माझ्या लहानपणीच्या सगळ्या दिवाळी मी शेवगाव आणि पाथर्डी या माझ्या दोन्हीकडच्या आजी-आजोबांच्या गावांत साजऱ्या केल्या आहेत. मराठवाडय़ाच्या सीमेवर असलेले हे जवळजवळ बारमाही दुष्काळी तालुके. इथे ना नदी आहे, ना हिरवे हिरवे डोंगर. लांबच लांब मोठय़ा डौलाने वाऱ्यावर डोलणारी पिके आणि झुळझुळ वाहणारे पाणी वगैरे असले तिथे दोन्हीकडे काहीही नाही. पण मला मात्र ही दोन्ही गावे भरभराटीची आणि सदा बहरलेलीच वाटत आलीयेत. जगातल्या काही सर्वोत्कृष्ट शहरांत राहण्याची संधी मला अनेकदा मिळाली. ही सगळीच गावे प्रगत होती, पैशाची आणि सुखसुविधांची लयलूट या सगळ्याच शहरांत होती. पण ही गावे माझ्या मनावर तो बहर त्या गावांवर असल्याचा प्रभाव पाडू शकली नाहीत, जो बहर मला शेवगाव आणि पाथर्डीत जाणवतो. माझे हे विधान अनेकांना अतिशयोक्त वाटेल. कदाचित या दोन्ही गावांत राहणाऱ्यांनाही या बाबतीत काही वेगळे म्हणायचे असेल. त्या सगळ्यांनी एकदा माझ्या चष्म्यातून ही गावे पाहावीत.

तुम्हाला कळायला लागले तेव्हा तुमची पहिली दिवाळी या गावात गेलीये. तुमचे आजी-आजोबा, भावंडं, सगळे नातलग कुठूनकुठून तिथे आलेत. आणि तुम्ही इथे जेव्हा येता, अगदी वर्षांतून एकदाच येता तेव्हा ते दिवाळीचे दिवस आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिले फटाके या गावात पाहिलेत, पहिल्या फुलबाज्या इथे पाहिल्यात. वर्षांतून आठ-दहा दिवसच इथे राहिलाय, पण ते दिवाळीचे आतषबाजीचे दिवस असणे.. हे सारे या गावांच्या बाबतीत माझे अनुभव आहेत. त्यामुळेच माझ्यासाठी ती साजरी करायची गावे आहेत. पूर्ण गावाची ओळख एखाद्याच्या मनात ‘साजरे करायचे गाव’ अशी बदलून टाकायची ताकद या दिवाळीच्या सणात असते, हे मला मोठेच मजेचे वाटते. माझ्यासारखे जे जे लोक आपल्या आजी-आजोबांच्या गावात दिवाळी साजरी करायला गेलेत त्यांना माझे म्हणणे पटेल. गावं कोणतीही असोत आणि ती कशीही असोत, त्या सगळ्यांसाठी एक जगायचे गाव असेल आणि एक साजरे करायचे गाव असेल. माझ्या मनातल्या दिवाळीच्या आठवणी या अशा श्रीमंत काळाच्या तुकडय़ाच्या आहेत.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

दिवाळीचे शुभेच्छापत्र ही मला पूर्वी मोठीच श्रीमंत गोष्ट वाटायची, आजही वाटते. अनेक जण छापील शुभेच्छापत्र आणायचे, पण खाली निदान सही किंवा वर किमान ‘प्रिय’ तरी पेनाने लिहायचे. त्या क्षणी त्या व्यक्तीला आपली आठवण आली असणार याची अगदी नक्की खात्री वाटायची. सहज मोजले तर दीड हजार तरी शुभेच्छांचे व्हाट्सअ‍ॅप संदेश आत्तापर्यंत आलेत. या व्हाट्सअ‍ॅपच्या शुभेच्छा का कुणास ठाऊक मला कायमच सदिच्छांपेक्षा ‘टेक्निकली करेक्ट’ राहायचा प्रयत्न वाटत आल्यात. त्या पाठवण्याच्या क्षणी त्याला आपली आठवण आली असणार, असे वाटतच नाही. ‘सेंड ऑल’ करून त्याने संदेश पाठवला, तो आपल्यालाही आला. त्या क्षणी त्याला तुम्ही आठवले असो किंवा नसो, तो कायमच पुराव्याने सिद्ध करू शकतो, की त्याने तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. एकदा सिद्ध करून दाखवायचा सावधपणा आला, की तिथे उत्स्फूर्त, मनमोकळे काही कसे असू शकते? बांगडीच्या काचेचे तुकडे, टिकल्या, कुठून तरी कापून आणलेला आकाशकंदिलाचा फोटो, ठेवणीतले रंगीत पेन, फक्त दिवाळीतच मिळणारा जाड घडीचा कागद.. हे सगळे वापरून जो तो आपापल्या कलाकारीच्या वकुबाप्रमाणे शुभेच्छापत्र बनवायचा आणि धाडून द्यायचा. ‘शुभ’मधला ‘शु’ ऱ्हस्व की दीर्घ या गोंधळात दोनदोन वेलांटय़ा असलेल्या शुभेच्छा पावल्या, की फार मस्त वाटायचे. आपले खूप छान व्हावे, आपल्या आयुष्यात खूप आनंद यावा, आपलं आयुष्य उजळून निघावे आणि आपल्या आयुष्यात सगळे कसे शुभ शुभ होऊन जावे असे वाटणारे खूप जण आहेत ही पक्की खात्री मनात बाळगून दिवाळीला सुरुवात व्हायची. ‘‘अरे, पोस्टमन नेहमी बाहेरच्या बाहेरच जातात, निदान सणासुदीला तरी त्यांना आत बोलाव,’’ असे म्हणून भलत्याच घाईत असलेल्या पोस्टमनलाही घरात फराळाला बोलावणारी आणि एक आनंदाचा भाग म्हणून त्यांना ‘पोस्त’ नावाची बक्षिसी देणारीही घरं होती. आणि दारावर दिवाळीत पोस्टमन आला, की पोस्त द्यायला लागू नये म्हणून लहान पोरांना पत्र घ्यायला पाठवणारीही घरं होती! ‘‘कशासाठी त्यांना पोस्त द्यायचे? केंद्र सरकार त्यांना पगार देते ना!’’ असे म्हणून एका नरोत्तमाने भर दिवाळीत आमच्या वडिलांशी वाद घातला होता. सह्य़ाद्रीच्या कुशीत जसे वीर निपजतात तसे नतद्रष्टही निपजतात, याची खूणगाठ बहुधा तेव्हाच मी पहिल्यांदा आयुष्यात बांधली होती.

त्या काळात चांगल्या सुयोग्य प्रसंगी लावायला चांगल्या संगीतासाठी भरवशाचे टेपरेकॉर्डर नसायचे. आणि असलेच तर योग्य वेळेला टेप वाजेल याची काही खात्री नसायची. त्यामुळे चांगल्या संगीतासाठी सगळेच जण आकाशवाणीवर अवलंबून असायचे. मला आठवतेय, एका दिवाळीच्या संध्याकाळी कोणत्या तरी आकाशवाणीच्या कार्यक्रम निष्पादकाने ‘आता दिवाळीच्या निमित्ताने ऐकूयात विशेष गाणे..’ असे म्हणून ‘मालवून टाक दीप..’ हे गीत लावले होते! त्या वेळेला मला दोन साक्षात्कार एकाच वेळेला झाले. एक म्हणजे, माझ्या जवळचे नातलगही काही अत्यंत इरसाल शिव्या देऊ  शकतात. आणि दुसरे म्हणजे, साहेबाने सुट्टी दिली नाही तर शासकीय कर्मचारी कोणत्याही थराला जाऊन आपला राग काढू शकतात.

शाळेत शिकणाऱ्या मुलांप्रती शिक्षण खाते पूर्वी ‘कमी क्रूर’ होते, असे मला वाटते. तेव्हा दिवाळीआधी मुले सहामाही परीक्षा द्यायचे आणि मोकळ्या मनाने दिवाळी साजरी करायचे. मुलाने काय दिवे लावलेत, हे पालकांनाही थेट दिवाळीनंतर निकाल लागले की कळायचे. मात्र कोण्या एका- ज्याच्या आयुष्यावरचे कंटाळ्याचे मळभ कधीच हटत नाहीत अशा अधिकाऱ्याने, मुलं दिवाळीत आनंदी असतात हे अगदीच सहन न झाल्याने दिवाळी झाली की लगेच परीक्षा घेण्याची ‘क्रीएटिव्ह (?) आयडीया’ काढली असावी. पण ‘‘दुपारी चार तास अभ्यास नाही केलास, तर संध्याकाळी फटाके फोडायला बाहेर जाऊ  देणार नाही,’’ हे सणासुदीला ऐकायची वेळ त्या मळभात बरबटलेल्या अधिकाऱ्यामुळे मुलांवर आली.

मध्यमवर्गीय मराठीजनांच्या आयुष्यात दिवाळी अंकांचेही एक वेगळे स्थान आहे. दिवाळीच्या दिवसांत दुपारच्या वेळी दिवाळी अंक वाचत पडणे ही सर्वोच्च चैन त्यांनी कितीतरी वर्षे केलीये. अनेक मोठय़ा मोठय़ा लेखकांचा लेखनप्रवास हा दिवाळी अंकांतल्या लेखनापासून सुरू झाला. कितीतरी चळवळ्या मराठी लोकांनी आपापले दिवाळी अंक सुरू केले आणि मोठय़ा हिकमतीने ते चालवले. दिवाळी अंकासाठी चांगले लेखन मिळवणे, जाहिराती मिळवणे, तो वेळेवर छापून वितरित करणे ही सगळीच तारेवरची कसरत कितीतरी लोकांनी कितीतरी वर्षे केली आहे. तसेच, पहिल्याच दिवाळी अंकानंतर धारातीर्थी पडलेले कितीतरी लोक या महाराष्ट्रात आहेत. तरी अजूनही नवेनवे दिवाळी अंक बाजारात येत राहतात. फक्त कवितांना वाहिलेल्या दिवाळी अंकाची कोणीतरी घोषणा केल्याचे मी मागे एकदा वाचले आणि माझ्या पोटात गोळाच उभा राहिला. या धाडसाला सलाम करायलाच हवा!

आमच्याकडे कुठल्यातरी अतक्र्य कारणाने भल्यामोठय़ा वाडय़ात अंघोळीला एकच मोरी होती. मला आठवतेय, माझ्या काकूने आम्हा तेव्हा साधारण पाच ते सात वर्षे वयाच्या असलेल्या सगळ्या भावंडांना एकत्र करून, सगळ्या मुलींना तुम्ही मोरीत अंघोळी करा आणि मला व माझ्या लहान भावाला वेगळे वेचून काढून तुम्ही चौकात अंघोळ करा असे सांगितले होते. वाडय़ातल्या चौकात सगळे आजूबाजूने जाताहेत आणि आपण मधे अंघोळ करतोय, हे अनुभवताना माझ्या मनात स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत जग पुरुषाशी फारच असमानतेने वागते हे कुठेतरी तेव्हाच कोरले गेले होते. आजी, आई, काकू, मामी, बहिणी अशा सगळ्याच जणी दिवाळीला अंगाला तेल लावून द्यायच्या, उटणे लावून द्यायच्या हे मला भारीच श्रीमंतीचे वाटत आलेय. तेव्हा मला असे वाटायचे, की आपण थोडे कमी पैसेवाले आहोत त्यामुळे आपल्याला फक्त दिवाळीत अंघोळीच्या आधी तेल-उटणे लावतात. आयुष्यात खूप पैसेवाले व्हायचे म्हणजे काय, तर त्यानंतर रोज तेल-उटणे लावून अंघोळ करायला आपल्याला परवडायला हवे, अशी काहीतरी माझी कल्पना होती. आपण अंघोळीला गेल्यावर भावंडे फुलबाज्या पेटवताहेत, फटाके लावताहेत हे भारीच गौरवाचे वाटायचे.

दिवाळीच्या काळात येणारे विविध वास-गंध यांची एक वेगळीच रंगत आहे. दिवाळी ही जशी अनेकानेक रंगांनी समृद्ध आहे तशीच अनेकानेक गंधांनीही समृद्ध आहे. उटणे, तेल, शिकेकाई, दिवाळीतच वापरायला मिळणारे विविध साबण, कुठली कुठली ठेवणीतली अत्तरं, भाजणी, तळण्या, फुलबाज्या आणि फटाक्यांचे धूर, पूजेत वापरली जाणारी फळं, फुलं, गजरे या सगळ्या गंधांचा एक फार वेगळा कोलाज दिवाळीत बनतो आणि तो दिवसभर वातावरणात दरवळत असतो. हे वेगवेगळे वास हे दिवाळीच्या समृद्धीचा एक अविभाज्य भाग आहेत.

वेगवेगळ्या चवींबाबत सहनशील असणे हेही दिवाळीचे संस्कारच आहेत. कितीतरी घरी कौतुकाने फराळाला बोलवतात. जिने तिने आपापल्या वकुबाप्रमाणे फराळ बनवलेला असतो. कसा झालाय फराळ? या प्रश्नावर थापा मारायला लागू नये म्हणून- ‘‘तुम्ही प्रेमाने फराळाला बोलावता, हे प्रेम महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रेमाची टेस्ट या पदार्थात उतरलीये ती खरी; पदार्थाच्या चवीकडे मी लक्षदेखील देत नाही,’’ असे सांगून सुटका करून घेतो. जालीम जमाना बाहेर आपल्यावर इतका अन्याय करतो, पण ही तर सगळी आपली प्रेमाचीच माणसे आहेत असे एकदा मनाला समजावले, की खुळखुळ वाजणाऱ्या करंज्या, इथून उठून आता डेंटिस्टकडेच जावे लागेल की काय असे वाटायला लावणाऱ्या चकल्या किंवा वेगवेगळ्या आकारांचे शंकरपाळे खायला बळ मिळते. मागे एकदा एका घरात दोनचार पदार्थ घरी बनवलेले होते आणि दोनचार दुकानातून आणले होते. मी ज्या पदार्थाची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली तो नेमका दुकानातून आणलेला होता. फराळानंतर मला चहा मिळाला नाही हे तर स्वाभाविक आहे, पण मला पाचपोच नाही अशी माझ्याबद्दल कायमची प्रतिमा त्या घराने बनवून घेतली.

दारात काढलेली रांगोळी ही मला फार ग्रेट वाटत आलेली आहे. ‘माझे छान चालले आहे, तुमचेही छान होवो’ अशा मंगल प्रार्थना मला त्या रांगोळीतून ऐकायला येतात. रोजचे आयुष्य जगताना वेळ कुठे असतो आपल्या वाटय़ाला आलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला? संधी कुठे मिळते इतरांसाठीही प्रार्थना करायला? रांगोळी हा मला शुभेच्छा प्रकट करण्याचा फार क्रीएटिव्ह फॉर्म वाटत आलाय. ‘सबका शुभ हो, सबका मंगल हो’ हे रांगोळीच्या प्रत्येक ठिपक्यातून ऐकायला येत असते.

हल्ली पूर्वीसारखी दिवाळी राहिली नाही, असे कोणी म्हणायला लागला की मला त्याला सांगावेसे वाटते, दिवाळी तशीच आहे, तू पूर्वीसारखा राहिला नाहीस. तू स्वत:च्या आयुष्याचा फुसका फटाका करून घेतला आहेस. जरा बाहेर पडलास आणि गल्ल्यांमधून, रस्त्यांवरून फिरलास तर तुला दिसेल महोत्सवाला सुरुवात झालीये. ज्यांच्याकडे भरपूर आहे तेही साजरे करताहेत आणि ज्यांच्याकडे खूप थोडेसे आहे तेही कधीतरी भरपूर मिळेलच ही आशा जिवंत ठेवून साजरे करताहेत. संक्रांत, शिमगा ही जशी जगण्याची वस्तुस्थिती आहे तशीच दिवाळीही जगण्याची वस्तुस्थिती आहे. ती अंगावर भरजरी दिवे लेवून तुझ्या दारात उभी आहे. संक्रांत-शिमग्याचे मळभ उटणे लावून घासूनपुसून टाक आणि दिवाळीला सामोरा जा. नवे कपडे घे, दागिने घे. फराळाचे पदार्थ कर. लोकांना घरी बोलाव. तू त्यांच्याकडे जा अन् यातले काहीही करायला या वर्षी पुरेसे पैसे नसतील तरीही दारासमोर रांगोळी काढ आणि लोकांना त्यांचे भले व्हावे अशा शुभेच्छा दे. जेव्हा मनाच्या तळापासून लोकांचे भले व्हावे म्हणून ‘शुभ लाभ’ अशी प्रार्थना तू जगासाठी करशील, तेव्हा त्या जगात तूही असतोच ना?

 

– मंदार भारदे

mandarbharde@gmail.com