प्रामुख्याने पुरातत्त्वाच्या आधारे भारताचे कूळ उलगडून सांगणारे हे पुस्तक आहे. यात पुरातत्त्वासंबंधाने भरगच्च माहिती आलेली आहे. ती प्रकाशचित्रे आणि रेखाचित्रे यांच्या साहाय्याने आकर्षकही केलेली आहे. पुस्तकातली भाषा ओघवती आणि प्रभावी आहे. पुरातत्त्वासारखा शास्त्रीय विषय आधाराला घेऊन एखादा विषय सोपपत्तिकपणे मांडणे सोपे नाही. लेखकाला हे चांगले साधले आहे.

पहिल्या प्रकरणात पर्यावरणानुसार सांस्कृतिक बदल होत असतो, हे तत्त्व लेखकाने अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे प्रथम थोर पुरातत्त्वज्ञ गॉर्डन चाईल्ड यांनी दाखवून दिले. लेखकाचे म्हणणे असे, की पर्यावरण आणि मानवी जीवन व संस्कृती परस्पर आश्रित आहेत. पर्यावरणशास्त्राचा किती खोलवर आणि सविस्तर विचार लेखकाने केला आहे, हे या प्रकरणातील विवेचनावरून लक्षात येते. येथे संस्कृती म्हणजे भौतिक संस्कृती हे मात्र लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीचे हे एक अंग झाले. दुसरे म्हणजे, मनोमय सृष्टी; जिच्यात धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, साहित्य, कला आणि विज्ञान यांचा समावेश होत असतो. या मनोमय सृष्टीवर पर्यावरणाचा थेट परिणाम होतोच असे मात्र नाही.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?

पुस्तकात अश्मयुगीन मानवासंबंधीची माहिती पुरातत्त्वीय अवशेषाधारे दिलेली असल्यामुळे ती अर्थातच तुलनेने अधिक विश्वासार्ह ठरते. या पुराव्याच्या आधारे अश्मयुगीन मानवी जीवनाच्या विकासाचा जो आलेख काढला गेला आहे तो अधिक विस्ताराने येथे विशद केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात लिहिल्या गेलेल्या इतिहासात तो आढळतो, पण तोही मर्यादित स्वरुपात. मात्र या प्रकरणात समाज, भाषा, धार्मिक समजुती यांसंबंधीची माहिती दिली आहे. ती तर्काधिष्ठितच असणार. ‘असे असावे, असे असेल’ अशी अनुमाने करावी लागतात. प्राचीन काळाच्या इतिहासासंबंधी असावीत तशीच ती असतात. शिवाय पुरातत्त्वीय अवशेष दृश्य असल्यामुळे विश्वासार्हच असतात, मात्र त्यांची ओळख, त्यावरील भाष्य हे पुरातत्त्वज्ञांच्या तद्विषयक ज्ञानाच्या मर्यादांवर अवलंबून असते, हे विसरून चालणार नाही. त्यांच्याकडून गफलती झाल्याचे, त्यांचे निष्कर्ष वादातीत नसल्याचे आढळून आले आहे.

या पुस्तकातील दोन प्रकरणे अधिक महत्त्वाची वाटतात. एक- ‘सिंधू संस्कृती’ आणि दुसरे ‘आर्य- एक यक्षप्रश्न’. जिज्ञासूंना वा अभ्यासकांना सिंधू संस्कृतीसंबंधीची अद्ययावत माहिती आणि तिच्या संबंधीचे साधनसाहित्य पाहिजे असेल तर ते या प्रकरणातून त्यांना मिळू शकते. खरे तर हा या संस्कृतीचा इतिहासच आहे. यातून निष्पन्न होते ते हे की, जेव्हा काही जाणकारांनी ही संस्कृती म्हणजे आर्य संस्कृतीच होय असे म्हणणे मांडले तेव्हा पुरातत्त्व-विद्वानांनी नाके मुरडली आणि आता आडूनआडून का होईना त्यांना ते मान्य करणे भाग पडते आहे. प्रारंभी, सिंधू लिपीचा उलगडा झाल्यावरच खरे काय ते कळेल, असे म्हटले गेले. आता त्या लिपीचा उलगडा होतो आहे. दुसरीकडे आर्यप्रश्नांचाही उलगडा होतो आहे. त्यामुळे लेखकाला असे वाटते, की सिंधू संस्कृती आणि आर्य संस्कृती एकच असावी. लेखकाने या संबंधात जे पुरातत्त्वीय पुरावे गोळा केले आहेत त्यावरून उत्तर सिंधूचे लोक (पुरातत्त्व परिभाषा) आणि वैदिक आर्य हे एकच असावेत, असे दिसते. याबाबतीत ते लिहितात, ‘दोहोंचा अधिवास (habitat) एकच होता. ते दोघेही सप्तसिंधूच्या प्रदेशात, म्हणजे पश्चिमेकडे सिंधू आणि पूर्वेकडे सरस्वती या दोन नद्यांनी सीमित केलेल्या प्रदेशात राहात होते. दोन्ही संस्कृतीचा काळ मिळता (इ. स. पू. २०००-१४००) आहे. दोघेही गोपजन असले तरी थोडीफार शेती करतात..’ यापेक्षाही अधिक पुरावा वैदिक वाङ्मयात मिळू शकतो, असेही लेखक म्हणतात. यावरून वाचकाच्या मनात येईल ते असे, की निखळ पुरातत्त्वीय साधनांनी प्रश्न (यक्षप्रश्न असला तरी) सुटत नसतो आणि पुरातत्त्वीय निष्कर्ष पुरातत्त्वाची जशी प्रगती होत जाईल तसे बदलावेही लागतात.

भारत स्वतंत्र झाला आणि पुरातत्त्वाच्या संशोधकांनी आपल्या देशात हडप्पा, मोहेंजोदारो यांसारखेप्राचीन संस्कृतीचे अवशेष उदरात दडवून ठेवणारी ठिकाणे शोधावीत असे ठरवले. पाहाता पाहता अशी हजारोंहून अधिक ठिकाणे दृष्टोत्पत्तीस आली. सरस्वती नदी- जी लुप्त झाली होती- तिचाही शोध लागला आणि आता पुरातत्त्वज्ञांनाही हे मान्य करावे लागते आहे, की ‘सिंधू संस्कृती’ म्हणण्याऐवजी तिला ‘सरस्वती संस्कृती’.. फार तर ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’ संबोधणे अधिक सयुक्तिक ठरेल. हरियाणातील राखीगडी येथील उत्खननामुळे कळते, की ही संस्कृती आणखी दोन-अडीच हजार वर्षे मागे जाऊ शकते. म्हणजे ही संस्कृती तब्बल सात हजार वर्षांइतकी प्राचीन आहे. याचा अर्थ, पुरातत्त्वीय संशोधनाधारे काढलेले आतापर्यंतचे निष्कर्ष बदलावे लागतील असे दिसते. कारण अनेक बाबतीतील काळ आता बदलावा लागत आहे. उदाहरणार्थ, एनबीपी खापरांची प्राचीनता; जी इ. स. पू. ६-५ शतके मानली जाई, ती आता १०००-१२०० पर्यंत मागे जाते किंवा लोखंडाचे तंत्रज्ञान इ. स. पू. १४०० पर्यंत मागे जाते, आर्य भारतातून इराणात गेले तो काळही असाच मागे जातो. हे सर्व पुरातत्त्वानेच सांगितल्याचे प्रस्तुत पुस्तकात विशद केले आहे.

‘आर्य- एक यक्षप्रश्न’ या प्रकरणात या समस्येसंबंधीचा भरपूर ऊहापोह झाला आहे. बरीच साधकबाधक चर्चाही केलेली आहे. या प्रश्नासंबंधातल्या अनेक साधनांचा आधार यासाठी घेतला गेला आहे. प्रकरणाच्या प्रारंभी लेखक म्हणतात, ‘ही एक अत्यंत जटिल समस्या आहे. त्याची उकल कधी काळी होऊ शकेल किंवा कसे, हे सांगता येत नाही.’ हा प्रश्न ज्यांनी ज्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व पुरातत्त्वज्ञांच्या म्हणण्याचा पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांच्या म्हणण्याचाही धावता आढावा घेतला आहे. मराठीतून यासंबंधी आलेल्या विचारांचा उल्लेख मात्र येथे आढळत नाही. सुमारे ४५-५० वर्षांपूर्वी केशवराव गोळेगावकर यांनी ‘सिंधू लिपी, समाज व संस्कृती’ नामक ग्रंथ लिहिला. त्यात मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या ४००-५०० मुद्रांचा अभ्यास करून त्यांनी दाखवून दिले आहे, की त्यांवर ऋग्वेदातील किती तरी नावे आढळतात. ती संस्कृती आर्य संस्कृतीच होती, असा त्यांचा निष्कर्ष आहे. मौज अशी, की इंग्रजीतील या विषयावरील पुस्तके आणि पुरातत्त्वज्ञांची मते माहिती नसतानाही केवळ सिंधू लिपीच्या वाचनाधारे, डॉ. ब्रिजवासी लाल यांनी पुरातत्त्वाच्या आधारे काढलेले निष्कर्षच उपरोल्लेखित लेखकानेही काढले होते.

प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आर्य प्रश्नासंबंधी काही विद्वान पुरातत्त्वज्ञांची मते दिली आहेत. ती खूपच मनोरंजक आहेत. पहिले आहेत सर्वात श्रेष्ठ पुरातत्त्वज्ञ गॉर्डन चाईल्ड. लेखक म्हणतात, की ते मार्क्‍सवादी असल्यामुळे त्यांनी सुरुवातीस आर्याचे वसतिस्थान रशियात होते असे प्रतिपादन केले. ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ अशा अभिनिवेशाने पुरातत्त्वाची तरफदारी करणारी मंडळीही असा शास्त्रबाह्य़ विचार करीत असतात तर! मारिया निंबुरास, कोलीन रेनप्रभू, रामशरण शर्मा या प्रगत विचारसरणीच्या मंडळींची आर्याच्या वसतिस्थानाबद्दल वेगळाली मते आहेत. असा पुरातत्त्वज्ञांतील मतमतांचा गलबला वाचून असे वाटते, की पुरातत्त्वशास्त्र हे विश्वासार्ह असेलही, पण अवशेषाधारे किंवा पुराव्यावरून निष्कर्ष काढणाऱ्यांना मर्यादा आहेत. शेवटी केशवसुतांच्या शब्दात म्हणायचे तर ‘अहो, हे जग केवढे? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढे!’ हेच खरे. पण मग प्रचलित पद्धतीच्या इतिहास लेखनास डावलून सत्यान्वेषणासाठी पुरातत्त्वाचे प्रयोजनच काय, असाही प्रश्न निर्माण होतो.

अनेक पुराव्यांची, पुरातत्त्वज्ञांच्या मतमतांतराची अनेक आवर्तने घेऊन, त्या संबंधातली जवळ असेल नसेल ती माहिती देऊनही लेखकाला ऋग्वेदादी वाङ्मयाचा आधार घ्यावा लागलाच आहे. ‘नव्या पिढीने कितीही उडय़ा मारल्या तरी पुरातत्त्वाच्या आधारे मानवी संस्कृतीची काही अंगे कधीही जाणून घेता येणार नाहीत,’ असे ख्रिस्टोफर हॉक्स या ऑक्सफर्ड विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञाचे म्हणणे आहे.

या पुस्तकातील काही प्रकरणे ही कुळकथेतील उपकथानाके ठरावीत अशी आहेत. त्यावरून ती अस्थानीही वाटतात. परिशिष्ट कुळकथा प्रवाही करण्यात पाठबळ देण्याच्या उपयोगी नाही.

‘पुरातत्त्व आणि परंपरा’ या प्रकरणात ‘महाभारत आणि पुरातत्त्व’ असा एक उपविभाग आहे. याच विषयावर डेक्कन कॉलेजातील लेखकाच्या सहकारी विदुषीने प्रबंध लिहिला आहे. लेखकाने याचा संदर्भ घेतला असता तरी भरपूर प्रकाश टाकता आला असता.

प्रस्तावनेत लेखक म्हणतात, की प्रचलित पद्धतीने लिहिलेला इतिहास काही विद्वानांना मान्य नाही; दामोदर कोसंबींनी तर चिंधडय़ा उडवल्या त्याच्या. म्हणून लेखक पुरातत्त्वाच्या अंगाने कुळकथा सांगायला प्रवृत्त झाले आहेत. यासाठी प्रस्तावनेत जी विधाने केली आहेत ती वस्तुस्थितीला धरून नाहीत, हे कोणताही इतिहासकार दाखवू शकेल.

या परीक्षणाच्या ओघात पुरातत्त्वातील निष्कर्ष बदलत असतात, पुरातत्त्वज्ञांची मतंही डावी-उजवी असतात, मतभेद असतात हे वर सांगितलेच आहे. शिवाय कुळकथेशी संबंधित मुख्य प्रश्न म्हणजे सिंधू संस्कृती, आर्य प्रश्न अद्यापिही अनिर्णीत असल्याचे खुद्द लेखकांचेच म्हणणे आहे. या पुस्तकात भारतीय भौतिक संस्कृतीचा विकास कसा झाला हे पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. परंतु मग संस्कृतीच्या दुसऱ्या बाजूचे काय? धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिरे, मूर्ती यांचा विचार केल्याशिवाय कुळकथा पूर्ण होत नसते; शिवाय जी सांगितली तीही प्रश्नांकितच आहे. सबब, ही कुळकथा असली तरी ती अधुरी आहे, असे म्हणावे लागते. महाराष्ट्राची कुळकथा म्हणणे ठीक आहे, परंतु भारताच्या कुळकथेची व्याप्ती, आयाम भिन्न स्वरूपाचे आहेत. आहे तेवढी त्या त्या प्रकरणातील विषयाची माहिती इथे एकत्र दिलेली आहे, एवढेच. ती पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देणारी नाही.

भारताची कुळकथा

डॉ. मधुकर केशव ढवळीकर,राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- ५५६, मूल्य- ४०० रुपये.