राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या कारकीर्दीत देशातील सर्जनशील लेखक, कलावंत, विविध क्षेत्रांतील नवकल्पनांचे प्रणेते यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात ‘रेसीडन्सी प्रोग्राम’ची नवी परंपरा सुरू केली. या उपक्रमांतर्गत चित्रकार प्रताप मोरे यांना राष्ट्रपती भवनात वास्तव्य करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवाबद्दल..

मी काही लेखक नाही; चित्रकार आहे. मला लिहिण्यासाठी निमित्त लागतं. नाहीतर विविध विषयांवरून जे बोलणं होतं, ते बहुतेकदा दृश्यकलेच्या माध्यमातूनच होतं. माझं कलाकार असणं आणि आजचं हे लिखाण यात एक कनेक्शन आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये माझं लेखक आणि कलाकारांसाठी आयोजित रेसिडन्सी प्रोग्रामकरता राष्ट्रपती भवनात जाणं झालं. चोवीस दिवसांकरिता राष्ट्रपती प्रणब मुखर्जीचा गेस्ट म्हणून मी वावरलो आणि काही उत्तम अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मला मिळाली. काय होते हे अनुभव? मला ते का महत्त्वाचे वाटले? आणि प्रणब मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदाची टर्म आता पूर्ण होत आहे.. त्या पाश्र्वभूमीवर मला ते का नमूद करावेसे वाटताहेत, हे मांडण्याचा हा प्रयत्न.

मी मुंबईकर. इमारतींच्या जंगलात राहतो. चाळ पाडून टॉवरची मोठी लागवड आमच्या इथं सध्या सुरू आहे. याला व्यावहारिक कारणं आहेतच; पण मुंबईचं शांघाय करण्याचं राज्यकर्त्यांचं स्वप्न जणू आपल्या उरावर पेलू पाहणाऱ्या भाबडय़ा नव्हे, तर ‘स्मार्ट’ विचारांचाही यात हातभार आहे. मुळात आपल्याला काय हवंय, आणि ते सर्वार्थानी उत्तम स्वरूपात आपल्याला कसं मिळू शकेल, याचा स्पष्ट विचार ही कोणत्याही विकासाच्या दिशेनं वाटचाल करतानाची पहिली पायरी. शहराच्या बदलत्या रूपात प्रगतीचा हा विचार केला जातोय का? मुंबईतल्या चाळी पडल्या आणि जे नवं बांधकाम झालं ते चाळींमध्ये जपल्या गेलेल्या शेजारभावनेच्या पोषणासाठी अनुकूल आहे का? निसर्गप्रेम जपावं म्हणून डालडाच्या रिकाम्या डब्यांत रुजवलेली रोपं- त्यांना आलेल्या फुलांसोबतच हरवलीयेत. कारण या नव्या टॉवरमधल्या बाल्कन्यांची फ्री स्पेस महाग झालीये. हे वास्तव बोचरं नाही का? विशेष उल्लेखच करायचा झाला तर टोलेजंगी इमारतींसोबत आलेल्या फ्रेंच विंडोज्चा करावा लागेल. लिफ्टचा डोंगर चढून सोसाटय़ाच्या वाऱ्याला बोलावण्याची संधी या खिडक्यांनी बहाल केली. आता मुळात चाळ काय आणि टॉवर काय; निवासी संकुलनं ही. इथं क्रीडांगणांचा आग्रह जागेचं मोल जाणता धरता येत नाहीये. आजकाल लोक मॉलमध्ये केवळ शॉपिंगकरताच जात नाहीत, तर आता मॉल हे लोकांसाठी वीकएंड डेस्टिनेशन झालंय. स्कायवॉक्स आणि फ्लायओव्हर्स याच्या त्याच्या घरात डोकावताहेत. आणि शहर घडय़ाळाच्या काटय़ावर धावतंय. महत्त्वाकांक्षा आणि तडजोडींच्या साम्राज्यात उभी ही मुंबापुरी स्वप्नातल्या इमल्यांतही पावसाळी पुरातून सावरतेय. मी माझ्या चित्रांतून स्थापत्यशास्त्राची भाषा वापरून शहराचं हे बदलतं रूप आणि त्यासोबतचा वैचारिक असमतोल मांडतो.

माझ्या आजूबाजूच्या लोकांनी केलेला ‘स्पेस’चा विचार मी समजून घेतो आणि त्यांच्या विचारांचा आदर आणि स्वीकार करत मी माझं मत मांडतो. माझी ही निरीक्षणं नेमकेपणानं मांडण्याचा प्रवास म्हणजे माझ्या कलाकृती! वसई विकासिनी दृक्-कला महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी जेव्हा भारतीय सौंदर्यशास्त्रावरील पी. जी. डिप्लोमा करत होतो, ते दिवस माझ्या घडणीत खूप महत्त्वाचे ठरले. सौंदर्याच्या अभिनव विचारांशी माझी तेव्हा ओळख होत होती. आजवर पाहिलेल्या विविध कलाकारांच्या कलाकृती त्यानंतर मला अधिक जवळच्या वाटू लागल्या. चित्र कसं दिसतं, याचा विचार मला मिळाला. त्यासाठीचं पोषक वातावरण मिळालं. रेसिडन्सी प्रोग्राम्समध्ये सहभागी होण्यामागची प्रेरणाही इथंच दडलीये. सकस वातावरणात आपल्या विचारप्रक्रियेकडे नव्यानं पाहता यावं, एक नवा प्रोग्राम मिळावा, त्यावर नव्या उमेदीनं काम करता यावं, आणि या साऱ्याला मजबूत शैक्षणिक अधिष्ठान लाभावं, या हेतूनं मी आणि सगळीच कलाकार मंडळी रेसिडन्सी प्रोग्राम्समध्ये सहभागी होऊ इच्छित असतो. या कार्यक्रमाअंतर्गत नव्या ठिकाणी जाऊन काम केल्यानं एका नव्या भूभागाशी आणि संस्कृतीशीही परिचय होतो आणि कलाकाराला एका नव्या वातावरणात काम करण्याची संधी मिळते. आपल्यापल्याडचं जग आपल्या प्रॅक्टिसमध्ये सामावून घेण्यात हे रेसिडन्सी प्रोग्राम्स महत्त्वाची भूमिका बजावतात. डिसेंबर २०१३ मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात ‘आर्टिस्ट इन् रेसिडन्सी’ प्रोग्राम तरुण तसंच प्रस्थापित आर्टिस्ट्स आणि लेखकांकरिता पहिल्यांदा सुरू केला. देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा तेव्हा अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी पेलली होती. योगायोगाची गोष्ट अशी, की याच मनमोहन सिंग यांच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या नेमणुकीच्या दस्तावेजावर मुखर्जी यांनी अर्थमंत्री या नात्यानं एकेकाळी शिक्कामोर्तब केलं होतं. पुढे जाऊन सिंगांनी देशाच्या आर्थिक धोरणांच्या आखणीसंदर्भात किती मोलाची भूमिका बजावली, हे आपण जाणतोच. राज्यसभेचे खासदार म्हणून मुखर्जी यांनी केंद्रीय राजकारणात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. आणि फारच थोडय़ा कालावधीत त्यांनी मंत्रिमंडळात आपलं स्वतंत्र स्थान प्रस्थापित केलं. २०१३ मध्ये देशाच्या सर्वोच्च पदांवरून प्रशासन करणारे हे दोघेही आपल्या कामगिरीमुळे लोकांना परिचयाचे होते. तब्बल पाच दशकांहूनही अधिक काळ मुखर्जी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सक्रिय राबता राहिला. आणि त्यामुळंच कदाचित, अभिनव प्रकल्पांचा वा धोरणांचा विचार या राज्यकर्त्यांनी आपल्या कारकीर्दीत मांडला.

आपण जाणतोच की, समाजाचं योगदान कलेच्या वृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावतं. रसिकाश्रय व राजाश्रयावर कला ही खऱ्या अर्थानं पोसली जाते. यात चित्रांच्या विक्रीतून वा माफक स्कॉलरशिप्समधून अर्थसाहाय्य करणं एवढय़ाचाच समावेश नसतो, तर कलाकारांच्या आणि कलाविचारांच्या जोपासनेसाठी सकस आणि चैतन्यपूर्ण वातावरणाची निर्मितीही अपेक्षित असते. संवेदनशील प्रशासन आणि लोकांची डोळस दाद हे वातावरण सशक्त करते आणि अर्थपूर्ण जगण्याचं दान पुढच्या पिढय़ांना बहाल करते. लोकशाहीचा स्वीकार केलेल्या राष्ट्रात तर हा विचार अधिक घट्ट मुळं रोवून धरायला हवा. याच भावनेचा पडसाद राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या रेसिडन्सी प्रोग्रामच्या आयोजनाच्या पुढाकारात दिसतो. राष्ट्रपती भवनाच्या भव्य वास्तूत सृजनशील व कलात्मक विचारांना उपयुक्त वातावरण कलाकारांना त्यांच्या सकस कलाविष्कारासाठी काही कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याचं देशाच्या शासनानं उचललेलं हे एक पाऊल!

‘आर्ट कीपर’ म्हणून याच राष्ट्रपती भवनात आपल्या कलाकारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आणि राज्यसभेत खासदारपदाचा कार्यभार पेललेल्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलाकार जोगेन चौधरी यांना राष्ट्रपतींनी सर्वप्रथम या प्रोग्रामकरिता आमंत्रित केलं. माझ्यानंतरच्या आवृत्तीत बोलावणं धाडलं ते जागतिक पातळीवर नावाजलेल्या सुबोध गुप्ता यांना. गावातल्या माणसाच्या घरातील वस्तू- मग त्या शेणाच्या गोवऱ्या असोत वा काही काळापूर्वी अख्खं मार्केट व्यापून टाकलेली स्टीलची भांडी असोत- गुप्ता आपल्या कलाकृतींमध्ये सामाजिक विषय वा जाणिवांवर भाष्य करतात. रूढार्थानं प्रचलित माध्यमांहून आणि चित्रभाषेहून वेगळी भाषा आपल्या कलाविष्कारासाठी वापरण्याच्या विचाराला अनुमोदन देण्याकरता एक विशेष भान, धारिष्टय़ आणि दृष्टी लागते. तसा विचार पाझरावा यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर टप्प्याटप्प्यानं विकसित करावं लागतं. या रेसिडन्सी प्रोग्रामचं आणि पर्यायानं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं हे योगदान विशेष नोंदवावं असं!

राष्ट्रपती भवनातला मला आलेला अनुभव हा इतर रेसिडन्सीज्पेक्षा वेगळा होता. शासकीय वास्तूत निवास आणि इतर दिनक्रमाच्या सोबतीला मीटिंग्जचंच असं एक वेगळं वेळापत्रक माझ्यासाठी नवं होतं. माझ्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन मला राष्ट्रपती भवनाचं फोटो डॉक्युमेंटेशन करण्याकरता विशेष अनुमतीही मिळाली होती. पोट्र्रेट पेंटर्स वा रिअ‍ॅलिस्टिक पद्धतीनं पेंटिंग करणाऱ्या कलावंतांकडे आजही ज्या अदबीनं पाहिलं जातं, तिथं समकालीन प्रवाहांना, माध्यम-वापरांना सामावून घेणं आणि या नव्या परिभाषेला अनुमोदन देणं, हे वाखणण्याजोगंच आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना या वास्तव्यात तीनदा भेटणं झालं. या भेटींचं स्वरूप नेहमी औपचारिकच राहिलं असलं तरी प्रत्येकाचं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा स्वभाव विशेष लक्षात राहिला. नेमके आणि मोजके प्रश्न ते या भेटींदरम्यान विचारत होते. एका सुप्रीम अथॉरिटीच्या भोवलतालच्या लोकांचा वावर, त्यांच्या बोलण्यातलं प्रीसिजन हेही विशेष होतं. माझ्या पुढच्या आवृत्तीत कलाकार, लेखक, कवी आणि इनोव्हेटर्स यांच्या रेसिडन्सीचं एकत्रितपणे आयोजन केलं गेलं. कला आणि विज्ञान विषयातील सृजनशीलतेला सोबत आणण्यासाठीची एक विशेष जाण राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी तेव्हा दाखविली. बंगालच्या कलाभूमीत बालपणी झालेले संस्कार याला कारण असोत, किंवा  कलाविषयांचं त्यांचं वाचन असो, वा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पुपुल जयकरांसोबतच्या प्रोजेक्ट्सचं मुखर्जी यांनी केलेलं निरीक्षण असो; जिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सहजतेनं तोफ डागली जाते, तिथं शासनकर्त्यांचा मला आलेला निवासादरम्यानचा हा अनुभव सकारात्मकच राहिला.

प्रणब मुखर्जीच्या राष्ट्रपतीपदाच्या नेमणुकीच्या वेळी जनमानसात एक प्रकारची शाश्वती होती. त्यांच्या तोवरच्या कारकीर्दीनं तो विश्वास लोकांच्या मनात निर्माण केला होता. येणाऱ्या राष्ट्रपतींबद्दल लोक ही खात्री बाळगतील का? नवे राष्ट्रपती हा रेसिडन्सी प्रोग्राम सुरू ठेवतील का? सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणाऱ्या कलेला आश्रय दिला जाईल का? कलाकार हे काळाचे दूत असतात आणि त्यांचं पोषण करण्याच्या हेतूने उपक्रम राबविण्याची मनीषा नव्या राष्ट्रपतींच्या अजेंडावर असेल का? हे लवकरच कळेल.

प्रताप मोरे  pratapmorey25@gmail.com