आपल्या गावात असलेली सगळी घंटागृहे व्हेनिसवासीयांच्या अगदी जिवाभावाची आहेत. समुद्राकडे बघत मोठय़ा दिमाखात उभी असलेली ही प्राचीन घंटागृहे लेखक-कवींना सर्जनशील लेखन करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात. ही घंटागृहे  व्हेनिसचा अविभाज्य भाग असून त्यांच्याशिवाय व्हेनिसचे अस्तित्वच नसेल, इतकी ती महत्त्वपूर्ण आहेत.

अ‍ॅड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या लगूनमधील अनेक बेटांचा समूह म्हणजे व्हेनिस. त्यामुळेच या गावात रस्त्यांपेक्षा कालवेच जास्त आहेत. व्हेनिस म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते तिथले कालवे, त्यातून फिरणारे गंडोला, निरनिराळी स्मारके आणि विविध रंगांची उधळण. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिथे असलेली अनेक घंटागृहे व सतत चालू असणारी घंटांची मंजूळ किणकिण हे व्हेनिसचे एक वैशिष्टय़ मानले जाते.

या गावात उंच उंच इमारती नाहीत की कोणत्याही प्रकारचा भपका नाही. निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर असंख्य कालव्यांकाठी उभी असलेली लालचुटुक कौलारू घरे व त्यांच्या मधे मधे उभी असलेली उंच घंटागृहे हे व्हेनिसचे खरे रूप आहे. तसे बघितले तर युरोपमधील प्रत्येक गावात एखादे तरी घंटागृह असतेच; पण व्हेनिसमध्ये मात्र अनेक घंटागृहे आहेत.

व्हेनिसमधील जवळपास सगळ्याच बेटांवर कित्येक वर्षे जुनी चर्चेस असून त्यातल्या प्रत्येक चर्चच्या आवारात घंटागृह आहे. शेकडो वर्षे जुनी अशी अनेक घंटागृहे धरणीकंप, वादळे, वीज पडणे किंवा आग लागणे अशा कारणांमुळे नष्ट झाली आहेत. त्यापकी काही प्रसिद्ध घंटागृहे मात्र होती तशी नव्याने परत बांधली गेली, तर काही मोडकळीस आलेली घंटागृहे डागडुजी करून चांगल्या अवस्थेत उभी केली गेली आहेत.

सेंट मार्कस्चा चौक हा व्हेनिसमधील मुख्य चौक असून तिथल्या घडय़ाळाच्या टॉवरवर बसवलेली घंटा जगप्रसिद्ध आहे. अगदी आगळ्यावेगळ्या प्रकारची ही भलीमोठी घंटा वाजवण्यासाठी ब्राँझचे अडीच मीटर उंचीचे दोन पुतळे बनविण्यात आले आहेत. हे पुतळे जरी मेंढपाळाचे म्हणून बनविण्यात आले असले तरी ब्राँझच्या काळपटपणामुळे व्हेनिसवासी त्यांना ‘मूर्सचे पुतळे’ असे संबोधतात. त्यावरून या क्लॉक टॉवरला ‘मूर्स टॉवर’ असेदेखील म्हटले जाते.

या टॉवरवरचे खगोलशास्त्रीय घडय़ाळ (Austronomical Watch) पंधराव्या शतकात बनवलेले असून ते अचूक वेळ तर दर्शवतेच; पण त्याचबरोबर तारीख आणि राशीचक्र चिन्हेदेखील दाखवते. घंटा वाजवणाऱ्या दोन मूर्सची हालचाल या घडय़ाळाद्वारे नियंत्रित केली जाते. दर तासाने त्या मूर्सच्या हातातील हातोडी घंटेवर आपटली जाते व त्यातून स्वरमेळ संगीत (Symphony) ऐकू येते. चौदाव्या शतकात बनवलेली ही घंटा आजही सुस्थितीत असून तिचा आवाजदेखील पूर्वीप्रमाणेच आहे. या घडय़ाळाची व घंटा वाजण्याची वेळ इतकी अचूक आहे, की १८५८ पासून ती व्हेनिसची अधिकृत वेळसूचक म्हणून ओळखली जाते. हे खगोलशास्त्रीय घडय़ाळ आणि घंटा वाजवणारे मूर्स असलेली ही इमारत म्हणजे व्हेनिसचे वैभव आहे.

या घंटेचा आणखी एक विशेष म्हणजे रोज मध्यरात्री ती एकशे बत्तीस वेळा वाजवली जाते. त्यावेळी होणारी मूर्सच्या पुतळ्यांची हालचाल व त्यामुळे घंटेतून येणारा आवाज हे नीट बघता व ऐकता येते. रात्रीच्या शांत वेळी दिव्यांनी उजळून गेलेल्या सेंट मार्कस् चौकात बसून घंटा वाजवणारे मूर्स व त्या घंटेचा सुमधुर आवाज ऐकणे हा एक मस्त सुखद अनुभव असतो.

याच सेंट मार्कस् चौकात बेसिलिकाच्या अगदी समोरच्या कोपऱ्यात सेंट मार्कस्चे घंटागृह मोठय़ा दिमाखात उभे आहे. सव्वातीनशे फूट उंचीचे हे घंटागृह सुरुवातीला समुद्रावरची टेहेळणी करण्यासाठी तसेच बंदरावरील दीपगृह (लाइटहाऊस) म्हणून वापरले जात असे. दिसायला अगदी साध्यासुध्या अशा या घंटागृहाच्या सर्वात वरच्या मजल्यावर पाच घंटा बसवलेल्या आहेत. घंटागृहाच्या निमुळत्या टोकावर गॅब्रिएल या देवदूताचा सोनेरी रंगाचा पुतळा आहे. हा पुतळ्याला पंख आहेत. त्यामुळे वाऱ्याने तो सतत फिरत असतो.

हे घंटागृह १४ जुल १९०२ रोजी अचानक कोसळले. व्हेनिसवासीयांना त्या घटनेचा चांगलाच धक्का बसला. त्यामुळे त्याच दिवशी ‘सिटी कौन्सिल’ची तातडीची सभा होऊन त्यात कोसळलेले घंटागृह परत बांधावे असा ठराव मंजूर झाला. काही दिवसांतच घंटागृह परत उभे करण्याचे काम सुरू झाले. पण ते पूर्ण होण्यास मात्र १९१२ साल उजाडले. नवीन घंटागृह जुन्या घंटागृहातील बारीकसारीक तपशील तसेच कायम ठेवून उभारले गेले आहे. जेव्हा नवीन घंटागृहावर देवदूताचा पुतळा त्याच्या पूर्वीच्याच स्थानी बसवण्यात आला तेव्हा व्हेनिसवासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

आज हे घंटागृह व्हेनिसचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले प्रतीक बनले आहे. त्यातील प्रत्येक घंटेमागे एक कहाणी व इतिहास आहे. वेगवेगळी नावे असलेल्या या घंटा आपापल्या दृष्टय़ा प्रसिद्ध आहेत. यातल्या पाचही घंटांना स्वत:चा विशिष्ट आवाज असून त्या आवाजाला खास असा अर्थ आहे. त्यांचा आवाज व्हेनिसवासीयांना इतका सवयीचा आणि ओळखीचा झाला आहे, की कोणती घंटा वाजली, हे त्यांना आवाजावरून समजते.

या घंटांपकी ‘मॅरागोना’ ही घंटा सर्वात मोठय़ा आकाराची असून १९०२ मध्ये घंटागृह पडले तेव्हा त्यातूनही ती सहीसलामत वाचली होती. सकाळी कामाला सुरुवात होण्याच्या वेळी व संध्याकाळी काम संपण्याच्या वेळी अशी दिवसातून दोन वेळा मॅरागोना घंटा वाजवली जाते. ‘दी ट्रोटेरिया’ ही घंटा मॅरागोना घंटा वाजल्यानंतर थोडय़ा वेळाने वाजते आणि लोकांना सभेला जाण्याची आणखी एकदा आठवण करून देते. ‘नोना’ नावाची घंटा माध्यान्हीच्या वेळी- दुपारी बारा वाजता वाजवली जाते. ‘प्रिगाडी’ घंटा अधिसभेच्या (रील्लं३ी) बैठकीआधी वाजवली जाते व राज्यकर्त्यांना पार्लमेंटमध्ये आपापल्या जागी बसण्याची सूचना देते. कोणाला मृत्युदंडाची शिक्षा झाली असेल तर त्याची वार्ता देण्यासाठी सर्वात शेवटची घंटा वाजवली जाते. अशा तऱ्हेने व्हेनिसमधील जनजीवन नियमित करण्यासाठी पूर्वीच्या काळी या घंटांना निरनिराळे काम वाटून दिले होते.

आपल्या गावात असलेली सगळी घंटागृहे व्हेनिसवासीयांच्या अगदी जिवाभावाची आहेत. समुद्राकडे बघत मोठय़ा दिमाखात उभी असलेली ही घंटागृहे लेखकांना त्यांच्याबद्दल लिहायला स्फूर्ती देतात, तर कवींना त्यावर काव्य रचण्याकरता प्रेरणादायी ठरतात. या घंटागृहांची तुलना ते अथांग समुद्रातल्या जहाजाच्या शीडकाठीशी करतात. आजदेखील ही घंटागृहे म्हणजे व्हेनिसचा  अविभाज्य भाग असून त्यांच्याशिवाय व्हेनिसचे अस्तित्वच नसेल, इतकी ती महत्त्वपूर्ण आहेत.

अशा या मोहक आणि जादूई व्हेनिसमधील वेगवेगळ्या घंटा वाऱ्यामुळे हिंदोळल्या जाऊन सतत किणकिणत असतात. कडक ऊन असो, पाऊस असो, किंवा बर्फ वा कडाक्याची थंडी असो; त्या आपले काम अविरतपणे करीत असतात. सेंट मार्कस् चौकात पडलेली सोनेरी सूर्यकिरणे अंगावर झेलत, समोर पसरलेल्या ग्रँड कॅनॉलचे दृश्य न्याहाळत सतत कानावर पडणारा निरनिराळ्या घंटांचा मंजूळ आवाज ऐकणे हा एक वेगळाच आनंद असतो.

मृणाल तुळपुळे mrinaltul@hotmail.com