भारतीय पत्निव्रता पुरुषअशी संकल्पना केली तर अन्वीकर त्यात फिट बसतील. गेली पंचवीस वर्षे रेसिडय़ुअल स्किझोफ्रेनियाने ग्रस्त बायकोचा विकार ते सांभाळतसहन करीत आहेत, पण कधीही ते त्रासलेले, त्रागा करताना दिसत नाहीत, उपचाराची कास सोडत नाहीत. विचारही शांत, संयमी वाटतात, इतके समंजस विचार करण्याचं धैर्य त्यांना कुठून मिळालं असेल? काय असेल दोघांच्या नात्यात?..  मनोरुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबरोबरच त्यांना सांभाळणाऱ्या नातेवाईकांचंही कौतुक करायला हवं. श्री. अन्वीकर त्यातलेच एक.. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्ताने..

मनोविकारांच्या उपचाराचा प्रवास नेहमी सोपा असतोच असे नाही. तीव्र स्वरूपाच्या मनोरुग्णांना अनेक दिवस गोळ्या घ्याव्या लागतात, त्रासही सहन करावा लागतो. पण मनोरुग्णांची अखंड सोबत करणारे, त्यांची साथ देणारे, त्यांच्या स्वभावातला असमतोल सहन करणारे, त्यांचे फटके खाणारे, त्यांच्या मागे चिकाटीने औषध घे, औषध घे म्हणून मागे लागणारे सोशिक, सहनशील, व्यथित नातेवाईक हेही तेवढय़ाच तणावातून जातात. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन, तर ९ ते १५ ऑक्टोबर जागतिक मानसिक सप्ताह असतो   त्यानिमित्ताने त्यांचीही दखल घ्यायलाच हवी.

अन्वीकर! सावळे, शिडशिडीत शरीरयष्टीचे, बऱ्यापैकी उंच. गेली वीस वर्षे अव्याहत आपल्या बायकोला दाखवण्यासाठी माझ्याकडे येत आहेत. त्यापूर्वीही तिचा उपचार पाच वर्षांपासून पुण्याला चालूच होता.

सौ. अन्वीकर काहीशा ठेंगण्या, उजळ, स्थूल आहेत. तोंडात सुपारी ठेवून बोलल्यासारखे बोलतात. (खरं म्हणजे फारसं बोलतच नाहीत.) एकच एक वाक्य पुन: पुन्हा बोलत बसतात. गोळी वाढवू नका म्हणून सांगतात. श्री. अन्वीकरांशी मी एकांतात बोलत असताना कन्सल्टिंग रूमचं दार उघडून मधून मधून संशयाने आत डोकावतात! त्यांना स्किझोफ्रेनिया आहे!

आहे म्हणजे, आता पूर्ण स्वरूपात नाही. वीस वर्षांपूर्वी पूर्ण अ‍ॅटॅक आला असावा. त्यावेळी पुण्याला जाऊन अन्वीकरांनी तिचा उपचार केला. साधारण सत्तर टक्के आजार बरा झाला, पण काही लक्षणे बाकी राहिली. संशयी स्वभाव, आरडा-ओरड करणे, घरकाम न करणे, दिवसभर बिछान्यावर बसून राहाणे इत्यादी. तशा त्या अधून-मधून बऱ्या होतात. कामंही करतात, पण काहीच दिवस. दोन मुली. दोन्हीही समंजस. आईचा स्वभाव पाहून स्वत:च स्वत:चं करायचं शिकल्या. बालपणीच बिचाऱ्यांनी बालसुलभ हौशी-मौजींना मुरड घातली. अभ्यासूही निघाल्या.

खरं अपार कौतुक अन्वीकरांचं. ‘भारतीय पतिव्रता नारी’ या संकल्पनेचा उदोउदो होतो तशी ‘भारतीय पत्निव्रता पुरुष’ अशी संकल्पना केली तर श्री. अन्वीकर त्यात फिट बसतील. गेली पंचवीस वर्षे बायकोचा हा विकार श्री. अन्वीकर सांभाळत-सहन करीत आहेत. वीस वर्षांपासून तर मीच पाहातो आहे; पण कधीही ते त्रासलेले दिसत नाहीत,  उपचाराची कास सोडत नाहीत. अगदी तारीखवार येतात. पूर्ण फाईल घेऊन येतात. सर्व वृत्तांत सांगतात. थोडाही चांगला बदल झाला तर आवर्जून सांगतात. वास्तविक सौ. अन्वीकरांच्या कासव-छाप प्रगतीने मीच कंटाळलो आहे. त्या ‘रेसिडय़ुअल स्किझोफ्रेनिया’ या प्रकाराने ग्रस्त आहेत. बहुतेक लक्षणं हे रेसिडय़ुअल म्हणजे भिंतीवरचा रंग खरवडून काढल्यावर अर्धवट रंग कायम राहातो तसे मूळ व्यक्तिमत्त्वाला चिकटून आहेत. त्या लक्षणांना फारसा उपाय नाही. गोळ्या निष्प्रभ ठरतात.

पण अन्वीकरांची चिकाटी पाहून मला अचंबा वाटतो! ते अतिशय मृदू आवाजात बोलतात. सकाळचा कुकर लावण्यापासून मुलांचे कपडे काढून ठेवणे, डबा भरणे इत्यादी सर्व कामं करीत असल्याचा ते उल्लेखही करीत नाहीत. तुम्ही मोलकरीण का लावत नाही असं विचारल्यावरच त्यांनी सांगितलं की बायकोच्या स्वभावामुळे एकही मोलकरीण टिकत नाही. या माणसाच्या सहनशीलतेला मी मनोमन केव्हाच हात जोडले आहेत! ते कधीही रागावत नाहीत. गोळ्यांचा फारसा उपयोग झाला नाही हे सांगत असताना खरं तर मी ओशाळा व्हायला हवा, पण त्यांच्याच चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटतात! सासरच्या मंडळींकडनं त्यांना फारसा पाठिंबा नाही. सासरे नाहीत. सासू ठार बहिरी आहे. मेव्हणा अलिप्त आहे. अधून मधून येतो आणि काहीतरी चुकीची माहिती सांगून जातो. मी त्याच्या चुकीच्या माहितीने रागावल्यावर  अन्वीकरच माझी समजूत घालतात. रुग्णाचा नातेवाईकच एका सायकियाट्रिस्टला समजावतो!

अन्वीकरांच्या जीवनाबद्दल मी विचार करतो, या माणसाला आयुष्यात काय सुख मिळालं आहे? लग्नानंतरची चार-पाच र्वषच काय ती सुखाची गेली असतील. तेवढय़ा थोडक्या काळात यांचे पती-पत्नी संबंध इतके घट्ट झाले असतील, की त्यापायी आयुष्यभर त्यांनी बायकोच्या विक्षिप्त वागणुकीचा स्वीकार सोशिकतेनं करावा? मला उत्तर सापडत नाही, फक्त एक शेर आठवतो –

‘जिंदगी कुछ भी नही फिर भी जिये जाते है

तुझपे ऐ वक्त हम एहसान किये जाते है’

एखाद्या माणसाचा दुर्दैवाने किती पाठपुरावा करावा याला काही मर्यादा? असे प्रश्न ‘नियती’, ‘प्रारब्ध’ वगैरे शब्दाखाली आपण दडपून टाकतो. असेच एक दिवस अन्वीकर येऊन बसले. चेहरा थोडा गंभीर. कागद समोर ठेवला. त्यावर मुलीचं नाव होतं. कुण्या न्यूरोफिजिशियनचं प्रिस्क्रिप्शन होतं. ‘धाकटय़ा मुलीला ‘एपिलेप्सी’चा अटॅक आलाय. तिला गोळ्या चालू केल्यात. पण ही गोष्ट हिला सांगू नका. नाहीतर ती त्रागा करून घेईल.’ शांत आवाजात अन्वीकर बोलत होते. तेरा वर्षांच्या मुलीला आईला चुकवून गोळ्या देण्याची कसरत करणं हे अन्वीकरांच्या नशिबी आलं होतं.

अन्वीकर निव्र्यसनी आहेत. ‘आमचे हे सुपारीचं खांडदेखील खात नाहीत’ असं कौतुक सांगणाऱ्यांचं मला फारसं अप्रूप नाही. मात्र छोटय़ा छोटय़ा टेन्शनचं कारण सांगून दारू ढोसणारे पाहिले की मला अन्वीकर संत वाटतात. आज मात्र अन्वीकरांनी दोघा मुलींची लग्न नेटानं लावून दिली. वधुमाय दोन्ही लग्नात फारशी वावरली नसावीच. पण मुली सुस्थळी पडल्या अन् त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा सर झाल्याबद्दल मलाच हायसं वाटलं.

एकदा रेडिओवर मी अन्वीकरांचं पाटबंधारे वगैरे तत्सम विषयावर भाषण ऐकलं. त्यांच्या विषयात ते पारंगत दिसले. पण बोलण्याची पद्धत तशीच मृदू. वेदना पचवून मऊ  झालेली. स्वर तसाच किंचित कातरकिनरा. माझ्या मनात कधी कधी अन्वीकरांच्या भवितव्याचे विचार येतात. वृद्धापकाळाने किंवा इतर विकाराने जर बायको आधी वारली (कारण मनोविकाराने कुणी मरणं शक्य नाही- आत्महत्या सोडल्यास) तर अन्वीकर आनंदी होतील की दु:खी? उरलेलं आयुष्य ते कुठल्या कामानं भरून काढतील? अन्वीकरांनी आयुष्यात कधी घटस्फोटाचा विचार केला नाही. माझ्याजवळ तरी बोलून दाखवला नाही. घटस्फोटानं प्रश्न सुटणार नाहीत, मुलांची आबाळ होईल, मुख्य म्हणजे बायकोवर अन्याय केल्यासारखे होईल, इतके समंजस विचार करण्याचं धैर्य त्यांना कुठून मिळालं असेल? प्रेम हा तसा फार ढोबळ शब्द झाला, पण अन्वीकरांचं बायकोवर प्रेम असेल का? (प्रेम हा शब्द न वापरता, आयुष्यभर त्यांनी तिच्यासाठी जे केलं ते दुसरं काय, असं उत्तर मीच स्वत:ला देऊन टाकतो.)

आजही दर महिन्याला न चुकता ते बायकोला घेऊन येतात. मी दिलेल्या गोळ्या घेऊन माझी फी चुकती करून निघून जातात. ती फी त्यांच्याच खिशात टाकून, त्यांना एक कडक सॅल्यूट ठोकावा असा विचार करत, मी मनाशी गुणगुणतो-

सूर मागू तुला मी कसा.. जीवना तू तसा मी असा..

(लेखक नांदेड येथील मनोविकारतज्ज्ञ आहेत अन्वीकर हे नाव बदललेले आहे.)

nandu1957@yahoo.co.in