किशोरवयीन मुलांचे भावविश्व निराळेच असते. १२-१३ हे वय अगदीच निरागस नव्हे. आजूबाजूचे जग किती चमत्कृतीपूर्ण आहे याचा थोडा अंदाज यायला लागलेला असतो. पण ते तसे का आहे, हे मात्र कळत नसते. त्यामुळे कुतूहलाचा भाग मोठा असतो. बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याची नजर अचंब्याची असते. अशी किशोरवयीन मुले केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या नजरेतून जगाकडे बघणाऱ्या प्रथितयश लेखकांच्या कथांचा संग्रह म्हणजे ‘अचंब्याच्या गोष्टी’! सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केलेला हा संग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.

मुळात अशा कथांचा संग्रह काढणे ही कल्पनाच फार वेगळी आहे. मोठी माणसे त्यांना आलेले अनुभव, मनात घट्ट बसत गेलेल्या अढी, स्वभावात येत गेलेला निबरपणा यामुळे जगाकडे ज्या नजरेने  पाहतात, ती नजर पौगंडावस्थेतल्या मुलांची नसते. थोडीशी समज आलेले मूल आजूबाजूच्या गोष्टींकडे निल्रेप मनाने पाहते. त्याच्या मनात पूर्वग्रह अजिबात नसतात. त्यामुळे प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, एखाद्या छायाचित्रात अंधार-उजेड चेहऱ्यावर असलेले जसे व्यक्तिमत्त्व असते, तशीच आणि तेवढीच त्याची समज असते. यामुळे या कथा वाचताना मानवी व्यवहाराचे एक गूढ रूप डोळ्यासमोर उभे राहते. या कथा वाचनीय होण्याचे हेच महत्त्वाचे कारण आहे.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

कथा परिणामकारक होण्यासाठी ती कुठल्या पात्राच्या तोंडून सांगितलेली आहे किंवा कुठल्या पात्राला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आहे, हे महत्त्वाचे असते. ज्यांचे आकलन कमी आहे, ज्यांना व्यवहाराचे अजिबात ज्ञान नाही अशा किशोरवयीन मुलांच्या तोंडून किंवा त्यांच्या नजरेतून कथा सांगण्याने तिची परिणामकारकता वाढते का, हे तपासून बघण्यासाठी संपादकांनी अशा कथा एकत्र करायचे ठरवले. त्यातून हा संग्रह तयार झाला.

यातील बहुतेक सर्व कथा या काही वर्षांपूर्वीच्या आहेत. अपवाद मिंलद बोकील यांच्या ‘पतंग’ या कथेचा. अलीकडच्या काळात अशा कथा का लिहिल्या जात नसाव्यात, याचाही शोध जावडेकर आणि धर्मापुरीकर यांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही प्रसिद्ध लेखकांशी प्रश्नावलीतून संवाद साधला. त्याला मिळालेल्या प्रतिसादातून ‘लेखकांचीच भावनाशीलता कमी होत चालली आहे. त्यामुळे अशा कथा लिहिण्यासाठीची मानसिकता आणि शैली उरलेली नाही..’ असा सूर उमटला. हल्लीच्या मुलांना माहिती मिळवण्याचे इतके मार्ग उपलब्ध झाले आहेत, की त्यांच्यामधले बालसुलभ कुतूहलच संपून गेले आहे. त्यामुळेच अशा कथा आता दिसत नाहीत, हेही एक निरीक्षण आहे. मात्र, यामुळे संपादकांचे काम अवघड झाले. त्यांना मर्यादितच पर्याय उपलब्ध झाले. अर्थात, त्यातूनही त्यांनी ज्या कथा निवडल्या आहेत त्या उत्तमच आहेत यात शंका नाही.

या संग्रहात १४ कथा आहेत. यातले प्रकाश नारायण संत हे नाव यादृष्टीने अधिक परिचयाचे. पण इतरही मातब्बर लेखकांनी लहान मुलांचे भावविश्व ज्या ताकदीने चितारले आहे, ते मुळातून वाचायला हवे. लंपनच्या सगळ्याच कथा प्रसिद्ध असल्या तरी या संग्रहातल्या ‘स्पर्श’मध्ये वडिलांबद्दलचे प्रेम आणि त्यांच्या मृत्यूची लंपनला होणारी जाणीव यामुळे त्याचे एकदम मोठे होऊन जाणे, यामुळे ही कथा एक वेगळीच उंची गाठते. जी. ए. कुलकर्णी यांची ‘कैरी’ ही नितांतसुंदर कथा आपल्याला माहीत आहेच. त्यांच्या या संग्रहातल्या ‘लग्न’ या कथेतही आनंदा हा कथानायक त्याच्या मामाचे लग्न ठरवण्याच्या लगबगीत सहभागी झाला आहे. ज्या मुलीला ते बघायला जातात, ती त्याला शेवटी जे काही सांगते त्यामुळे आपण सुन्न होऊन जातो.

आजी-आजोबांशी या वयातल्या मुलांचे भावनिक नाते असते. हे नाते व्यक्त करणाऱ्या तीन कथा पुस्तकात आहेत. ‘आजोबांचे लग्न’ (वामन इंगळे) ही कथा वरवर हलकीफुलकी वाटली तरी तिचा शेवट मात्र आजोबांचे एकटेपण अधोरेखित करतो. ‘डोलकाठी’ (यशवंत कर्णिक) ही या विषयावरची अप्रतिम कथा. आपल्या मुलीचे दारुडय़ा माणसाबरोबर लग्न लावून दिल्याने तिचे आणि तिच्या मुलांचे होणारे हाल सहन न होणारे आजोबा या कथेत आहेत. तिला या ना त्या प्रकारे मदत करायची त्यांची धडपड आणि त्यांच्या भावना समजूनही त्यांच्यावर अवलंबून राहायचे नाकारणारी आई हे कथानायकाच्या नजरेतून फार छान उभे राहते. ‘आजी शरण येते’ (विद्याधर पुंडलिक) ही या संग्रहातली धमाल कथा. आजी-आजोबांची सतत होणारी भांडणे आणि त्यांच्या अबोल्यात मध्यस्थी करणारा नातू हा कथानायक. खरे तर त्याच्यातर्फे ही दोघे एकमेकांना जे निरोप सांगतात, त्यातला अर्थही न कळण्याच्या वयातला हा नातू. पण त्यामुळेच या कथेतील गंमत टिकून राहिली आहे.

प्रेम किंवा शारीरिक आकर्षणाबद्दल कुतूहल वाटण्याचे हे वय. ‘धग’ (विलास मोहिते) या कथेत रिवाजांमुळे माहेरीच राहिलेली खाला आणि तिला चोरून भेटायला येणारा तिचा नवरा आहे. ‘खेळ’ (रा. रं. बोराडे ) मध्ये नवरा परांगदा झाल्याने अस्वस्थ झालेली गुजाबाई आहे. ‘सनई’मधली या आकर्षणापोटी आपला जीव गमावणारी भागी आहे. चिं. त्र्यं. खानोलकरांची गूढ शैली या कथेत अंगावर काटा आणते. ‘भातुकली’ या आनंद विनायक जातेगावकरांच्या कथेतली शकू ही कथानायिका- एकीकडे भातुकलीचे आकर्षण असणारी आणि दुसरीकडे आपल्या ताईबद्दलच्या काही गोष्टी कळल्याने अस्वस्थ होण्याच्या अर्धवट वयात असणारी. जे कळलंय ते चांगलं नाही, एवढंच तिला जाणवतं. पण ते का, हे कळत नाही. कुणाला विचारावं, हेही कळत नाही. या वयातल्या मुलांची मानसिकता या कथेत फार छान उतरली आहे. ‘आडवा बोळ’ (श्री. दा. पानवलकर) आणि ‘गुप्तधन’ ( शरदच्चंद्र चिरमुले) या कथांतूनही हे धूसर आकर्षण सुरुवातीला दिसते. नंतर मात्र या कथा वेगळ्या वाटेने जातात. ‘लेखकाची गोष्ट’ (वामन काळे) ही अत्यंत गरीब घरातील मुलाचा अपेक्षाभंग दाखवणारी, तर ‘हिरवी काच’ ही कथा लक्षात राहते ती त्यातील शेवटच्या धक्क्यामुळे.

या कथासंग्रहातील ‘पतंग’ ही मिंलद बोकील यांची कथा अलीकडच्या काळातली. तिच्या शैलीमुळे लक्षात राहणारी. तसे पाहिले तर या कथेत ‘छोटा’ आहे, पण ही कथा खरे तर आहे मोठय़ांची. तो काय बोलतो आहे, हे छोटय़ाला कळतही नाहीये. त्याला ते कळावे ही मोठय़ांचीही अपेक्षा नाही. त्यामुळे छोटय़ा मुलाच्या नजरेतून गोष्ट उलगडण्याचा इथे प्रश्नच येत नाही. तरीही त्याचे तिथे निरागसपणे असणे यामुळे ही कथा वेगळी ठरते. कथेत फक्त ही दोन पात्रे आहेत. ती पतंग उडवताहेत. पण त्यातूनच मििलद बोकिलांनी मोठय़ांचे भावविश्व अलगद उलगडत नेले आहे. केवळ संवादावर उभी राहिलेली ही कथा या संग्रहात वेगळेच स्थान मिळवून जाते.

आपले वय, आपल्याला आलेले अनुभव, त्यातून बनलेली पक्की मते हे सगळे बाजूला ठेवून किशोरवयीन मुलांच्या नजरेतून जग बघणे ही खचितच सोपी गोष्ट नाही. पण या संग्रहातल्या लेखकांना ती उत्तम जमली आहे, हे नक्की. आज मुले तंत्रज्ञान पारंगत होताना, माहितीच्या जंजाळातून हवी ती माहिती सहज मिळवताना अज्ञानातला आनंद आणि कुतूहल हरवून बसली आहेत, असे आपण म्हणतो. अशा वेळेस संपादकांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, अचंब्यातून होणारे आकलन, अचंब्यातले प्रश्न, त्यातली निरीक्षणे आणि अचंब्यातूनच आलेले निष्कर्ष वाचकांना खूप अस्सल वाटतील यात काही शंका नाही.

 ‘अचंब्याच्या गोष्टी’,

संपादन- सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १८०, मूल्य- २५० रुपये.