Untitled-9ख्यातनाम साहित्यिक वि. स. ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ जानेवारी ९७ रोजी सुरू झाले. त्यांच्या ‘ययाति’ कादंबरीस १९७४ साली ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळाला. खांडेकरांच्या अनेक साहित्यकृतींचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. गुजराती आणि तामिळ भाषिक लोक खांडेकर हे आपल्या भाषेतील सर्वात लोकप्रिय लेखक आहेत, असे म्हणतात. अशा बहुभाषिक ख्यातीप्राप्त साहित्यिकाच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारा खास लेख..
११ जानेवारी १९९७ रोजी वि. स. खांडेकरांच्या जन्मशताब्दी वर्षांचा शुभारंभ झाला. १९६५ साली मल्याळी भाषेतील कवी जी. शंकर कुरुप यांचा कवितासंग्रह १९२० ते १९५८ या काळातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून भारतीय ज्ञानपीठाने निवडला आणि एक लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हापासून भारतीय ज्ञानपीठातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार भारतीय साहित्यसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजला जातो. वि. स. खांडेकर हे त्या पुरस्काराचे पहिले मराठी मानकरी. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची या पुरस्कारासाठी कशी निवड झाली, हे सांगणे औचित्यपूर्ण ठरेल. २८ सप्टेंबर १९७५ रोजी पुरस्कार घोषित होण्यापूर्वी नाना प्रकारच्या व्याधींशी झगडत असलेल्या वृद्ध खांडेकरांना पुरस्कार जाहीर झाल्यावर काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. दिवा विझण्यापूर्वी काही क्षण तो बराच प्रकाश देतो म्हणतात, तसे. २६ फेब्रुवारी १९७६ रोजी दिल्लीच्या विज्ञानभवनात पुरस्कार देण्याचा समारंभ झाला आणि त्याच वर्षीच्या २ सप्टेंबरला त्यांचा थकला-भागलेला देह मृत्यूच्या स्वाधीन झाला.
भारतीय ज्ञानपीठाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचा १९७४ मध्ये प्रथम मी सदस्य झालो आणि समितीचे निमंत्रक माधव आचवल परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत निमंत्रक म्हणूनही काम पाहिले. ‘ययाति’ या कादंबरीची शिफारस मी, डॉ. अशोक केळकर आणि १९७५ मध्ये समितीचे सदस्यत्व स्वीकारलेले मंगेश पाडगांवकर या तिघांनी एकमताने केली. परदेश दौरा आटोपून परतल्यावर माधव आचवलही आमच्याशी सहमत झाले आणि भारतीय ज्ञानपीठाच्या राष्ट्रीय निवड समितीने आम्ही चौघांनी एकमताने केलेली शिफारस स्वीकारली. या राष्ट्रीय निवड समितीत उमाशंकर जोशी, विनायक कृष्ण गोकाक, देवीप्रसाद पटनायक, रविकुमार दासगुप्ता, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि अन्य चार सदस्य होते. अंतिम निवड करताना राष्ट्रीय निवड समितीने १५ भारतीय भाषांपैकी ११ भाषा समित्यांनी केलेल्या शिफारसी विचारात घेतल्या होत्या. ज्ञानपीठाच्या नियमाप्रमाणे ज्या भाषेतील लेखकाला पुरस्कार दिला जातो, त्या भाषेची सल्लागार समिती आपोआप विसर्जित होते आणि पुढील तीन वर्षे त्या भाषेतील साहित्यकृतींचा वा लेखकाचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. खांडेकरांना १९७४ या वर्षांसाठी पुरस्कार देण्यात आला. त्याआधीच्या तीन वर्षांत बंगाली, हिंदी, कन्नड आणि ओरिया भाषेतील चार प्रतिभावंतांना पुरस्कार मिळालेले असल्यामुळे १९७४ चा पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी या चार भाषांतील कृतींचा नियमानुसार विचार करण्याचे कारण उरले नव्हते.
ज्ञानपीठ पुरस्काराबाबतच्या नियमांची नीटशी माहिती नसल्यामुळे वि. स. खांडेकरांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर काही मराठी समीक्षकांनी नाके मुरडली. वृत्तपत्रांत पत्रे लिहून आणि मासिकांत तिरकस मजकूर प्रसिद्ध करून मराठी भाषा सल्लागार समितीवर हेत्वारोप करण्यात आले. समितीतल्या बैठकीत झालेली चर्चा आणि तिचे कामकाज याबद्दलची गोपनीयता राखण्याचा संकेत निमंत्रक म्हणून मी आजपर्यंत कटाक्षाने पाळला. माझ्या सहकाऱ्यांनीही माझ्याप्रमाणेच काही वृत्तपत्रांतून केल्या जाणाऱ्या कुत्सित टीकेला उत्तर दिले नाही. खांडेकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना मिळालेल्या या पुरस्काराची सत्यकथा सांगितल्यामुळे काही महत्त्वाचे गुपित फोडले असेही होणार नाही; कारण खांडेकरांचे निधन झाले त्यालाही आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे.
१९७४ या वर्षांच्या पुरस्कारासाठी जानेवारी १९६३ ते डिसेंबर १९६७ या पाच वर्षांच्या काळातील एखाद्या लेखकाच्या महत्त्वाच्या पुस्तकाची त्याने तोपर्यंत वाङ्मयात टाकलेली भर लक्षात घेऊन भाषा सल्लागार समितीने शिफारस करावी, असा ज्ञानपीठाचा नियम होता. एकूण तीन पुस्तके निवडून त्यांना पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक देऊन समितीला आपली पसंती दर्शवावी लागत असे. या पाच वर्षांच्या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत एखादा कवितासंग्रह किंवा कथासंग्रह असल्यास त्यातील किमान साठ टक्के कविता अगर कथा जानेवारी १९६३ ते डिसेंबर १९६७ पर्यंतच्या काळात प्रकाशित झालेल्या असाव्यात, असे बंधन ज्ञानपीठाने घातलेले होते. १९७४ साठी आमच्या समितीने निवडलेल्या कथासंग्रहातील तसेच काव्यसंग्रहातील साठ टक्के भाग जानेवारी १९६३ पूर्वी प्रकाशित झाल्याचे प्रथम प्रसिद्धी दिनांकाबाबत थोडेसे संशोधन केल्यावर आढळले. हा नियम कथाकारांना आणि कवींना जाचक ठरतो. कारण अन्य भाषांप्रमाणे मराठीतही कथा व कविता यांची प्रथम नियतकालिकातील प्रसिद्धी आणि त्यांचा संग्रह पुस्तकरूपाने उपलब्ध होणे यामध्ये पाच वर्षांहून अधिक काळ गेल्याची बरीच उदाहरणे आढळली. कवी आणि कथाकार यांना कादंबरीकार व नाटककार यांच्याप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याची समान संधी दिली जावी म्हणून आमच्या समितीने हा जाचक नियम बदलावा, अशी ज्ञानपीठाला विनंती केली.
१३ एप्रिल १९७५ रोजी भारतीय ज्ञानपीठाच्या राष्ट्रीय निवड समितीने आमच्या सूचनेचा विचार करून पाच वर्षांच्या कालखंडाऐवजी तो दहा वर्षांचा केला आणि त्यामुळे निवडीची प्रक्रिया पुन्हा नव्याने करणे भाग पडले. आम्ही केलेली सूचना विचाराधीन असताना जानेवारी १९७५ च्या तिसऱ्या आठवडय़ात समितीचे निमंत्रक माधव आचवल परदेशी गेले आणि १५ जून १९७५ ला भारतात परतले. माधव आचवल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद होते आणि अव्वल दर्जाचे समीक्षक होते. परदेशी जाताना त्यांनी ज्ञानपीठाचे सचिव लक्ष्मीचंद्र जैन यांना त्यांच्या गैरहजेरीत माझ्याशी पत्रव्यवहार करावा, असे लिहिले होते. त्यामुळे ध्यानीमनी नसताना मी समितीचा निमंत्रक बनलो. ज्ञानपीठाने पाच वर्षांऐवजी दहा वर्षांच्या- म्हणजे १९५८ ते १९६७ पर्यंतच्या कालखंडातील पुस्तकांचा विचार करावा, असा नवा नियम केल्यामुळे १९५९ साली प्रकाशित झालेल्या ‘ययाति’बरोबरच अन्य पुस्तकांचाही समावेश नव्या यादीत करणे शक्य झाले. ‘ययाति’ला पहिला क्रमांक देऊन १९६९ व १९७० साली तेव्हाच्या मराठी भाषा सल्लागार समितीनेही त्या कादंबरीची शिफारस केलेली होती. पण तेव्हा पुरस्कार उर्दू आणि तेलगू भाषेतील लेखकांना मिळाला होता.
२१ व २२ जून १९७५ रोजी माझ्या घरी भरलेल्या समितीच्या बैठकीत ‘ययाति’ची शिफारस एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला. परदेशातून बडोद्याला परतलेले माधव आचवल काही अपरिहार्य कारणामुळे या बैठकीस हजर राहू शकले नाहीत. पण मी, डॉ. अशोक केळकर आणि मंगेश पाडगांवकर यांनी एकमताने केलेल्या शिफारशीशी आपणही सहमत असल्याचे त्यांनी ज्ञानपीठाला तसेच मला कळवले.
ज्ञानपीठाच्या नियमानुसार पहिला क्रमांक देऊन कोणाही लेखकाच्या पुस्तकाची शिफारस तीनपेक्षा अधिक वेळा करता येत नसे. आमच्या समितीने ‘ययाति’ची एकमताने शिफारस केली तेव्हा तिसऱ्यांदा या पुस्तकाला पहिला क्रमांक मिळालेला होता. आधी दोन वेळा या अखिल भारतीय स्पर्धेत खांडेकरांना अपयश आले होते, ते खुद्द खांडेकरांनाही माहीत नव्हते. १९७५ सालीही ‘इजा बिजा तिजा’ होण्याची शक्यता होती. पण २८ सप्टेंबर १९७५ रोजी राष्ट्रीय निवड समितीच्या सभेत एकमताने सर्वात कमीत कमी वेळात झालेल्या चर्चेनंतर ‘ययाति’ची आणि खांडेकरांची पुरस्कारासाठी निवड झाली. त्याच दिवशी लक्ष्मीचंद्र जैन यांनी तारेने हे वृत्त मला कळवले. तार मिळाली तेव्हा संध्याकाळ झाली होती. साहित्य संघात त्याच वेळी मौज प्रकाशनगृहाचा रौप्यमहोत्सवी सोहोळा सुरू होता. मी वा. रा. ढवळे यांना दूरध्वनी केला तेव्हा त्यांचा प्रथम या बातमीवर विश्वासच बसेना. तुम्हाला हे कसे आधी कळले? तुमचा या ज्ञानपीठाशी काय संबंध? असे काही प्रश्न त्यांनी मला विचारले. अखेर समारंभासाठी जमलेल्या सर्व लहानथोर लेखकांना ही आनंदाची बातमी कळवावी, अशी मी केलेली विनंती त्यांनी मान्य केली आणि समारंभ सुरू असतानाच ती जाहीर केली. वा. रा. ढवळे हे खांडेकरांचे अनेक वर्षांचे स्नेही होते. पुरस्कार मिळाल्याची बातमी खुद्द खांडेकरांना कोल्हापूरला रात्री समजली. त्याआधीच मुंबईतील साहित्यिकांना ती कळली होती.
मराठी भाषा सल्लागार समितीचा निमंत्रक या नात्याने पुण्यात प्रकाशक रा. ज. देशमुख यांनी आयोजित केलेल्या घरगुती स्वरूपाच्या आनंदोत्सवात मी खांडेकरांचे हार्दिक अभिनंदन केले. त्याआधी खांडेकरांच्या राजारामपुरीतील जुन्या घरी मी १९६२ साली त्यांना एकदा भेटलो होतो. तो परिचय त्यांच्या अखेरच्या वर्षांत थोडासा दृढ झाला तो या ना त्या निमित्ताने नंतर झालेल्या गाठीभेटींमुळे. ज्ञानपीठाचा पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकेच्या सोबतीने रेल्वेने दिल्लीला प्रवास करावा, असे ज्ञानपीठाच्या सहसचिवाने त्यांना कळवले आणि पहिल्या वर्गाच्या येण्याजाण्याचा खर्च त्यांना ज्ञानपीठ देईल असेही कळवले. खांडेकरांना तेव्हा काहीही दिसत नव्हते. पोटची पोर जितक्या मायेने पित्याची शुश्रूषा करणार नाही त्यापेक्षा जास्त मायेने रा. ज. देशमुखांच्या पत्नी सुलोचनाबाई आणि मोठा भाऊ मानणारे रा. ज. देशमुख यांनी खांडेकरांच्या प्रकृतीची नेहमी काळजी घेतली. त्यामुळे खांडेकर मोठय़ा आजारातूनही बरे झाले होते. भाऊसाहेब तसे व्यवहारी असले तरी भिडस्त स्वभावाचे होते. आपल्याला रेल्वेचा पहिल्या वर्गाचा प्रवासही झेपणार नाही, असे ज्ञानपीठाच्या सचिवांना कळविण्यासही त्यांना संकोच वाटला. ज्ञानपीठाच्या सचिवांनी खांडेकरांना पाठवलेल्या पत्राची एक प्रत माझ्याकडेही आल्यावर ती वाचून मला वाटले, निवड समितीच्या सदस्यांना विमानप्रवास करण्याचा विशेषाधिकार दिलेला; तर अंध, जराजर्जर पुरस्कारविजेत्याला रेल्वेचा पहिल्या वर्गाचा प्रवासखर्च देऊ केलेला- हा काय विचित्र प्रकार?
खांडेकरांचे वय, त्यांचे आजारपण आणि अंधत्व याबद्दलची कल्पना ज्ञानपीठाच्या सचिवांना मी दिली आणि खांडेकर व त्यांच्यासोबत दिल्लीस जाणाऱ्या देशमुख वहिनी यांचा विमानप्रवासाचा खर्च मंजूर करून घेतला. खांडेकरांना पुण्यात भेटून हे सारे सांगितले तेव्हा ते म्हणाले, ‘‘फडके, मी अद्याप विमानाने कधीच प्रवास केलेला नाही.’’ मीही त्यांच्याबरोबर दिल्लीला जावे असे त्यांचे म्हणणे होते. मला जाणे शक्य नव्हते, कारण विद्यापीठाच्या अध्यापनाचे त्या वर्षांचे काम पुरे झाले नव्हते. २६ फेब्रुवारी १९७६ रोजी दिल्लीत झालेल्या पुरस्कार वितरणाच्या वेळी प्रकाशित झालेल्या गौरविकेसाठी ‘ययाति’बद्दलचा आणि आपल्याबद्दलचा इंग्रजीतील लेख मात्र माझ्याकडून लिहून घ्यावा, असे खांडेकरांनीच ज्ञानपीठास कळवल्यामुळे मी तो लिहिला.
तो काळ आणीबाणीचा होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सचिव म्हणून सध्याचे आमदार रायभान जाधव काम पाहत असत. खांडेकरांना सांताक्रूझ विमानतळावर व्ही. आय. पी. म्हणून सन्मानाने वागवले जाण्याबाबतची चोख व्यवस्था रायभान जाधव यांनी केली. तेव्हा विमानतळाचे मुख्याधिकारी खांडेकर आडनाव असलेलेच होते. त्यामुळे विशेष महत्त्वाचे अतिथी म्हणून खांडेकरांचा विमानप्रवास सुखाचा झाला. दिल्लीतील चार दिवसांच्या मुक्कामात महाराष्ट्र परिचय केंद्राचे श्रीपाद वाघ आणि आयुक्त सरोजकांत गुहा यांनी खांडेकरांच्या प्रकृतीवर कार्यक्रमांचा फार ताण पडणार नाही अशी खबरदारी घेतली. श्रीपाद वाघ तर रोज रात्री मला फोन करून खांडेकरांची खुशाली कळवीत असत.
अनेक वर्षांपूर्वी खांडेकरांनी दरिद्री माणसाच्या मनोराज्यासंबंधी एक लघुनिबंध लिहिला होता. त्याच्या अखेरीस एक लाख रुपये कुणी बक्षीस म्हणून दिले तर काय वाटेल, असे एक मनोराज्यही रचलेले होते. वयाची पाऊणशे वर्षे उलटल्यानंतर पैलतीर दिसू लागलेले असताना ते स्वप्नही प्रत्यक्षात उतरल्याचे त्यांना पाहायला मिळाले. पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी थोडे दिवस जगावेसे वाटत असल्याचेही त्यांनी एकदा मला सांगितले. सतत पिच्छा पुरवणारे आजारपण, पत्नीशी सुसंवाद साधता न आल्यामुळे आणि पोटच्या मुलामुळे सतत होणारा मनस्ताप यामुळे खांडेकर प्रपंचात कधी रमले नाहीत. आणि भरल्या संसारातही एकाकीपणे ओल्या इसबात झालेले रूपांतर हा त्याचाच परिणाम होता.
विपुल लिहिणे ही जगण्यासाठीही त्यांची गरज बनली असावी. मन लेखनात गुंतवल्यामुळे त्यांना जगणे सुसह्य़ झाले असावे. अंधत्वामुळे आपण परस्वाधीन झालो आहोत असे मनातून त्यांना फार वाटत असावे. २६ मार्चला ते माझ्या घरी एक दिवस राहिले तेव्हा माझ्या मुलाने- अनिरुद्धने त्यांचे एक रेखाचित्र काढले. अनिरुद्ध तेव्हा दहा वर्षांचाही नव्हता. खांडेकरांना दिसत नाही याची त्याला आठवण राहिली नाही. उत्साहाने तो सोफ्यावर स्वस्थ बसलेल्या खांडेकरांकडे धावत गेला आणि म्हणाला, ‘‘आजोबा, हे पहा मी तुमचं चित्र काढलंय.’’ तेव्हा काहीशा उदास चेहऱ्याने खांडेकर त्याला म्हणाले, ‘‘अरे, मला काही दिसत नाही. तू काढलंस ना, म्हणजे ते चांगलंच असणार चित्र.’’ अनिरुद्धचे शाळेतले मित्रही आपसात हळू आवाजात कुजबुजत सोफ्यावर बसलेल्या खांडेकरांना पाहून जात होते.
दृष्टी गेल्यानंतर माणसाची आवाजावरून आणि स्पर्शावरून इतर माणसांना ओळखण्याची शक्ती वाढते की काय, कोण जाणे! मुंबईतल्या सत्कार समारंभानंतर त्यांचा हात हातात घेऊन आपण कोण, हे सांगणाऱ्यांची मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात अक्षरश: रीघ लागली होती. रांगेतल्या एका साठीच्या जवळपास असलेल्या माणसाने त्यांचा हात हातात घेताच त्याने नाव सांगण्याआधीच खांडेकरांनी त्याचे नाव उच्चारलेले पाहून मला नवल वाटले. नंतर मी त्यांना त्याबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘फडके, हा माझा विद्यार्थी. समुद्रात बुडतो आहे असं पाहताच मी त्याला वाचवण्यासाठी धावलो होतो आणि उडी घेतली होती. बुडणारा माणूस बहुदा वाचवणाऱ्या माणसाला गळामिठी मारतो. तसंच यानंही केलं. मी कशीबशी त्या गळामिठीतून सुटका करून घेतली. नाहीतर आम्ही दोघेही बुडालो असतो. जिवाच्या आकांताने त्याने मला केलेला हस्तस्पर्श इतकी वर्षे झाली तरी मी विसरू शकलेलो नाही. दुसऱ्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याचा एखादा क्षण आयुष्यात येतो ना, तेव्हा आयुष्याचं सोनं होतं.’’
आपल्या अनुभवातून मानवी जीविताविषयी त्यांना झालेला बोध ते अलंकारांच्या ओझ्याने वाकलेल्या भाषेत आपल्या साहित्यातून सांगत. रूपककथा या त्यांनी लोकप्रिय केलेल्या कथाप्रकारातूनही बोध सूचित होत असे. ‘ययाति’ कादंबरी आपण का लिहिली; ययाति, शर्मिष्ठा, देवयानी आणि कच या मिथकांनी आपल्याला कशी मोहिनी घातली, हे त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना इंग्रजीत केलेल्या भाषणात समजावून सांगितले आहे. नदीमध्ये कागदी नावा सोडणाऱ्या लहान मुलाला त्या अखेर समुद्राला जाऊन मिळतील असे वाटत असते. एवढेच नव्हे, तर त्या समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचतील असेही स्वप्न तो पाहत असतो. कागदी नावा प्रवाहामध्येच बुडतात हे त्या मुलाला माहीतच नसते. तसेच सर्जनशील लेखकाचेही असते. थोडय़ा वेळाने सहज विरून जाणाऱ्या दाट धुक्यात तो देखण्या प्रतिमा कोरण्याचा प्रयत्न करीत असतो. तो स्वत:च स्वत:चा वाटाडय़ा बनतो. काळोखात एकाकी वाटचाल करताना त्याला कोणी सोबतही करीत नाही. त्याला सत्यदर्शन घडलेच, तर ते संपूर्ण सत्याचा केवळ एक पैलू असते. एखाद्या काटेरी झुडपात नाजूक फूल दडलेले असावे तसे ते आपल्या पाऊलवाटेवर दिसल्या क्षणी त्याच्या सुगंधाने आपली मती हरपली, असे खांडेकरांनी श्रोत्यांना त्या दिवशी सांगितले. या पाऊलवाटेवर खांडेकरांना वासनांच्या आहारी गेलेला, भौतिक सुखाच्या मागे धावणारा आजच्या काळातला सामान्य लोभी माणूस दिसला. प्रतिभा आणि भावनांच्या गरुडपंखांनिशी सर्जनशील लेखकाला आकाशात मुक्त संचार करता येतो असे खांडेकरांना वाटत होते. तो लेखकाचा मूलभूत अधिकार बजावतानाही त्यांचे लक्ष जमिनीवर खिळलेले असायचे. अभिजात साहित्य माणसाला जगण्याचे धैर्य देते आणि साहित्य निर्माण करणाऱ्याला आणि ते वाचणाऱ्याला मनुष्यजातीच्या भवितव्याविषयी आशा वाटू लागते. त्यांच्या हयातीतच खांडेकरांच्या साहित्याचे अनुवाद सात-आठ भारतीय भाषांमध्ये झालेले होते. गुजराती-तामिळसारख्या भाषा बोलणारे लोक खांडेकर हे आपल्या भाषेतील सर्वात लोकप्रिय लेखक आहेत, असे म्हणतात. यातला अतिशयोक्तीचा आणि गुणगौरवाचा भाग वगळला तरी वस्तुस्थिती मान्य करावीच लागते. अनुवादाच्या रूपात का होईना, पण भारतातल्या अन्यभाषिकांना माहीत असलेला दुसरा मराठी लेखक खांडेकरांच्या हयातीतही कोणी नव्हता आणि आजही कोणी नाही. खांडेकरांच्या साहित्याने एकेकाळी मराठी वाचकांना घातलेली मोहिनी आता उरलेली नसली तरी त्यांनी भारतीय साहित्याच्या महानदीत सोडलेल्या कागदी नावा आजही अन्यभाषिक वाचकांचे लक्ष वेधून घेतात. इतके यश तरी अन्य कोणत्या मराठी लेखकाने मिळवले आहे?
(लोकरंग – १२ जानेवारी १९९७ )

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब