कथाकार दि. बा. मोकाशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. मोजकंच लेखन करूनही आपली लखलखीत नाममुद्रा मराठी साहित्यात उमटविणाऱ्या या सारस्वताच्या एका काहीशा दुर्लक्षित लेखनकृतीचा हा परामर्श..
दि.बा. मोकाशी (१९१५-१९८१) हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंदओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. अरविंद गोखले यांनी साहित्य अकादमीसाठी ‘दि. बा. मोकाशी यांची कथा’ हा कथासंग्रह काढला. त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. अलीकडे जानेवारी २०१४ मध्ये मोकाशींची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षांत त्यांच्या या उपेक्षित राहिलेल्या, पण उद्बोधक पुस्तकाचा परामर्श घेणे उचित ठरेल.
आजच्या हॅवलॉक एलिस वगैरेंच्या आधी इसवी सनापूर्वी भारतात वात्स्यायनाने ‘कामसूत्रे’ लिहिली. ‘कामसूत्र’ ग्रंथाचा हेतू वासना उत्तेजित करणे हा नव्हता, तर त्याच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहणे हा होता. ब्रह्मचर्य व परम समाधी या दोन्ही गोष्टींचा विचार त्याने केला होता. एका बाजूला महर्षी पतंजलींनी योगसूत्रांचे संपादन केले आणि त्या काळाच्या आसपासच केव्हातरी वात्स्यायनाने ही रचना केली. भारतीय परंपरेच्या या सर्वसमावेशकतेला जगात तोड नाही असेच म्हणावे लागेल. इतर अनेक श्रेष्ठ प्राचीन भारतीय व्यक्तींप्रमाणे वात्स्यायनाचीही निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. प्राचीन भारतीय परंपरेतली इतिहासलेखनाविषयीची अनास्था सर्वपरिचित आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनीही आपल्या निबंधमालेत याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यामुळे वात्स्यायनाचा काळ ख्रिस्तपूर्व दुसरे-तिसरे शतक हा ‘असावा’.. त्याचा जन्म आजच्या बिहारमध्ये झाला ‘असावा’, अशा पद्धतीनेच बोलावे लागते.
भारतीय चिंतन परंपरेमध्ये जीवनाचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले आहेत. म्हणजे काम या प्रेरणेला धर्म, अर्थ आणि मोक्षाच्या जोडीने समान स्थान दिले गेले आहे. कामाशिवाय जीवन अपूर्ण मानले गेले आहे. सिग्मंड फ्रॉइडप्रमाणे आपल्याकडेही कामप्रेरणेची बलिष्ठता मान्य केली गेली आहे व तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहिले गेले आहे. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही, यावर भारतात आज मोठे वादविवाद होत आहेत.. रण माजत आहे. अशावेळी दि. बा. मोकाशींचे ‘वात्स्यायन’ हे पुस्तक अतिशय उद्बोधक वाटेल.
मोकाशींनी पुस्तकाची सुरुवात अशी केली आहे :
‘धर्म, अर्थ, काम यांना नमस्कार असो.
कामशास्त्राला नमस्कार असो.
कामशास्त्रावर ग्रंथ रचणाऱ्या पूर्वाचार्याना नमस्कार असो.
विशेषत: वात्स्यायनाला.’
शिवाय कामशास्त्राच्या जन्माची पौराणिक कथाही प्रारंभी मांडली आहे. शंकर-पार्वतीची प्रणयक्रीडा नंदीने चोरून पाहिली. त्यावर त्याने ग्रंथ लिहिला. पार्वतीला त्या औद्धत्याचा संताप आला. तिने नंदीला शाप दिला की, तो ग्रंथ नष्ट होईल. शिवाय नंदीला मानवजन्म घेऊन कामसंताप सहन करत पृथ्वीवर वणवण हिंडत राहावे लागेल. नंदीने दु:खाने प्रार्थना केली की, मी तो ग्रंथ लोकांच्या कल्याणासाठी लिहिला, मला उ:शाप दे. मी यातना सहन करीन, पण माझा ग्रंथ नष्ट झालेला मला पाहवणार नाही. तेव्हा पार्वतीला वाईट वाटले. तिने उ:शाप दिला की, तो ग्रंथ नष्ट झाला तरी श्वेतकेतू तो पाचशे अध्यायांत लिहून काढेल. त्यामुळे समाजातले परदारागमन थांबेल. नंतर पुन्हा तो विस्मरणात जाईल. मग बाभ्रव्य तो दीडशे अध्यायांत लिहील. तोही विखुरला जाऊन लोकांत कामसेवनाचे अज्ञान पसरून लोक दु:खी होतील. त्यावेळी नंदी, तू मल्लनाग वात्स्यायन म्हणून जन्म घेशील व तुला वणवण हिंडत राहावे लागले तरी तू तो ग्रंथ लिहिशील. लोक त्याला ‘वात्स्यायनाची कामसूत्रे’ म्हणून ओळखतील व त्याला अक्षय कीर्ती लाभेल.
मोकाशींनी या कादंबरीत वात्स्यायनाने हा ग्रंथ कसा लिहिला याची कहाणी सांगितली आहे. वात्स्यायनाचा मेहुणा अंगरिक हा वासंतिकेच्या प्रेमात पडला. (आजच्या कुठल्याही कथा-कादंबरी-चित्रपटातल्याप्रमाणे) या प्रेमाला विरोध झाला आणि तो विरोध तिच्या आईचा होता. या विरोधाचे जे कारण ती सांगते ते आज अगदीच चमत्कारिक वाटेल; पण माणसाच्या मनाच्या लहरी अगम्य, गूढ असतात असे म्हणावे, किंवा मग हे त्या काळातल्या बहुपत्नी पद्धतीचे समर्थन असेल! ती म्हणते, ‘जे शूर असतात, ते समर्थ असतात. त्यांनी अनेक स्त्रिया केलेल्या त्यांना शोभाच देतात. तरी अशा वराशीच कन्येचा विवाह करावा आणि त्याचे महाराणीपद मिळवावे. पुरुषही आपल्या मुठीत आणि त्याच्या इतर स्त्रिया आपल्या हातात- अशी भाग्यवान पत्नी माझ्या मुलीने व्हावे.’
पण वात्स्यायनाने मात्र त्या प्रेमिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना उद्यानयात्रेला जायला प्रवृत्त केले. ते साध्य झाले. पण घडले असे, की हे प्रेमिक उद्यानयात्रेतून पळून गेले. वासंतिकेच्या पित्याने- बाहुबलीने वात्स्यायनाला यासाठी जबाबदार धरून त्याला मारण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला. त्याच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी वात्स्यायन आपल्या अवंती नगराबाहेर पडला. शिवाय आपल्यामुळे हे प्रेमिक जवळ आले, पण त्यांच्या पळून जाण्यालाही आपणच जबाबदार- या भावनेने तो त्यांना शोधण्यासाठी प्रवास करू लागला. या मोठय़ा प्रवासाच्या अखेरीस त्याला दुरून ते जोडपे दिसले. एका देवळाच्या परिसरात राहत ते एकमेकांवरच्या प्रेमात बुडालेले आणि सुखात असलेले त्याने पाहिले. पण त्यांच्याजवळ न जाता तो परत फिरला. त्याने त्यांच्या प्रेमपूर्ण संसाराबद्दल देवळाच्या पुजाऱ्यांकडून सर्व जाणून घेतले. त्याला कळले की, ते जोडपे गावातही प्रिय झालेले होते, आनंदात राहत होते. वात्स्यायनाने पुजाऱ्यांजवळ निरोप ठेवला, की तो येऊन गेला, कुठल्याही अडचणीच्या वेळी तो त्यांच्या पाठीशी राहील, साहाय्य करेल. परत येऊन त्याने पत्नी धारिणीला त्यांची खुशाली सांगितली. पण वासंतिकेचे आई-वडील मात्र तोवर मुलीच्या वियोगामुळे दु:खाने मरण पावले होते.
कथासूत्र असे एवढेच; पण वात्स्यायनाच्या या प्रवासाचे, त्यातील अनुभवांचे सविस्तर वर्णन म्हणजे ही कादंबरी आहे. कथेच्या शेवटी सर्वाची गळाभेट वगैरे न दाखवता वात्स्यायनाचे हे जे दुरूनच परत फिरणे आहे, ते अनपेक्षित तर आहेच; शिवाय ते संयत आणि अभिजात वाटते. या प्रवासामध्ये तो सर्व वेळ ग्रंथ लिहिण्याच्या दृष्टीने निरीक्षण करत आहे. हा विषय फार गुंतागुंतीचा आहे हे त्याला सतत जाणवते. या वर्णनातून मोकाशींनी तो काळ जिवंत केला आहे. त्याकाळची संस्कृती व जीवनशैली साक्षात् उभी केली आहे. ख्रिस्तपूर्व दुसरे-तिसरे शतक म्हणजे मौर्यकाळ. गुप्तकाळाप्रमाणे हाही भारताच्या प्राचीन इतिहासातला भरभराटीचा सुवर्णकाळ होता. अवंती, पाटलीपुत्र, उज्जयिनी या नगरांतले समृद्ध व रसिकतेने परिपूर्ण जीवन या कादंबरीतून समोर येते. यवनांशी नेहमी लढाया होत. त्यात विजयी होऊन येणाऱ्या वीरांवर सोन्या-चांदीची फुले उधळली जात. काही नगरांत राजा नसलेली गणराज्ये आहेत. लोकायतिकांचे वर्णन येते. ताम्रलिप्ती, अपरान्त, महाराष्ट्र यांचे उल्लेख येतात. पाटलीपुत्राहून दूर देशांकडे व्यापारी संघ निघत असत. तिथे प्रचंड वाडे, कमळांनी भरलेले तलाव, पुष्करणी, मोठे हाट होते. मोठय़ा वाडय़ांत सुरक्षिततेच्या दृष्टीने भुयारे करण्याइतके त्यांचे स्थापत्य प्रगत होते. काही लोक घराच्या मागच्या अंगणात (चोरून नव्हे!) मद्य तयार करीत असत. धनवंतांच्या वाडय़ांत चांदीच्या पिंजऱ्यांत शुक-मैनेसारखे पक्षी असत. अंगणांत सोन्या-चांदीचे वाळे घातलेले मोर नाचत तेव्हा मधुर ध्वनींनी वाडे भरून जात. अळिता, तांबूल यांचा वापर केला जात असे. आजच्या सेमिनारसारखे गोष्ठीसमवाय भरत असत. तिथे नाना विषयांवर चर्चा होत. त्यात वैयक्तिक प्रश्न विचारले जाऊ नयेत असा संकेत पाळावा लागत असे. एखादा सभासद मुखलेप लावून येई. कक्षामध्ये फुले, पाने यांच्या माळा लावलेल्या असत व रंगीत आसने असत. दासी सर्वाना मधुपेय, मैरेय, आसव इत्यादी देत असत. कौटिल्याच्या अर्थशास्त्राने घालून दिलेली शिस्त पाळणारी ही नगरराज्ये होती. वात्स्यायन वेशीवर जोडप्याची चौकशी करतो तेव्हा तिथला अधिकारी म्हणतो, ‘नगरात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्याची शिस्त आम्हाला कौटिल्याने सांगितलेली आहे. एखादी मुंगी जरी आत आलेली असेल आणि तिचा एक पाय मोडलेला असेल, तरी त्याची नोंद आमच्याकडे मिळेल! तुमचे तरुण जोडपे इथे आले असेल तर मी जरूर सांगू शकेन.’ वात्स्यायनाबरोबर त्याचा मित्र महेश्वरदत्तही या विषयाचा विचार करतो आहे. तो वात्स्यायनाला सांगतो, ‘तू ग्रंथ लिहिलासच तर सर्वाच्याविषयी सहानुभूतीने लिही. या जगात चांगले काय आणि वाईट काय, हे कुणाला कळलेले नाही.’
पाटलीपुत्र नगरात वात्स्यायनाची सोमल या सुसंस्कृत वृद्ध गृहस्थाशी गाठ पडली. तो पक्ष्यांचा मित्र होता. त्याने विशिष्ट आवाजात बोलावल्यावर अनेक लहान-मोठे विविधरंगी पक्षी त्याच्याजवळ आले. त्याच्या अंगाखांद्यावर बागडू लागले. सोमलाने वात्स्यायनाचे उत्तम आदरातिथ्य केले. शिवाय त्याच्याकडच्या गोष्ठीसमवायात झालेल्या चर्चेतून त्याला अनेक विचार मिळाले. त्या मुक्त विचारांच्या काळातही एक ब्रह्मदत्त आहे. तो म्हणतो की, ‘कामशास्त्राची चर्चा करून तुम्ही पाटलीपुत्र नगर धुळीला मिळवाल.’ पण वात्स्यायनाने स्वत: मांडलेले विचार सर्वाना पटल्याचेही त्याला दिसले. त्याने सांगितले की, धर्म, अर्थ, काम तिहींचे योग्य आचरण करणारा मनुष्यच इहपरलोकी दीर्घकाळ निर्भेळ सुख अनुभवतो. सर्वानी ‘साधू! साधू!’ म्हणून त्याला मान्यता दिली. अंगरिक-वासंतिकेला पाहून घराकडे परतताना तो पुन्हा पाटलीपुत्र नगरात गेला तेव्हा त्याला समजले की सोमलाचा मृत्यू झाला होता. पण त्याच्या पत्नीला भेटल्यावर तिने त्याला सोमलाची शेवटची भेट दिली. सोमलाने त्याच्यासाठी बाभ्रव्याची पोथी आणि काही टाचणे-टिपणे ठेवली होती. वात्स्यायनाच्या ग्रंथलेखनाला हे मोठे साह्य़च होते.
मोकाशींची कादंबरीतील कित्येक प्रगल्भ विधाने मनात रुतून राहावीत अशी आहेत..
‘स्त्री-पुरुष संबंधाचा अपत्य हाच तेवढा शेवट राहतो. बाभ्रव्याचे कामशास्त्र जिथे थांबते, तिथे खरे जीवन सुरू होते. कारण कामशास्त्राला पुढे हेतूच राहत नाही.’
‘दु:ख झाले तरी दु:ख कळणे हाही आनंद असतो.’
‘प्रत्येक नागरिकाच्या मनात दोन स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी, दुसरी त्याची गणिका. दोघींचे मिश्रण करून तो आपले आवडते स्त्रीरूप उभे करीत असतो.’
या वाक्याने पुराणातल्या एका कथेची आठवण होते. एक स्त्री पती आणि त्याचा जिवलग मित्र यांच्याबरोबर प्रवास करत असते. वाटेत ते एका देवळाजवळ थांबतात. पती देवीच्या दर्शनाला जातो आणि काही प्रेरणेने आपले मस्तक कापून देवीला अर्पण करतो. त्याला शोधायला गेलेला तो मित्रही आपले मस्तक अर्पण करतो. दोघांना शोधत आलेली स्त्री देवीसमोर ही दोन्ही मस्तकविहीन शरीरे पाहते. शोकविव्हलतेने देवीला प्रार्थना करून मरणाला उद्युक्त होते. पण देवी सांगते, त्यांच्या धडांवर मस्तके ठेव. शोकाने बावरलेली स्त्री मस्तके ठेवताना अदलाबदल करते. पतीच्या देहावर त्याच्या मित्राचे मस्तक आणि त्याच्या मित्राच्या देहावर पतीचे मस्तक बसते. बहुधा त्या पुराणकथाकाराला अशा प्रकारे स्त्रीच्या मनातल्या दोन पुरुषांची जाणीव असावी. स्त्रीलाही पुरुषामध्ये बुद्धी व शक्ती दोन्ही गोष्टी हव्या असतात. या दोन्ही गोष्टी नेहमीच एकत्र मिळतात असे नाही. गिरीश कर्नाडांनी या कथेवर आधारित ‘हयवदन’ नाटक लिहिले आहे.
‘स्त्रीचे मन शब्दात ओळखण्याइतके सोपे नाही. पण स्त्रीचे व पुरुषाचे प्रेमसुख, मीलनसुख व विरहदु:ख सारखेच असते. एकच असते. हे तत्त्व कळल्याने कामसेवनात समजूत येईल. त्यामुळे पृथ्वीवरील स्त्रियांना प्रथमच स्वत्व लाभेल.’
‘इतर प्राण्यांप्रमाणे फक्त ऋतुकाळीच स्त्री-पुरुषांच्या कामवासना बळावल्या असत्या तर माणूस फार सुखी झाला असता.’
‘अतिकामवासनेने देशही नष्ट होतो.’
स्त्रियांनी कामशास्त्र शिकावे का, याचे उत्तर वात्स्यायनाने होकारार्थी दिलेले आहे. नाना देशीच्या कामप्रवृत्ती वेगवेगळ्या असतात असेही त्याने म्हटले आहे.
वात्स्यायनाच्या प्रवासात विविध मुक्कामांच्या ठिकाणी त्याला भेटलेली माणसे, व्यापारी तांडे घेऊन जाणारे काही सार्थवाह आपल्या अनुभवांच्या विविध कथा सांगतात. अरबी सुरस कथांप्रमाणे त्या रंजक आहेत. या कथांमुळे ही कादंबरी अधिक रोचक झाली आहे. एक सार्थवाह बजावून सांगतो की, पत्नीचा संशय कधी घेऊ नकोस. तिचा अपमान कधी करू नकोस.
अंगरिक व वासंतिकेच्या शोधात दक्षिणेकडे जाताना वात्स्यायन अजिंठय़ाच्या परिसरात येतो. तिथे शेकडो कारागीर व हजारो श्रमिक लेणी खोदण्याचे काम करत असतात. संध्याकाळच्या वेळी त्यांच्या स्त्रिया भाकऱ्या भाजू लागतात. मग क्षुधा शांत झाल्यावर त्यांच्या श्रांत शरीरांना विसावा देण्यासाठी ते आसनांवर पडतात. तेव्हा त्यांना कथा सांगण्याचे, रिझवण्याचे काम करणारे कथ्थक असत. तिथे वात्स्यायनाला असाच एक कथ्थक भेटतो. त्याचे पूर्वज गुणाढय़ाचे शिष्य होते. राजा सातवाहनाने गुणाढय़ाचा अपमान केला, त्याचे साहित्य तुच्छ ठरवले तेव्हा गुणाढय़ाने डोंगरावर जाऊन आपल्या ग्रंथाचे एकेक पत्र वाचून वाऱ्यावर सोडले. ते ऐकून व पाहून पशुपक्षी रडले. त्या कथ्थकाच्या पूर्वजाने त्यातले एक पत्र घरी आणले होते आणि भक्तिभावाने ते देवघरात ठेवले होते. त्याची तो कथ्थक अजून पूजा करत असतो. वात्स्यायन त्याच्या कथा ऐकतो. त्या कथेत आज तो कथ्थक अंगरिक व वासंतिकेच्या कथेचे तपशील चपखलपणे बसवतो. त्याचे एक वाक्य फारच सुजाण व चातुर्याचे आहे : ‘मी भविष्य सांगत नाही, घटनांतून क्रमप्राप्त होणारे सांगतो आहे.’ अंगरिक व वासंतिकेला शोधताना दंडकारण्याच्या प्रवासात तो कथ्थक वात्स्यायनाबरोबर जातो. या प्रवासातच तुमचा ग्रंथ असेल, असे तो म्हणतो.
या सर्व भटकंतीतील अनुभवांतून गेल्यानंतर वात्स्यायन घरी परत आला. पत्नी धारिणीने त्याच्या ग्रंथलेखनाची सर्व सिद्धता केली. आसन मांडले. पुष्पमाला टांगल्या. धुपाचा सुगंध घरभर दरवळला. शुचिर्भूत होऊन वात्स्यायन ग्रंथलेखनास आसनावर बसला. पत्नी समोर येऊन बसल्यावर तो म्हणाला,
‘धारिणी, हा ग्रंथ पुरा करण्याचे सामथ्र्य गुरू मला देवो. त्याला माझे वंदन. कामेच्छा फार गहन आहे. कामाचरण हे त्याहूनही गहन आहे. कामेच्छेने अनावर होऊन माणूस वाटेल ते साहस करतो, मृत्यूलाही कवटाळतो. कामाचे हे बल मला कळो. कामाचरणातले योग्यायोग्य मला सांगता येवो. शास्त्र म्हणून सांगाव्या लागणाऱ्या गोष्टींत निर्भयता येवो. शास्त्र म्हणून जे जे आहे तेच मी सांगेन. म्हणजे माझा ग्रंथ वाचताना कुणाचे कामोद्दीपन झाले तर त्याचा दोष माझ्याकडे येणार नाही.’
नंतर वात्स्यायनाने गुरूला वंदन करून आपल्या ‘कामसूत्रा’स आरंभ केला-
‘धर्म, अर्थ, काम यांना नमस्कार असो.
पूर्वाचार्याना नमस्कार असो.’
वात्स्यायनाचा ग्रंथ पूर्ण झाला. तिकडे पार्वती नंदीच्या परत येण्याची वाट पाहत होती. शंकरांनी तिला सांगितले, ‘आपला नंदी परत आला नाही याला मीच कारण आहे. वात्स्यायनाने पृथ्वीवर जन्म घेतल्यावर अनंत यातना भोगल्या आहेत. असे आहे की, मानवाच्या चांगल्या-वाईट कर्माची फळे त्याला त्याच आयुष्यात भोगावयाची असतात. पार्वती, त्याच्या कर्माचे तिथेच परिमार्जन होऊन काही काळ त्याला सुख मिळावे असे मला वाटते. त्याने आपल्या पत्नीबरोबर सुखोपभोग घ्यावेत.
‘मला वाटते की, नंदीने आपल्या ग्रंथाच्या कीर्तीचा परिमल सर्वत्र पसरलेला पाहावा. कारण मानवांतील ग्रंथकर्त्यांस कीर्तीच्या सुखाचे फार वाटते. या हेतूनेच मी त्याचे पृथ्वीवरील आयुष्य वाढवले आहे. परंतु प्रिये, चिंता करू नको. मानवाचे एक वर्ष हे देवांचे केवळ निमिष असते. तेव्हा काही निमिषांतच तुझा नंदी तुझ्यापुढे येऊन बसलेला तुला दिसेल. पुढील युगायुगांत त्याच्या ग्रंथाची कीर्ती त्रिखंडात वाढत राहील. महाकवी त्याच्या ग्रंथावरून प्रणयकाव्ये रंगवतील. त्याचा ग्रंथ पृथ्वीवर पाचवा वेद म्हणण्याइतका महत्त्वाचा ठरेल.’
शंकराच्या भाषणाने प्रसन्न झालेली पार्वती म्हणाली, ‘देवा! तसे होवो. तथास्तु.’

‘वात्स्यायन’, वरदा प्रकाशन (१९७८), पृष्ठे- २५९.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!