उद्या १ ऑगस्ट.. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. टिळकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व म्हणजे मंडालेतील तुरुंगवास. या पर्वात त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. ‘गीतारहस्य’चे लेखन ज्या ठिकाणी टिळकांनी केले, त्या तुरुंगाच्या शोधमोहिमेची एक अयशस्वी कहाणी..

मुंबईच्या नेक्झीर कन्सल्टसी कंपनीतर्फे नोकरीनिमित्त सुमारे वर्षभर ब्रह्मदेशातील- हल्लीच्या म्यानमारमधील रंगून (यांगून) या शहरापासून ८० कि. मी. दूर असलेल्या बगो या प्रांतात माझे वास्तव्य होते. हा आपला सख्खा शेजारी देश. दोन हजार वर्षांपूर्वी भगवान गौतमाने संपूर्ण मानवकल्याणासाठी विपश्यना ही सिद्धी प्राप्त करून तिची दीक्षा जनसामान्यांना दिली. भारतभूमीचे दुर्दैव असे, की कर्मकांडी कर्मठांनी ही विद्याच हद्दपार केली. या विद्येची जपणूक केलेला हा ब्रह्मदेश. मंडाले येथील आचार्य सत्यनारायण गोयंका या कर्मठ हिंदू कुटुंबातील सत्पुरुषाने ही विद्या पुन्हा भारतात आणली. आज जगभरात (अगदी इस्लामी देशांसहित) सुमारे १२०० पीठे स्थापन करून ते या विद्य्ोचा प्रसार करीत आहेत.
ब्रह्मदेशातील लोकजीवन व संकृती समजून घेण्यासाठी भटकलो होतो. पण लोकमान्य टिळकांचे वास्तव्य असलेल्या मंडाले येथे जाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग एके दिवशी मनोज नावाच्या स्थानिक बिहारी तरुणाला दुभाषी म्हणून सोबत घेऊन मंडाले शहर गाठले. इथे तुम्हाला ब्राम्ही भाषा येत वा समजत नसेल तर सर्वच बाबतीत मोठय़ा अडचणी येतात. एकतर येथील लोकांना स्थानिक भाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नाही. आणि ज्यांना इंग्रजी येते त्यांचे शब्दोच्चार जाणीवपूर्वक ऐकून आकलन करावे लागतात. मनोज हा महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या सेवेसाठी इंग्रजांनी जबरीने बिहार प्रांतातून नेलेल्या मजुरांच्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी. या बिहारींच्या मोठय़ा वसाहती, गावे, घरेदारे व जमीनजुमला आज उत्तर-मध्य ब्रह्मदेशात आहेत. केवळ शारीरिक कष्टांच्या जोरावर गुजराण करणारा हा समाज आजही शैक्षणिक व त्यामुळे आर्थिक बाबतीतही मागासलेला राहिला आहे. या लोकांची भारताशी असलेली नाळ बहुतांशी तुटलेली आहे. इथे एकंदर लोकसंख्येच्या पाच टक्के असलेल्या भारतीय लोकांमध्ये तमिळींची संख्याही बरीच आहे. तमिळ मुख्यत: व्यापारासाठी आले व बऱ्यापैकी प्रगती करून आजही भारताशी नाते ठेवून आहेत.
मंडालेत पोहोचल्यावर चहापान करून ताजेतवाने झाल्यावर पुढच्या प्रवासासाठी एक कार भाडय़ाने घेतली आणि मार्गस्थ झालो. वाटेत भर शहरात थिबा राजाचा राजवाडा पाहण्यासाठी मोटारीतून पायउतार झालो. भुईकोट असलेला किल्ला आणि राजवाडा चहुबाजूनी खोल खंदक व पाणी यात सुरक्षित आहे. मंडालेचा थिबा राजा रत्नागिरीत, तर रत्नागिरीचा (राजकीय) राजा मंडालेत- अशी इंग्रजांची राजकीय कूटनीती होती. थिबा हा ब्रह्मदेशाचा राजा असल्याने सुमारे दहा एकर परिसरात समुद्रदर्शनी उंचीवरील राजवाडा व मानधनाची सोय केली गेली होती. संबंधित देशात राजाने पुन्हा बंड करू नये म्हणून राजाचे स्थलांतर करण्याची इंग्रजांची ही प्रथा होती. तर एक राजकीय कैदी म्हणून लोकमान्यांना नेमके कुठे ठेवले होते, हे जाणून घेण्यासाठी माझी ही परिक्रमा होती.
थिबाचा ब्रह्मदेशातला हा राजवाडा छोटेखानीच आहे. इथे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडात नक्षीकाम व कलाकुसर केलेला आहे. राजा, राण्या आणि इतर कुटुंबीयांच्या कोठय़ा अजूनही शाबूत आहेत. परंतु सिंहासन वगळता कसलेही फर्निचर, पडदे वा गालिचे आज तिथे आढळत नाहीत. पोहण्याचा हौद व लाकडी टेहळणी मनोरा शाबूत आहेत. राजाचा दरबार हॉल छोटेखानी असून त्याच्या लाकडी कलाकुसरीवर ब्राह्मी छाप दिसते. जमिनीपासून दहा फूट उंचीवर असलेल्या राजवाडय़ाच्या मागील भागात पुरातन वस्तू, शस्त्रे व तैलचित्रांचे संग्रहालय आहे. राजवाडा परिसरात त्याकाळी अंतर्गत वाहतुकीसाठी नेरोगेज रेल्वे अस्तित्वात होती. तिचा वापर मंत्रिगण व प्रशासकीय अधिकारी करीत. आज तिचे केवळ अवशेष तेवढे शिल्लक राहिले आहेत. मागील भागात जंगल व झाडी आहे.
राजवाडा पाहून झाल्यावर लोकमान्यांच्या वास्तव्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती तुरुंगाकडे कूच केले. राजवाडय़ापासून तीन-चार कि. मी. अंतरावर मध्यवर्ती तुरुंगात पोहोचल्यावर मोठा भ्रमनिरास झाला. हा तुरुंग केवळ २०-२५ वर्षांपूर्वीच बांधलेला होता. १९०८ हे लोकमान्य टिळकांचे शिक्षावर्ष.. म्हणजेच सुमारे ७० वर्षांनंतर तो बांधला होता. अर्थात टिळक हे काही सामान्य कैदी नव्हते. त्यामुळे त्यांचे वास्तव्य तुरुंगात नसून इतरत्र असावे. शिवाय त्यांची खोलीही स्वतंत्र लाकडी व लिखाण साहित्ययुक्त होती असेही वाचनात आले होते. आमची ही परिक्रमा खाजगी असल्याने कुठलेही शासकीय साहाय्य मिळणे अवघडच होते.
आमच्या मनाची ही घालमेल पाहून शेजारच्या दवाखान्यात हाताच्या फॅ्रक्चरवर उपचार घेण्यासाठी आलेली एक मध्यमवयीन ब्राह्मी स्त्री आपला प्लास्टरमधला हात सांभाळत समोर आली. ब्राह्मी स्त्रिया या भारतीय स्त्रियांप्रमाणे सोज्वळ, शालीन व संयमी समजल्या जातात. सहसा त्या स्वत:हून परपुरुषाशी संवाद साधत नाहीत. परंतु तिने काहीशा अंदाजे दुभाषी मनोजशी संवाद सुरू केला. तिच्या लेखी टिळक म्हणजेच गांधीजी असून तसा नामोल्लेखही तिने केला. गांधीजी हे राजवाडा परिसरात सैनिकांच्या बराक १५ मध्ये होते आणि यापूर्वीही दोन भारतीय व्यक्ती अशाच प्रकारे शोध घेण्यास आल्या होत्या अशी माहिती तिने दिली. या दोन व्यक्तींबद्दल इतरत्रही ऐकावयास मिळाले. त्या महिलेला ही माहिती कुठून मिळाली, तिचे नाव काय, हे जाणून घ्यायची इच्छा होती; परंतु तत्पूर्वीच तिच्या मुलाने दुचाकीला किक् मारून तिला घेऊन तो भुर्रकन् निघूनही गेला.
आमचा मोर्चा परत राजवाडय़ाकडे वळला. तिथे पुनप्र्रवेश करतेवेळी मी विदेशी असल्याने माझ्याकडून मघाशी अनवधानाने राहिलेली दहा अमेरिकी डॉलर शुल्काची वसुली केली गेली. या तिकिटामुळे संपूर्ण मंडालेतील इतर स्थळदर्शन मात्र विनामूल्य झाले. आमची गाडी आत शिरल्यावर लष्कराच्या ताब्यात असलेल्या मागील भागात आम्ही आलो. बरॅक क्रमांक १५ जवळ पोहोचलो तर तेथे सध्या सैनिकी भांडार असून ते कुलूपबंद होते. थोडा पुढे ऑफिसमध्ये गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. गेली १०-१२ र्वषे नोकरीत असलेल्या या कर्मचाऱ्यांना सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या टिळक या राजकीय कैद्याची माहितीच काय, पण त्यांचे साधे नावही माहीत नव्हते. दुभाष्याद्वारे बरीच चौकशी केल्यावर आमचा येण्याचा उद्देश आणि चिकाटी पाहून तेथील सैनिक कर्मचाऱ्यांनी बरीच मदत केली. आम्हाला हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी एकजण ७५ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे जाण्यास निघाला. आम्हाला नेमके काय हवे आहे याचा तपशील घेऊन तो दुचाकीवरून त्यांच्याकडे गेला.
तोवर आम्ही आमचा मोर्चा इतरत्र काही माहिती मिळते का, यासाठी वळवला. बरॅक क्रमांक १५ चा किमान फोटो तरी घ्यावा म्हणून गेलो तर तेथे सैनिकी अंमल असल्याने मनाई करण्यात आली. आजूबाजूच्या परिसरात काही मोडकळीस आलेल्या मोकळ्या, धोकादायक सैनिकी बराकी, काही भांडारगृहे, चांगल्या अवस्थेतील काही गोडाऊन आणि कर्मचाऱ्यांची वस्ती होती. इंग्रजांच्या इथल्या वास्तव्याच्या खुणा आजही आढळून येतात. एक दुमजली पूर्ण लाकडी इमारत काहीशी वेगळ्या धाटणीची व संरक्षक भिंतीसह होती. पण मोडकळीस आलेल्या आणि वापरात नसलेल्या या लक्षवेधी इमारतीबद्दल कोणीच काही सांगू शकले नाही. तिथे एक मानवनिर्मित तलावही होता.
सुमारे तासाभराने तो सैनिक परतला. मोठय़ा आशेने त्याच्याकडे गेलो. त्याने बरीच मेहनत करून त्या बुजुर्गाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तेथूनच त्याने अजून दोन-तीन जुन्या वरिष्ठांशी मोबाइलवर संपर्क साधला होता. पण आमच्या दुर्दैवाने त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. लोकमान्य व त्यांच्या मागील शतकातील मंडालेतील वास्तव्याबद्दल कोणीच काही सांगू शकले नव्हते. कदाचित शंभर वर्षांपूर्वीची ही घटना.. तीही इंग्रज राजवटीत घडलेली.. त्यामुळे ब्रह्मदेशातील इंग्रजांच्या नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी ही बाब फारशा गांभीर्याने घेतली नसावी. भारत आणि ब्रह्मदेशाला चार महिन्यांच्या फरकाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील राजवटीने नेमके काय केले? त्यानंतरची स्थिती काय? हे कळू शकले नाही. कदाचित माझा हा खटाटोप व्यक्तिगत पातळीवरचा होता. तो शासकीय पातळीवरून केला गेला असता तर काही साध्य झाले असते का, असा प्रश्न पडला. एक मात्र खरे, की पदरमोड करून केलेल्या माझ्या या शोधयात्रेला स्थानिक ब्राह्मी लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही, ही खंत मात्र राहून राहून वाटते.
अनंत गवळी asgawali@gmail.com

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका