पहिल्या भेटीचे महत्त्व काय? पहिली भेट सामान्यत: दीर्घकाळ लक्षात राहते. एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व असे असते, की त्याला पाहिल्याबरोबर पाहणाऱ्याच्या मनावर कायमचा ठसा उमटतो. काहींचे तर आयुष्यच अशा एका भेटीतूनच बदलून जाते. पहिल्याच आणि त्याही अतिशय संक्षिप्त भेटीत एवढा जबरदस्त परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर होतो. यामागे त्या व्यक्तीचे वेगळेपण आणि एकप्रकारची नैतिक शक्ती असते. महात्मा गांधी हे गेल्या शतकातले जगातले सर्वात मोठे व्यक्तित्व. आपले साधेपण, जीवनातली पारदर्शकता, पाहणाऱ्याला सहज जाणवणारा अंतरीचा जिव्हाळा यामुळे जगाच्या विविध भागांतील माणसे गांधीजींची चाहती बनली. अनेक भेटींतून दीर्घकाळ परिचय झाला म्हणजे माणूस अधिक कळतो, असे आपण मानतो. पण कित्येक वेळा त्या माणसाविषयीचे आपले मत त्याच्या पहिल्या भेटीतच बनून जाते. आयुष्यभर त्या पहिल्या भेटीचा ठसा आपण विसरू शकत नाही.

‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला’ असे एक गाणे आहे. त्यातला संदर्भ वेगळा आहे. येथे व्यापक अर्थाने गांधीजींच्या व्यक्तित्वाची पहिल्या भेटीत काय प्रतिक्रिया झाली, याबद्दल जीवनाच्या विविध क्षेत्रांतल्या व विविध राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तींनी केलेल्या नोंदी एकत्र करून मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक थॉमस वेबर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्याचा सुजाता गोडबोले यांनी केलेला अनुवाद राजहंस प्रकाशनने ‘गांधी : प्रथम त्यांस पाहता..’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकात ४९ व्यक्तींच्या गांधीजींशी झालेल्या आपल्या पहिल्या भेटीबद्दलच्या प्रतिक्रिया एकत्र केलेल्या आहेत. त्यात विविध जीवनक्षेत्रांतील व जगाच्या विविध भागांतली माणसे आहेत. स्वातंत्र्यलढय़ातील गांधीजींचे सहकारी सरोजिनी नायडू, आचार्य कृपलानी, राजकुमारी अमृतकौर, विनोबा भावे, राजेंद्र प्रसाद, रंगराव दिवाकर, झाकीर हुसैन, जे. सी. कुमारप्पा, श्रीमन नारायण अग्रवाल असे त्यात आहेत. गांधीजींच्या कार्याच्या कीर्तिप्रभेने युरोपातून भारतात आलेल्या मादलेन स्लेड (मीराबेन), दक्षिण आफ्रिकेतले गांधीजींचे मित्र आणि सहकारी हेन्री पोलॉक यांच्या पत्नी मिलीग्रॅहम पोलॉक यांचाही त्यात समावेश आहे. व्हिन्सेट शिऑन, हॅलम टेनिसन, एडगर स्नो आणि विल्यम लॉरेन्स शिरर यांच्यासारखे प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय इतिहासकार यांचाही त्यात समावेश आहे. पुढे गांधीजींच्या भेटीबद्दल जगप्रसिद्ध झालेले पुस्तक लिहिणारे लुई फिशर त्यात आहेत. संततिनियमनाच्या प्रसारासाठी आयुष्य देणाऱ्या मार्गारेट सँगर बाईही त्यात आहेत. फ्रान्समध्ये गांधी विचारातले स्वयंपूर्ण खेडे पुढे प्रत्यक्षात स्थापन करणारे जोसेफ जीन लाँझा देलवास्तो (शांतिदास) हेही त्यात आहेत. रोमा रोलाँ, चॅप्लिन अशा काही जगप्रसिद्ध व्यक्तींनीही गांधीजींशी आपली पहिली भेट नोंदवली आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

थॉमस वेबर यांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावनाही वाचनीय आहे. त्यात त्यांनी काही गमतीच्या गोष्टी नोंदवल्या आहेत. गांधीजींचे अगदी जवळचे सहकारी म्हणून जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना आपण ओळखतो. नेहरूंनी गांधीजींच्या पहिल्या भेटीबद्दल फारच थोडे लिहिले आहे. पटेलांना तर प्रारंभी गांधी म्हणजे एक चक्रमपणाच आहे असे वाटत होते. गांधीजींना पाहण्याचीही त्यांना उत्सुकता नव्हती. पुढे हेच पटेल गांधीजींशी अतिशय जवळचे भावनात्मक नाते असलेले स्नेही झाले.

गांधीजींशी आपली झालेली भेट नोंदवताना यातल्या अनेकांनी आजूबाजूचा काही तपशीलही दिला आहे आणि तो गांधीजींविषयीसुद्धा पुष्कळ सांगतो. पोलॉक गांधीजींना भेटायला गेले तेव्हा गांधीजींच्या कार्यालयात दादाभाई नौरोजी, न्या. रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले या गांधीजींच्या राजकीय गुरूंबरोबर येशू ख्रिस्त आणि टॉलस्टॉय यांचीही छायाचित्रे तेथे होती. गांधीजींच्या जवळच्या पुस्तकात बायबल, भगवद्गीता आणि मॅक्सम्युलरचे ‘इंडिया – व्हॉट कॅन इट टीच अस?’ यांचाही समावेश होता. टी. एस. एस. राजन हे वैद्यकशास्त्रातील उच्चशिक्षण घेतलेले शल्यविशारद. त्यांनी गांधीजींच्या तामिळनाडू दौऱ्यात गांधीजींच्या भाषणाचे मौखिक अनुवादही केले होते. लंडनमध्ये ते शिकत असताना भारतीय नेत्यांच्या भाषणाचा एक कार्यक्रम व्हावा असे त्यांच्या मित्रांनी ठरवले. ही सभा विद्यार्थ्यांनी वर्गणी देऊन तयार केलेले जेवण आणि नंतर भाषणे अशी होणार होती. जेवण शाकाहारी असावे अशी अट गांधीजींनी घातली होती. शाकाहारी पदार्थ हॉटेलमध्ये मिळणार नव्हते म्हणून हॉलमध्येच स्वयंपाक करण्यात येत होता. राजन यांनी गांधीजींना पाहिले नव्हते. दुपारी दोन वाजता ‘लहानखोर, कृश व हसतमुख चेहऱ्याचे एक गृहस्थ’ आले व त्यांनी भाज्या व भोजनाची ताटे धुण्यापासून सगळी कामे मन:पूर्वक केली. काही वेळाने व्ही. व्ही. एस. अय्यर हे विद्यार्थ्यांना माहीत असलेले नेते स्वयंपाकघरात आले, तेव्हा आपल्याला मदत करणारा हा माणूस म्हणजेच आजच्या सभेचे अध्यक्ष गांधीजी आहेत, हे राजन यांना कळाले. माणूस फक्त त्याच्या बोलण्याने, चर्चा करण्यानेच कळतो असे नाही. त्याचे सभोवताल, त्याचा दिनक्रम आणि त्याची वागण्याची पद्धत यातूनही माणसाची ओळख पटत जाते. गांधीजींचे मोठेपण असे, की त्यांनी आपल्या शब्दांतून जेवढा उपदेश केला, त्यापेक्षा अधिक तो आपल्या प्रत्यक्ष आचरणातून केला, हेही संपादकांनी लक्षात ठेवले.

आपल्या सार्वजनिक जीवनात कित्येक वेळा उपचार म्हणून काही गोष्टी करण्यात येतात. आपण त्या केल्याचे समाधान मिळवतो, परंतु त्याचा काही उपयोग होतो आहे की नाही याचा विचारच केला जात नाही. विजापूरला भरणाऱ्या एका परिषदेत गांधीजींचे ‘अस्पृश्यता निवारण’ या विषयावर भाषण होणार होते. त्याची हकिगत रंगराव दिवाकरांनी सांगितली आहे. गांधीजी भाषणासाठी उभे राहिले आणि म्हणाले, ‘ज्यांच्याकडे अस्पृश्य म्हणून तुच्छतेने पाहिले जाते, त्यांनी हात वर करावेत.’ कोणीच हात वर केला नाही. कारण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कोणालाच त्या भाषणाचे निमंत्रण नव्हते. ‘आता मी कोणासाठी भाषण करणार?’ असे गांधीजी म्हणाले आणि भाषण न करता खाली बसले. कोणताही दिखाऊपणा गांधीजींना चालत नव्हता, अगदी राजकारणातसुद्धा. आपली मते गांधीजी स्पष्ट सांगत, मतभेद व्यक्त करतानाही गांधीजींच्या मनात कटुता नसे आणि त्यांच्या आवाजली मृदुता कायम असे. ‘हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीबद्दल मला सहानुभूती आहे, पण यंत्रांना तुम्ही करत असलेल्या विरोधामुळे मी काहीसा गोंधळून गेलो आहे. यंत्रामुळे कामाचे तास कमी होतील आणि मनोविकासासाठी व आयुष्याचा आस्वाद घेण्यासाठी लोकांना अधिक वेळ मिळेल,’ असे चॅप्लिन म्हणाले. त्याच्या उत्तरात गांधीजींनी स्पष्टपणे सांगितले, की ‘ते ध्येय गाठण्यापूर्वी हिंदुस्थानला ब्रिटिश राजवट नष्ट व्हायला हवी आहे. यंत्राच्या वापराने आम्हाला इंग्लंडवर अवलंबून राहावे लागते. त्या परावलंबित्वापासून मुक्त होण्यासाठी यंत्राद्वारे बनवलेल्या सर्व वस्तूंवर बहिष्कार घालणे गरजेचे आहे.’ होरॅस अलेक्झांडर आठ दिवस साबरमती आश्रमात राहून गेले. जाताना गांधीजींचा निरोप घेताना येथील अनुभवाबद्दल मी सार्वजनिकरीत्या बोलण्याची संधी मिळाली तर काय सांगावे, असा प्रश्न त्यांनी केला. उत्तरात ‘सर्वात पहिले म्हणजे तुमच्या जोखडातून आम्हाला मुक्त करा,’ गांधीजींनी वापरलेले शब्द कडक होते, मात्र ते अलेक्झांडर यांच्यासाठी अविस्मरणीय होते.

हे पुस्तक म्हणजे गांधीजींचे चरित्र नव्हे, पण वेगवेगळय़ा माणसांनी आपापल्या दृष्टिकोनातून गांधीजींना जेव्हा प्रथम पाहिले, तेव्हा त्यांच्या मनावर उमटलेल्या मुद्रांची ही मालिका आहे. अशा तुकडय़ा तुकडय़ांनी वाचकांच्या मनात जुळणारे चित्र सकृतदर्शनी तुटक वाटले तरी त्या सर्वातून एक प्रतिमा उभी राहते. कित्येक वेळा अशी प्रतिमा एकाच व्यक्तीच्या पाहण्यातून निर्माण झालेल्या आणि चरित्रग्रंथात उमटलेल्या प्रतिमेपेक्षा अधिक खरी आणि विविध पैलूंचे दर्शन सहजपणे घडवणारी असते, म्हणूनच हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

‘गांधी : प्रथम त्यांस पाहता..’

संपादक – थॉमस वेबर,

अनुवाद – सुजाता गोडबोले,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे – २७६, मूल्य – ३०० रुपये

नरेंद्र चपळगावकर