‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया कौतुक आणि आनंद, अशीच दिसते आहे; म्हणजे प्रेक्षकपसंतीची मोहर या चित्रपटावर उमटलेली आहेच. किंवा असंही की, आक्षेपाचे मुद्दे असूनही ते दबलेलेच आहेत.. केवळ जाहिरातशरणतेपेक्षा वेगळी काही कारणं यामागे आहेत का, याचा हा शोध..
‘डेकोरम’ असा एक इंग्रजी शब्द आहे. त्याचा चटकन दिला जाणारा मराठी अर्थ ‘सभ्यता’ असा असला तरी तो काही पुरेसा वाटत नाही. एखाद्या समारंभाचा डेकोरम पाळला जातो म्हणजे आब राखला जातो, म्हणजे प्रतिष्ठेबाबतचे प्रस्थापित संकेत पाळले जातात. यातूनच पुढे डेकोरम पाळणारे किंवा प्रतिष्ठासंकेत माहीत असणारे आणि न पाळणारे किंवा माहितीच नसणारे अशा विभागणीचीही कल्पना करता येते.. हा सगळा अर्थव्यूह इंग्रजीतून अंगावर आदळतो, तसा तो आदळवणारा एकच शब्द मराठीत सापडत नाही, हे एक प्रकारे आपल्या पूर्वापार मोकळेढाकळेपणाचंच लक्षण मानता येईल. इंग्रजी ही आपल्या मातीतली भाषा नसल्यामुळे आपल्यापैकी अनेकांना ‘डेकोरम’ हा शब्द उच्चारताच ‘डेकोरेशन’ आठवू शकेल- स्वानुभव असा की, डेकोरेशनचा आद्य प्रकार म्हणून महिरपच डोळय़ांसमोर येते.. आणि ‘डेकोरम’चा अर्थव्यूह समजल्यावरही, डेकोरम पाळण्याची क्रिया ही उगाच महिरपीत वावरल्यासारखी आहे, असं वाटू लागतं. या भावना नापसंतीदर्शक असल्या तरी निरुपद्रवी आणि मुख्य म्हणजे अहिंसक आणि अस्सलसुद्धा आहेत. त्यामुळे ‘डेकोरम’ किंवा महिरपीपणाबद्दलच्या या भावनांचं अस्तित्व मान्य करायला हरकत नाही.
वाद असू शकतो तो, ‘डेकोरम’ सारखा परका शब्द- त्याच्या अर्थव्यूहासकट- ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाबाबत एखाद्याला आठवण्याचं काही कारण आहे का, याबद्दल.
तरीही डेकोरम, महिरप असं काहीबाही आठवत राहिलं.. हे सांगणं आणि त्यामागली कारणं शोधणं हे या मजकुराचं प्रयोजन. एका अस्फुट अस्वस्थतेची नोंद केल्यामुळे तरी ती अस्वस्थता सशक्त की अशक्त हे स्पष्ट व्हावं, यासाठी हा प्रयत्न. ही नोंद करताना अपरिहार्यपणे चित्रपटाचे संदर्भ येतील. ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकावरला चित्रपट ही स्वतंत्र निर्मिती आहे वगैरे सगळं मान्यच करूनसुद्धा नाटकाचा उल्लेख काही वेळा येईल. तरीही, चित्रपटाबाबत काही मतप्रदर्शन आहे म्हणून या लिखाणाला चित्रपटाचं ‘परीक्षण’ ठरवू नये, ही विनंती. हे जर परीक्षण असलंच, तर ते प्रेक्षकांविषयीचं परीक्षण ठरो!
चित्रपटाच्या प्रेक्षकांविषयीचं परीक्षण हे ऐकायला विचित्र वाटेल. ज्या प्रकारे या चित्रपटाची तोंडी जाहिरात होते आहे, ज्या प्रकारच्या चर्चा समाजमाध्यमांवर झडत आहेत. किंवा या चित्रपटाचा खेळ पाहण्यास गेल्यावर जे चेहरे/कपडे दिसताहेत किंवा सुवास येताहेत, त्यावरून प्रेक्षकांचं परीक्षण करता येईल का? म्हणजे ‘कटय़ार..’च्या बाबतीत, पहिल्या दोन आठवडय़ांत तरी हे प्रेक्षकवर्गच एकसुरी असल्यानं त्याचं एका सुरात साऱ्यांनी पसंती दिली, असं म्हणता येईल का? कदाचित हो. या पसंतीचा सूर सध्या तरी डोळे दिपल्यासारखा आहे. म्हणजे शंकर-एहसान-लॉय यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित संगीत देण्यासाठी मराठीत उतरणं हेच मोठं, किंवा एखाद्या मराठी चित्रपटासाठी एवढा खर्च झाला हेच सुखद. किंवा बालगंधर्व आणि लोकमान्य अशा भूमिका करूनसुद्धा सुबोध भावे यांनी सदाशिवची भूमिका वठवली हीच अभिनयाची ताकद, असा. झालंच तर.. ‘महागुरू’ असूनसुद्धा सचिन पिळगावकर हे या चित्रपटात कमी अभिनयातिरेक करतात हे छानच, असाही. ‘चित्रपटाकडे स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहा’ असं सांगणं सोपं असतं, पण प्रेक्षकाची नजर ‘स्वतंत्र कलाकृती’ पाहण्याची असते का? प्रत्यक्षात आधीचे चित्रपट, त्यांचे खर्च, त्यांतल्या भूमिका वगैरे साऱ्याचा ताण या ‘स्वतंत्र कलाकृती’वर असतोच असतो. वर उल्लेख केलेलं कौतुक हे ताणनिरसनाच्या भावनेतून आणि ‘अपेक्षेहून जास्त मिळालं’ अशा उपकृत भूमिकेतून झालं, असं मानण्यास जागा आहे.
पसंती आणि कौतुक यांचा ऊहापोह आणखी एका उल्लेखाशिवाय अपुरा राहील. प्रेक्षकपसंतीची लाटच या चित्रपटाआधी उसळलेली दिसली. त्यात प्रसारमाध्यमांचा रेटा, उघड वा आडून केलेली जाहिरात, वृत्तपत्रीय प्रसिद्धी इत्यादी नेहमीच्या- आणि बहुतेकदा नकारात्मकपणे पाहिल्या जाणाऱ्या कारणांपेक्षाही जबरदस्त असं एक कारण होतं. नाटकाचं यश, नाटकाला लाभलेलं वलय, यांचा रेटा इतका होता की लाट उसळणारच. ही लाट फसली असती, प्रेक्षकसंख्येचा किनारा गाठण्याआधीच फुटली असती.. पण चित्रपट नाटकापेक्षा खरोखरच निराळा आहे, ही धारणा अखेर प्रबळ ठरली आणि तुलना झाली नाही.
चित्रपटाचं (नाटकापेक्षा) निराळेपण अनेक बाबतींत आहे. नदीसह विश्रामपुरची पहिली फ्रेम दिसते, तिथं ते सुरू होतं आणि शेंदूर खिलवण्याच्या प्रसंगात पराकोटीला जातं. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळण्यासाठी कथेचं जे सुलभीकरण आवश्यक मानलं जातं, ती या वेगळेपणाची नकारात्मक बाजू आहे आणि चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमातून जो तपशील साकारता येतो तो या चित्रपटानं भरपूर साकारला, ही ‘मानलं तर’ सकारात्मक बाजू.
‘मानलं तर’ असं म्हणण्यास कारण आहे. सुलभीकरण हे हिंदू आणि मुस्लीम अशाही प्रकारे झाल्याचं लक्षात घेतल्यास, इस्लामी पात्रांची रंगभूषा आणि काही प्रमाणात त्यांची वेषभूषा, हे सारं जमून आलं आहे. वेषभूषेला ‘काही प्रमाणात’ म्हणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खाँसाहेबांच्या शाली! दोन शाली ओढणीसारख्याच आहेत. यापैकी एका शालीचं कापड बाटिक (विश्रामपुरात?) केलेलं आहे आणि दुसऱ्या (मोरपंखी रंगाच्या व कृत्रिम रेशमाच्या) शालीवर मशीन एम्ब्रॉयडरीचं चक्राकार डिझाइन आहे. मराठी नाटकांत अशा प्रकारची वेशभूषा खपवून घेतली जाते. खाँसाहेबांच्या दिवाणखान्यातल्या छोटय़ाशा मेजावरले ‘न्यौते’ आणि ‘नजराने’ महिनोन्महिने तसेच्या तसेच असतात. तपशिलाचे हे दोष ‘मानलं तर’ अगदीच किरकोळ आहेत; पण पंडित भानुशंकरजींची बाराबंदी आणि त्यावर डॉ. एम. विश्वेश्वरय्यांसारखी म्हैसुरी पगडी, त्यांच्या सख्ख्या मुलीनं विश्रामपूरसारख्या- म्हणजे जिथल्या राणीसाहेब मराठी पद्धतीनं नऊवारी नेसून महाराष्ट्री घाटाचे दागिने घालतात अशा- संस्थानात लहानाची मोठी झाल्यानंतरही जपलेली गुजराती भासणारी वेशभूषा, हे सबगोलंकार भेदाभेदही ‘मानलं तर’ दुर्लक्षणीयच ठरवता येतील.. अन्य चित्रचौकटींमध्ये खाँसाहेबांचा वाडा, दरबार हॉल, दसऱ्याच्या जत्रेची दृश्यं यांमध्ये कलादिग्दर्शनाच्या तपशिलांपेक्षा भव्यताच पाहिली जाते आणि प्रभाव पाडते.
भव्यतेचा प्रभाव पडणं, हे मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकाला नवं आहे. हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक या नात्यानं, याच मराठीजनांनी कदाचित मुगल-ए-आज्ममपासून जोधा-अकबपर्यंत अनेक चित्रपट पाहिले-पचवले आहेतच. त्यामुळेच की काय, आगामी ‘बाजीराव मस्तानी’च्या भव्य श्रीमंती थाटमाटाचं भाबडं कौतुक करायचं सोडून काही मराठीजन कथानकाच्या चित्रपटीकरणावर (किंवा करमणुकीकरणावर) आक्षेप घेऊ पाहताहेत. या साक्षेपी तर्कशास्त्रातून मराठी चित्रपटांना सूट किंवा माफी असावी, एवढं चित्रपटीकरण ‘कटय़ार..’ या चित्रपटाच्या कथानकासंदर्भात केलं गेलं आहेच. हे चित्रपटीकरण ‘सुबोध भावेचा पहिलाच प्रयत्न असूनही कौतुकास्पद’ अशासारख्या शब्दांत माफ करून टाकलं जात आहे. खाँसाहेबांचं खलनायकीकरण हा ‘चित्रपटीकरण/ करमणुकीकरण’ या दृष्टीनं आक्षेपाचा ठरू शकणारा मुद्दा ‘मायबोली’सारख्या एखाद्या इंटरनेट-चर्चास्थळावरल्या चार-पाच टिप्पण्यांमध्ये डोकावतो आणि विरून जातो आहे. पंडित भानुशंकरशास्त्रींच्या शिफारशीमुळे संस्कृत पाठशाळेत जी शिकली, ती एक झरीना वगळता ‘खलनायकत्व’ ज्यांच्यात डोकावतं ती पात्रं म्हणजे अम्मी, अम्मीचे वडील आणि चाँद व उस्मान. यापैकी चांद आणि उस्मान ही दुक्कल अर्धशिक्षित, बेअक्कल, लोभी आणि माजखोर आहे.. ती दोघं म्हणजे ‘बांडगुळं’ आहेत. दिग्दर्शक सुबोध भावे यांनी साकारलेलं सदाशिव हे (शेतकऱ्यासारखा पोशाख करणारं) पात्र, चाँद-उस्मान यांच्याकडून अवमानित झाल्यावर आजच्या काळातल्या ब्रिगेडी त्वेषानं ‘गळा दाबीन तुझा’ म्हणतं.. पण तो त्वेष चित्रपटीय कथानकात उचित ठरतो. पुढे सदाशिव खाँसाहेबांचा जीव घेण्याचं ठरवतो, तेव्हा मात्र झरीना त्याला कलेतूनच प्रत्युत्तर द्यायला सुचवते आणि खलनायकीकरणाचा खळखळता अंत:प्रवाह अखेर थांबून मूळपदावर येतो. लालसा, कमी कुवत, अहंकार, लाभ पदरात पाडून घेण्यासाठी कोणतंही कुकर्म निषिद्ध न मानण्याची वृत्ती हे खाँसाहेब, अम्मी, अम्मीचे वडील आणि चाँद-उस्मान यांचे दुर्गुण आणि त्या दुर्गुणांना ‘फोडा आणि झोडा’ म्हणून ब्रिटिशांकडून मिळणारं प्रोत्साहन हे तपशील या चित्रपटामध्ये जितके खुलवून दाखवले गेले आहेत, तितके ते मूळ नाटकात असते तर नाटकाचा प्रभाव आज आहे तितका राहिला असता का? कदचित हा प्रश्नच व्यर्थ आहे.. चित्रपटाला निराळंच काही सांगायचं आहे.. नाटकातले खाँसाहेब सहृदयसुद्धा आहेत, गुणग्राहकता त्यांच्यातही आहे, हे वसंतराव देशपांडे यांच्या आवाजत ‘तेजोनिधि लोह गोल’ ऐकताना श्रोत्या-प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं! नायक-खलनायक हा भेद सुरांमुळे विरून जायचा आणि कथानकाच्या पलीकडला ‘झगमगले भुवन आज’ असा मेंदू लख्ख करणारा कलाप्रत्यय (नाटकात) मिळायचा. चित्रपट ही ‘स्वतंत्र कलाकृती’ असल्यानं आतून प्रकाश पाडणारी नाटकातली सोय काढून टाकून इथं पडद्यावरच अ‍ॅनिमेटेड काजवे चमकवता येतात, हेही एक वेळ ठीक. पण सदाशिव खाँसाहेबांच्या घरात ‘गुलाम’ म्हणून राहताना त्यांची गायकी कशी आत्मसात करतो आहे, एकलव्यवृत्तीच्या त्या शिष्याला गायकीतल्या कशाचं अप्रूप वाटतं आहे, हे प्रेक्षकांपर्यंत पुरेसं पोहोचत नाही.. त्याऐवजी, चाँद-उस्मानसारखे ‘दुर्जन’ आपल्या सदाशिवाचा कसा बेबंद छळ करताहेत हे तपशिलानं पाहावं लागतं. जो काही प्रत्यय येतो, तो अगदी अखेरीस सदाशिव तराणा सादर करतो तेव्हाच.
भारतीय संगीतातल्या दोन प्रवाहांची, त्यांतल्या स्पर्धेची आणि या स्पर्धेला असलेल्या गुणग्राहकतेच्या रेशमी अस्तराची गोष्ट नाटकानं सांगून झाली.. जणू ती गोष्ट संपलीच. आता चित्रपट सांगतो आहे ती नवी गोष्ट.. सुरुवातीलाच कटय़ार (रीमाच्या आवाजात) म्हणते त्याप्रमाणे, कला क्षेत्रातल्या अहंकाराची गोष्ट. ही गोष्टसुद्धा कशी? तर सुष्ट सुष्टच असतात आणि दुष्ट दुष्टच, असं ठसवणारी.. म्हणजे ‘चांदोबा’तल्या जुन्या गोष्टींसारखीच.. ‘एका गावी एक गरीब ब्राह्मण राहात होता’ अशासारख्या पहिल्या वाक्यातच आपण कोणाच्या बाजूचे आहोत हे चांदोबाच्या वाचकांना- कितीही बालबुद्धीचे असले तरी- कळायचं, ती सोय या चित्रपटात भरपूर आहे!
नाटक पाहाताना, खाँसाहेब या पात्राचा तिरस्कार प्रेक्षकानं किती करायचा यावर अगदी आपसूक नैसर्गिक मर्यादा असायची.. खाँसाहेबांचं काम करणाऱ्या गायक-नटाचा आवाज, ही ती मर्यादा. चित्रपटात पात्रयोजनेमुळे (कास्टिंग) ती असूच शकत नव्हती.. उलट, पंडित भानुशंकरशास्त्रींचं अमर्याद कौतुक करण्याची सोय मात्र चित्रपटानं दिली.
हा मजकूर अनेकांना रडगाणं वाटेल.. पण काही जणांना कदाचित, त्यामागचं गाणं कळत असेल.. ‘हिंदुस्तानी शास्त्रीय’ संगीतातल्या उस्ताद आणि पंडित या प्रवाहांच्या गायकीबद्दल गाण्यातूनही जे कळतं, ते ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकानं पोहोचवलं होतं. ते आजही चित्रपटातून पोहोचावं, ही गरजच नाहीशी झाली का? कशी आणि कोणी विझवून टाकली ती गरज?
चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असतानासुद्धा हे असे प्रश्न पडणं म्हणजे प्रेक्षकांना कमी लेखणं, असा अर्थही काढला जाईल.. पण हे प्रेक्षक कदाचित प्रस्तुत लेखकापेक्षा अधिक हुशार असतील आणि या चित्रपटातून एक रसिक म्हणून होणाऱ्या लाभ-हानीचं गणित त्यांनी मनोमन मांडलंही असेल.. हे गणित एखाददुसऱ्या इंटरनेट चर्चास्थळावरून किंवा क्वचित फेसबुकवरून उघडही होतं.. पण ही चर्चा तिथंच संपते.. कंसाकंसांच्या गणितात जसा प्रत्येक अंकाला घनभार असतो, पण गोल कंस, चौकटी कंस आणि या सर्वाना सामावून घेणारा महिरपी कंस यांची बाकी शून्यच असते, तशी! ‘पण एवढा महत्त्वाकांक्षी चित्रपट मराठीत निघालाय तर चांगलं म्हणा की..’ हा या गणितातला महिरपी कंस!
‘डेकोरम पाळण्याची अपेक्षा व्हिक्टोरियन, ब्रिटिश असल्यानं तो शब्द इंग्रजीच आहे’, हा मराठीतला विश्वास अशा महिरपी कंसांनी डळमळू लागतो.. यावरही कुणी म्हणेल, ‘त्याचं काय एवढं?’

अभिजीत ताम्हणे
abhijit.tamhane@expressindia.com

actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
laxmikant berde daughter swanandi berde debut
लक्ष्मीकांत बेर्डेंची लेकही करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर करणार काम
PM Modi PM Modi on Article 370on Article 370
“हा चित्रपट कसा आहे याबद्दल…”, पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये केला ‘आर्टिकल ३७०’ चा उल्लेख; यामी गौतम म्हणाली…