इ. स. २००० ते २०१० या कालावधीत रंगमंचावर आलेल्या नाटकांच्या ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी केलेल्या समीक्षणांचा संग्रह ‘महानगरी नाटकं’ या नावाने प्रकाशित झाला आहे. त्यानिमित्ताने लेखकाने व्यक्त केलेले मनोगत..

नाटककार कवी गोविंदग्रजांच्या महाराष्ट्रगीतातील काव्यपंक्तीत थोडा बदल करून म्हणता येईल..
मंगल देशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री नाटकाच्या देशा।
महाराष्ट्र देशी मराठी नाटकं धडाक्यानं होतच आहेत. प्रयोग हाऊसफुल्ल जात आहेत. नाटय़संमेलनं भरत आहेत. वृत्तपत्रांतून भरभरून नाटकांच्या जाहिराती ओसंडत आहेत. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकांचा हा अव्याहत चाललेला प्रवाह काही नव्या दिशा प्रकट करतोय का? त्यातून काही वेगळेपणाची चाहूल लागतेय का? भविष्याचा काही अंदाज घेता येतोय का? या पुस्तकाच्या अनुषंगानं त्याचा धांडोळा घेणं उद्बोधक ठरू शकेल. इ. स. २००० ते २०१० या वर्षांतील नाटय़कार्याचे केंद्र असलेल्या मुंबापुरीतील नाटकांकडे पाहताना संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ झाली नाही, या सरधोपट विधानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न हाच या मनोगताचा हेतू आहे.
या दशकात नव्या प्रायोगिक-समांतर नाटकांची संख्या मुख्य धारेतील व्यावसायिक नाटकांशी तुलना करता अगदी नजरेत भरण्याजोगी दिसते. मुख्य धारेनेही काही विक्रमी प्रयोगसंख्येची नाटकं दिली आहेत. या दशकातील मराठी नाटक केवळ पांढरपेशी नाटककार, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ यांचं न राहता काहीसं मुक्त झालेलं दिसतं. गिरणी कामगारवर्गातून आलेल्या नाटककारांनी, कलावंतांनी आपली ठसठशीत मुद्रा नाटय़ाविष्कारावर उमटवलेली दिसते. या नाटय़कर्मीनी तरुण प्रेक्षकांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठय़ा संख्येने नाटकाचा प्रेक्षक बनवलं, ही वस्तुस्थिती नोंद घेण्यासारखी आहे.
या नाटय़कर्मीनी नाटकाला अधिक मोकळा अवकाश प्राप्त करून दिला. स्थळ : दिवाणखान्यात घुमसटणाऱ्या नाटकाला मनमोकळी हवा मिळाली. लोकनाटय़ाच्या बाजाचं रसरशीत नाटक वाढीला लागलं. लोकप्रिय झालं. मध्यमवर्गीय जाणिवांचा भर काहीसा ओसरला. हे जरी खरं असलं, तरी त्या अजिबात नष्ट झालेल्या नाहीत. अधूनमधून पूर्वीच्या प्रतिगामी नाटकांनीही आपला प्रभाव ठळकपणे उमटवलाच.
एकंदर नाटकाची भाषा चटपटीत झाली. तीन अंकी नाटक दोन अंकी झालं. दोन छोटे दीर्घाक किंवा तासा-सव्वा तासाचंच नाटक व्यावसायिक रंगमंचावर भावी काळात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रयोगातील तांत्रिकता अधिक कुशल झाली. वेशभूषेच्या पूर्ततेसाठी त्याच विषयातील निपुण लोकांची नेमणूक करण्यात आली. प्रकाशयोजना केवळ वातावरणनिर्मितीपुरतीच राहिली नाही. त्यापलीकडे जाऊन त्यात काही अर्थपूर्णता आणण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे या सर्व कौशल्यकारांना जाहिरातीतील श्रेयनामावलीतही स्थान मिळालं. पूर्वी हे होत नव्हतं.
काही त्रुटींवरही नजर टाकणं आवश्यक आहे. इ. स. २००० च्या अगोदर मुंबईत किमान पाच-सहा तरी प्रायोगिक/ समांतर नाटय़संस्था कार्यरत होत्या. त्यानंतरच्या दशकात मुंबईत ‘आविष्कार’ ही एकमेव नाटय़संस्था प्रायोगिक नाटकं सादर करण्यात मग्न आहे. तुलनेनं पुण्यात मात्र आजही प्रायोगिक/ समांतर रंगभूमी चैतन्यदायी आहे.. वेगळं काही करू पाहत आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी होत असलेल्या नाटय़विषयक हालचालींचा थांगपत्ता मुंबई-पुण्याला लागत नाही.
पुस्तकातील समीक्षाविषय झालेला नाटककाळ हा युवा रंगकर्मीचा आहे. पण युवकांचं भावविश्व, त्यांचं जगणं, त्यांच्यापुढच्या समस्या व्यावसायिक नाटकांतून तितक्या जोमाने प्रकट होताना दिसत नाहीत.
तरुण, बिनपांढरपेशा रंगकर्मीनी व्यावसायिक रंगमंचावर नाटकं केली, पण ती बहुतांशी पांढरपेशांचं रंजन करणारी अशी. समांतरवाल्यांनी अत्यंत छोटय़ा छोटय़ा मध्यमवर्गीय समस्या नाटय़रूपात मांडल्या आहेत. पण रसरशीत विनोदप्रधान नाटकं करावीत असं समांतरवाल्यांना का वाटत नाही? चांगला प्रभावी मेलोड्रामाही मुख्य धारेच्या रंगमंचावर कित्येक दिवसांत आलेला नाही.
दूरचित्रवाणीवरील मालिकांची जेवढी चर्चा होते तेवढी नाटकांची चर्चा आज होत नाही. केवळ दूरचित्रवाणी घरोघर पोचते म्हणून हे होतं असं समजणं गैर आहे. चर्चा करण्याजोगं सशक्त नाटकच रंगमंचावर येत नसेल तर..
ठिकठिकाणच्या विद्यापीठांतून नाटय़शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना थेट दूरचित्रवाणीकडेच धाव घ्यावी लागते. केवळ नाटकांवर ते जगू शकत नाहीत. त्यामुळे दूरचित्रवाणी, लघुपट, चित्रपट अशासारखी आविष्काराची माध्यमं त्यांना शोधावीच लागतात. त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाहच होऊ शकत नाही. या सगळ्या धावपळीतून त्यांनी ज्या विषयात प्रावीण्य मिळवलेलं असतं त्यात काही करून दाखवायला त्यांना फारच थोडा वेळ मिळतो. त्यामुळे कित्येकदा जबरदस्त इच्छा असूनही त्यांना समांतर/ प्रायोगिक रंगभूमीसाठी अवधी मिळत नाही.
यापूर्वीच्या प्रायोगिकवाल्यांचं उदरनिर्वाहाचं क्षेत्र कचेरी, फॅक्टरी हे होतं. त्यामुळे नोकरीच्या ठरावीक वेळेनंतर ते स्वत:चं नाटक करायला मोकळे असायचे. आजच्या परिस्थितीत उदरनिर्वाहाचं काही वेगळं साधन असलेले वा ‘घरचे बरे’ असलेलेच समांतर वा प्रायोगिक नाटक सातत्याने करू शकतात. अशाही परिस्थितीत सर्व अडचणींशी सामना देत बरीच तरुण मंडळी आशयपूर्ण नाटय़कार्य करत आहेत, वेगळं काही करू पाहत आहेत, हे या संग्रहावरून लक्षात येईल.
आजची वृत्तपत्रीय नाटय़समीक्षा पूर्वीपेक्षा कितीतरी सुधारली आहे. पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की, आज नाटय़क्षेत्रातील कितीतरी सर्जनशील रंगकर्मी आपल्या प्रत्यक्ष कामाव्यतिरिक्त नाटकाबद्दल लिहीत आहेत. हे लेखन रंगभूमीच्या इतिहासाबद्दल आहे, तसंच तात्त्विक व सैद्धान्तिकही आहे, परिचयपर आहे, तसंच समीक्षणात्मकही आहे. आत्मकथनातूनही खूप काही सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. रंगभूमीच्या विविध अंगांवर त्यामुळे अधिक प्रकाश पडतो आहे. हे सर्व लेखन नाटय़समीक्षा अधिकाधिक सकस करण्यास कारणीभूत ठरणारं आहे. आणि पर्यायाने आपलं नाटकही सशक्त होणार आहे. अन्य माध्यमं कितीही झगमगाटाने कोसळली तरी त्या सर्वाना टक्कर देत मराठी नाटक खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि मग ‘महाराष्ट्र देशा, नाटकाच्या देशा’ ही पंक्ती अधिकच उजळून निघणार आहे.