नाटय़संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फक्त मागण्या आणि सूचना केल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु रंगकार्याबद्दल अधिकारवाणीने मौलिक विचार प्रकट करणे हा आपला प्रांत नव्हे, याची विनम्र जाण ठेवून त्यांनी भाषण केले. त्यातल्या केवळ दोन सूचना जरी त्यांनी आपल्या कार्यकालात अंमलात आणल्या तरी पुरेसे आहे.

सहा दशकांची रंगकारकीर्द असलेल्या जयंत सावरकर यांना ९७ व्या  नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाने सन्मानित केले गेले याचा सर्वाधिक  आनंद मला होणे स्वाभाविक आहे, कारण मी त्यांच्या या रंगकर्तृत्वाचा प्रारंभापासून जिताजागता  हयात साक्षीदार आहे. त्यांच्याबरोबर नाटकातून काम केलेला, त्यांचा  जानी दोस्त. स्पष्ट शब्दोच्चार, चोख पाठांतर, अस्खलित वाणी आणि भूमिका लहान- मोठी कशीही आणि केवढीही असो, समरसून आविष्कारित  करणे, ही त्यांची  खासियत आज ऐंशीच्या प्रांगणातही कायम आहे.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
sangli superstition marathi news
सांगली: अंधश्रद्धेतून लिंबाच्या झाडाला टांगला उलटा बोकड

त्यांच्या अध्यक्षीय भाषणासंदर्भात त्यांचे प्रथम अभिनंदन करायचे आहे ते यासाठी, की आपली धाव कुंपणापर्यंतच आहे हे नेमके ओळखून नाटकांचे दौरे, नाटय़गृहे, तिकिटांचे दर, रंगभूमी कामगार, त्यांच्यासाठी घरे, शालेय अभ्यासक्रमात ‘अभिनय’ या विषयाचा समावेश करणे, इ. मुद्दय़ांवरच त्यांनी आपले भाषण रचले होते.

दीर्घकाळ रंगमंचीय अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी विचारवंत, नाटय़जाणकार, नाटय़अभ्यासक  असले कसलेच बुरखे घेतले नाहीत. त्यामुळेच ‘आजची आणि कालची रंगभूमी,’ ‘भारतातील अन्य प्रांतीक नाटके आणि मराठी नाटके’, ‘जागतिक रंगभूमीच्या संदर्भात मराठी रंगभूमी’,   ‘प्रायोगिक रंगभूमीचे आजचे चित्र आणि भवितव्य’, ‘बालरंगभूमीच्या  आजच्या अवस्थेची कारणमीमांसा आणि उद्याची दिशा’ इ. विषयांवर त्यांच्याकडून काही मौलिक विचार प्रकट होण्याची अपेक्षा करणेच गैर आहे. तो त्यांचा प्रांत नव्हे. आणि अट्टहासाने त्यांनी त्यात उडी घेऊन आपला देखावाही करून घेतला नाही. हे उत्तमच झाले.

नोटबंदीच्या नौटंकीत नाटय़संमेलन सापडल्यामुळे ते विलंबाने भरवावे लागले. परिणामी अध्यक्षांचा कार्यकाल कमी झाला याची खंत अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली आहे. अर्थात ज्यांना काहीच कार्य करायचे नसते व अध्यक्षपदाची फक्त गादी भूषविण्यातच धन्यता मानायची असते, त्यांना कार्यकालाच्या अधिक-उणेपणाने काहीच फरक पडत नाही. कार्यकालापेक्षाही खरा मुद्दा आहे तो नाटय़संमेलनाच्या अध्यक्षांना काही अधिकार आहेत का, हा! ‘तो नसेल तर आमचे अध्यक्षपदाचे  बाहुले कशासाठी  नाचवता?’ असा प्रश्न आपल्या भाषणातून अध्यक्षांनी जोरदारपणे मांडायला हवा. पण आपल्याला अध्यक्ष केल्याबद्दल उपकृततेची भावनाच एवढी जबरदस्त असते, की त्यापुढे असा खडा सवाल विचारण्याची हिंमतच अध्यक्षांना नसते. (ज्यांना ती हिंमत असण्याची शक्यता असते, त्यांना अध्यक्षपद देण्याचा अव्यापारेषु व्यापार नाटय़ परिषद करीत नाही. त्यामुळे जो कायम नाटय़ परिषदेच्या मर्जीत आणि आज्ञापालनाच्या भूमिकेत राहील त्यालाच अध्यक्षपद देण्याची चलाखी करण्यात येते.) आपले कुणी काही ऐकणार नसेल, आपल्या सूचना अंमलात आणणार नसतील तर उगाचच अध्यक्षपद भूषवायचे कशाला, या विचारानेच नाटय़क्षेत्रातील अनेक दिग्गज नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वाटेलाही जात नाहीत.

अध्यक्षीय भाषणातून काही स्वतंत्र विचार वा वेगळी दिशा मिळण्याची सुतराम शक्यताच नसेल तर केवळ स्नेहसंमेलनाच्या आनंदासाठी येणारेच  संमेलनाला आले तर त्यात नवल ते काय? प्रत्येक रंगकर्मीने नाटय़संमेलनाला हजर राहणे हे त्याचे कर्तव्यच आहे, हे मान्यच. पण त्याचबरोबर नाटय़ परिषद रंगकर्मीना आपलीशी वाटेल असं तिनं ठोसपणे काहीतरी करणे हे तिचेही कर्तव्य नाही काय? नाटय़संमेलन अधिकाधिक मौलिक आणि सर्वसमावेशक करणे हे संमेलन भरवणाऱ्यांचे कर्तव्य नाही काय? नाटय़संमेलन तसेच नाटय़ परिषदेत नाटय़विश्वातील किती प्रवाहांना स्थान असते? अध्यक्षीय भाषणावर चर्चा व्हायला पाहिजे हे तर खरेच; पण गेल्या काही वर्षांतील अध्यक्षीय भाषणांपैकी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी भाषणेसुद्धा चर्चा करण्याच्या योग्यतेची असत नाहीत, त्याला काय करणार?

जयंत सावरकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना कार्यकाल कमी मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.  त्यावरून त्यांना प्राप्त झालेल्या अपुऱ्या अवधीत काही ठोस काम करून दाखविण्याची मनस्वी इच्छा असल्याचे दिसून येते. ही त्यांची इच्छा पुरी करायची असेल तर त्यांनी व्यक्त केलेल्या सर्व त्रुटी वा मागण्या एवढय़ा अल्प अवधीत त्यांच्या एकटय़ाने तडीस नेणे अशक्य आहे. म्हणजे बघा- त्यांचे अध्यक्षीय भाषण सुमारे पंधरा सूचना व त्यांच्या आवश्यकतेच्या उल्लेखाने भरले आहे. इतक्या सूचनांचा पाठपुरावा केवळ त्यांनी उद्घोषित केला म्हणून त्यांच्याकडूनच सारे काही अपेक्षित करणे गैर आहे. फार नाही, पण त्यांनी सुचवलेल्या फक्त दोनच सूचना जरी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आपला कार्यकाल खर्च केला तरी तो चिरंतन लाभाचा ठरणार आहे.

महाराष्ट्रातील नाटय़गृहांमधील गैरसोयींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. दोन-तीन सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी स्वत: या नाटय़गृहांचा दौरा करावा. प्रत्येक नाटय़गृहातील त्रुटी व गरजांची त्यांनी पाहणी करावी व त्याची नोंद करावी. विशेषत: नाटय़गृहातील स्वच्छतागृहांची अत्यंत घृणास्पद अवस्था आहे. (पहा- ‘नाटकवाल्याचे प्रयोग’,  ले. अतुल पेठे) त्यासाठी त्यांनी अग्रक्रम द्यावा. शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत  या कार्यासाठीही निधी उपलब्ध होऊ शकेल. रंगमंच, प्रेक्षागृह यासंबंधीचा प्रत्येक नाटय़गृहाचा तपशीलवार अहवाल तयार करून तो त्यांनी नाटय़ परिषद, नाटय़निर्माता संघ आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागाला सादर करावा. निर्माता संघ व सांस्कृतिक विभागातील प्रतिनिधीलाही त्यांच्या सहकाऱ्यांत स्थान द्यावे. उपाशीपोटी सेवा ही खरी नाही, असे अध्यक्षच म्हणाले आहेत. या मोहिमेला येणाऱ्या एकूण खर्चाचा (प्रवास, निवास, मानधन) अंदाज घेऊन तो या तिन्ही घटक संस्थांकडे द्यावा. हे काम या तिन्ही संस्थांचे आहे. अध्यक्षांनी आपल्या नेतृत्वाने त्याला चालना द्यायची आहे.

इतकी तयारी असल्यास कुठलीही संस्था हा प्रस्ताव अमान्य करील असे वाटत नाही. एकूण खर्चाची जबाबदारी या तीन संस्थांनी उचलल्यास  प्राथमिक स्वरूपाचे पायाभूत काम होईल आणि अध्यक्षांनी केवळ फुकाच्या वल्गना केलेल्या नाहीत याचा प्रत्यय येऊ शकेल. हे साध्य करण्यासाठी कुठल्याही विशेष अधिकाराची गरज नाही. शिवाय या प्रस्तावाला वरील संस्थांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर अध्यक्ष तसे जाहीर करून आपल्यावर ठपका येणार नाही याची काळजी घेऊ शकतात.

शालेय अभ्यासक्रमात ‘अभिनय’ या विषयाचा समावेश करण्याची सूचनाही शिक्षणमंत्र्यांच्या खनपटीला बसून पुरी करून घेता येणे शक्य आहे. गोव्यातील शाळांमधून ‘अभिनय’ हा विषय गेल्या दशकापासून शिकवला जात आहे. नाटय़-अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ शिक्षक सबंध महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. पण त्यांना एकत्र आणून कार्यरत करण्याचे काम करणार कोण? आधी केलेचि पाहिजे! प्राप्त कार्यकालात संमेलनाध्यक्षांना याबाबत पुढाकार घेणे शक्य होणार नाही काय? मग कमी कार्यकालाची खंत कोरडीच नाही का?

नाटय़संमेलनाला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी दरवर्षी केली जाते. पण या अनुदानातून वर्षांकाठी पैशाअभावी नाटय़शिक्षण घेऊ न शकणाऱ्या एखाद्या तरी विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती देऊन नाटय़प्रशिक्षित केले जावे यासाठी संमेलनाच्या अध्यक्षांना प्रयत्न करायलाही विशेष अधिकार हवेत काय?

या गोष्टींसाठी अभ्यास व नियोजन आवश्यक आहे, हे मान्य. पण भूमिकांचा अभ्यास करणाऱ्या नटाला ते कठीण वाटू नये. फक्त काही करून दाखविण्याची आंतरिक तळमळ मात्र हवी. अध्यक्षपद भूषवायचे ते काय फक्त माजी अध्यक्षांच्या फोटोंच्या मालिकेत आणखी एका फोटोची भर घालण्यासाठीच?

नाटय़संमेलनाचे पूर्वीचे अध्यक्ष विद्वान असत. साहित्यिक असत. नाटय़जाणकार असत. नाटय़अभ्यासक असत. दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी असे. त्यांना पथ-दिग्दर्शनासाठी, नवी दिशा देण्यासाठी, प्राप्त परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठीच पाचारण करण्यात येत असे. आणि ते ती पूर्णाशाने पुरी करीत. म्हणूनच त्यांची अध्यक्षीय भाषणे संग्रा झाली आहेत. अलीकडच्या संमेलनाध्यक्षांना ‘कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष’ म्हणून  संबोधले जाते. अशा कार्यकर्ता अध्यक्षांनी आपण कुठले काम करणार आहोत याचे नेमके चित्र उभे करायचे, की केवळ सूचनांच्या वाऱ्यावर आपले भाषण फडफडत ठेवायचे? ‘माझे हे भाषण दुर्लक्षित केले जाईल व संबंधित डोक्यावर पांघरून घेऊन निद्राधीन होतील,’ असा टोला अध्यक्षांनी आपल्या भाषणात मारला. अध्यक्षांनी स्वत:ही कुणाच्या नकळत त्या पांघरुणात शिरून अध्यक्षीय भाषणाला उंटावरून शेळ्या हाकणाऱ्याची कळा लाभू नये म्हणूनच या सूचना करणाऱ्यांना सूचना! बरं, निर्देश केलेल्यापैकी कोणतीही कृती करणे अध्यक्षांना शक्य नसेल तर एक कृती मात्र अंमलात आणणे त्यांना सहज शक्य आहे. अध्यक्ष झाल्याबद्दल परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांचे सत्कार स्वीकारीत शाली गोळा करणे, ही ती कृती! यासाठी प्राप्त कार्यकाल अपुरा पडणार नाही असं वाटतं.

भाषणानंतर आता अध्यक्ष काय करणार आहेत, हेच बघायचं. अन्यथा ‘नेमेचि येते नाटय़संमेलन,  नाटय़ परिषदेचे हे कौतुक  जाण बाळा!’ हेच खरं.

ता. क. – ‘कै. राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकांतून भूमिका वठवणारा आज मी एकमेव हयात नट आहे,’ असे अभिमानपूर्वक वक्तव्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकरांनी केले. तथापि शब्दप्रभूंचा पुतळा हटविणाऱ्यांचा निषेध करण्याच्या बाबतीत मात्र त्यांनी नटाचा ‘ब्लॅंकनेस’ स्वीकारला. योग्य पदावरून आणि योग्य व्यासपीठावरून हा निषेध न होणे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. नाटय़ परिषदेला, नाटय़संमेलनाला, तिच्या अध्यक्षांना आणि त्यांचा मी मित्र असल्यामुळे मलाही ती लाजिरवाणी आहेच. क्षमस्व!

कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com