भारतातच नव्हे तर जगभरातील तरुण स्त्रिया एचआयव्ही संसर्गाला बळी पडतात. एकूण एचआयव्हीबाधितांपकी जवळपास ५१ टक्के स्त्रिया आहेत. त्यातील ४९ टक्के या १५ ते २४ वयोगटातील स्त्रिया आहेत. आज जगभरात पावणेचार कोटी एचआयव्हीग्रस्त लोक आहेत. पकी केवळ दीड कोटी व्यक्ती उपचार घेतात. एड्सच्या उदयानंतर जागतिक पातळीवर जे एड्सबद्दल जनजागरण-प्रबोधन झाले, त्यामुळे ७८ लाख मृत्यू रोखले गेले. २०१५च्या आकडेवारीनुसार दर वर्षी ११ लाख व्यक्ती एचआयव्हीसंबंधित आजारांनी मृत्युमुखी पडतात. तर दर वर्षी नव्याने जवळपास २१ लाख व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होते. म्हणजेच आज दर मिनिटाला चार व्यक्ती एचआयव्हीबाधित होत आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक एड्सदिवसानिमित्त..

एचआयव्ही-एड्सच्या पहिल्या रुग्णापासून म्हणजे १९८१ (जगातील) आणि १९८६ (भारतातील) पासून या आजाराच्या संसर्गाचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना नेहमीच अधिक राहिला आहे. जगातील पहिला रुग्ण समिलगी संभोगी पुरुष असला तरी भारतातील पहिला रुग्ण ही चेन्नईची एक शरीरविक्रय करणारी स्त्री होती. भारतातच नव्हे तर जगभरात तरुण स्त्रिया हा गट एचआयव्ही संसर्गाला बळी पडणारा मोठा वर्ग आहे. अधिकृत आकडेवारीनुसार आजपर्यंत जगात पावणेआठ कोटी व्यक्तींना एचआयव्ही एड्सचा संसर्ग झाला; त्यापकी साडेतीन कोटी लोक आजपर्यंत एड्ससंबंधीच्या विकारांनी मृत्युमुखी पडले. आज पावणेचार कोटी एचआयव्हीग्रस्त हे जगातल्या अनेक देशांत जीवन व्यतीत करत आहेत. पकी केवळ दीड कोटी व्यक्ती उपचार घेतात. एड्सच्या उदयानंतर जागतिक पातळीवर जे एड्सबद्दल जनजागरण-प्रबोधन झाले, त्यामुळे ७८ लाख मृत्यू रोखले गेले. २०१५च्या आकडेवारीनुसार दर वर्षी ११ लाख व्यक्ती एचआयव्हीसंबंधित आजारांनी मृत्युमुखी पडतात. तर दर वर्षी नव्याने जवळपास २१ लाख व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होते. म्हणजेच आज दर मिनिटाला चार व्यक्ती एचआयव्हीबाधित होत आहेत.

एकूण एचआयव्हीबाधितांपकी जवळपास ५१ टक्के स्त्रिया आहेत; मुले वगळता इतर वयोगटांतील ४९ टक्के व्यक्ती या १५ ते २४ वयोगटातील स्त्रिया आहेत. २०१५ मधील नवीन २१ लाख एचआयव्हीबाधितांपकी पंधरा ते चोवीस वयोगटातील स्त्रियांची संख्या तब्बल ४७ टक्के इतकी होती. आजमितीला जन्माला येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांची संख्या दर दिवशी ६०० इतकी आहे आणि हा भर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने स्त्रियांवरच आहे. कारण या मुलांचा जन्म, शुश्रूषा, संगोपन या साऱ्यांचा भार हा स्त्रियांवरच पडतो. काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे, जगातील ४० टक्के रुग्ण व्यक्तींना माहीतच नाही की, ते एचआयव्हीबाधित आहेत, यात बहुसंख्या स्त्रिया आहेत. एड्ससाठी दिली जाणारी एआरटी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी) या उपचारपद्धतीचा लाभ केवळ ४६ टक्के व्यक्ती घेतात. हा लाभ न मिळणाऱ्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचा भरणा अधिक आहे.

स्त्रिया एवढय़ा मोठय़ा संख्येने या संसर्गाला का बळी पडतात याचे एक कारण म्हणजे पुरुषप्रधानता! स्त्री आणि पुरुष म्हणजे संसाररथाची दोन चाके असे म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. अनेक स्त्रियांवर आजही जोडीदाराकडून ‘संभोग’ लादला जातो. तो त्यांच्यासाठी आनंदाचा भाग न राहता काही स्त्रियांच्याबाबतीत तो िहसक क्रौर्य ठरतो. ज्या आफ्रिकेत अशा नवसंसर्ग झालेल्या स्त्रियांची संख्या ८० टक्के आहे, तिथे जवळपास ५० टक्के स्त्रियांच्या म्हणण्यानुसार शारीरिक संबंध हा त्यांच्यासाठी आनंद नसून अत्याचार असतो. यातून नको असलेला गर्भ राहतो, तो वेगळाच प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेच्या काही भागात काही विशिष्ट रूढी-परंपरा आहेत. मलावी नावाच्या एका मोठय़ा भागात वयात येणाऱ्या मुलींना लैंगिकदृष्टय़ा ‘स्वच्छ’ करण्यासाठी त्यांच्याहून खूप मोठय़ा असलेल्या व्यक्तीकडे समागमासाठी परंपरेनुसार पाठवले जाते. अशी पुरुषव्यक्ती कदाचित एचआयव्हीबाधितसुद्धा असू शकते. याबाबतीत कुठल्याही मुलीने, कोणत्याही प्रकारचा विरोध करायचा नाही अशी प्रथा. या कुप्रथेतून एचआयव्हीबाधितांची संख्या खूप वाढलेली आहे, पण ही प्रथा थांबलेली नाही.

‘पुरुषप्रधानता’ हा तसा खूपच सोज्वळ शब्दप्रयोग झाला. पण जिथे कौटुंबिक िहसाचार होतो अशा दाम्पत्यातील स्त्रिया या एचआयव्ही संसर्गाला अधिक संख्येने बळी पडताना दिसतात. दाम्पत्यातील कौटुंबिक िहसाचार हा केवळ पतीकडून पत्नीवर होणारा लैंगिक अत्याचार नव्हे, तर एकूणच शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक छळ असे म्हणता येईल.

भारतातील जवळपास वीस हजार दांपत्यांच्या अभ्यासांती अशा िहसक मनोवृत्तीच्या पुरुषांमध्ये एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. २००५ च्या आकडेवारीनुसार भारतात या प्रकारच्या कौटुंबिक िहसेचे प्रमाण १५ ते १८ वर्षांच्या स्त्रियांमध्ये ३३.५ टक्के आहे. ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या २०१४ मधील अभ्यासानुसार भारतातील ‘लैंगिक िहसा’ ही जगभरातील कोणत्याही देशापेक्षा खूप कमी आहे. ही आकडेवारी कमी दिसण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘स्त्रिया बोलत नाहीत’. एचआयव्हीएड्सच्या बाबतीतही हेच घडते. नवरा बाहेरख्याली आहे हे जिला माहीत आहे, अशी सुशिक्षित स्त्रीदेखील बऱ्याचदा मूग गिळून बसते. अनेकदा पुरुषाचा बाहेरख्यालीपणा पत्नीच्या लक्षातही येत नाही. नवऱ्याच्या वर्तनाबद्दल शंका उपस्थित केली तरी मारहाण आणि छळ होण्याचाच धोका अधिक असतो. जेव्हा अशा पुरुषाला ‘बाहेर’ एचआयव्हीची बाधा होते, तेव्हा ती बाधा त्याच्या निरपराध पत्नीलाही होते. कंडोम किंवा निरोध वापरणे ही बाब जिथे ‘बाहेर’ पाळली जात नाही, त्याचा घरात वापर करण्याबद्दल कोण कुणाला विचारणार? कुठली स्त्री आपल्या नवऱ्याला वार्षिक आरोग्यचाचणीत एचआयव्ही चाचणीचा आग्रह धरेल? खरे तर हा आग्रह कायदेशीर व्हायला हवा आणि तो स्त्रीचा कायदेशीर हक्क व्हायला हवा.

एचआयव्ही एड्स प्रसाराच्या चार प्रमुख प्रकारांपकी असुरक्षित लैंगिक संबंध हेच कारण नव्वद टक्के व्यक्तींच्या बाबतीत असते. ‘तो’ जेव्हा ‘बाहेर’ असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतो, तेव्हा एचआयव्ही-एड्सची बाधा होते. अधिकृत आकडेवारीनुसार भारतात जवळपास नऊ लाख स्त्रिया सेक्सवर्कर आहेत. (प्रत्यक्षात हा आकडा याहून दुप्पट किंवा तिप्पट असावा.) यातील तीन टक्के एचआयव्हीबाधित आहेत आणि जवळपास ७० ते ८० टक्के स्त्रिया सुरक्षित लैंगिक संबंधाचा आग्रह गिऱ्हाईकाकडे धरतात असे आकडेवारी सांगते. परंतु भारतात हा व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर नाही. यात गुंडगिरी, हप्तेबाजी, भीती, अप्रतिष्ठा असते. इकडे वळणारे अनेक जण मद्यपान, अवैध व्यवसाय, जुगार, िहसा, मादक द्रव्यसेवन करणारे असतात. त्यामुळे त्यांना भान नसते आणि यामुळे सुरक्षित लैंगिक संबंधांची हमी राहत नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, एचआयव्ही एड्सची बाधा वेश्यागमन केल्यानेच होते हे अर्धसत्य असते. एचआयव्हीबाधित कोणाही व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध केल्यास एचआयव्हीची बाधा होते. आकडेवारी लक्षात घेता भारतात कमाल एक लाख सेक्सवर्कर्स वगळता इतर सर्व एचआयव्हीबाधित स्त्रिया या सर्वसामान्य स्त्रिया आहेत. एखादी व्यक्ती ओळखीची आहे, माहितीची आहे, बघण्यातली आहे याचा अर्थ ती व्यक्ती एचआयव्हीबाधित नाही असा होत नाही.  इथेच गफलत होते आणि बेजबाबदार वर्तन अंगाशी येते. अर्थात यातील अनेक स्त्रिया या नवऱ्यांमुळे एचआयव्हीबाधित झालेल्या असतात, ही गोष्ट वेगळी.

एड्स आणि एड्समुळे होणारे मृत्यू यांबद्दल ऐंशी- नव्वदच्या दशकांत जी भीती होती, ती आज उरली नसली तरी एचआयव्ही-एड्सबद्दलचा सापत्नभाव समाजातून निघून गेलेला नाही. रोगनिदान झाल्यानंतर मिळणाऱ्या आयुष्याच्या लांबीचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग, विविध प्रकारचे दीर्घकालीन श्वसनविकार, हृदयाची कमकुवतता (कार्डिओमायोपॅथी), मूत्रिपड निकामी होणे, यकृताचे कार्य मंदावणे (लिव्हर सिरॉसिस), मेंदूमध्ये रक्तस्राव होणे (स्ट्रोक) या विकारांपेक्षा एचआयव्ही एड्स बाधित व्यक्ती आज खूप दीर्घकाळ- किमान पंधरा ते वीस वर्षांचे चांगले आयुष्य योग्य उपचारांनी जगू शकते. भविष्यात मिळणाऱ्या आयुष्याच्या लांबीपेक्षा व्यक्तीला मानसिक पातळीवर मोठा धक्का बसतो. याचे कारण एचआयव्ही-एड्स या आजाराचा, संसर्गाचा लैंगिकतेशी असणारा संबंध आणि लैंगिकता व प्रतिष्ठा यांचा घातला जाणारा ताळमेळ. व्यक्तीच्या चारित्र्यावरच तो घाला असतो. एखाद्या व्यक्तीने एखादी मोठी मारामारी केली, गुंडगिरी केली, चोरी केली, भ्रष्टाचार केला, अपघात केला, अपघातात हातून एखादा मृत्यू झाला तरी त्यातून समाजात होणारी अप्रतिष्ठा ही एचआयव्हीची बाधा झाल्यामुळे होणाऱ्या अप्रतिष्ठेपुढे खूपच कमी असा समज समाजात पक्का आहे. त्यामुळे समाजात उजळ माथ्याने फिरणे अवघड होऊन बसते. अनेकजण स्वत:ला मधुमेह झालेला आहे, बीपी आहे असे आत्मप्रौढीने सांगतात. परंतु ‘मला एचआयव्ही-एड्सची बाधा झाली आहे’ असे कोणी सांगत नाही. अशी व्यक्ती ‘तो’ असेल तर जोडीदाराला- ‘तिला’ वस्तुस्थिती सांगायची की नाही याबाबतीत तो बहुतांशी द्विधा मन:स्थितीतच असतो. ते त्याच्या मानसिकतेवर, बौद्धिक-सांस्कृतिक समृद्धतेवर अवलंबून असते.

स्वत:ला एचआयव्ही एड्सची बाधा असताना पत्नीला त्याचा थांगपत्ता लागू न देता, औषधोपचार घेणारे आणि त्याहून पुढची गोष्ट म्हणजे पत्नीशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवून एचआयव्हीसंसर्गाची बाधा करून तिची तपासणीही न करणारे आणि अर्थात आरोग्याच्या बाबतीत तिला औषधोपचार न देता किंवा औषधोपचाराच्या गरजेची चाचपणी न करता, चक्क वाऱ्यावर सोडून देणारे अनेक महाभाग आपल्या समाजात आहेत.

स्त्रियांमधील एचआयव्हीची बाधा हा भारतासारख्या देशात एक गंभीर विषय अशासाठी आहे की, मुळात बहुसंख्य स्त्रियांना त्यांचा अपराध नसताना एचआयव्ही एड्सचा संसर्ग होतो. आपल्या रूढी आणि परंपरांचा पगडा, स्त्रियांचे डावललेले अनेक हक्क- ज्यांमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक हक्क आणि एकंदर सर्वच पातळ्यांवर पुरुषप्रधानता असल्याने, स्त्रीला अनेक प्रश्नांप्रमाणेच एचआयव्हीच्या गंभीर आरोग्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. शिक्षणाच्या बाबतीत आज थोडीफार सुधारणा झालेली असली तरी ‘तुला काय समजतं?, तुला काय करायचं?, तुला जमणार नाही. मुलीची जात तुझी!’ अशा प्रकारचे हेटाळणीवजा शेरे बालपणापासून घरात केवळ पुरुषांकडूनच नव्हे, तर ज्येष्ठ-वृद्ध स्त्रियांकडूनही ऐकवले जातात.

अब्रू, संस्कृती या नावाखाली स्त्रियांना अनेक लहान-मोठे अन्याय सहन करायला उद्युक्त केले जाते. विवाहाबाबतही आपल्या समाजात खूप मागासलेपण आहे. विवाहात मुलीच्या मनाचा सर्वागीण विचार किती होतो याचा शास्त्रशुद्ध आणि खराखुरा अभ्यास केल्यास धक्कादायक आकडेवारी समोर येईल. अजूनही मुली पाहण्याचा पारंपरिक कार्यक्रम होतो आणि एखाद् दुसऱ्या किरकोळ भेटीतच आयुष्यभराची एकमेकांशी गाठ बांधणारे विवाह ठरतात. बहुतेक वेळा ते पुरुषच ठरवतात. मुलीकडची पुरुषप्रधानता अधिक की मुलाकडची अधिक एवढाच काय तो बदल विवाहानंतर होतो. जोडीदाराची निवड आणि निकष यांबाबत आपल्याकडे फारसे काही प्रबोधन होताना दिसत नाही. अगदी आजही नाही.

जेव्हा एखादी स्त्री अकाली विधवा होते, तेव्हा पुनर्विवाहाचा विचार गांभीर्याने होताना दिसत नाही, जो पुरुषांच्या बाबतीत सहज होताना आणि अमलात येताना दिसतो. जर पती एचआयव्ही एड्सने गेला असेल तर मात्र अनेकदा तिची परवड होते. पोटच्या मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर पडते. त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन स्वत:च्या पायावर उभी राहीपर्यंत तिचे शारीरिक, आर्थिक असे सर्वागीण हाल होतात. त्यात जर मूल एचआयव्हीबाधित असेल तर अवस्था आणखी दयनीय होते. अशा स्त्रीचे कुटुंबातील स्थान अपवादानेच सन्माननीय राहते. आरोग्यावरील आणि एकंदर खर्च बहुतेक वेळा कुटुंबातील इतर व्यक्ती करतात. कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत तिचा सहभाग असतोच असे नाही. दीर, जाऊ, सासू-सासरे यांच्या मानसिकतेवर पुढचे भवितव्य अवलंबून राहते. तिला मूल नसेल तर या कुटुंबाकडून मानसिक आधार अभावानेच मिळतो. काही वेळा पतीच्या स्थावरावरील हक्कावर पाणी सोडावे लागते. घरात हेटाळणी, भेदभाव पदरी येतो. एकंदरीत एचआयव्हीच्या बाबतीत अनेक भ्रामक समजुती आहेत. एकमेकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे, एकमेकांना स्पर्श केल्यामुळे, एकमेकांचे कपडे-अंथरुण वापरल्यामुळे, अशा व्यक्तीबरोबर जेवल्यामुळे किंवा तिने स्वयंपाक केल्यामुळे एचआयव्हीचा प्रसार होत नाही. परंतु अनेकांमध्ये याबाबत अज्ञान आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधितांना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणी मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी ही गोष्ट लपवण्याकडे कल असतो. स्नेही, नातेवाईकांमध्ये पूर्वीसारखे समरसून जाता येत नाही. आरोग्याच्या बाबतीतसुद्धा सर्वच प्रकारचे उपचार सर्व हॉस्पिटलमध्ये मिळतील याची हमी नसते. एड्सबाधितांवर सर्वच रुग्णालयांत मोठी शस्त्रक्रिया होत नाहीत. बाहेरच्या जगात वाटय़ाला आलेला तिरस्कार ती एक वेळ सहन करू शकते; पण हा अनुभव जेव्हा कुटुंबात येतो, तेव्हा मात्र तिला जीवघेण्या वेदना होतात. ती स्वत:ला कमी लेखू लागते. काही वेळा तिला पराकोटीचे नराश्य येऊ शकते. आजही भारतात बहुतेक स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे. जगभरात हयात असलेल्या ७० कोटी स्त्रियांचा विवाह वयाच्या अठरा वर्षांपूर्वी झालेला आहे. भारतात ही वयोमर्यादा आणखी कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शिकलेली नसेल तर प्रश्नच नाही; पण ती पदवीधर असो, बाहेर नोकरी करणारी असो, डॉक्टर-शिक्षक-इंजिनीअर असो तिचा आवाज बहुधा दबलेलाच असतो. कुटुंबातील इतर निर्णयांबरोबरच लैंगिक निर्णयाबाबतीतही ती स्वतंत्र नसते. म्हणजे संसारातील लैंगिक संबंधात तिच्या इच्छेचा विचार होत नाही. हे लैंगिक संबंध बहुधा पतीच्या इच्छेनुसारच होतात. लैंगिकतेचे शास्त्रशुद्ध शिक्षण अजून आपल्या गावीही नाही. स्मार्ट फोन, इंटरनेट इत्यादी माध्यमांतून सेक्स मात्र सर्वदूर, सर्वस्पर्शी झाला आहे. तो न्याहाळताना त्यातील गरमार्ग, अवाजवी समज, बहकलेपण यांची कल्पना मात्र तो पाहणाऱ्या व्यक्तीला नीटशी आलेली असतेच असे नाही. मग ती व्यक्ती सेक्सबद्दलच्या गरसमजांचा, अवाजवी अपेक्षांचा, नि हव्यासांचा बळी ठरल्यास नवल नाही.

जोपर्यंत ‘वयात येताना’च्या वयातच कुटुंबात लैंगिकतेविषयी खुली चर्चा सुरू होत नाही, विचारांची देवाणघेवाण होत नाही, संवाद घडत नाहीत, तोपर्यंत आपल्याला निरोगी समाजाची अपेक्षा ठेवता येणार नाही. तरुण मुला-मुलींशी शिक्षकांचा, पालकांचा आणि त्यांच्या संपर्क-सान्निध्यात येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाचा सुसंवाद घडायला हवा. कारण तेच उद्याचे नागरिक आहेत.

१ डिसेंबर हा जागतिक एड्सदिवस साजरा केला जात नाही; तो पाळला जातो. एचआयबाधितांना हात देण्यासाठी, त्यांचे मानसिक बळ वाढविण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात सन्मानाने ठेवण्यासाठी आणि त्यांना आरोग्यासह सर्व सुविधा त्यांचा हक्क म्हणून बहाल करण्यासाठी; येणारी पिढी एचआयव्हीबाधित असू नये; कोणा एकाही व्यक्तीला त्याची बाधा होऊ नये यासाठी आरोग्यशिक्षणाचे धडे सर्वांपर्यंत पोहोचवून- विशेषत: समाजातील स्त्रिया- ज्यांचा तिळमात्र दोष नसतो, त्यांना एचआयव्ही-एड्सचा ‘विटाळ’ होण्यापासून वाचवण्यासाठी!

लेखकसांगलीस्थित एम.डी.(चेस्ट), एफ.सी.सी.पी. छातीरोग विशेषज्ञ आहेत.   

डॉ. अनिल मडके 

anms@rediffmail.com