डॉ. छाया महाजन यांचं ‘दशदिशा’ हे ललितबंधाचं पुस्तक औरंगाबादच्या रजत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं आहे. हा लेखसंग्रह म्हणजे संवेदनशील मनानं टिपलेला भोवताल आहे. हे लेख लेखिकेच्या विचारांचा आवाका स्पष्ट करणारे आहेत. इंग्लिशच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉ. छाया महाजन यांनी स्वत:च प्रस्तावना लिहिली असून, त्यात ठरावीक पद्धतीने पुस्तकातील लेखांचा परामर्ष घेतलेला नाही. ही प्रस्तावना म्हणजे ‘ललितगद्य’ या साहित्यप्रकारावर भाष्य करणारा स्वतंत्र असा मुक्तचिंतनपर लेखच आहे. लेखिका म्हणते- ‘ललितगद्याचा मूळ उगम निबंधाच्या आकृतिबंधातून झाला आहे. एखादा विषय एकत्रित पद्धतीनं, नीटपणे बांधणं, गोवणं म्हणजे निबंध. त्यात लेखकाचे त्याला जाणवलेले अर्थ, संवेदना, भावना, वास्तव, नाटय़, प्रतिमा, चिंतन, मत यांचा शब्दांतून भावानुवाद करणं आणि वाचकांनाही ते आस्वाद्य होईल असं शब्दबद्ध करणं म्हणजे ललित.’ लेखिकेचे हे सगळे विचार मुळातून वाचण्यासारखे आहेत.
लेखिकेला आसपासच्या घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये लेखनाची बीजं गवसतात. त्या- त्या प्रसंगांकडे ती चहुबाजूंनी पाहते आणि त्यातून आकळलेले अर्थ ती वाचकांसमोर ठेवते. जगणं, जगण्यातले प्रश्न, नातेसंबंध, भावनिक गुंते, स्त्री, समाज, स्वानुभव, गावे व त्यातील बदलते संदर्भ, वास्तव, निसर्ग अशा विविध विषयांकडे लेखिका आत्मीयतेने पाहते. ललितगद्याचा आकृतिबंध कधी व्यक्तिचित्रासारखा, तर कधी कथावजा शैलीचा आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातलगांना सांत्वनासाठी भेटायला जाण्यातली अटळता आणि त्यातील देखावा हे सारंच विषण्ण करणारं असतं, हे सांगणारा ‘मरे एक त्याचा’ हा पहिलाच लेख लक्ष वेधून घेतो. संवेदनशीलता आणि करुणा ही लेखिकेची स्वभाववैशिष्टय़ं आहेत. कष्टणाऱ्यांसाठी लेखिकेचं मन नेहमी तुटतं. मनाविषयी बोलणारी तमाम संतवचनं नि मनाचे श्लोक आणि वास्तव यांतील अंतर लेखिकेच्या मनाला जाणवत राहतं. वेगानं बदलणाऱ्या जगात गावकुसामध्येही बदल कसा होतोय, तसेच इंग्रजी भाषा ही मोठं जग दाखवणारी जादूची कांडी कशी आहे, पाश्चिमात्य संस्कृतीनं मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कसं बदलवलंय, बदलत्या जीवनमूल्यांचा लेखाजोखा मांडणारा ‘थॅंक्स लोड शेडिंग’ हा लेख, कृत्रिम आपत्तीमुळे, बॉम्बस्फोटामुळे वस्ती कशी उद्ध्वस्त होते- असे विविध विषय लेखिकेला लिहितं करतात. कधी चिंतनात्मक, तर कधी संवादात्मक शैलीत, कधी हितगूज, तर कधी कथेच्या अंगानं जाणारे हे सारे लेख वास्तवाचं रोखठोक दर्शन घडवतात.
आपल्या आसपासच्या घटनांकडे लेखिका अतिशय जागरूकतेनं, पण सह-अनुभूतीनं बघते. घरात, अंगणात, शेजारी, रस्त्यावर, समाजात, शाळेत, निसर्गात घडणाऱ्या प्रसंगांना लेखिका आपल्या चिंतनाची जोड देत वाचकांसमोर ठेवते. त्यामुळे हे अनुभव आपलेच आहेत असे वाटते. ‘कामाचे मोल’ हा गृहिणीच्या श्रमप्रतिष्ठेचा आणि श्रममूल्याचा विचार मांडणारा लेख, ‘मनं सांभाळण्याचं काम’ हा घरादारात स्त्रीच्या मनाला मुरड घालायला लावणाऱ्या अलिखित अपेक्षांवर टीका करणारा लेख, सासरच्या अडाणी लोकांच्या छळाला कंटाळून जीवन संपवू पाहणारी असमंजस, पण शिकलेली बाई, कॉन्व्हेंट शाळांमधून हद्दपार होऊ घातलेली राष्ट्रीय अस्मिता, पत्नीच्या मृत्यूनंतर मुश्किलीने मुलांना शिकवून, मोठे करूनही एकाकी पडलेल्या ‘उद्ध्वस्त’ मित्राची गोष्ट.. असे सगळे लेख जीवनाची नेमकी नस पकडून त्यावर मलम लावणारे आहेत.
‘नाव’ या लेखात नाव-आडनावातील जातीय, वांशिक व धार्मिक संदर्भ, पुरुषप्रधान संस्कृतीनुसार मधे बापाचे वा पतीचे नाव लावण्यातली निर्थकता आणि आईचे नाव लावण्याचा नवा पायंडा इत्यादी विषयांवरील चर्चा आहे. अठरापगड जातीपातींच्या भाऊगर्दीतून ‘समते’चा झेंडा घेऊन जाणारी वारी हे वरवरचे देखावे असून, जात फिरून पुन्हा मूळ जागी संकुचित अस्मितेचे रूप कसे घेते, हे लेखिकेला अस्वस्थ करते.
निसर्गातील घटितांना शब्दबद्ध करणाऱ्या अतिशय तरल ललितलेखांनाही या संग्रहात स्थान आहे. ‘थेंब’, ‘झाडावरचा पाऊस’ हे सृष्टीतील विभ्रम दर्शवणारे लेख अतिशय सुंदर आहेत. ‘दशदिशा : प्रेरणा’ हा लेखकाच्या एकूणच जगण्याचा, प्रेरणांचा, प्रतिभेचा आणि समाजाकडून येणाऱ्या चित्रविचित्र प्रतिक्रियांविषयीचा लेख लेखन व वाचन-व्यवहारातील गाळलेल्या जागा शोधणारा आहे. ‘लेखननिवृत्ती’- स्वेच्छेने घेतलेली, लादलेली वा प्रकृतीमुळे.. हा लेखकीय आयुष्यातला खास विचार मांडणारा लेख अंतर्मुख करणारा आहे.
संतांची, कवी-लेखकांची उद्धृते त्यातील मूळ संदर्भ न तपासता वापरणाऱ्यांविषयीचा ‘उचलेगिरी’ हा लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. उपहासात्मक शैलीतील या लेखातून विसंगतीवर बोट ठेवले असले तरी लेखिकेची बहुश्रुतता मात्र त्यातून स्पष्ट होते. सर्व लेख संदर्भसंपन्न आहेत. जाता जाता सहजपणे लेखिका देशोदेशीच्या लेखकांचे, तत्त्ववेत्त्यांचे संदर्भ देते. त्यातून लेखिकेचे सर्वस्पर्शित्व दिसून येते. प्रासादिक शैलीतील हितगूज करणारे हे लेख वाचकांना विचारांची दिशा देणारे आहेत.
एकूणच ललितगद्याचा आकृतिबंध कधी व्यक्तिचित्रणासारखा, तर कधी कथावजा शैलीचा आहे. कधी निबंध, कधी अनुभवकथन, कधी सूचक प्रसंग, कधी चिंतनपर लेख, कधी संवादात्मक अशा विविध आकृतिबंधांतील हे लेख वाचकांना त्यांच्याच जगण्याचे ललितरम्य कवडसे दाखवतात. ललितगद्याच्या बंधमुक्त आविष्काराचा हा संग्रह आहे.
‘दशदिशा’- डॉ. छाया महाजन
रजत प्रकाशन, औरंगाबाद
पाने- १५२, मूल्य- १८० रु.
आश्लेषा महाजन – ashleshamahajan@rediffmail.com