सर्वसाधारणपणे पर्यटक थायलंड, मलेशिया, मॉरिशस, दुबई अशी सुरुवात करतात. नंतर फ्रान्स, स्वित्र्झलड, जर्मनी, इंग्लंडची सफर करतात व त्यानंतर अमेरिका ईस्ट कोस्ट/ वेस्ट कोस्ट असा क्रम असतो. हे सर्व झाल्यावर पूर्व युरोपकडे पर्यटक मोठय़ा प्रमाणात वळू लागले आहेत. नुकतीच मी वॉरसॉ (पोलंड), प्राहा (झेक रिपब्लिक), व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) या शहरांची व स्लोव्हेनिया आणि क्रोएशिया या देशांची सफर केली.

राजप्रासाद, संग्रहालये व चर्च हे सर्वसाधारण प्रत्येक ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांत समाविष्ट असतात. स्लोव्हेनिया व क्रोएशिया या देशांमध्ये मात्र वेगळाच अनुभव आला. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व नैसर्गिक आश्चर्याचा वरदहस्त लाभलेल्या या दोन देशांत अशी अनेक स्थळे आहेत, जी पाहून डोळ्यांचे पारणे फिटावे व एक अलौकिक, विस्मयकारक अनुभव यावा. यातील तीन स्थळांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पोस्तोना येथील खाणी, लेक ब्लेड (lake Bled) व प्लिटव्हिस नॅशनल पार्कमधील सरोवरे. प्लिटव्हिस पार्कमधील सौध सरोवरे व लेक ब्लेड या स्थळांबाबत माहिती घेऊ. एक पर्यटक म्हणून माझे अनुभव सांगण्याचा हा प्रयत्न.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

क्रोएशियातील प्लिटव्हिस लेकस् (स्थानिक भाषेत ‘प्लिटव्हिका’ ) ही प्लिटव्हिस राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहेत. सुमारे २९४.८२ चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोने ‘वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साइट’ – जागतिक नैसर्गिक वारसा संपत्तीचे स्थळ हा दर्जा १९७९ साली दिला. या उद्यानात बर्च व फर वृक्षांची घनदाट जंगले, कुरणे, वसाहती आहेत. तिथे १,२६७ जातींची झाडे/ वेली असून ऑर्किड या फुलाच्याच तब्बल ५५ प्रजाती आढळतात. शिवाय फुलपाखरांच्या ३२१ जाती, पक्ष्यांचे १६१ प्रकार व नुसत्या वटवाघुळांच्या २१ जाती आहेत. तपकिरी रंगाचे अस्वल हा येथील मुख्य प्राणी आहे.

या उद्यानातील प्लिटव्हिस लेकस् या स्थळाला पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते. ही सरोवरे त्यांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहेत. यांना ‘टेरेस लेकस्’ म्हणतात. (आपण ‘सौध सरोवरे’ म्हणू या.) पाण्यातील चुनखडी, प्राणवायू यांचा संयोग होतो व त्यात इतर मृत जीवजंतू, गाळ यांचा भरणा होऊन ट्रॅव्हरटाइन नावाचा सच्छिद्र खडक तयार होतो. तो जवळपासच्या नद्या व जलप्रवाहात बंधारे, भिंती व इतर आकार निर्माण करतो. या भिंती व बंधाऱ्यांवरून असंख्य लहान-मोठे प्रपात (धबधबे) तयार होतात. काळाच्या ओघात पाणी आपली दिशा बदलते. जुने बांध कोरडे होऊन नवीन तयार होतात. ही प्रक्रिया चालूच राहते. ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया प्लिटव्हिस लेकस्मध्ये प्रकर्षांने जाणवते, तितकी इतरत्र कुठेही जाणवत नाही. म्हणूनच ही सरोवरे एकमेवाद्वितीय ठरली आहेत व पर्यटनाचा मानबिंदूही!

आम्ही आमची टूर दुपारी साडेअकरा वाजता सुरू केली, ती साडेचार वाजता संपली. गाइड मोठी संभाषणचतुर व माहीतगार होती. सुरुवातीलाच एक भव्य नकाशा होता. त्यात वरून पाहता ही सरोवरे कशी दिसतील याची कल्पना येत होती. शिवाय एकूण राष्ट्रीय उद्यान, त्यातील सरोवरांची जागा, अंतर, दिशा यांची स्पष्ट माहिती त्यात होती. पर्यटकांसाठी काऊंटरवर भरपूर माहितीपत्रके होती. प्रथम आम्ही सुमारे दोन कि.मी. चाललो. सर्वत्र गर्द झाडी होती. बर्च, फर व इतर सूचिपर्णी वृक्षांची दाटी होती. हवाही आल्हाददायक व ऊन छान पडले होते. एका जागी येऊन थांबलो, तेथून दोन डब्यांची ट्रेन पुढे नेणार होती. प्रत्येक ठिकाणी उपाहारगृह, वस्तू यांची व्यवस्था होतीच आणि मुख्य म्हणजे येथे सर्व निसर्गनिर्मित साधनसामग्री वापरली जाते. लाकडाचे बांधकाम, लाकडाची बाके व भिंती, इतकेच काय तर जमीनही लाकडाच्या ओंडक्यांच्या गोल चकत्या बसवून तयार केली होती. स्थानिक गोष्टींचा पुरेपूर उपयोग व सौंदर्यदृष्टीही!

सुरुवातीलाच एक फोटो पॉइंट होता. सर्वोच्च उंचीवर असल्यामुळे एकाखाली एक सरोवरे, मधले बंधारे, अनेक नयनरम्य धबधबे व या सर्वामधून बांधलेल्या लाकडी पायवाटा, त्यावरून चालणारे रंगीबेरंगी पर्यटक.. असे अप्रतिम सुंदर दृश्य दिसले. आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत व एका अभूतपूर्व अनुभवाच्या उंबरठय़ाशी येऊन ठेपलो आहोत, याची चाहूल त्या क्षणीच लागली. त्यानंतर आश्चर्याचे व नेत्रसुखाचे क्षण सतत बरसतच राहिले.

ट्रेनने पाच मिनिटे प्रवास केल्यावर एका सपाट जागी तळ्याकाठी थांबलो. तेथे जेवण ‘उरकून’ घेतले. पुढे बोटीचा प्रवास होता. आम्हाला तिथेच सांगण्यात आले, की यापुढे दोन तास चालायचे आहे, तेही चढ-उतार पार करत! ज्यांना तेवढी शारीरिक ताकद व मनोबल असेल त्यांनीच पुढे जावे, बाकीच्यांसाठी सर्व सुविधा तेथे होत्याच. आम्ही भाग्यश्री ट्रॅव्हल्समधून गेलेलो २१ जण होतो, त्यातील चार वगळता सर्वजण पुढे जायला सज्ज झालो. आमचा २१ जणांचा पर्यटक गट होता. (या गटाचे सरासरी वय ६० वर्षांच्या वर होते.) तरीही त्यातील केवळ चार जण वगळता सर्व जण पुढे जायला सज्ज झाले. बोटीतून समोरचा डोंगर व किनारा दिसत होता. दोन मिनिटांत पैलतीरी पोहोचलो. बोटीतून उतरल्याबरोबर चढ सुरू झाला. थोडा चढ, थोडा सपाट भाग, मग काही पायऱ्या, पुन्हा सपाट, पुन्हा चढ. पर्यटकांना दम लागू नये व थकवा वाटू नये म्हणून केवढा विचार! पायवाट संपूर्णपणे लाकडाच्या ओंडक्यांनी तयार केलेली होती. दोन गोलाकार ओंडक्यांत किंचितशी फट. पाच-सहा ओंडक्यांनंतर एक सपाट केलेला ओंडका. माझ्यासारख्या सत्तरीच्या लोकांना तोल सांभाळता यावा म्हणून ही रचना!

यानंतर रंगोत्सव सुरू झाला. सोबतीला सतत पाणी व प्रपात. पाण्याचे रंगही विविध- कुठे अस्मानी, कुठे गर्द निळा, कुठे मोरपंखी, तर कुठे हिरवागार! पाण्याच्या असंख्य रंगछटा, सभोवताली अनेक झाडे, झुडुपे, वेली, किलबिलणारे पक्षी, वर निळेभोर आकाश व त्यात ठळकपणे दिसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ढगांचे विविध आकार.. अशा रंगांच्या पंचमीत आम्ही अक्षरश: न्हाऊन निघत होतो. पाच मिनिटे चालावे, तो वेगळेच निसर्गरूप दिसे. काही ठिकाणी पाणी उथळ असे, अगदी वाकून हात बुडवावा. खालची तपकिरी जमीन व पालापाचोळा इतका स्वच्छ दिसे, की जणू आरसा. तरुणींनी खुशाल मेकअप करावा! अमल, नितळ असे ते पाणी मी ओंजळ भरून प्यायले व तीर्थ लावावे तसे डोळ्यांना, डोक्याला लावले.

वाटेतल्या असंख्य प्रपातांचे वर्णन काय करावे? हिमालयात पाहिलेले असेच प्रपात, कॅनडाच्या बाजूने पाहिलेला नायगारा.. अशा सर्व रूपांची यावेळी आठवण झाली. ‘ज्युरॅसिक पार्क’ सिनेमात हेलिकॉप्टर एका उंच धबधब्याच्या पाश्र्वभूमीवर हळूहळू अलगद खाली उतरते, ते दृश्य आठवले. काही प्रपात अगदी छोटे, फूटभर उंचीवरून खाली येणारे.. नुकत्याच चालू लागलेल्या बालकासारखे. काही प्रपात हे मध्यम उंचावरून खळाळत उडी घेणारे.. एखाद्या खोडकर व उतावळ्या मुलासारखे. तर काही खूप उंचावरून धीरगंभीर ध्वनी करत मंत्रोच्चार करणाऱ्या ऋ षींसारखे.. दबदबा वाटावा असे! एका ठिकाणी तर अर्धगोलाकृती खडकाची गुळगुळीत भिंत.. अगदी त्रिज्येने रेखाटल्यासारखी तयार झाली होती. त्यावरून अनेक प्रपात खाली उडय़ा घेत होते. हा तर प्रपातांचा व सरोवरांचा खजिना होता.

सुमारे पाच कि.मी. अंतर चालताना पाय थकत होते. शरीर विरोध करत होते; परंतु डोळे आणि मन थांबायला तयार नव्हते. शरीरावर मात करत होते. अखेर बोटीजवळ आलो व परतीचा प्रवास सुरू झाला. हा अनुभव एखादे मौल्यवान रत्न छोटय़ाशा डबीत जपून ठेवावे तसा आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवण्याचा होता. कॅमेऱ्याने लोकांनी शेकडो फोटो काढले. मीही काढले. पण शेवटी आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्याने ही दृश्ये मनात साठवावी. आठवण येईल तेव्हा अंत:चक्षूंनी व कल्पनाशक्तीने ती पुन:पुन्हा पाहावीत आणि मन आनंदून जावे.. असा कवी विल्यम वर्डस्वर्थने ‘डॅफोडिल्स’ कवितेत व्यक्त केलेला अनुभव वारंवार घ्यावा.

इव्हो पेव्हालेक हा या उद्यानाच्या पहिल्या अभ्यासकांपैकी एक. १९३७ साली त्याने म्हटले आहे : ‘जगात सर्वत्र जलाशय, प्रपात व अरण्ये असतात. पण प्लिटव्हिस सरोवरे एकमेवाद्वितीय आहेत. खरोखरच! जन्माला यावे व एकदा या लाकडी पायवाटांवरून सरोवरे व प्रपातांच्या संगतसोबतीने निसर्गाने बहाल केलेला हा अमोल खजिना लुटावा. कितीही लुटा, तो न संपणारा आहे.’

जगातील सात आश्चर्ये ही मानवनिर्मित आहेत. ‘माचू-पिचू’ या सर्वात प्रचीन संस्कृतीपासून ‘ख्राइस्ट द रिडीमर’ या प्रचंड पुतळ्यापर्यंत जगातल्या  सात नैसर्गिक आश्चर्याची अशी जत्रा केली तर प्लिटव्हिस लेकस्ची गणना त्यात नक्कीच असेल.

आता लेक ब्लेडविषयी.. हे स्लोव्हेनियामधील लुब्लीआना या शहराजवळ असलेले अत्यंत रमणीय सरोवर. युरोपातील दहा नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांत त्याचा समावेश आहे. ज्युलियन आल्प्सच्या हिरव्यागार पाइन वृक्षांनी नटलेल्या पर्वतरांगा, वर निळे आकाश अशा महिरपीत निळेभोर लेक ब्लेड व त्याच्या मध्यावर एक हिरव्या पाचूचे बेट, त्यावरील बरोक शैलीचे चर्च व चर्चचा टोकदार कळस.. असे हे एखाद्या परिकथेतील वाटावे असे दृश्य.

बोहिन्ज (Bohinj) हिमनदी जेव्हा वितळली तेव्हा त्या नदीच्या नैसर्गिक खोऱ्यात हा विस्तीर्ण जलाशय सातव्या शतकात निर्माण झाला असे म्हटले जाते. त्याचे स्वच्छ, नितळ पाणी अनेक नैसर्गिक झरे व जलप्रवाहांतून येते. या सरोवराभोवती आठव्या शतकापासून वस्ती होती; परंतु ते प्रवाशांचे आकर्षण बनले ते एका डॉक्टरच्या दूरदृष्टीमुळे. येथील तळ्याचे सौंदर्य जपण्यासाठी त्याने एक नामी युक्ती काढली. येथील नैसर्गिक झऱ्याचे पाणी अनेक औषधी गुणांनी युक्त होते. या झऱ्यांचे पाणी व शाकाहारी आहार हे अनेक व्याधींवर रामबाण उपाय आहेत, असा त्याने प्रचार केला व हा हा म्हणता लेक ब्लेड हे पर्यटनाचे नामांकित आकर्षण ठरले.

लेक ब्लेड हे ६,९६० फूट लांब, (५,२८० फुटांचा एक मैल होतो.) ४,५३० फूट रुंद व ९७ फूट खोल आहे. त्याच्याभोवती हॉटेल पार्क (हे क्रीम केकसाठी प्रसिद्ध आहे), हॉटेल रीजंट (येथे प्रिन्स चार्ल्स राहिला होता) अशी सुंदर हॉटेल्स आहेत. जवळच मार्शल टीटो यांचे वसंतऋतूतील घर आहे, तेच आताचे हॉटेल व्हिला ब्लेड. गावातील लोकसंख्येपेक्षा जास्त प्रवासी खोल्या बांधल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांचे प्रमाण मोजूनमापून असते व सरोवराची शांतता अभंग राहते.

मध्ययुगातील ब्लेड किल्ला सरोवराच्या उत्तरेकडे ३०० फूट उंच खडकावर उभा आहे. प्रथम तिथे जाऊन आम्ही सरोवर पाहिले. या किल्ल्यावर जसजसे उंच जावे तसतसे सरोवराचे अधिकाधिक विहंगम दर्शन होते. नजर ठरत नाही असे अप्रतिम सौंदर्य बघताना डोळ्यांचे खरोखरच पारणे फिटते.

लेक ब्लेड हिवाळ्यात पूर्ण गोठते व स्केटिंग आदी खेळांना ऊत येतो. एरव्ही सरोवराच्या मध्यावरील ब्लेड आयलंडकडे  जायला ‘प्लेटना’ नावाच्या गोंडोलासारख्या होडय़ा वापरतात. आमच्या होडीतील २५ माणसे त्यांच्या जाडी व आकारमानाप्रमाणे नाविकाने बसवली, हेतू हा की समतोल राहावा. मध्यावरील बेट – ब्लेस्की ओटोक (blejski otok) हे १२ व्या शतकातील बरोक शैलीत बांधलेल्या एका चर्चला मोठय़ा दिमाखात अंगावर वागवते. सध्याचे चर्च १७ व्या शतकात बांधले आहे. बेटावर गेल्यावर ९९ पायऱ्या चढल्या, की सेंट मारियाच्या चॅपेलजवळ आपण पोहोचतो. हे चर्च लग्नासाठी शुभ समजले जाते. या चर्चमधील घंटा तीन वेळा वाजवल्यास मनोकामना पूर्ण होते, असा समज आहे. या चर्चला १७१ फूट उंचीचा टॉवर आहे. आत भिंतीवर ठिकठिकाणी गॉथिक शैलीत चितारलेली चित्रे आहेत. आम्ही या बेटाला वळसा घालून वर गेलो व पायऱ्या उतरून खाली आलो. लेक ब्लेडचे असामान्य सौंदर्य डोळ्यांत साठवण्याचा आणखी एक प्रयत्न!

येताना मी सर्वाना बोटीत दोन मिनिटे स्तब्ध राहण्याची विनंती केली व त्या नि:शब्द शांततेत सरोवरांच्या लाटांचा लयबद्ध नाद, पक्ष्यांचा किलबिलाट व वल्ह्य़ांचा पाण्यावर होणारा आवाज कानात साठवला. मेडिटेशन आणखी काय वेगळे असते? हे सरोवर एकदा पाहिले की आयुष्यभर आपल्या मन:पटलावर त्याची सुंदर छबी कोरली जाते. अनेक जलाशय पाहिले, परंतु या सम हा!

अखेरीस अनेक वर्षांनंतर लक्षात काय राहते? एखादा पुतळा, एखाद्या वस्तुसंग्रहालयातल्या गोष्टी, तैलचित्रे, प्रासादातल्या सोन्याचा मुलामा दिलेल्या खोल्या की गालिचे? या गोष्टींना त्यांचे त्यांचे माहात्म्य आहे. विशेषत: वस्तुसंग्रहालयात अनेक शतकांतील शिल्पे, चित्रे व इतर वस्तू जपून जतन केल्या जातात, त्यामुळे जगाचा इतिहास व अनेक संस्कृती अजरामर होतात; पण या सर्वात मनाच्या गाभाऱ्यापर्यंत खोलवर पोहोचतो तो फक्त निसर्ग! हिमालयासारखा उत्तुंग पर्वत, नायगारासारखा प्रचंड प्रपात किंवा स्लोव्हेनिया/ क्रोएशियासारखा मयूरपंखी सरोवरांचा प्रदेश!

अनुराधा ठाकूर anuradha333@gmail.com