समलैंगिक संबंधांविषयी आपल्या समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा समज म्हणजे- हा विषय घेऊन भांडायचा हक्क फक्त त्या समलैंगिक समाजातल्या छुप्या किंवा उघड व्यक्तींनाच असतो, हा आहे. आपल्याकडे अजूनही या विषयाचा संबंध बहुसंख्य विषमलिंगी समाज समलैंगिकांच्या व्यक्तिगत ‘वेस्टेड इंटरेस्ट्स’शी जोडून स्वत:च्या काखा वर करताना दिसतो. यावरून आपल्याकडची परिस्थिती किती दयनीय आहे याचा अंदाज यावा.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’ची सुरुवात एका उद्बोधक सूचनेने केली आहे-
‘‘..या उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्व असल्यामुळे नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णु आहे. स्वयंभू, स्थाणु किंवा स्थिर नाही. त्या- त्या काळी ती- ती चाल नीतिमत्तेची समजली जाते व वाटत्ये, इतकेच. तो काळ पालटला व समाजात अंतर्घर्षणाने किंवा बाह्य़ प्रेरणेने बदल झाले म्हणजे ती जुनी व वहिवाटेतून गेलेली किंवा जात असलेली चाल नीतिबाह्य़ व चमत्कारिक भासून तिची गणना गह्र्य़ वस्तूंत होते.’’
भारतीय समाजमनाला राजवाडय़ांच्या या भूमिकेचा विसर पडलेला दिसतो. उत्क्रांतीची सुरुवात झाल्यापासून मानवी समाज हा विरुद्धलिंगी विवाहसंबंधांनीच बांधलेला होता, असा एक गैरसमज प्रचलित आहे. गे किंवा समलिंगी संबंधांना अनैसर्गिक ठरवून प्रदीर्घ कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या घटनेच्या ३७७ व्या कलमाच्या मुळाशी हाच गैरसमज दिसून येतो. कोणतीही सामाजिक चाल निसर्गनियमाविरुद्ध आहे, हे ठरवतं कोण? आज जे निषिद्ध मानलं आहे, ते काल समाजमान्य होतं का? तसंच आज जे समाजमान्य आहे, ते उद्या कालबाह्य़ तर ठरणार नाही ना? या प्रश्नांची उत्तरे समाजाने इतिहासाचा अभ्यास करून प्रामाणिकपणे दिली तर आजची आपली समलैंगिक संबंधांविषयीची भूमिका जास्त स्पष्ट होईल. अन्यथा ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ या मूलतत्त्वावर आधारित आपल्या लोकशाहीत ‘हेटरोसेक्शुअल’ लोकांना नैतिकतेच्या कसोटीवर उतरण्यास तोंड उरणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने एका जुलमी कायद्याविरुद्ध उशिराने का होईना, पण एक संवेदनशील आणि समंजस पाऊल उचललंय. पण ते पुरेसं आहे काय? सर्वप्रथम म्हणजे हे कलम १९ व्या शतकातल्या ब्रिटिश कायद्यावरून हुबेहूब घेतलेलं आहे आणि तत्कालीन ब्रिटिश समाज हा समलैंगिक व इतर ‘क्वियर’समाजघटकांसंदर्भात अत्यंत असंवेदनशील होता, हे ध्यानात ठेवायला हवं. भारतीय समाज मात्र प्राचीन काळापासून ‘क्वियर’समाजघटकांप्रती एवढा कोडगा होता का? महाभारत, पौराणिक कथा इत्यादींमध्ये इला, स्कंद, कृष्ण, बृहन्नडा अशा अनेक पात्रांच्या समलिंगी नसल्या, तरीही ‘निसर्गनियमां’त न बसणाऱ्या कथा आहेत. पुरुष व स्त्रियांव्यतिरिक्त तिसरी ‘तृतीय प्रकृती’ अस्तित्वात आहे याचे भान प्राचीन भारतीय ग्रंथकारांनाही होते. याचाच अर्थ लैंगिकतेच्या बाबतीत भारतीय संस्कृती कठोर नसून जास्त लवचीक असल्याचे दिसून येते. परंतु आज जेव्हा समलैंगिक संबंधांवर कायद्याचा बडगा उगारला जातो तेव्हा आजची भारतीय न्यायव्यवस्था नैतिकदृष्टय़ा भोंगळ अशा व्हिक्टोरियन ब्रिटिश युगाशीच आपली बांधीलकी असल्याचे प्रदर्शित करते. प्रत्यक्षात विषमलिंगी संबंधांप्रमाणेच समलिंगी संबंधांनाही समाजात योग्य स्वरूपात स्थान मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेने सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत. केवळ मानवी समाजातच नव्हे, तर निसर्गात वानर व इतरही प्रजातींत समलैंगिकता आढळते. तेव्हा हा मानवी मनाचा बिघाड नसून निसर्गातील एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे या वास्तवाकडे मोकळेपणाने बघण्याची आणि मूलभूत विचार करण्याची सुरुवात कुटुंबाच्या पातळीवर झाली पाहिजे.
‘सहमतीने समलैंगिक संबंध हा दंडात्मक गुन्हा आहे’ हे आजच्या काळात कोणत्याही संवेदनशील, मानवतावादी आणि बुद्धिनिष्ठ अशा समाजास न पटणारे विधान आहे. समलैंगिकता विकृती नाही हे वैदिक काळापासून ‘विकृती एवं प्रकृती’ असं म्हणणाऱ्या भारतीय समाजाला नव्याने सांगण्याची गरज का पडावी? आज अशी परिस्थिती आहे की, समाजातील नवी पिढी अपारंपरिक लैंगिकतेविषयी जास्त बोलकी आणि काही ठिकाणी (विनाकारण) आक्रमक झाली आहे. तर परंपरावादी जुनी पिढी अजूनही घरीदारी ‘समलैंगिक’ हा शब्दही उच्चारण्यास कचरते आहे. अशा परिस्थितीत विषमलिंगी लोकांनी ‘आपण ते नॉर्मल’ आणि ‘बाकीचे अॅबनॉर्मल’ किंवा ‘आपण बहुसंख्य.. ते अल्पसंख्य’ म्हणजेच ‘आपण स्ट्रेट म्हणूनच ग्रेट’ अशा समजुतींत राहणे म्हणजे स्वत:च स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. बहुसंख्येच्या तत्त्वाने प्रकृती किंवा विकृतीचा निर्णय मान्य करणे मुळात चूक आहे. आणि तसे एकदा केले की आज जी गदा समलैंगिकांवर कोसळणार आहे, तीच उद्या समाजमताच्या विरोधात जाणाऱ्या इतर कोणत्याही समाजहितैषी व्यक्ती अथवा घटकावर कोसळणार आहे. तसे झाले तर ‘डार्क एजेस’मध्ये जशी बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक कुचंबणा निर्माण करणारी व्यवस्था युरोपात निर्माण झाली, तशाच परिस्थितीची पायाभरणी आपण इथेही करून मोकळे होऊ. सत्ताधिष्ठित/ सत्यान्वेषी, परंतु समाजमतविरोधी असा मतप्रवाह छाटून टाकण्याची हीच सुरुवात असेल.
भारतासारख्या नव्याने कट्टर बहुअस्मितावादी होऊ पाहणाऱ्या देशात समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध कायद्याने आखलेल्या चौकटींमुळे समाजस्वास्थ्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत ‘तुम्ही एकतर स्ट्रेट असा, आणि नसलात तर फ्रस्ट्रेट व्हा’ असा एक सरळसोट संदेश समलैंगिक व्यक्तींना देण्यात आला आहे.
बलात्कारी व्यक्ती आणि समलिंगी संबंध ठेवणारी व्यक्ती यांच्यात शिक्षेच्या पातळीवर कायद्याने विशेष भेद न दाखवून चमत्कारिक परिस्थिती निर्माण केली आहे. २०१३ मध्ये झालेल्या सुधारणांनुसार, भारतीय दंड विधानात अॅसिड हल्ला, अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न, लैंगिक शोषण, ‘वॉयरिझम’, ‘स्टॉकिंग’ या गुन्ह्यंविरुद्ध दिलेल्या शिक्षा पाहा. यात ‘स्टॉकिंग’, ‘वॉयरिझम’साठी किमान एक वर्ष कारावासापासून ते अॅसिड हल्ल्यासाठी जन्मठेपेएवढी शिक्षा होऊ शकते. याचा अर्थ लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांना किमान शिक्षा एक वर्ष आणि याउलट, दुसऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण सहमतीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या निरपराध व्यक्तीला थेट दहा वर्षे किंवा त्याहूनही मोठी शिक्षा, शिवाय त्यावर आर्थिक भुर्दंड! हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’सारखा न्याय होत नाही काय?
गे व्यक्तींच्या नावनोंदणीवरून आणि इतर साधनांद्वारे किती गे लोक आज देशात वास्तव्य करत आहेत याची निरनिराळी अनुमाने काढली जात आहेत. प्रत्यक्षात किती मोठा समाज या गटात येतो याची कल्पना नाही. घर, कुटुंब, समाज, नोकरी इत्यादी ठिकाणच्या अत्यंत क्रूर मानसिक दबावाखाली यातले अनेक लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. परंतु, केवळ चारचौघांत उठून दिसणाऱ्या आणि स्वत:च्या हक्कांसाठी बोलणाऱ्या गे व्यक्तीलाच विषमलिंगी समाजाने उपकार भावनेतून समान हक्क देणे, हा मुद्दा नाही आहे. उलट, गे समाजघटकांना त्यांची लिंग-अभिव्यक्ती नाकारणं हे अभिव्यक्ती व व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वांची पायमल्ली करण्यासारखं आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर निरनिराळ्या क्षेत्रांतील- फॅशन : डॉल्चे अँड गब्बाना, जॉर्जिओ अरमानी, संगीत : रिकी मार्टिन, एल्टन जॉन, व्यापार : टिम कूक, मनोरंजन : पेद्रो अल्मोडोवार, एलन डिजनरेस, इयन मॅकएलन ही व अशी अनेक माणसं अभिमानाने ‘आऊट’ झाली आहेत. भारतातदेखील उघडपणे लैंगिकता जाहीर करणारे अशोक रावकवी, ओनीर, रोहित बाल, मनीष अरोरा, इ. लोक आहेत. या सर्वाचे त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या कामामुळे समाजाला कमी-जास्त प्रमाणात आनंद मिळाला आहे.
भारतात आनंदाने ‘आऊट’ झालेल्या किंवा होत असलेल्या व्यक्तींना आयुष्यातून ‘आऊट’ करण्याच्या न्यायालयीन व इतर प्रतिगामी प्रयत्नांना यश आले तर मात्र तो आपल्या लोकशाहीतले एक ‘फाऊल’ असेल. रामायणात रामाची अयोध्येतील पुनरागमनाची एक कथा प्रसिद्ध आहे. धर्म आणि नीतीचे सर्व नियम पाळून शत्रूचा नि:पात करून झाल्यावर अयोध्येत पुनरागमन करत असताना प्रभू रामचंद्राला नगरीच्या बाहेर काही लोक शोक करताना दिसले. चौदा वर्षांपूर्वी जेव्हा रामाने अयोध्येचा निरोप घेतला तेव्हापासून ती माणसं तिथेच तिष्ठत उभी होती. त्याने चौकशी केली असता त्या लोकांनी असं सांगितलं की, ‘‘राजा, वनवासाला जाण्यापूर्वी तू इथून अयोध्येतल्या सर्व पुरुषांना व स्त्रियांना स्वगृही जायला सांगितलेस. आम्ही पुरुषही नाही व स्त्रियाही नाही, म्हणून आम्ही इथे उभे आहोत.’’ त्याकाळी रामाने त्या विशिष्ट समाजालाही आपलेसे करून राज्यात सुखाने नांदण्याचे आवाहन केले. आजच्या काळातल्या ‘ऑल्टरनेट सेक्श्युअॅलिटी’ असलेल्या समाजाशी आपण समन्वयाने राहणार की नाही, हा आपल्यासमोरचा रोकडा सवाल आहे.
ओंकार कुळकर्णी omkarkulkarni2508@gmail.com

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास