अरुण साधू हा आमच्या पिढीचा लेखक. त्याची माझी मत्री १९५९ सालापासून होती. ती सोमवारी खंडित झाली. तो अमरावती जिल्ह्यतून पुण्यात आला होता, मी रोह्यहून. आम्ही दोघे ‘केसरी’ वर्तमानपत्रात नोकरी शोधण्यास आलो होतो, तेथे भेटलो आणि कायमचे जिवलग होऊन गेलो. आम्ही पुण्यात तर एका खोलीत राहिलोच, परंतु पुढे मुंबईस येऊन नव्या नोकऱ्या शोधल्या, संसार थाटले, तरी आमची दोन्ही कुटुंबे एकरूप राहिली. आम्हा दोघांना दोन-दोन मुलीच! आमचा पत्रकारमित्र सुधाकर अनवलीकर याने नानासाहेब परुळेकरांपासून सुरुवात करून फक्त एक किंवा दोन मुली असलेल्या नव्वद पत्रकारांची यादी तयार केली होती. समाजाला त्या काळी कुटुंब पुरोगामी, सुधारक असल्याचे ते लक्षण वाटे.

साधू स्वभावाने लाजाळू, संकोची, लोकांपासून दूर राहणारा. सारे परिचित तो पत्रकार कसा झाला याचा अचंबा व्यक्त करत; पण त्याचमुळे तो निरीक्षण दूर, अलिप्त राहून करायचा आणि तशा त्याच्या लेखनाला वस्तुनिष्ठेची धार लाभायची. त्याला त्या काळातील वास्तवदर्शी लेखक असा लौकिकही लाभला. त्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर लिहिले हे खरे, परंतु त्याने महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारण यांचे जे छेद पाडले ते अधिक महत्त्वाचे वाटतील. त्याला महाराष्ट्रातली शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आणि यशंवतराव चव्हाण ही माणसे मोठी वाटत.

500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

साधूचा काळ विलक्षण समाजबदलाचा आहे. विज्ञानापासून स्त्री-पुरुष समानतेपर्यंतच्या गोष्टी समाजाला समजावून सांगाव्या लागत होत्या. साधूने त्याच्या साहित्यातून ते काम साधले. त्याने समाजवास्तव आणि लालित्य यांचे समीकरण उत्तमरीत्या जमवले. त्याचे वाचनही अफाट. किंबहुना त्याने प्रेम लेखनापेक्षा काकणभर अधिक वाचनावर केले. तो सखोल वाचायचा. त्याला इंग्रजी क्लासिक्सपासून महाराष्ट्राच्या गावखेडय़ात राहणाऱ्या अपरिचित लेखकांच्या साहित्यकृतींपर्यंत सारे वाचायला हवे असायचे. त्यासंबंधीचे त्याचे विवेचन ऐकणे हा मोठा आनंद असे. आम्ही त्या आनंदाला आता पारखे झालो आहोत.

साधूचे शेवटचे बारा-पंधरा दिवस खोकल्यात गेले. तो ढास लागण्याच्या भीतीने सतत धास्तावलेला होता. मुंबईतले जीवन पावसाने अस्थिर झाले होते. त्या आधीचे त्याचे दोन-तीन वेळचे संभाषण ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’वर होते. त्याने त्या कादंबरीची किती पारायणे केली, त्याचे त्याला माहीत! खरे तर, त्याने स्वत:च्या प्रज्ञेने व प्रतिभेने मानवी जीवनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, तो समाजाला मान्यताप्राप्त झाला. त्यासाठी त्याला मोठमोठे पुरस्कार लाभले. परंतु त्याला टॉलस्टॉयपासून हेमिंग्वे वगरे लेखकांनी जीवनाची जी गुंतागुंत मांडली व घडी वर्णन केली ती अधिक मोह घाली. काही वेळा वाटे, की त्याने स्वत:साठी ती सीमारेषा घालून घेतली आहे का? त्यापुढे, गेल्या पन्नास वर्षांत जीवन जे बदलून गेले आहे ते त्याला समजत होते, पण बहुधा तो ते वाचनात ठेवण्याचे नाकारत होता. त्यामुळे तो त्याच्या सर्व पुस्तकांत ‘मुखवटा’ या कादंबरीवर संतुष्ट होता का?

मी साधू गेल्यानंतरच त्याच्या बाबतीत संतुष्ट हा शब्द वापरू शकतो. कारण तो त्याची प्रत्येक कृती पूर्ण झाल्यानंतर तीमधून बाहेर पडे. त्याला त्या कृतीकडे पुन्हा पाहावे, तीसंबंधी बोलावे असे वाटत नसे. त्याची ‘तडजोड’ ही तुलनेने निरस कादंबरी, परंतु त्याला ती लाडकी होती. त्याने त्या कादंबरीत जिल्हा पातळीवरील राजकीय हालचाली व घटना यांचे तपशिलात वर्णन केले आहे- पण सर्व काही सर्वसाधारण पातळीवर घडते. त्या कादंबरीत हिरोगिरी वगरे आढळत नाही. स्वाभाविकच, ती वाचकांना प्रिय झाली नाही. वाचकांना ‘त्रिशंकू’मधील तडफदार नायिका, ‘बहिष्कृत’मधील दुष्काळपीडित कुटुंब, ‘झिपऱ्या’तील ‘जगू’ पाहणारी स्ट्रीट चिल्ड्रेन अशा गोष्टी मोह घालतात. साधू नंतर त्या समाजदर्शन मोडमधून बाहेर पडून तत्त्वदर्शन पातळीवर लिहू लागला. ‘मुखवटा’, ‘शोधयात्रा’ ही त्यामधील रूपे. त्यामुळे त्याचा वाचक बदलला. वाचकांचा प्रतिसाद त्याला अधिक बौद्धिक, भावनिक पातळीवर मिळू लागला. परंतु त्या वाचकाला ही ‘तडजोड’ कळली नाही, ही गोष्ट त्याला खंतावणारी जाणवे.

आरंभी साधूने त्याच्या ‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या कादंबऱ्यांतून त्या काळी प्रबळ होत चाललेल्या राजकारणाला साहित्यात नाटय़मय, संघर्षांत्मक व शैलीदार पद्धतीने आणले आणि महाराष्ट्राला जिंकले. त्यानंतरचा काळ जाग्या होणाऱ्या समाजाचा व विज्ञानजाणिवेचा होता, साधूने तो ‘मूड’, ‘त्रिशंकू’पासून ‘विप्लवा’सारख्या कादंबऱ्यांमधून अचूक पकडला. त्या काळात त्याच्या तशा धर्तीच्या कथाही प्रसिद्ध होत गेल्या. तोपर्यंत तो सिद्धहस्त झाला होता. प्रसिद्ध समीक्षक मीना गोखले या जेव्हा त्याने ‘युगभान’ प्रकट केले असे म्हणतात, तेव्हा त्यांना त्याचे ते सारे लेखन अभिप्रेत असावे.

साधू शेकडो व्यक्तींना ‘वन टू वन’ भेटला आहे, समाजगटांत मिसळला आहे, मात्र तो आम समाजदर्शनाला बिचकला आहे, असे जाणवते. त्याला समुद्राचे वेड होते. आम्ही जुहूच्या समुद्रावर पोहण्यास बऱ्याच वेळा गेलेले आहोत; परंतु तो शिवाजी पार्कवर जमलेल्या जनसागराने थरारून गेला आहे, असे कधी जाणवले नाही. तो ‘रिपोर्टर’ म्हणून सभा ‘कव्हर’ करण्यास गेला तरी दूर दूर राही. त्या उलट आमचा अशोक जैन. तो व्यासपीठाच्या जास्तीत जास्त जवळ जाईल, शक्य तर वर चढेल, व्यासपीठावरील नेत्यांना भेटेल, सभोवताल पाहून घेईल आणि मग दोन-दोन तास त्यासंबंधीच्या गप्पा-गॉसिप सांगेल. माझे अगदी भिन्न प्रकृतीचे दोन मित्र, पण आम्ही तिघे बरीच वर्षे एकत्र नांदलो, हे खरे. त्यानंतर कुमार केतकर तितकाच माझ्या व साधूच्या जवळ आला.

साधूचे समाजाशी कसले नाते होते? त्याला पराक्रमाच्या गोष्टी फार कधी आवडलेल्या दिसल्या नाहीत; परंतु जॉर्ज फर्नाडिसने सर्वसामान्यांच्या बाजूने स. का. पाटलांना दिलेली झुंज त्याला आकर्षक वाटे. बाळ ठाकरे शिवसेनेची जमवाजमव करत होते ती प्रक्रिया त्याला आकृष्ट करी, परंतु त्यांचे नंतरचे तत्त्वहीन वागणे त्याला त्रस्त करी. दिवाकर कांबळी नावाच्या आमच्या एका मित्राने ‘परळ १९६८’ या कादंबरीत तो काळ उभा केला आहे. साधू त्याच्या मागे लागून लागून त्यातील तपशील मिळवे. माझे असे काही लेखनेच्छू परिचित नंतर साधूशी घट्ट होत गेले, अगदी शेवटपर्यंत त्याच्याशी संबंधित राहिले. तो वऱ्हाडी गोडवा साधूच्या व्यक्तिमत्त्वातच होता.

समाजाचा वेध विजय तेंडुलकर यांनी मराठी साहित्यात रीतसर आणला. त्यापूर्वी त्यात श्री. म. माटे यांच्यासारखी कणव तरी होती किंवा बाबुराव बागूल यांच्यासारखा आक्रोश तरी होता. तेंडुलकरांपाठोपाठ मुंबईत अरुण साधू व पुण्यात सतीश आळेकर यांनी तो वसा अगदी वेगवेगळ्या पातळ्यांवर व वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेतला. साधूने कथा-कादंबऱ्यांबरोबर नाटकाचा फॉर्मही चोखाळला, पण ‘पडघम’ या एका प्रयोगावर सोडून दिला. आळेकरने समाजवेध- मुख्यत: मध्यमवर्गीय जीवनाचा- एका वेगळ्या तात्त्विक उंचीवर नेऊन ठेवला. त्याच्या लेखनाला पुणेरी संस्कृतीच्या अर्काची डूब असल्याने ते विलक्षण भेदक ठरले. साधूने समाज व्यापक पातळीवर ‘कव्हर’ केला. त्याच्या लेखनात मलबार हिलवरील उच्चभ्रू घरातील मानभावी वर्तन जसे येते, तसे विदर्भातील कर्मठ घरातील कर्मकांड आणि नातेसंबंधही प्रकट होतात आणि मराठवाडय़ाच्या खेडय़ातील वा कुल्र्याच्या रेल्वेरुळावरील जीवनही विदारकरीत्या समोर येते. साधू आणि आळेकर तेंडुलकरांच्या पुढे जातात का, हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा प्रश्न असणार आहे. मला असे वाटते, की त्या दोघांनी आघाडी घेतली, परंतु ती तेथेच सोडून दिली. ते दोघे तेथे स्थिरावले नाहीत. दोघेही नंतर रूढ समाजचौकटीत अडकले. साधूपुरते बोलायचे तर त्याने ‘मुखवटा’ व ‘शोधयात्रा’ लिहून मराठी वाचकांना त्यांच्याच भावविचारांच्या चौकटीत राहण्यासाठी उत्तम खाद्य पुरवले; परंतु भविष्यवेध घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ‘मुखवटा’तील जुन्या काळातील पात्रे जितकी सच्ची जाणवतात तेवढीच आधुनिक काळातील पात्रे निराधार वाटतात आणि ‘शोधयात्रा’चा नायक कृष्णमूर्तीच्या तत्त्वज्ञानात घोटाळत राहतो. तत्त्वज्ञानातील ‘या क्षणीं जगा’ हे सूत्र आमजनांकडून प्रत्यक्षात अवलंबले जाऊ लागले असताना तेच अधोरेखित करण्यामध्ये कालबाह्य़ता जाणवते. आजच्या प्रौढ पिढीची ती शोकांतिका आहे, की त्यांतील व्यक्त करू शकणाऱ्यांना जग खूप झपाटय़ाने ‘पुढे’ निघाले आहे हे कळते? ते वैचारिक लेखनात तसे स्पष्ट करतात, परंतु ‘पुढे गेलेले जग’ समजून घेण्यात कमी पडतात. त्यांना त्यांच्या जगातील सनातन, चिरंतन वगरे मूल्ये आता तशी राहणार नाहीत, ती बदलत आहेत-बदलणार आहेत हे व्यक्त करताना धास्ती वाटत असावी. साधूचा समाजवेध दोन हजार सालाच्या आसपास थांबला का? त्याने सारे जग नागर होईल अशा आशयाचा लेख दोन वर्षांपूर्वी ‘मौजे’त लिहिला. त्यातील विवेचन त्याच गोष्टीचे निदर्शक वाटते.

साधूबरोबर आमच्या पिढीत भालचंद्र नेमाडे, अनिल अवचट, ह. मो. मराठे हे लेखक मोठे होत गेले व त्यांनी वाचकांवर मोहिनी घातली. साधूची आम वाचकप्रियता त्यांपैकी कोणाला लाभली नाही. त्या लेखकांचे पिंड वेगवेगळे. पैकी नेमाडे स्वपंथ धरून बसले. अनिलने समाजाचे जणू डॉक्युमेंटेशन केले, त्यातील लालित्य विलक्षण मोहक आहे. त्यालाही हळूहळू हळवेपण येऊ लागले. मराठे यांचे लेखन वाचनवेधक असते. त्यांची कथावस्तूवर पकड असते, परंतु त्यात उत्स्फूर्तता कमी भासते. ते ‘आयपीएल’च्या क्रिकेट वा कबड्डी सामन्यासारखे घडवलेले वाटते. साधू हा त्याच्या व्यापक समाजजाणिवेने महाराष्ट्रभर वाचकप्रिय झाला व त्याच्या त्या असाधारण स्थानाचा प्रत्यय, तो ऐंशीव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला गेला तेव्हा आला. साधूच्या स्वभावप्रकृतीशी विसंगत म्हणजे त्याने ते अध्यक्षपद निभावलेही नीटपणे. त्याचे कादंबरीलेखन व मराठी भाषा संरक्षण हे जिव्हाळ्याचे विषय. त्याने संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. साधूने मराठीत सहसा आढळणार नाहीत इतके लेखनासंबंधातील प्रगल्भ विचार तेथे मांडले आहेत.

साधूच्या पिढीनंतर विश्वास पाटील, रवींद्र शोभणे व रंगनाथ पठारे हे लोकप्रिय लेखक आहेत. ‘ब्र’कार कविता महाजन ही फार संवेदनाक्षम जाणवते. ती लेखनही विविध प्रकारांत व प्रयोगशीलरीत्या करते. समकालीन वा नंतरच्या साहित्यिकांबद्दल येथे लिहिण्याचे कारण म्हणजे, साधूच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील लोक त्याच्या पत्रकार कॉलनीत जमले होते. शेजारीच साहित्य सहवास असून साहित्यिक म्हणून ओळखला जातो/जाते अशी व्यक्ती त्या समुदायात नव्हती. त्यामुळे गप्पांत तेथे विषय निघाला, की मराठीत साहित्यिकच राहिले नाहीत की काय! ते काही प्रमाणात खरे आहे. रवींद्र पिगे स्वत:ला ‘आम्ही दुसऱ्या रांगेतील पहिले’ असे म्हणत. त्यांना ‘आम्ही’मध्ये त्यांच्यासोबत व. पु. काळे, गिरिजा कीर वगरे अभिप्रेत असत. पहिल्या रांगेत त्या वेळी कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी असे गृहीत धरले जात. सध्या अशा दोन पंक्ती करता येतील एवढे, लोकांना माहीत असलेले लेखक आहेत का? पुन्हा, रवींद्र पिगे यांच्या रांगेत विजय तेंडुलकरांना स्थान नसेच. जुने साहित्य जुन्यालागी झाले आहे, हे ध्यानी घ्यायला हवे. नवे साहित्यिक वातावरण एकात्म राहिलेले नाही. ते विविध विचारप्रवाहांनी घडत आहे. उदाहरणार्थ, अच्युत गोडबोले सर्वसाधारण जनांना विविध विषयांत माहीतगार करावे या ‘साहित्यबाह्य़’ वाटणाऱ्या हेतूने खूप खूप लेखन करत आहे. मोठा विचारी लेखकवर्ग सामाजिक-सांस्कृतिकपेक्षा राजकीय वातावरणातील विरोधी भावनेने धुमसत आहे. हौशी लेखकांचा वर्ग तर खूपच वाढला आहे. त्यांचे मूल्यमापन या समाजात कसे व्हावे? कारण तशी व्यवस्था विद्यमान साहित्य-प्रकाशन व्यवहारात नाही. साधू हा तशा लेखकांना मोठाच आधार वाटे. साधू निष्ठेने त्यांचे वाचन करी व त्यांना सूचना देई. त्याने पत्रकारितेचे, साहित्यलेखनाचे धडे दिलेल्या अनेक व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. त्यांनी त्याच्या ‘साधू’वृत्तीचा उल्लेख जसा वेळोवेळी केला आहे, तसेच त्याच्याकडून लाभलेले मार्गदर्शनही कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.

साधूच्या मनाची विशालता, त्याच्या मनातील करुणा त्याच्या साहित्यातून प्रतीत होते. त्या गुणांनी तो साहित्यातील अभिजाततेशी जोडला जातो. त्याची लेखनशैली हा तर मुद्दाम अभ्यासावा असा विषय आहे. तो ती त्याला जशी हवी तशी उपयोगात आणू शकतो. ती पल्लेदार असते तेव्हा जुन्या मराठी साहित्याशी नाते सांगते. त्याने संयुक्त वाक्यातील वाक्यांश तितक्या सूक्ष्मतेने व तरलतेने सांभाळलेले असतात, परंतु तीच शैली वास्तवाचे वर्णन करताना रोखठोक होते व छोटय़ा वाक्यांनी वाचकाला भिडते. साधू हा बहुधा जुन्या व नव्या जगाला जोडणारा शेवटचा साहित्यिक दुवा होता. त्याला तेंडुलकर परंपरेत बसवले जाते. ते त्याला आवडले नक्की नसते. खुद्द तेंडुलकरांनाही त्यांच्या नावाची पंरपरा चालू आहे, हे आवडले नसते. आधुनिक लेखनात साठोत्तरी, नव्वदोत्तरी असे कालनिदर्शक भेद सोयीसाठी केले जात असावेत. त्यातून जाणिवा कशा प्रकट होतात ते मला कळत नाही. तेंडुलकर-सुर्वे यांच्यापासून आशयदृष्टय़ा आधुनिक काळाचे मराठी साहित्य येणे सुरू झाले, असे मानले तर ते ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे आहे. परंपरा त्यांच्या नावांची नाही. ती संतसाहित्य परंपरा म्हणून ओळखली जाते. तशी तेंडुलकरांपासून आधुनिक लेखकांची परंपरा सुरू झाली असे म्हणू या. त्यातील प्रत्येक लहान-मोठा लेखक स्वयंभू आहे. साधूचे स्थान त्यात अग्रभागी तर आहेच, पण अनन्यही आहे. त्याच्या लेखनात प्रज्ञेची व प्रतिभेची झेप आहे. तशी उदाहरणे मराठी साहित्यात मोजकी असतील. आमच्या मित्राला त्यात स्थान आहे, ही गोष्ट आम्हाला अभिमानाची वाटते. हे ‘आम्ही’ कोण? तर ‘ग्रंथाली’ या नावाने एकत्र झालेले व महाराष्ट्रभर पसरलेले शेकडो-हजारो लोक! साहित्यवाचनाचे परिभाषेबाहेरचे चाहते!