून एकाच्या सहा बकऱ्या त्याने केल्या. होतकरू व आशावादी असणारा वसंता तेराव्या वर्षीच प्रौढ झाला आहे. वडिलांच्या पश्चात आपल्याला कुटुंबाच्या कर्त्यां पुरुषाची जबाबदारी घ्यायची आहे, असे त्याने मनोमन नक्की केले आहे व तो नक्की केल्याप्रमाणेच आईशी व बहिणीशी वागतो. घरातील मोठय़ा माणसांशी बोलायचे असो किंवा घरातील खर्चाची सोय करायची असो, वसंता प्रत्येक वेळी स्वत: पुढे होतो. आईला बोलू देत नाही. कोवळ्या वयात स्वत:वर लादून घेतलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे वसंता किती वाहू शकेल हे कालांतरानेच कळेल. पण अकाली प्रौढत्व त्याचं आयुष्य गंभीर करत आहे. वसंतासारखीच गायत्रीदेखील अल्पवयातच ‘पोक्त’ झाली व आज एकटी पूर्ण घर सांभाळते आहे, कारण आई दिवसभर कामासाठी बाहेर, मोठा भाऊ काम करता करता शिकतोय म्हणून तोही घराबाहेर आणि घरी फक्त लहान बहीण म्हणून मग गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत बसलेल्या गायत्रीचे काही विषय राहिले. आता ती स्वत:च्या शिक्षणापेक्षा लहान बहिणीच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देते आहे. स्वत:चं, स्वत:साठी जगणं तिला शक्य होईल असं दिसत नाही.

एकीकडे कटुंबात अस्वस्थता आहे, अकाली प्रौढत्वाचं ओझं आहे तर काही मुलं परिस्थितीने शहाणी व समंजस झाली आहेत. अमरावतीच्या रजनीताई पतीच्या माघारी शेती सांभाळून गावातील ‘आशा’ कार्यकर्तीचे काम करतात. अतिशय कष्ट व विपरीत परिस्थितीत त्यांनी दोन्ही मुलींना शिकविले. मोठय़ा मुलीने ‘पॉलिटेक्निक’ला प्रवेश घेतला व जिल्ह्य़ाच्या ठिकाणी खोली घेऊन राहाते आहे. आईच्या कष्टाची पुरती जाणीव असणाऱ्या आपल्या मुलीबद्दल रजनीताईंच्या तोंडून फक्त तिचे कौतुकच बाहेर पडते. रजनीताईंसारख्या शालूताईपण ‘आशा’ कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा या वर्षी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. तालुक्याच्या ठिकाणी एकटय़ा राहणाऱ्या ऋषिकेशला आईची पूर्ण साथ आहे. ऋषिकेशला या दु:खांचा विचारही करायचा नाही आहे. भविष्यात चांगलेच होईल, अशी उमेद ठेवायची असल्याचं तो सांगतो. ऋषिकेशसारखाच सकारात्मक विचार अभिषेक इंगळेही करतो. लहानपणीच हृदयाला असलेल्या छिद्राला बुजवण्यासाठी अभिषेकवर मोठी शस्त्रक्रिया झाली, पण त्यामुळे निर्माण झालेलं शारीरिक दुबळेपण विसरून त्याला पुढे जायचे आहे. वडिलांच्या काळातला आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतरचा भूतकाळ विसरायचा आहे व वडिलांच्या आत्महत्येनंतर आई व मोठा भाऊ यांना मदत करायची आहे. त्यासाठी अभिषेक कष्टाची सारी कामे करतो. आईने चिंता व्यक्त केली तर ‘‘माझी तब्येत आता उत्तम आहे. तू काळजी करू नकोस,’’ असं म्हणत तोच तिला धीर देतो.

रजनीताई व शालूताई या दोघी ‘आशा’ कार्यकर्ता आहेत. शेती करून त्या हे काम करतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा काही भार त्या उचलू शकतात व समाजात वावरल्यामुळे, प्रशिक्षणामुळे त्या धीटही झाल्या आहेत. मात्र सर्वच कुटुंबात अशी स्थिती नाही, त्यामुळे या कुटुंबात कायम अस्वस्थता आहे. दु:ख आहे, भरून राहिलेली भूख आहे. त्या वातावरणात वर्षांनुवर्षे राहिल्यावर आणि ही परिस्थिती बदलू शकत नाही, याचं अस्वस्थ भान आल्यावर सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची सज्ञान, शहाणी मुलेदेखील वडिलांसारखाच आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसतात.

वडिलांच्या आत्महत्येला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, आईने कसेतरी करून संसाराचा गाडा रेटला, मुलींची लग्नं केली, मात्र कुटुंबात सर्वात लहान असलेल्या संतोषला मनातून खूप वाटत होते की आपण कुटुंबाला आर्थिक मदत करावी, आईचा ताण कमी करावा, पण त्याची नोकरीच त्याला टिकविता येत नव्हती. आत्मविश्वास कमी असल्यामुळे, सततची अस्थिरता असल्याने नोकरीच्या ठिकाणी कामात घडणाऱ्या चुका व भित्रेपणा यामुळे त्याची नोकरी टिकत नव्हती, त्याचं त्याला इतकं दडपण येऊ लागलं की त्याने एके दिवशी घरीच स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आई-बहिणी मध्ये पडल्या व त्याचा जीव वाचला. पण तो यातून कसा सावरू शकेल हा प्रश्नच आहे. दुसरं म्हणजे, शेतकरी आत्महत्येकडे बहुतांश समाज कडेलोट झाल्यावर उचललेले शेवटचे पाऊल असे न बघता अनेकदा मदत लाटण्यासाठी जीव घालवला किंवा कलंक अशा दृष्टिकोनातून बघतो, त्यामुळे समाजात वावरताना या मुलांना आपण कलंकित आहोत की काय? किंवा लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, असे अनुभव नेहमी येतात, मग ती अधिकच संकोचून जातात.

या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना राज्य सरकार, प्रकृति संस्था व इतर बऱ्याच सेवाभावी संस्था शिक्षणासाठी मदत करताहेत. शिक्षणासाठी मिळणाऱ्या या मदतीबद्दल अदितीचे विचार मनाला चटका लावून जातात. अदितीच्या मते, ‘‘ही स्कॉलरशिप माझे बाबा गेले म्हणून मला मिळाली, म्हणून त्या पशांचा उपयोग मला करवत नाही. एकवेळ मला शिक्षण मिळाले नाही तरी चालेल, पण बाबांच्या मृत्यूच्या मोबदल्याचे पसे मला नको असं वाटतं. त्या पैशांना बाबांच्या आयुष्याचं मोल आहे.’’

याच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील जी मुले विकलांग आहेत किंवा ज्यांना लहानपणीच आजार जडला आहे त्यांच्या परिस्थितीवरील उदाहरणांतील मुलांपेक्षा बिकट आहे. चांदूर गावातील लहानपणी अर्धागवायूचा झटका आल्यामुळे हाताने अधू झालेला कुशल किंवा थायरॉइडच्या त्रासामुळे अति वजन असणारा पीयूष यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या आईकडे पसेही नाहीत आणि कुणाची मदतही नाही. अशा परिस्थितीत स्त्रियांना फार तडजोडीदेखील कराव्या लागतात. चार मुलांपकी दोन मोठय़ा मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवून लहान मुले स्वत:जवळ ठेवणे असा पर्याय काही कुटुंबांनी निवडला आहे. मोठय़ा मुलांना स्वत:जवळ का नाही ठेवलं? त्यांची मदत झाली असती, असा सल्ला जेव्हा चांदूर बाजार, अमरावतीच्या गीताला दिला तेव्हा तिचे उत्तर होते की, ‘‘लहान मुलांची भूकपण लहान असते, म्हणून त्यांना मी माझ्याकडे ठेवले आहे.’’ या एका विधानाने या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आपण काढू शकतो.

सध्या ‘प्रकृति’ व ‘आनंदवन’तर्फे या कुटुंबातील तरुण मुलांना ‘आनंदवन’ येथे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वीही काही तरुणांनी व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले व आज ती मुले स्वत:च्या पायावर उभी राहून घरी थोडे पसे पाठवत आहेत. एकीकडे स्वत:चे घर आहे, शेती आहे पण ते पुरेसे नाही आणि दुसरीकडे शेती केली तर वडिलांसारखे मरावे लागेल अशी भीती, त्यामुळे ही पुढची पिढी शेती करणार नाही, असा ठाम विचार करते आहे. आम्हाला नोकरी द्या आम्ही ती करू, पण शेती करणार नाही, असे विचार या कुटुंबातील बहुतेक मुले बोलून दाखवतात. आजच्या परिस्थितीत सर्वाना नोकरी मिळणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती त्यांना पटत नाही. हे प्रश्न चुटकीसरशी सुटणारेही नाहीत किंवा सर्व प्रश्नांसाठी एक समान उत्तर ही शक्यताही नाही. तेव्हा एकीकडे गावातील शेतीचा विकास, जलसंवर्धन, शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, शेतीसोबत जोडधंदे, नवीन कल्पना व प्रयोगांना प्रोत्साहन अशा बहुपर्यायी उपायांचा अवलंब करून पुढील पिढीला सावरायचा प्रयत्न करण्यात येत आहे. संकोच, भय, ताण व असुरक्षा अशा नकारात्मक परिस्थितीत सापडलेल्या या दुसऱ्या पिढीला जर सामान्य वागणूक मिळाली, पुढे जाण्यासाठी वाट दाखवली, त्या वाटेवर चालताना थोडा हात धरला, तर नक्कीच इतर मुलांप्रमाणे त्यांचेही भविष्य घडू शकेल, असे वाटते.

एकीकडे स्वत:चे घर आहे, शेती आहे पण ते पुरेसे नाही तर दुसरीकडे शेती केली तर वडिलांसारखे मरावे लागेल अशी भीती, त्यामुळे ही पुढची पिढी शेती करणार नाही, असा ठाम विचार मांडते. आम्हाला नोकरी द्या आम्ही ती करू, पण शेती करणार नाही, असे विचार या कुटुंबातील बहुतेक मुले बोलून दाखवतात. आजच्या परिस्थितीत सर्वाना नोकरी मिळणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती त्यांना पटत नाही. हे प्रश्न चुटकीसरशी सुटणारेही नाहीत किंवा सर्व प्रश्नांसाठी एक समान उत्तर ही शक्यताही नाही. तेव्हा एकीकडे गावातील शेतीचा विकास, जलसंवर्धन, शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, शेतीसोबत जोडधंदे, नवीन कल्पना व प्रयोगांना प्रोत्साहन अशा बहुपर्यायी उपायांचा अवलंब करून पुढील पिढीला सावरायचा प्रयत्न करण्यात येत आहे.

– सुवर्णा दामले

prakriti_ngp@bsnl.in

(लेखातील काही मुलांची नावे बदलली आहेत.)