मंगेश तेंडुलकर हे मितभाषी असले तरी त्यांची व्यंगचित्रं खूप बोलत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर- ‘‘या नव्या व्यंगचित्रांच्या भाषेत मला किती बोलू न् किती नको असं होतं!’’ अगदी साधी गंमत ते तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून मांडलेलं भाष्य- या व्यंगचित्रकलेच्या दोन टोकांमधला प्रवास ते आयुष्यभर मजेने करत राहिले. मराठी व्यंगचित्रकला अधिक समृद्ध करणारा हा प्रवास आता थांबला आहे.

मोठा भाऊ सुप्रसिद्ध लेखक आणि धाकटा व्यंगचित्रकार हे आर. के. नारायण- लक्ष्मण यांच्या घरातलं साम्य तेंडुलकरांच्या घरातही दिसतं. मोठय़ा भावाच्या पसरू चाललेल्या फांद्या, पारंब्या- वटविस्तार यांतून स्वत: खुरटत न राहता दुसरीकडे रुजण्यासाठी प्रयत्न करण्यात आयुष्याची सुरुवातीची बरीच वर्षे जातात. खूप घुसमट सहन करावी लागते. पण अखेरीस स्वत:ची मूळं रुजतील, खोल जातील अशी जमीन सपाडते आणि स्वत:चं स्वतंत्र आकाशही गवसतं. मंगेश तेंडुलकरांना असं स्वत:चं स्वतंत्र आकाश गवसलं.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

शाळेत असताना त्यांच्या एका चित्राला पंचवीसपैकी शून्य मार्क देऊन त्या काळातील प्रथेनुसार, त्या काळातच शोभणाऱ्या शिक्षकांकडून झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला अन् त्यांनी जिद्दीने  चित्रकार व्हायचं ठरवलं. थोरल्या भावासाठी- विजयसाठी वडिलांनी आणलेलं ‘व्यंगचित्रं कशी काढावीत?’ हे इंग्रजी पुस्तक मंगेश तेंडुलकर यांनीच अधिक उपयोगात आणलं. त्या पुस्तकाने त्यांना दिशा दिली आणि अपमान न करणारा गुरूही सापडला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो न् (आठ आण्याची चित्रकलेची शिक्षकांनी भिरकावून दिलेली वही) त्या आठ आण्याच्या बदल्यात नंतर लाखमोलाचा आनंद मिळवू लागलो!’’

त्यांच्या सुरुवातीच्या धडपडीच्या काळात सर्वात महत्त्वाचा व हृद्य प्रसंग आहे तो ‘दीपावली’च्या कार्यालयातला. तिथे त्यांना चित्रकार व संपादक दीनानाथ दलाल भेटले. स्वत:च्या मोठय़ा भावांची (रघुनाथ व विजय यांची) ओळख न सांगता त्यांना व्यंगचित्रांबद्दल पसंती मिळवायची होती. दलालांनी चित्रं हातात घेतली अन् अनपेक्षितरीत्या त्यांनी जवळच्या ड्रॉइंग बोर्डवर लावलेलं स्वत:चं चित्र बाजूला ठेवलं व चार-पाच कोरे ड्रॉइंग पेपर घेऊन त्यावर ब्रशने तेंडुलकरांचीच चित्रं ते सुधारून दाखवू लागले. मॉडर्न टेक्निक कसं आहे याचं जणू ते प्रात्यक्षिक दाखवू लागले. तेंडुलकरांनी लिहिलंय की, ‘‘दलालांच्या नावाचा धसका घेऊन मी पोहोचलो होतो, पण दलालांनी मोठय़ा भावाच्या जिव्हाळ्याने व प्रेमळ शिक्षकांप्रमाणे चित्रातील चुका दाखवून त्या सुधारून यायला सांगितलं व नंतर ती सर्व चित्रं प्रसिद्धही केली. जे तीन-चार वर्षांत शिकता आलं नाही, ते त्या पंधरा मिनिटांत शिकता आलं,’’ असं तेंडुलकरांनी कृतज्ञतेनं लिहिलं आहे. (ललित दिवाळी, १९७५)

यानंतर तेंडुलकरांमधल्या व्यंगचित्रकाराला दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. उत्तम व्यंगचित्रं काढण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं. स्वत:ची रेखाटनशैली त्यांना सापडली. मुख्य म्हणजे स्वत:चा स्वतंत्र विनोदही त्यांना सापडला.

दिवाळी अंकांतील त्यांच्या असंख्य मालिका पाहिल्या तर तेंडुलकरांचं वेगळेपण त्यातून स्पष्ट दिसतं. वेगवेगळे विषय आणि ते सादर करण्याच्या विविध पद्धती यातून चित्र आणि विनोद याबाबतीत तेंडुलकरांचं स्वतंत्र अस्तित्व ठळक होत गेलं, हेच त्यांच्या कामाचं यश आहे.

‘आवाज’ दिवाळी अंकासाठी ते दरवर्षी एखादं सुप्रसिद्ध मराठी व्यक्तिमत्त्व घेऊन त्यावर चार-पाच पानांची १०-१२ चित्रांची मोठी मालिका करायचे. हा एक वेगळाच प्रयोग होता व तो निश्चितच यशस्वी ठरला. या चित्रमालिकेच्या आधी ते भलीमोठी खुशखुशीत प्रस्तावना लिहायचे. त्यातून त्यांच्यातला लेखक दिसायचा. एकदा त्यांनी दस्तुरखुद्द ‘आवाज’ व त्याचे संपादक मधुकर पाटकर यांच्यावरच एक मालिका ‘गुरूची विद्या’ या नावाने बेतली. ‘आवाज’चा त्या काळातील एकूणच दबदबा, त्यातील खिडकीचित्रं, किंचित चावटपणा, पाटकरांची काम करण्याची शैली, ‘आवाज’चा प्रचंड खप वगैरे बाजू या मालिकेत बहारदारपणे रेखाटल्या होत्या. त्यातलं एक चित्र म्हणजे- ‘आवाज’ची प्रिंट ऑर्डर इतकी मोठी, की मुंबईहून पुण्याला जाताना तो ट्रकमध्येच छापून तयार करतात, हे! हे चित्र पाहण्यासारखं आहे. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला काहीतरी काम आहे, मशीनची धडधड सुरू आहे, ट्रक वेगाने जातोय, कामगार काम करताहेत, इत्यादी. हे सर्व तपशील बारकाईने चितारले आहेत. मुख्य म्हणजे ट्रक, मशीन, कामगार या सर्वाच्या हालचालींचा वेग त्यात दिसतोय. हे सर्व रेखाटणं अतिशय कठीण काम आहे.

या मालिकेतलं मार्मिक म्हणावं असं चित्र ‘आवाज’ची वार्षिक जन्मकथा सांगणारं! ‘आवाज’च्या जन्माची सरकारी नोंद हॉस्पिटलमध्ये करताना तिथे असणारा ‘सायलेन्स झोन’चा बोर्ड! प्रचंड विरोधाभास दाखवणारं हे हास्यस्फोटक चित्र आहे.

पण याहीपेक्षा मला त्यांच्या एकूणच शैलीमध्ये दिसणारा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचा अँगल  वाटतो. हा अँगल किंवा दृष्टिकोन हा त्यांच्या विषयाच्या निवडीत दिसतो, त्यातल्या विनोदात दिसतो. तसेच रेखाटनात तर तो दिसतोच दिसतो!

पु. ल. देशपांडे यांच्यावरच्या मालिकेत त्यांनी असाच अँगल दाखवलाय. त्या काळात पुलंकडून प्रस्तावना लिहून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असत. त्यातल्याच एका हौशी लेखकाकडून प्रस्तावनेसाठी आलेल्या हस्तलिखिताचं हे चित्र. त्या हौशी लेखकाचा आत्मविश्वास (!) पाहून धडपडलेले पुलं आहेतच; पण त्या ट्रकचा अँगल मात्र अप्रतिम आहे. अर्थातच सरदारजी ड्रायव्हरसुद्धा!

अतिशयोक्ती हा विनोदाचा एक भाग झाला. पण तेंडुलकर हे अतिशयोक्तीलाही अतिशयोक्तीपर्यंत नेऊन ठेवायचे, हे त्यांचं विलक्षण वैशिष्टय़ होतं. त्यांच्या अनेक चित्रांतून ते लक्षात येतं.

पुण्यात स्कूटरवरून भरधाव जाणाऱ्या एका युवतीची ओढणी एका बैलगाडीच्या बैलाच्या शिंगात अडकली तर कोणत्याही व्यंगचित्रकाराच्या मनात जी स्वाभाविक शक्यता उमटेल त्यापेक्षा तेंडुलकरांची कल्पनाशक्ती फारच वेगळी असायची. हाच त्यांचा वेगळा अँगल असे. कल्पनेतला आणि चित्रीकरणातलाही!

प्रत्यक्षात तेंडुलकरांशी अनेकदा भेटी झाल्या. अतिशय सावकाश, शांत, पण ठामपणे ते आपली मतं व्यक्त करायचे. दहा-बारा वर्षांपूर्वी पुण्यात एकदा अनेक व्यंगचित्रकार गप्पा मारत होतो. एकाने तक्रार केली, की आमची मोठी राजकीय व्यंगचित्रं हल्ली फारशी कोणी छापत नाहीत. त्यावर अगदी खालच्या आवाजात, शांतपणे मंगेश तेंडुलकर म्हणाले की, ‘‘यापुढे स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन स्वत: भरवणे हाच व्यंगचित्रकारांसाठी राजमार्ग आहे!’’ त्यानंतर त्यांची सततची प्रदर्शनं सुरू झाली. जवळपास शंभरीपर्यंत जाणारा हा आकडा आहे, हे बघितल्यावर थक्क व्हायला होतं. तेंडुलकरांचा हा अँगलही खास त्यांचाच म्हणता येईल. परखड नाटय़परीक्षण असो वा पुण्यातल्या हट्टी वाहतूक अव्यवस्थेला वळण लावायचं सार्वजनिक काम असो; तेंडुलकरांचा हा अँगल दिसून येत असे.

तेंडुलकर मितभाषी असले तरी त्यांची व्यंगचित्रं खूप बोलत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर- ‘‘या नव्या व्यंगचित्रांच्या भाषेत मला किती बोलू न् किती नको असं होतं!’’ अगदी साधी गंमत ते तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून मांडलेलं भाष्य- या व्यंगचित्रकलेच्या दोन टोकांमधला प्रवास ते आयुष्यभर मजेने करत राहिले. मराठी व्यंगचित्रकला अधिक समृद्ध करणारा हा प्रवास आता थांबला आहे.

सातवी-आठवीत असताना चित्रकलेच्या वर्गात त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी त्यांचा अपमान करून त्यांची वही खिडकीतून बाहेर फेकून दिली होती. ती घ्यायला छोटा मंगेश तिथे गेला. पाण्यात पडलेल्या त्या वहीला लागलेला चिखल त्याने डोळे पुसण्याआधी पुसला. त्याला आईने  केलेले कष्ट आठवले व चित्रकला शिकायचीच, उत्तम चित्रं काढायचीच, या जिद्दीने तो ती वही घेऊन वर्गात परतला.

..आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी याच मुलाचे- ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे- सभागृहातील सर्व रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले!

प्रशांत कुलकर्णी prashantcartoonist@gmail.com