क्वीन एलिझाबेथ.. नुसती इंग्लंडची राणीच नाही, तर तिचा उल्लेख ‘वर्ल्ड मोनार्च’ म्हणून गौरवाने होतो.. ‘रॉयल्टी’ या संकल्पनेतले सर्व गुण असलेली ही ‘हर मॅजेस्टी..! क्वीन व्हिक्टोरियाच्या प्रदीर्घ राजवटीचे रेकॉर्ड ब्रेक करणारी ही राणी म्हणून नुकतेच गौरवसमारंभ झाले.. त्या निमित्ताने, या राणीपूर्वीच्या राण्यांचा घेतलेला मनोज्ञ मागोवा..
रा ल्ल जसत्ता आणि लोकसत्ता एकत्रित असण्याची प्रदीर्घ परंपरा असणारा देश.. इंग्लंड! एकीकडे राजसत्तेवर अतोनात प्रेम करणारी इंग्लिश जनता, तर ग्रीसनंतरची मोठी लोकशाही म्हणून अंगुलीनिर्देश- इंग्लंडचाच होतो. इंग्लंडचे राजघराणे, म्हणजे खूप खोलवर मुळे रुजलेला वटवृक्ष मानलेला आहे. दहाव्या शतकानंतर इतक्या आधुनिक काळापर्यंत, राजसिंहासन कधी रिकामे राहिले नाही. राजसिंहासन, राजघराण्याची धार्मिक स्थळे, पॅलेसेस, वंश-परंपरा, रीतिरिवाज, म्युझियम्स, खेळ, संगीत, भाषा, विवाहसंबंध या सर्व गोष्टी वलयांकित आहेत. अवघ्या जगाचे कुतूहल या राजघराण्याभोवती फिरते आहे. इंग्लिश राजे-राण्यांनी जगाच्या इतिहासाची पाने भरली आहेत आणि भारलीही आहेत..
सध्या अशीच ऐतिहासिक घटना प्रसिद्धीच्या लखलखाटाने दिपून गेली आहे. क्वीन एलिझाबेथ (द्वितीय) हिने, राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या प्रदीर्घ काळापेक्षा अधिक काळ राज्य केले. (राजसिंहासन भूषवले म्हणू) जगभराने तिचे कौतुक केले. नव्याने पुस्तके लिहिली. चित्रपट काढले. ‘लाँग लीव्ह क्वीन’चा नव्याने जयजयकार झाला.
या राणीपूर्वीची महत्त्वाची राणी होती, व्हिक्टोरिया! जिच्या नावे ‘व्हिक्टोरिअन एज’ हा मोठा कालखंड नावाजला जातो. जिच्या राज्यात सूर्य कधीच मावळला नाही, जी हिंदुस्थानात कधीही न येता, हिंदुस्थानची राणी ठरली, आता नावे बदलली, तरी अद्यापही व्हिक्टोरिआ टर्मिनस, व्ही. जे. टी. आय कॉलेज, राणीचा बाग, व्हिक्टोरिया मेमोरिअल (कोलकत्ता) व्हिक्टोरियाच्या नावाने ज्ञात असलेली व्हिक्टोरिया घोडागाडी (आता शोभेपुरती उरलेली) अशी अनेक स्मारके जिच्या नावाने हिंदुस्थानात आहेत. अवघ्या पृथ्वीतलावर जिच्या नावे (आणि पती अल्बर्टच्या नावे) सर्वात जास्त स्मारके, रस्ते, गावे, बागा, म्युझियम्स आहेत. तसेच प्रथा आणि एक प्रचंड मोठा सुसंस्कृतपणाचा आदर्श दर्शवणारा कालखंड गणला जातो- व्हिक्टोरियन एज नावाने. अशी क्वीन व्हिक्टोरिया.. राजघराण्याच्या प्रभावळीतली ही चौथी राणी होती.
सध्याची राणी एलिझाबेथ (दुसरी) ही गादीवर आलेली चोपन्नावी राज्यकर्ती. व्हिक्टोरियाच्याही आधी सर्वात गाजलेली राणी होती, एलिझाबेथ (पहिली)! कन्या वारस राजगादीवर येण्यास चर्च, जनता, पार्लमेंटची मान्यता मिळायला, मेरी स्टुअर्ट हिचे प्रयत्न कारणीभूत ठरले. त्याआधी अवघ्या जगभरात पुत्र वारसा हीच प्रचलित प्रथा होती. राजा आणि राणी, हे ‘ब्लू ब्लड’ म्हणजे राजरक्त धारण करणारे असतात. देव-गॉडचे सगुण रूप म्हणजे राजा-राणी, सर्वोच्च गुणांचे एकरूप म्हणजे राजा-राणी. ही १०४२ सालापासून , म्हणजे ‘वेस्टमिन्स्टर अ‍ॅबी’, या वास्तूच्या स्थापनेपासून रुजलेली कल्पना आहे. आजही कित्येक इंग्रज, ब्लू-ब्लडच्या स्पर्शाने रोग बरे होतात, संपन्नता येते, मनुष्यजीवनाचे सार्थक होते, या श्रद्धेतून ‘किंग एडवर्ड’च्या समाधीचे दर्शन घेतात. क्वीन व्हिक्टोरियाने, ‘वेस्टमिन्स्टर अ‍ॅबी’मध्ये राज्ञीपदाची शपथ घेताना ‘मी चांगली ख्रिश्चन होईन’ अशी शपथ घेऊन अखेपर्यंत पाळली. इंग्लंडमधील ‘किंग एडवर्ड’ या धर्मपरायण राजाने ही वास्तू बांधली. राजघराण्याची लग्ने-बारशी-राज्याभिषेक-मृत्यू, नंतरचे रिवाज, याच ‘अ‍ॅबीत’ होतात. पहिली राणी एलिझाबेथ, क्वीन मेरी, क्वीन व्हिक्टोरिया, एलिझाबेथ दुसरी (सध्याची).. सर्व राण्यांच्या डोक्यावर राजमुकुट चढले ते ‘अ‍ॅबी’मध्ये.
इंग्लंडला शक्तिशाली देश बनवणारा किंग हेन्री..कडकडीत देशप्रेम, देशोन्नतीची आस, सुसंस्कृतपणा आणि विलक्षण देखणेपणा असणारा, आठवा हेन्री.. इंग्लंड-फ्रान्सच्या युद्धकाळात राज्यावर आला. हेन्रीचे लग्न कॅथरीनशी झाले. ती तेव्हाचा प्रिन्स ऑफ वेल्स (आर्थर) याची विधवा पत्नी होती. (पुत्रजन्म.. तोही रॉयल ब्लड संबंधातून व्हावा. यासाठी काही राजांनी विधवा राण्यांशी विवाह केले. मात्र क्वीन व्हिक्टोरियाच्या सनातनी विचारांना विधवा विवाह मंजूर नव्हता.) हेन्रीने हा विवाह राजघराण्याच्या दडपणाखाली केला. या दोघांना मुलगे झाले. परंतु सर्व मरण पावले. जगलेले एकमेव अपत्य म्हणजे मेरी. पुढे क्वीन मेरी. इंग्लंडची पहिली राणी!
या मेरीबद्दल इंग्लंडच्या जनतेच्या मनात फक्त भय होते. तिने आपली सावत्र बहीण एलिझाबेथ (पहिली) हिचा अमानुष छळ केला. त्या वेळी राणीपदाच्या स्पर्धेत तीन स्त्रिया होत्या. १५०४ ते ४५ हा तो कालखंड होता. या पूर्वी मात्र ‘राणी’ हे पद, फक्त राजाच्या पत्नीपदापुरतेच मर्यादित होते. सम्राज्ञी-राज्ञी म्हणजे, कन्या वारस राज्यावर येणे. यासाठी कारणीभूत ठरली, मेरी! महत्त्वाकांक्षी हॅन्री -कॅथरीनची राजकन्या!
‘मेरी’ लहान असतानाच, हेन्री हा अ‍ॅन बुलन, या कोवळ्या रूपवान मुलीच्या प्रेमात पडला. भाषा आणि संगीत या दोन्हीत त्यांच्या इतकाच रस असणारी अ‍ॅन पत्नीपदी यावी आणि त्यासाठी कॅथरीनपासून घटस्फोट हवा, यासाठी हेन्री प्रयत्न करू लागला. पण खरा स्वार्थी हेतू होता राज्याला पुरुष वारस देणारी, पुत्रप्रसवा राणी करणे. या काळापर्यंत इंग्लंडच्या राज्यावर ‘राणी’ कधीच नव्हती. हा विचार कल्पनेतही नव्हता ब्रिटिश जनतेच्या. ही परंपरा सुरू केली मेरी स्टुअर्टने!
ही मेरी प्रजेची नावडती होती. इतिहासाने ‘ब्लडी मेरी’ अशी तिची हेटाळणी केली आहे. ती केवळ स्त्री राजपदी बसली म्हणून नाही, तर तिने तिची पाच वर्षांची सत्ता सावत्र बहीण एलिझाबेथ (पहिली, हेन्री – अ‍ॅनची मुलगी) हिचा छळ (कारण तीही राज्याची वारस होती) करण्यात, तिला आरोपी करून शिरच्छेदासाठी तिला टॉवर ऑफ लंडनमध्ये पाठवणे, अशा कुकर्मात घालवली. फ्रान्सशी चाललेल्या खर्चीक युद्धाने जनता जेरीस आली होती. लोक हताश होते. देश क्रांतीच्या उंबरठय़ावर होता. १५५८ साली क्वीन मेरी एकाकी आणि अपत्यहीन अवस्थेत मरण पावली.
तेव्हा इंग्लंडच्या आशा एकवटल्या त्या एलिझाबेथ (पहिली) या कोवळ्या तरुण राजकन्येवर! हेन्रीने अ‍ॅन बुलिनशी विवाह केला. पण त्याची पुत्रप्राप्तीची आस पूर्ण झाली नाहीच. एलिझाबेथ (पहिली) ही एकच मुलगी त्या दंपतीला झाली. हेन्रीने मुलगा न देऊ शकल्याचा राग अ‍ॅनवर काढला. त्याने अ‍ॅनची हत्या करवली. परंतु त्याने प्रबोधनपर्वाची, नव्या युगाची, देशप्रेमाच्या भावनेची मूल्ये रुजवली, त्यामुळे ब्रिटिश जनतेने त्याचा गुन्हा माफ करून, हेन्रीला गौरवाचे स्थान दिले.
हेन्रीच्या दोन पत्नींच्या मुली मेरी आणि एलिझाबेथ. चर्च आणि इंग्रजी जनतेस मुलगी राज्यावर बसणे मान्य नव्हते. पण धार्मिक सत्तांतर होऊन राजघराणेच चर्चचे ‘सुप्रीम हेड’ झाले. मेरी राणी झाली, त्याचे हेही एक कारण..
मेरीची जुलमी राजवट संपली, आणि एलिझाबेथ (पहिली) राणी झाली. ‘इंग्लंडच्या महाकाव्यातला एक मनोहर सर्ग’ म्हणजे एलिझाबेथचा कालखंड असे मानले जाते. एक स्वत:वरचा आणि दुसरा देशावरचा विश्वास, हे हेन्रीचे गुणविशेष एलिझाबेथमध्ये आणि पुढे व्हिक्टोरियामध्ये पुरेपूर उतरले होते. ( राणी एलिझाबेथ (पहिली) ही ‘टय़ुडाँर’ घराण्यातली, मेरी ही ‘टय़ुडाँर’. राणी व्हिक्टोरिया ‘हॅनॉव्हर’ घराण्यातली आणि एलिझाबेथ (दुसरी) ही ‘विंडसर’ घराण्यातली.. ब्रिटनवर अनेक घराण्यांनी राज्य केले. या राण्याही त्यामुळे वेगवेगळ्या घराण्या-वंशाच्या आहेत.) एलिझाबेथ (पहिली) राज्यावर आली तेव्हा ब्रिटिश जनतेला ती फक्त नावानिशी ज्ञात होती, सावत्र बहीण मेरीने हेतुत: तिला जनतेपासून दूर ठेवले होते. राज्यावर आल्यावर तिला मेरीने निर्माण केलेली राणीची मलिन प्रतिमा पुसून टाकायची होती. एलिझाबेथ रूपवान होती, तरुण होती. पण तिने विवाह कधीच केला नाही. ‘इंग्लंड देशच माझा प्रियकर आहे’ या रोमांचकारी कल्पनेत ती जगली आणि वागली. स्पेन, ऑस्ट्रिया आदी देशांतील राजपुरुषांशी प्रेमचेष्टिते हा तिच्या राजकारणाचा भाग होता. त्यांच्याशी विवाहाला ती कधीच उत्सुक नव्हती. ऐश्वर्य, वैभव, दिमाखदार समारंभ साजरे करून जगाला
दिपवून टाकण्याची तिची आवड ही ‘वैयक्तिकतेपेक्षाही’ लंडनची प्रतिमा जगात उजळून टाकण्यासाठीच होती. ‘चर्च ऑफ इंग्लंड’ हा तिच्या अभिमानाचा आणि आखत्यारीचा विषय होता. इंग्लंडचे राजघराणे प्रोटेस्टंट पंथाचे. म्हणून ‘तो धर्म’ तिच्या देशाचा होता. त्यामुळे कॅथलिकांचा तिने तिरस्कार केला. स्पेनमधून आलेले ज्युसुइट्स राजकीय बंडाळी माजवणार, याची तिची अटकळ रास्त होती. ती मुत्सद्दी होतीच. कॅथलिकांना तिने दूर ठेवले. त्रासही दिला. परंतु त्याची तिला जाणीव होती. धार्मिक असहिष्णूपणा हा तिच्या डावपेचांचा भाग होता, तसा इंग्लंडवरील अधिकारभावेनचाही. मात्र एलिझाबेथने कोणा कॅथलिकास मृत्युदंड दिला नाही. मेरी-द-क्वीन, ही दुसरी मेरी. तिच्या आत्याची नात.. हीसुद्धा इंग्लंडच्या राजाची एक वारसदार होती. पण एलिझाबेथने तिला अठरा वर्षे कैदेत ठेवले. कारण ‘ती’ मागणी प्रोटेस्टंटनी केली होती. प्रोटेस्टंटची कुठलीही मागणी ती धुडकावत नसे. १५८८ साली स्पेनने इंग्लंडवर आक्रमण केले. तेव्हा तिला देश सोडून जाण्याबद्दल सुचवले गेले. पण ती तिथेच राहिली. ‘‘माझी प्रज्ञा निष्ठावान आहे. माझे शरीर दुर्बळ स्त्रीचे आहे. पण हृदय राजाचे आहे. युरोपातल्या कुठल्याही राजाने माझ्या देशाच्या सरहद्दीकडे वाकडय़ा नजरेने पाहिलेले चालणार नाही.’’ सैनिकांच्या तुकडीसमोर भाषण करणारी एलिझाबेथ, पंचेचाळीस वर्षे राज्य केलेली एलिझाबेथ (पहिली) हिने सर्वोत्तम, शांत, संपन्न अशा इंग्लंडची पायाभरणी केली. जगाचे नेतृत्व करणारे समर्थ राष्ट्र निर्माण करणारी एलिझाबेथ (पहिली) इतिहासात गौरवाने उल्लेखली जाते आहे. इंग्लंडच्या पायाभरणीसाठी या एलिझाबेथची कारकीर्द जशी महत्त्वाची मानली जाते, तशीच व्हिक्टोरियाची त्रेसष्ट वर्षांची कारकीर्द..
एलिझाबेथ (पहिली)पुढचे रक्तलांच्छित आवाहन व्हिक्टोरियापुढे नव्हते. व्हिक्टोरियाला जो देश मिळाला, तो स्वास्थ्यपूर्ण, समंजस होता. तिच्या राज्यात इंग्लंडच्या भूमीवर लढाया लढल्या गेल्या नाहीत. ‘कडकडीत देशप्रेम’ या भावनेचा वारसा एलिझाबेथकडून मिळाला. दोघी राण्या कणखर, खंबीर, राजघराण्याचे नियम शिरोधार्य मानणाऱ्या अशा. एकीने विवाह नाकारला, तर दुसरीने, व्हिक्टोरियाने आदर्श संसाराचा मापदंड दिला. व्हिक्टोरियाला नऊ अपत्ये आणि अनेक नातवंडे. सर्वजण युरोपातल्या राजघराण्यांशी लग्नसंबंधाने जोडली गेली. पण इंग्लंडचा मान प्रथम राहिला आणि अन्य युरोपिअन देशांचे अडथळे येणार नाहीत याची दक्षता घेतली. व्हिक्टोरियापुढची आवाहने औद्योगिक- सामाजिक होती, एलिझाबेथ पुढे धार्मिक.. अधिक अवघड.
एलिझाबेथ आणि व्हिक्टोरियाच्या राज्ञीपदाच्या काळात दोनशे वर्षांचे अंतर आहे. मेरी आणि एलिझाबेथ जवळपास एकाच काळातल्या. एलिझाबेथचा काळ हा मध्ययुगाचा अंत, तर व्हिक्टोरियाचा काळ आधुनिक यंत्रयुगाचा प्रारंभ होता. अॅन.. मेरी.. एलिझाबेथ.. यांच्या काळात दिमाखदार राजदरबार केंद्रस्थानी आणि पार्लमेंट दुय्यम स्थानी. तर चर्च आणि राजघराणे अत्युच्ची होते. व्हिक्टोरियाचे दरबार साधे होते. अफाट पत्रव्यवहार, अश्वदौड, ऑपेरांची जाणकारी, नृत्यकौशल्य, बुद्धिवैभव असणारी व्हिक्टोरिया ही अल्बर्ट, आपल्या पतीवर देवाइतकी श्रद्धा असलेली, कुटुंबाला प्राधान्य देणारी, जगभराच्या राजकारणावर अधिपत्य असणारी तरीही पॅलेसमध्ये घरगुती गृहिणी म्हणून वावरणारी, परंपरा मानणारी राज्ञी होती.
तिच्या राज्यात टपालखाते, तारयंत्रणा आणि रेल्वे या तीन महत्त्वाच्या सुधारणा आल्या आणि तिने तिच्या अधिपत्याखालच्या देशात राबवल्या. स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ, स्त्रियांना शस्त्रक्रियेच्या वेळी भूल घेण्याचा (पूर्वी नसलेला) हक्क, अशा स्त्रीसुधारणा तिने केल्या. आदर्श राजवटीचा एक मापदंड तिने गाजवला, राणीच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही अशी उक्ती सार्थ करणारे सामथ्र्य निर्माण करणारी, ही समर्थ राणी, रात्रीच्या वेळी हौसेने क्रॉसस्टीचचे भरतकाम करीत असे. पुत्र एडवर्डच्या चुकीच्या वर्तनाने, तो भावी राजा-राजपरंपरा पाळेल का? या धास्तीने धास्तावतही असे. अतिशय संमिश्र असे हे व्यक्तिमत्त्व. जिवंतपणीच तिच्या कारकीर्दीचा जगभर हीरक महोत्सव झाला. अशी ही राणी वृद्धत्वाने मृत्यू पावली. परंतु, जगाच्या इतिहासात अमर झाली. लॉर्ड सॅलेसबरी म्हणतात, त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या दोन स्त्रियाच होत्या. पहिली राणी एलिझाबेथ, दुसरी व्हिक्टोरिया. ‘लाँग लीव्ह द क्वीन’ ही इंग्लंडच्या जनतेची तळमळ, अपेक्षा, एलिझाबेथ (दुसरी) पर्यंत प्रवाहित होत गेली आणि जाते आहे. हेच राण्यांचे यश.. गॉड ब्लेस द क्वीन! आमेन!!
(संदर्भ साहित्याच्या ऋणासह) डॉ. सुवर्णा दिवेकर – drsuvarnadivekar@gmail.com

Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”