पालिकेनं अचानक पालं उठवल्यानं भर उन्हात तडफडून मेलेलं मूल आणि भिक्षुकीतल्या तुंटपुज्या अन्नामुळे कुषोषणग्रस्त मुलीचे होणारे हाल बबिताच्या कामाची प्रेरणा होती. भारताचे नागरिक असण्याच्या हक्कापासून वंचित असलेल्या २००० पालधारकांना त्यांच्या प्रयत्नांमुळे ओळखपत्रे मिळाली. तर २१५ मुलांना शाळेत दाखला मिळाला. आपल्या बांधवांना त्यांचे किमान अधिकार मिळावेत यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या बबिता पठाणेकर यांना आमचा मानाचा मुजरा!

‘‘गुजरातमध्ये माझ्या पालाशेजारी एक भिक्षुक भटक्याचं पाल होतं. कुटुंबात तीनच माणसं. नवरा, बायको आणि दोन-अडीच महिन्यांची मुलगी. रोजच्याप्रमाणे नवरा भिक्षुकीला गेला आणि तिथंच हृदयविकारानं वारला. शेजारी सारे भिक्षुकच. काय मदत करणार? पण सर्वानी संध्याकाळी शहरात जाऊन भिक्षा आणली व दुसऱ्या दिवशी त्याचं दहन केले. त्याच्या बायकोची अवस्था वाईट होतीच. तिला पुरेसं अन्न मिळत नव्हतंच त्यामुळे तिच्या दूधावर जगणारी मुलगीही कुपोषित राहात होती. सतत किरकिर करायची. काय झालं असेल त्या दोघींचं? हा विचार आजही मला सतत सतावतो..
दुसरा प्रसंग नवसारी-अमरावतीचाच. महानगरपालिकेनं एका मैदानावरची अनेक वर्षांची पालं भर उन्हाळ्यात दुपारी १२ वाजता बिगर नोटीस उठवली. एका पालात दहा दिवसांची बाळ-बाळंतीण होती. ४५ डिग्री से. तपमान होतं. मैदानात पडलेली आवश्यक भांडीकुंडी व कपडय़ाच्या, अंथरुणाच्या चिंध्या सोडून तिला जाववत नव्हतं. जायचं तर, कुठे आणि कसं? भर उन्हात भाजून ते १० दिवसाचं बाळ तीन वाजताच मेलं. आईच्या कुशीतलं, पण उन्हात तडफडणारं ते बाळ डोळ्यापुढून काही केल्या हालत नाही.. अजूनही..’’

‘‘मी जेव्हा पालात राहायची त्यावेळचे हे दोन प्रसंग माझ्या जिव्हारी लागलेत. जे मी विसरूच शकले नाही कधी, म्हणूनच भारतात असूनही ज्यांच्या वाटय़ाला फक्त अंथरायला जमीन व पांघरायला फक्त आकाशच आहे. चूल मांडायला लागणारे तीन दगडसुद्धा ज्यांच्या हक्काचे नाहीत. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाशिवाय कसलाही कागदोपत्री पुरावा ज्यांच्याकडे नाही अशा बेघरांसाठी काम करायचं मी ठरवलं.’’ बबिता पोटतिडकीनं सांगते.
बहुरूपी बबितानं हेच आपल्या आयुष्याचं जीवित कार्य ठरवलं आणि दोन हजार पालधारकांना ओळखपत्रे मिळवून दिली. अनेक मुलांना शाळेत दाखल केलं. त्यासाठी जंगजंग पछाडलं. आज एक सामान्य स्त्री असामान्य कर्तृत्व करते आहे.
ती जन्माला आली ती बहुरूपी समाजात. पुराणपात्रांची, देवदेवतांची रूपे घेऊन संगीत, नृत्य, गायन व नाटय़कलांच्या आधारे लोकांची करमणूक व त्यातून सदाचार व नीतीचा प्रचार ही कामं करीत गावोगाव भटकणं हा विदर्भातल्या बहुरूपी जमातीचा परंपरागत व्यवसाय! त्याच व्यवसायातल्या दौलतराव औंधकरांनी त्यावर चरितार्थ भागेना म्हणून ग्रामीण भाग व भावभावकी सोडून कुटुंबीयांसह नागपूर गाठलं. तीन चाकी सायकल रिक्षा चालविण्याचं अंगमेहनतीचं काम सुरू केलं आणि त्यातूनच कूड-छप्पराचं घर घेतलं. तिथेच त्यांना मुलगी झाली, बबिता. ते वर्ष होतं १९७२.

अनधिकृत झोपडी असली तरी कुटुंबाला स्थिरता मिळाली. शिक्षणाची सोय असलेलं नागपूर शहर मिळाल्यानं मुलीला शिकविण्याची हौस बाबानं पूर्ण केली. बबिताचं सलग १२ वी पर्यंतचं शिक्षण झालं. बबिता मुळातच हुशार होती आणि पुढे शिकायचीही इच्छाही होती, पण पुढे वय आड येऊ लागलं. अठरा वर्षांची बबिता आई-बाबाच्या नजरेतच नव्हे तर समाजाच्या नजरेतही मोठी झालेली. बालविवाहाची पद्धत असलेल्या त्यांच्या जमातीतलं तर लग्नाचंही वय टळून गेलेलं. जमातीत शिकलेली मुलं नव्हतीच मग जेमतेम अक्षर ओळख असलेल्या बहुरूपी जमातीचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कलाकार, राज कपूर पठाणेकरशी तिचं लग्न झालं. १९८९ मध्ये. स्थिर आयुष्य जगणारी बबिता बहुरूपी नवऱ्याबरोबर अस्थिर झाली आणि तिच्या वाटय़ाला आली ती भटकंती! लग्नानंतर सलग नऊ वर्षे तिनं महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत पालातलं भटकं जीवन अनुभवलं. त्यातच तिला तीन मुलं झाली. दोन मुलगे एक मुलगी. त्यातला एक मुलगा मतिमंद आहे. आज तो २४ वर्षांचा झालाय. दुसरा मुलगा शिकलाय, पण नोकरीच्या शोधात आहे. मुलगी तेरावीत आहे. शिकते आहे.
पण या नऊ वर्षांत धडपडय़ा बबिताला शांत बसवत नव्हतंच. कलाकार नवऱ्याची रंगरंगोटी व वेषभूषा यांची पूर्वतयारी आणि मुलांचा सांभाळ करण्याबरोबरच बांगडय़ा, नाका-कानातले कृत्रिम दागिने तसेच कटलरी वस्तूंची विक्री करून तिनं कुटुंबाच्या अर्थार्जनास मदत केली. तिचं योग्य आर्थिक नियोजन व काटकसर यामुळे लवकरच तिनं अमरावतीला जागा घेतली आणि तिथं एका खोलीचं पक्कं घरही बांधलं एका बाजूला स्वत:चा संसार स्थिर करत असतानाच एक खंत मात्र तिला सतत त्रास देत होती ती म्हणजे पुढे शिकण्याची. इच्छा असून आपण शिकू शकलो नाही ही खंत तिने अमरावती शहर व परिसरातल्या भटक्या जमातीच्या प्रत्येक पालात ज्ञानाचा दिवा लावण्यात बदलवायची, असं तिनं ठामपणं ठरवलं. त्यासाठी आधी तिनं परंपरागत बहुरूप्यांच्या भिक्षुकी व्यवसायाला वेगळं वळण दिलं.
ch11
भिक्षुकीच करायची पण परंपरागत पद्धतीनं करमणूक करून नव्हे तर विविध विषयाचं महत्त्व पटवून. बारावी शिकलेल्या बबितानं बहुरूपीच्या वेषात फिरताना शिक्षणाचं महत्त्व, नशामुक्ती, एड्स जनजागृती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ, पर्यावरण, स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तुकाराम महाराजांची शिकवण आदी विषय मनोरंजक पद्धतीनं सादर करून भिक्षुकी करायला सुरुवात केली. बहुरूपीच्या वेषातले शंकर-पार्वती, राम-लक्ष्मण, हनुमान आदी ‘देवदेवता’ आजच्या गंभीर समस्यांवर बोलू लागले. लोकांनाही त्याचं अप्रुप वाटायला लागलं. कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली. बहुरूपीच्या भिक्षुकी व्यवसायात त्यामुळे बरकत आली नसली तरी पूर्वीपेक्षा प्रतिष्ठा वाढली. स्थानिक गट विकास अधिकारी, अनेक गावचे सरपंच, आमदार, खासदार व काही सामाजिक संस्था यांनी बबिता व तिचे पती राज कपूर या दोघांचा सन्मान पत्रे देऊन गौरव केला.

‘‘उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ॠतूंत पालधारकांचे काय हाल होतात ते मी स्वत: सोसले, भोगले आहेत. ९९ टक्के पालधारकांची चूल दिवसातून एकदाच पेटते. पावसाळ्यात तर चूल पेटणे पावसावर अवलंबून असते. यांच्यात समाजकार्य करायचे म्हणजे मेलेल्या माणसांना जिवंत करण्यासारखं आहे. त्यांची मनं मेलेली आहेत. पराभूत मानसिकता असली तरी शेवटी ती माणसं आहेत. भारतीय बांधव आहेत. त्यांना स्वत:चं घर का असू नये? त्यांच्या मुलांनी शिक्षण का घेऊ नये? त्यांना देशाच्या, राज्याच्या मुख्य विकासात कोण व कधी घेणार? हा विचार मला सतत बेचैन करतो.’’

बबिताच्या माहितीनुसार भटक्या जमातींची अमरावती शहर व परिसरात सुमारे पाच हजार कुटुंबे पालात राहातात. त्यापैकी सुमारे दोन हजार पालधारकांचं तिनं स्वबळावर (नवऱ्याच्या भिक्षुकीतून व स्वत:च्या छोटय़ाशा व्यवसायातून मिळालेला स्वत:चा पैसा व श्रम देऊन)सव्‍‌र्हेक्षण केलं आहे. सर्वप्रथम नवसारी क्षेत्रातल्या पालधारकांच्या २१५ मुलांना शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न तिनं सुरू केला. त्यासाठी सर्वात पहिली लढाई होती पालकांबरोबरच.
आपल्या मुलांना शाळेत दाखल करायला हवं ही जागृतीच नसलेल्या पालकांच्या मनात शाळेचं महत्त्व पटवून देण्यापासून तिला सुरुवात करायची होती. त्यानंतरची लढाई आणखीनच वेगळी. शाळेत दाखल करायचं म्हणजे प्रत्येक मुलाची जन्म तारीख हवी. या मुलांचे जन्म पालात किंवा प्रवासात असताना रानात नदी-नाल्या काठी झालेले. आई-बापांना त्यांची जन्म तारीख तर दूरच राहिली, पण महिनाही आाठवत नाही. शेवटी बबितानं अमरावती येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातून या मुलांच्या वयाचे दाखले मिळवून त्यांना नवसारी येथील अमरावती महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. शासकीय यंत्रणेकडून ही कामे करून घेणे वाटते तेवढे सहज सुलभ नाही.

बबिता एवढय़ावर थांबली नाही. नवऱ्याने बहुरूपीची सोंगे घेऊन भिक्षुकीतून मिळवलेल्या पैशांतून पालातल्या त्या मुलांना मोफत वह्य़ा-पुस्तके वाटली. या कामाबद्दल महापौर वंदना कंगाले यांनी सन्मानपत्र देऊन तिचा गौरव केला.
जी स्थिती मुलांची तीच स्थिती पालकांची. त्यांना भारताचे नागरिक म्हणून ओळखच नव्हती. त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आदी ओळख पत्रे मिळवून देण्याचं काम बबितानं हाती घेतलं. तिथेही त्यांच्या जन्म तारखेच्या दाखल्याचा प्रश्न आ वासून उभा होताच. आरोग्य खाते, महसूल खाते व सामाजिक न्याय खाते या सर्वाचा समन्वय साधण्याचं काम बबितानं केलं. अनेक राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांची प्रमाणपत्रे मिळविण्याची बबिताची धडपड आणि भटक्यांच्या गंभीर समस्या लक्षात घेऊन अमरावतीचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी या पालधारकांना आधार कार्ड देण्यासाठी खास कँप लावला होता. त्यामुळे अनेक दुर्लक्षित पालधारक लोकांचा लाभ झाला, हे बबिता कृतज्ञतेनं आणि भारावून सांगते. बबिताच्या गेल्या सहा वर्षांतील अथक प्रयत्नाने सुमारे २००० पालधारकांना ओळखपत्रे मिळाली आहेत. आणि तिचं हे काम पुढे चालूच आहे. तिच्या मते हे मूलभूत काम आहे. कारण अशी ओळखपत्रे मिळाल्याशिवाय त्यांना विकासाच्या क्षेत्रात पाऊलच ठेवता येत नाही.

‘घर तिथे शौचालय’ या योजने मागच्या शासकीय हेतूचं बबिता मनापासून स्वागत करते. पण प्रश्न विचारते की केवळ अमरावती परिसरात ज्यांना घरच नाही अशा विखुरलेल्या पाच हजार बेघर व भूमिहिन पालधारकांपैकी एकालाही हक्काचे शौचालय देण्याची तरतूद या योजनेत कशी व का नाही? पालधारकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जशी ती आग्रही आहे, तशीच पिढय़ान्पिढय़ा आकाशाखाली राहाणाऱ्या पालधारकांना घरे देण्यास प्राधान्य देण्यासाठीही ती आग्रही आहे. म्हणूनच वीस पालधारकांचा एक असे अनेक गट संघटित करून शासकीय योजनेतून घरे मिळण्यासाठी तिच्या द्वारे शासनाकडे मागण्यांचा पाऊस पडला आहे. शासनाचा प्रतिसाद मंद गतीने असला तरी शासकीय कार्यालयात ती एक जिद्दी व सचोटीची कार्यकर्ती आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. शासनाकडून लवकरच पालधारकांना घर मिळेल. त्यांनाही भारताचे नागरिक म्हणून सन्मान मिळेल अशी आशा तिला वाटते. तिचं हे काम एकटीच्या बळावर सुरू आहे. अर्थात त्या कामात पती राजकपूर शमशेर (पठाणेकर) यांचं संपूर्ण सहकार्य तिला मिळतंय.

आपल्या बहुरूपी जमातीविषयी बोलताना तिनं सांगितलं, ‘‘आम्ही नेमके कोणत्या धर्माचे आहोत तेच आम्हाला माहीत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही धर्मनिरपेक्ष आहेत. जेवढय़ा निष्ठेनं आम्ही रमजानचे रोजे करतो तेवढय़ाच निष्ठेने आम्ही श्रावण महिन्यातले उपवास पण करतो. जसा मोहरम साजरा करतो तसा दिवाळी-दसरा पण साजरा करतो. आम्ही गणपती बसवतो व नियमितपणे नमाजही पढतो. मी स्वत: संपूर्ण महिन्याचे रमजानचे रोजे करते आणि दसऱ्यात नवरात्रीचे नऊ दिवसाचे कडक उपवास पण करते. नवव्या दिवशी नऊ कन्यांना पक्वान्नाचे जेवण देऊन माझा उपवास सोडते. मृत्यूनंतर अंत्यविधी, कोणी मुस्लिम पद्धतीनं दफन करतं, तर कोणी हिंदू पद्धतीनं दहन करतं. मृत्यूनंतर तेराव्याचा कार्यक्रम करण्याची आमच्या जमातीची स्वतंत्र पद्धत आहे. मृत्यूनंतर १० ते ४० दिवसांपर्यंत हा कार्यक्रम करता येतो. या कार्यक्रमात नातेवाईक व मित्रांना जेवण दिलं जातं. बहुधा हे मांसाहारी असते. मात्र यासाठी होणारा खर्च आपल्या मर्जीने गरिबांच्या मदतीसाठी किंवा सार्वजनिक कामासाठी देणगी रूपानं द्यावा, असा विचार बबिता मांडत असते, या विचाराला समाजातून ६० टक्के लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून या पैशांतून मूर्तिजापूर तालुक्यात सिरसुल गावी मशिदीच्या शेजारी इंधन विहीर खोदून त्यावर हापसा बसवून देण्यात आला आहे.’’

‘‘आमच्यापैकी बहुतेकांची हिंदू व मुस्लिम या दोन्ही पद्धतीनं लग्न झालेली आहेत. आमच्या हिंदू पद्धतीत भटजी नसतो आणि मंगलाष्टके पण नसतात. माझ्या पतीचे नाव राजकपूर आहे तर माझ्या सासऱ्यांचे नाव शमशेर आहे. माझे स्वत:चे लग्न हिंदू-मुस्लीम दोन्ही पद्धतीने झाले आहे. पण आम्हा साऱ्यांची आमची जमात एकच आहे, बहुरूपी. आमची मातृभाषा मराठी आहे. ही पद्धत मला आवडते. प्रत्येकजण विधी आपापल्या मर्जी प्रमाणे करतात. परंतु अडीअडचणीत, सुख दु:खात मात्र जमातीतले सारे लोक प्रेमाने सहकाऱ्याच्या भूमिकेतून वागतात हे मला आवडतं. इतरांनी असंच वागावं असं वाटतं’’
स्वत: गरीब असताना नवऱ्याच्या भिक्षुकी व्यवसायातून मिळालेला पैसा वापरून पालधारकांचे समाज कार्य करण्यामागची

भूमिका व प्रेरणा याबद्दल विचारता बबिता म्हणाली, ‘‘उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ॠतूंत पालधारकांचे काय वेगवेगळे हाल होतात ते मी स्वत: सोसले, भोगले आहेत. ९९ टक्के पालधारकांची चूल अनेक कारणाने दिवसातून एकदाच पेटते. पावसाळ्यात तर चूल पेटणे पावसावर अवलंबून असते. यांच्यात समाज कार्य करायचे म्हणजे मेलेल्या माणसांना जिवंत करण्यासारखं आहे. त्यांची मनं मेलेली आहेत. पराभूत मानसिकता असली तरी शेवटी ती माणसं आहेत. भारतीय बांधव आहेत. त्यांना स्वत:चं घर का असू नये. त्यांच्या मुलांनी शिक्षण का घेऊ नये. त्यांना देशाच्या, राज्याच्या मुख्य विकासात कोण व कधी घेणार? हे प्रश्न मनात यायचे. त्यानं मी बेचैन व्हायचे, पण संघटनात्मक काम सुरू केलं नव्हतं. पण २००६ मध्ये आम्ही दोघे पती पत्नी बाळकृष्ण रेणके अण्णांच्या संपर्कात आलो. त्यांच्या काही शिबिरांना हजर राहिलो. आमचे डोळे उघडले. आपल्या मर्यादेत राहून आपण कसे काम करायचे ते आम्ही त्यांच्याकडून शिकलो. ते आमची प्रेरणा आहेत.’’ आज या एकाच प्रेरणेच्या बळात बबिता बहुरूपी समाजातील पालधारकांच्या मदतीसाठी उभी आहे.’’
शिक्षण कमी आणि पैसाही फारसा गाठीशी नाही, तरीही तिची इच्छाशक्ती आणि आवाज बुलंद आहे. त्याच जोरावर ती लढते आहे.. लढणार आहे.
(संपर्क : ९३२६२८९२२७)
अ‍ॅड. पल्लवी रेणके – pallavi.renake@gmail.com