डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांच्या ‘making of a rural surgeon’  या मूळ इंग्रजी आत्मवृत्ताचे, ‘दोंडाईच्याचा डॉक्टर’ हे मराठी रूपांतर. डॉ. टोणगावकर हे मेडिकल कॉलेजमधील माझे वर्गमित्र असल्याने दीर्घकाळापासून मी त्यांना ओळखतो. १९५८ साली मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी आलेला हा युवक ग्रामीण भागातून आला आहे, हे त्यांच्या पेहरावावरूनच दिसत होते. पायजमा, शर्ट, गांधी टोपी, गळ्यात अडकवलेली शबनम बॅग आणि पायात रबरी सपाता. सर्व कपडे हातमागाचे – खादीचे. रवींद्रनाथचे वडील हरिजन सेवक संघाचे मानद सचिव व त्याची आई शिक्षिका, हे गांधीवादी विचारसरणीचे. आर्थिक स्थिती अगदी बेताची पण सांस्कृतिक वारसा खूप मोलाचा. गांधीवाद, सत्यव्रत, मानवतावाद आणि समाजाप्रत उत्तरदायित्व अशा उच्च तत्त्वांचे आचरण, आधी केले मग सांगितले अशा प्रकारचे, आई-वडिलांकडून बाळकडूच्या स्वरूपातच लाभलेला हा वारसा. तो रवींद्रने आयुष्यभर जपला आणि वाढवला. संकटसमयीसुद्धा कुठल्याच नीतिमूल्याची कास सोडली नाही. त्याचा मित्र म्हणून मी वारेमाप स्तुती करतो आहे की काय असा माझ्यावर दोषारोप होऊ शकतो. पण कोणीही त्याचे आत्मवृत्त वाचून किंवा त्याहीपेक्षा दोंडाईचाला भेट देऊन त्याचे कार्य पाहिले, तर खात्री पटेल की स्तुती करण्यात मी कंजूषच आहे.

डॉ. टोणगावकर हे मेडिकल कॉलेजच्या सर्व परीक्षा फक्त प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण झाले. शिक्षणात अग्रेसर असलेल्या व्यक्ती नंतर व्यावहारिक आयुष्यात यशस्वी झालेल्या क्वचितच पाहण्यात येते. अर्थात यशाचे मोजमाप कसे करायचे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सामान्यपणे आर्थिक उत्पन्न हा निकष असतो. या मोजपट्टीवर मात्र टोणगावकर सपशेल अपयशी वाटतात. ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात नीतिमूल्यांना उतरती कळा लागली आहे, डॉक्टर देव, देवमाणूस, माणूस ते अमानुष अशा शिडय़ा वेगाने उतरताना दिसताहेत, त्याच काळात ग्रामीण भागात जाऊन उच्चशिक्षित सर्जन अनेक गैरसोईंना खंबीरपणे तोंड देत दीनदुबळ्या रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा देत असताना स्वत: खूप हलाखीच्या परिस्थितीत राहतो, हे पाहून माणुसकीलाही गहिवर फुटावा. रुग्णांची अडवणूक, लुटालूट न करता अहोरात्र वाजवी किंवा रुग्णाला शक्य होईल तेवढय़ाच मोबदल्यात आरोग्यसेवा देणारा हा धन्वंतरी इतरही क्षेत्रांत, समाजकार्यात अग्रेसर आहे.  त्यांचे कार्य पाहून आदराने मान झुकते आणि तोंडातून शब्द उमटतात – ‘सज्जनम् अविरत वंदे!’

himanshu tembhekar dhule upsc
फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप ते ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, धुळ्याचा हिमांशू टेंभेकर देशात ७३८ वा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
ssc recruitment 2024 career in staff selection commission jobs under the staff selection commission
नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी

पुणे विद्यापीठात असलेली मेडिकलच्या अभ्यासक्रमातील सर्व पारितोषिके मिळविणारा डॉ. टोणगावकर सरस्वतीपुत्र आहे. एवढय़ावर समाधान न मानता, ग्रामीण भागातून मोठय़ा शहरी जाऊन सतत नवीन गोष्टी, तंत्रे शिकणे. देश-विदेशात कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध सादर करणे, ग्रामीण शल्य चिकित्सेचा विभाग देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन करणे, त्यात पदव्युत्तर शिक्षणाची पायाभरणी करणे, अशा असंख्य गोष्टी त्यांनी उभ्या केल्या. त्यांचे कार्य पाहून त्यांना देश-विदेश पातळीवर खुपदा सन्मानित केले आहे. ते आयुष्यभर आदर्श विद्यार्थी राहिले आहेत. नशीब किंवा दैव यावर विसंबून न राहता, प्रयत्नांती परमेश्वर हा मंत्र त्यांनी जपला.

लहानपणापासून देवपूजा, धार्मिक ग्रंथपठण हे त्या काळात शोभणारे सर्व काही करीत असताना चिंतन करून, विज्ञानाचा अभ्यास करून रवींद्रनाथ टोणगावकर यांचा देवाधर्मावरचा विश्वास उडाला. धर्ममरतड सामान्य देवभोळ्या लोकांना कसे लुबाडतात याचा त्यांनी शोध घेतला आणि याविषयी आत्मशोध आणि समाजप्रबोधन करण्यास सुरुवात केली. आता पन्नास वर्षांच्या अभ्यासानंतर सखोल चिंतनानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे शाखेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.  त्यांच्या मते धर्माचरण, आनंद हे शब्द सापेक्ष आहेत. वाचन, मनन, चिंतन, शिबिरे या सर्वाचा सखोल अभ्यास करून ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत याची स्वत: खात्री करून घेतली आहे. या विषयावर ते लेखन, भाषणे याद्वारे समाजप्रबोधनही करतात.

पैसा मिळविणे गरजेचे आहे तरी आनंद किंवा समाधानाचे ते साधन नाही, हा त्यांचा सल्ला प्रत्येक विचारवंतास पटण्यासारखा आहे आणि हाच तर सर्वसामान्यांची विचारसरणी आणि संतप्रवृत्तीच्या लोकांमधला फरक असतो. डॉ. टोणगावकर यांनी आपल्या आध्यात्मिक वाटचालीविषयी लिहिलेल्या पुस्तकाचा गोषवाराही आत्मवृत्ताच्या शेवटी दिला आहे.

बुद्धिमान माणूस पृथ्वीच्या पाठीवर काही लाख वर्षे वावरतो आहे. मानव समूहाने राहू लागला, तेव्हा नीतिनियम, आचारसंहिता ठरविल्या. त्यांना धर्म म्हटले तर नैसर्गिक सुविधा निर्माण करणारा किंवा संकटे आणणारा नियंता, सर्वशक्तिमान तो देव हे माणसानेच ठरवले. धार्मिक अंधश्रद्धा जपणे किंवा वाढवणे हा धर्ममरतडांचा धंदा आहे. ‘पापी पेट का सवाल’ आहे, एवढे म्हणून न थांबता, देवधर्म, फलज्योतिष, भूत-पिशाच, शुभ-अशुभ या सर्व संकल्पना प्रदीर्घ काळ जनमानसात खोलवर रुजलेल्या आहेत. त्या समाजशिक्षणाने आणि वैज्ञानिक कारणमीमांसा देऊन घालवल्या पाहिजेत असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. या हजारो, लाखो वर्षांच्या दीर्घकाळ मनात घर करून बसलेल्या संकल्पना नष्ट होण्यास काही दशके किंवा एखादे शतकही लागू शकते. यासाठी समाजशिक्षणाचे प्रयत्न आवश्यक आहेत. काम अवघड आहे पण तितकेच अत्यावश्यक आहे. ते केलेच पाहिजे, या त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

डॉ. टोणगावकरांचे आत्मवृत्त हे ध्येयवेडय़ा, आदर्शवादी व्यक्तीच्या आयुष्याचा धांडोळा आहे. प्रत्येक डॉक्टरने आपल्या डोळ्यापुढे त्याचा आदर्श ठेवावा असे ते आहे. त्यांच्या मूळ इंग्रजी आत्मवृत्ताचे मराठी रूपांतर करताना आजच्या स्पेशालिस्टच्या जमान्यात, एखाद्या कसलेल्या चरित्रलेखकाची मदत घेणे योग्य झाले असते. त्यामुळे शब्दांची कशिदाकारी, अदाकारी यांचाही लाभ झाला असता. पुस्तकाला साहित्यिक मूल्य, लालित्य, नर्मविनोद यांचीही जोड मिळाली असती.

डॉ. टोणगावकरांचे व्यक्तिमत्त्व मुळात सात्त्विक, ध्येयवादी आणि आदर्श आहे. त्यांनी आयुष्यात किती शस्त्रक्रिया केल्या, त्यांना किती पुरस्कार मिळाले याची गणती नाही. मी मात्र त्यांच्यातल्या मानव्याच्या गुणांवर फिदा आहे. हा माणूस बावन्नकशी आहे, इथे सर्व विशेषणे थिटी पडतात. म्हणून म्हणतो –

‘सत्त्वगुणांची जेथ प्रचीती

तेथे कर माझे जुळती।।’

दोंडाईच्याचा डॉक्टर’ –  डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर,

मनोविकास प्रकाशन, पुणे

पृष्ठे३०१, मूल्य२८० रुपये

ganilgulab@gmail.com