‘गुरुत्व सोडताना फार त्रास होत नाही. पण गुरुत्वात परत येताना फार कठीण जाते..’ नासाचे अमेरिकी अंतराळवीर स्कॉट केली यांनी ३४२ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात राहून प्रदीर्घ अंतराळ-वास्तव्याचा सांगितलेला हा अनुभव. एकूण चार मोहिमांत ५२० दिवस अंतराळस्थानकात राहून त्यांनी रशियाचे व्हॅलेरी पोलयाकोव यांचा ४३८ दिवस वास्तव्याचा विक्रम मोडला. ते अवकाशात गेले आणि तेथून त्यांनी पृथ्वी पाहिली तेव्हा तिचे अद्भुतपण त्यांना जाणवले. अवकाशाची अथांगता मोठीच; पण तेथून त्यांना पृथ्वीवर परतल्यावर हिमालयाच्या उत्तरेकडील सरोवरे बघण्याची लागलेली आस जीवनाचा अर्थ सांगणारी.. शेवटी पृथ्वीपासून दूर गेल्याशिवाय तिचे महत्त्व कळणार थोडेच? अवकाशातून परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मनसोक्त केळी खाल्ली. त्यांना केळी खूप आवडतात. अवकाशातून पृथ्वी कशी वाटते, असे एका पत्रकाराने त्यांना अवकाशात असतानाच विचारले होते. तेव्हा ‘माझी पृथ्वी आजारी वाटते आहे. मध्य अमेरिका व आशियावर प्रदूषण जाणवते आहे,’ असे त्यांनी सांगितले. अवकाशातून पृथ्वीच्या प्रकृतीचे निदान करताना ‘तिला जपले पाहिजे’ असा हळुवार सल्लाही त्यांनी दिला. अंतराळवीर स्कॉट केली यांनी अवकाशस्थानकात असताना ‘द माíशयन’ हा चित्रपटही पाहिला. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील कलगीतुरे पृथ्वीपासून लांब राहून तटस्थपणे अनुभवले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा त्यांच्याशी फोनवर बोलले. स्कॉट केली यांनी त्यांची गर्लफ्रेंड असलेली नासाची जनसंपर्क अधिकारी अमिको कॉडरर हिच्याशी गुजगोष्टी केल्या. त्यांच्या वास्तव्यातील या काही हलक्याफुलक्या गोष्टी! पण या प्रदीर्घ अवकाश-वास्तव्याचा हेतू हा मंगळावरील स्वारीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने माणसावर काय परिणाम होऊ शकतात, याचा अभ्यास करण्याचा होता.
प्रदीर्घ अवकाश-वास्तव्याने स्नायू आखडतात. ताण जाणवतो. त्वचा जळल्यासारखी वाटते. विशेष म्हणजे स्कॉट यांची उंची सूक्ष्म गुरुत्वामुळे दीड इंचांनी वाढली होती. पृथ्वीवर परत येताच ती पूर्ववत झाली. प्रत्येकाने एकदा तरी अवकाशवारी करावी असे त्यांना वाटते. ‘आतापासून वीस वर्षांनी तुम्ही अगदी स्वस्तात अवकाश पर्यटन करू शकणार आहात..’ ही त्यांची भविष्यवाणी नाही, तर ते वास्तव आहे. कारण अवकाश पर्यटन उद्योग आता खासगी पातळीवर मूळ धरत आहे.
अवकाशस्थानकातील वास्तव्य आपण पृथ्वीवर राहतो त्यापेक्षा खूपच अवघड. कारण शरीरातील सर्व द्रव पदार्थ मेंदूच्या दिशेने जात असतात. त्यामुळे चेहरा सुजतो. अनेक अंतराळवीरांनी आतापर्यंत डोळ्यांच्या दृष्टीत फरक पडल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अवकाशवीर होण्यासाठी तुम्हाला धडधाकट असणे महत्त्वाचे असते. हृदयाचे, स्नायूंचे आरोग्य महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातील वास्तव्यात भरपूर व्यायाम करावा लागतो, तरच तुम्ही तेथे टिकाव धरू शकता. केली यांचे हे वास्तव्य खूप वेगळ्या स्वरूपाचे होते. त्यांचा जुळा भाऊ मार्क केली हा निवृत्त अंतराळवीर आहे. त्यामुळे या दोन जुळ्या भावांची तुलना जैविक परिणाम व जनुकीय फरकांच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. ही सर्वात वेगळी अशी संधी संशोधनासाठी मिळाली. ‘द माíशयन’ चित्रपटात अंतराळवीर मार्क वॅटनी मंगळावर यशस्वीरीत्या बटाटय़ाची लागवड करतो असे दाखवले आहे. शेवटी जगण्यासाठी अन्न लागते व तेही अवकाशात उगवायचे म्हणजे कर्मकठीण. पण अंतराळवीर केली यांच्या या अवकाश मोहिमेत आणखी एक वेगळी गोष्ट घडली, ती म्हणजे झिनिया फुलाचे अलगद उमलणे. अवकाशात अंतराळवीरांना भाजीपाला ताज्या स्वरूपात मिळत नाही, तर तो वाटण (पेस्ट) स्वरूपात न्यावा लागतो. यापूर्वी अवकाशात लेटय़ूस व गव्हाची लागवड यशस्वी झाली आहे. पण आता तेथे झिनियाचे फूलही उगवले आहे. अतिशय संवेदनशील अशी ही वनस्पती तेथे वाढू शकली. अंतराळवीर केली रोज पहाटे उठल्यावर झिनियाची प्रगती निरखत असायचे. एके दिवशी हे फूल उमलले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य विलसले. आता २०१७ मध्ये अवकाशस्थानकात टोमॅटोची लागवड होणार आहे. ती यशस्वी झाली तर अवकाशवीरांना ताज्या भाज्या खायला मिळण्याची शक्यता आहे. अंतराळवीरांसाठी खाण्याची काय व्यवस्था असते, म्हणण्यापेक्षा ते अन्न कसे सेवन करतात, हे पाहणे महत्त्वाचे. कारण तेथे सूक्ष्म गुरुत्व असल्याने पृथ्वीवरचा कुठलाही अन्नपदार्थ तरंगणार व तो खाताच येणार नाही. तरी तेथे ब्राऊनी व काही फळे खाता येतात. इतर अन्नपदार्थात पाणी मिसळावे लागते. मॅक्रोनी, स्पॅघेटी, चीज हे पदार्थ त्यांना दिले जातात. अवकाशस्थानकात अन्न गरम करण्याचीही सोय आहे. पण शीतकपाटे नाहीत. त्यामुळे अन्न टिकवणे अवघड असते. केचअप, मायोनीज यांचा आहारात समावेश असतो. मीठ व मिरपूड ही द्रवरूपात ठेवावी लागते. अंतराळवीर न्याहारी, दुपारचे भोजन व रात्रीचे भोजन असे तीन वेळा जेवतात. त्यांच्या अन्नात खनिजे व उष्मांकांचा विचार केला जातो. फळे, सुकामेवा, पीनट बटर, चिकन, बीफ, सागरी अन्न, कँडी , ब्राऊनीज, कॉफी, चहा, संत्र्यांचा रस, फळांचे पाऊच, लेमोनेड एवढी विविधता त्यांच्याही आहारात असते. अंतराळवीर दिवसा भरपूर काम केल्यानंतर रात्री झोपतात. अंतराळवीर वजनरहित अवस्थेत असल्याने ते कुठल्याही दिशेने भरकटू शकतात. त्यामुळे त्यांना स्लीिपग बॅगमध्ये झोपावे लागते. त्यांना आठ तास झोप आवश्यक असते. त्यात त्यांना छान स्वप्नेही पडतात. काहीजण चक्क घोरतातही. अवकाशात राहायचे म्हणजे सतत काम करायचे असेही नाही. अवकाशस्थानकाच्या खिडकीतून ते बाहेरची दृश्ये बघू शकतात. अगदी एकमेकांना चिडवण्याचे प्रकारही होतात. अर्थात गमतीने. ट्रेडमिलवर व्यायाम, संगीत, चित्रपट, पुस्तकांचे वाचन, अगदी पत्ते खेळणेही चालते. तिथून ते कुटुंबीयांची ख्यालीखुशालीही विचारतात. दात घासणे, केस िवचरणे, दाढी करणे ही नित्यकम्रे तेथेही केली जातात. स्नान मात्र नाही. तेथे टॉयलेटही आहे. ते हवा शोषून स्वच्छ केले जाते. प्रत्येकाला मूत्रविसर्जनासाठी एक फनेल असते. त्यातून मूत्र गोळा करून त्यापासून पुन्हा पाणी तयार केले जाते. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा व युरोपीय स्पेस एजन्सी यांचे आहे. त्याचा वेग ताशी २७,७०० कि. मी. असून ते एका दिवसात पृथ्वीला १६ प्रदक्षिणा घालते. त्याचा आकार आहे सहा बेडरूमच्या बंगल्याएवढा. रात्रीच्या वेळी ते पृथ्वीवरून दिसतेही. आपल्यापासून ३२० कि. मीटर उंचीवरून ते फिरते. त्यावर बोइंग विमानाच्या पंखाएवढय़ा १६ सौरपट्टय़ा आहेत. अवकाशस्थानकाला त्यातून ऊर्जेचा पुरवठा होतो.
स्कॉट केली यांच्या वास्तव्यातील निरीक्षणांचा मंगळावरील मोहिमेत कसा उपयोग होणार, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा कमी गुरुत्वात राहावे लागणार आहे व तेथून परत आल्यानंतर पृथ्वीवरील गुरुत्वाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. गुरुत्वाशिवाय आपण राहतो तेव्हा शरीरातील खनिजे गमावली जातात. हाडांची घनता महिन्याला एक टक्का कमी होते. जी पृथ्वीवर वर्षांला एक ते दीड टक्का कमी होते. त्यामुळे मंगळावर गेल्यानंतर हाडे जास्तच ठिसूळ बनतील. अवकाशात असताना शरीरातील द्रव पदार्थ शरीरात वरच्या दिशेने जात असतात. त्यामुळे डोळ्यांवर दाब येतो. मंगळ मोहिमेतील प्रवास खूप जास्त काळाचा असणार आहे. त्यामुळे बराच ताण येणार आहे. मंगळावरील दिवस ३८ मिनिटे जास्त कालावधीचा असल्याने शरीराला त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. पोषक आहार तर त्यात महत्त्वाचा आहेच; शिवाय मानसिक ताणाचे प्रश्न जाणवणार आहेत. शरीराचे तालचक्र प्रकाशावर अवलंबून असते. त्यामुळे एलईडी लाइट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अवकाशस्थानक असो किंवा मंगळावर जातानाचे अवकाशयान असो, त्यात मर्यादित जागेत जंतू शरीरात शिरकाव करू शकतात. त्याचीही काळजी घ्यावी लागते. अवकाशातील प्रारणे फार धोकादायक असतात. मंगळाकडे जाताना त्यांचा सामना करावा लागणार आहे. पृथ्वीपेक्षा दहापट जास्त प्रारणे तेथे असतील. त्यामुळे मेंदूतील चेतासंस्थेला जबर फटका बसतो. कर्करोगही होतो. त्यामुळे मंगळाकडे जाणारे यान या प्रारणांपासून रक्षण करणारे असेल यात शंका नाही. मानवाला मंगळावर नेणाऱ्या यानातील तंत्रज्ञान फार वेगळे असेल. अन्न व औषधांची निवडही अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. मंगळावर जाण्यासाठी जी तयारी करावी लागणार आहे त्यात अंतराळ-स्थानकात जाऊन आलेल्या लोकांनी लिहिलेली रोजनिशी महत्त्वाची आहे. त्यात किमान २ लाख ८५ हजार शब्दांचा मजकूर असून, एकूण अकराशे पाने आहेत. भावनिक, मानसिक पातळीवर नेमके काय बदल होतात याची निरीक्षणेही त्यात नोंदलेली आहेत. मंगळावरून संदेशवहन करणेही सोपे नाही. कारण संदेश पृथ्वीवर पोहोचण्यास वीस मिनिटांहून अधिक काळ लागतो. तेथे अन्नाची व्यवस्था करताना एक छोटे ग्रीन हाऊस पाठवून त्यात भाजीपाला लागवड करण्याचाही इरादा आहे. त्यात लाल, निळा व हिरवा अशा रंगांतील एलईडीचा वापर केला जाऊ शकतो. आता अवकाश प्रवास करून आलेले स्कॉट केली यांनी लेटय़ूसच्या रोपांबरोबर सेल्फीही काढले होते. यापूर्वी नासाच्या अवकाशयात्री श्ॉनन ल्युसिड यांनी रशियाच्या मीर अवकाशस्थानकात गव्हाची लागवड केली होती. त्याला जेव्हा अंकुर फुटू लागले तेव्हा त्यांनी इतर सहकाऱ्यांना बोलावून ते दाखवले. सगळ्यांनीच त्याचा आनंद साजरा केला होता. अंतराळस्थानकात वनस्पतींच्या या यशस्वी लागवडीमुळे लांब अंतराच्या मोहिमांत खायचे काय, हा प्रश्न सुटणार आहे.
अवकाशस्थानकातील प्रयोगांमुळे पृथ्वीपासून कमी उंचीवरचा अवकाश प्रवास ही पर्यटनाची बाब बनणार आहे. तेथील जलशुद्धीकरणाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय घाण पाण्यापासूनही पेयजल तयार करता येते. निसर्गात दहा अब्ज प्रथिने आहेत. माणसाच्या शरीरात एक लाख प्रथिने असतात. त्यांचा स्फटिक पातळीवर अभ्यास केल्याने मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर उपाय शक्य आहेत. अवकाशस्थानकात अत्यंत लहान व सोपी अल्ट्रासाऊंड मशिन्स आहेत. ते तंत्रज्ञान जेथे कुणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणीही पोहोचवता येईल. त्यामुळे पृथ्वीवर दूरस्थ भागांत आरोग्यसेवा देता येऊ शकेल. आपण जी डोळ्यांची लेसर शस्त्रक्रिया करतो त्यात जे आय ट्रॅकिंग डिव्हाइस (डोळ्यांची स्थिती दर्शवणारे यंत्र) वापरले जाते, ते अवकाशस्थानकातील अंतराळवीरांसाठी प्रथम विकसित करण्यात आले होते. मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया रोबोच्या मदतीने करता येते. तोही अवकाशातील वास्तव्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा भाग आहे. स्तनाच्या कर्करोगातील गाठ शोधण्याचे ‘द इमेज गायडेड ऑटोनॉमस रोबो’ तंत्र कॅनडाच्या अवकाश संस्थेने तयार केले आहे. अंतराळस्थानकात खूप मोठय़ा प्रमाणावर प्रयोग केले जातात. त्यांचे प्रत्यक्ष उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात होत आहेत.
मंगळावर जाण्यासाठी मार्स वनपासून अनेक योजना जाहीर झाल्या आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये मंगळावर जाऊ इच्छिणाऱ्यांचा एक मेळावाही हय़ूस्टन येथे झाला होता. आजपासून साधारण वीसपेक्षा अधिक वर्षांनी सर्व काही व्यवस्थित पार पडत गेले तर मंगळस्वारीचे स्वप्न साकार होईल. नासाचे अंतराळवीर ‘ओरायन’ नावाच्या कॅप्सूलमध्ये बसतील व ती पृथ्वीबाहेर झेपावेल. आता स्पेस शटलची जागा ‘ओरायन’ हे नासाचे अवकाशयान घेणार आहे. हे यान दुसऱ्या एका यानाशी जोडले जाईल. तेथून ते यान खोल अवकाशात भरारी घेईल व बराच काळ प्रवास केल्यानंतर मंगळावर पोहोचेल. मंगळावर वस्ती उभारण्यास शेकडो दिवस लागतील. तेथे इंधन तयार करून ते परत येताना वापरावे लागेल. आता तरी हे सगळे वेडेपणाचे वाटते आहे. पण मंगळाचा नकाशा तयार करून तेथे नेमके कुठे उतरायचे, याची तयारी सुरू झाली आहे. चंद्र सोडून मंगळाचा वेध घेण्याचा पाठपुरावा नासाने सुरू केला, त्याचे कारण मंगळ कधीतरी पृथ्वीसारखा होता. तेथे पाणी होते. नद्या होत्या. समुद्र होता. मंगळ जन्मत:च मेलेला नव्हता, तर त्याचा बालमृत्यू झाला. म्हणजे काळाच्या ओघात तेथील पाणी व इतर गोष्टींच्या रूपातील प्राणतत्त्व निघून गेले. पण त्याचे अंश अजून आहेत. अब्जावधी वर्षांपूर्वी तेथील वातावरणात असे बदल झाले, की ज्यामुळे पाणी एकतर खोल भागात जाऊन गोठले किंवा हवेत नाहीसे झाले. मंगळाची सर्वात जास्त माहिती असलेला माणूस म्हणजे अ‍ॅरिझोनातील भूगर्भशास्त्रज्ञ आल्फ्रेड मॅकइवेन. नासाने जो ‘हायराइज’ कॅमेरा नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बायटर यानावर बसवला, त्यामागची संकल्पना त्यांची आहे. मंगळावरील तीस सेंटीमीटर भागातील बारीकसारीक तपशील हा कॅमेरा टिपत आहे. मंगळावरील दऱ्या, ज्वालामुखी व एव्हरेस्टपेक्षा फार मोठे पर्वतही त्यात दिसतात. माणूस कधीकाळी मंगळावर उतरला तर त्याने मरिनरीज दरीतील मेलास चास्मा भागात उतरावे असे मॅकइवेन यांनी बऱ्याच विचाराअंती सुचवले आहे. या भागात एकेकाळी पाणी होते. आता तेथे वातावरणीय दाब अधिक आहे. उन्हाळ्यात तेथे तापमान जास्त असते. कारण विषुववृत्तीय प्रकाश जास्त आहे. त्यामुळे गोठणिबदूच्या वरच तापमान असते. मंगळावर पृथ्वीसारखे असलेले ठिकाण कुठले? तर त्याचे उत्तर मेलास चास्मा हे आहे. पण आज तरी तेथे पाणी नाही. त्यावर मॅकइवेन यांचे म्हणणे असे की, तेथील खडक १५० अंश सेल्सियसला तापवले तर पाणी बाहेर पडेल. हा उपायही ते सांगतात. बाकीच्या लोकांना मात्र सध्या क्युरिऑसिटी रोव्हर उतरली त्या गेल विवरात उतरावेसे वाटते आहे. दुसरे एक वैज्ञानिक फ्रेड कॅलेफ यांच्या मते, मंगळावर पूर्वी नद्या होत्या. तेथील एकूण १० हजार ते एक दशलक्ष मेट्रिक टन पाणी तेथील भागात आहे असा त्यांचा अंदाज आहे. फक्त ते काढण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील. पॉल नाइल्स हे नासाचे ग्रह-वैज्ञानिक. त्यांच्या मते, गेल विवरात उतरणे मूर्खपणाचे ठरेल. त्यापेक्षा एबर्सवाल्ड विवर, मवर्थ व्हॅली, जेझिरो विवर अशी इतर अनेक ठिकाणे अनुकूल आहेत. अरम चाओस या विवरात उतरण्यास नाइल्स यांची पसंती आहे. जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीजच्या लॉरा केरबर यांच्या मते, अपोलोनॅरिस सुल्सी ही खोल दरी मानवी वस्तीस योग्य आहे. युक्रेनचे संशोधक व्हॅलरी याकोलेव यांच्या मते, झेफिरिया प्लॅनम हा मंगळावरील टेकडय़ांचा प्रदेश फारच वसाहतयोग्य आहे. कारण तेथे दहा हजार लोकांना पाचशे वष्रे पुरेल इतके पाणी आहे असा त्यांचा अंदाज आहे. अमेरिकेतील हय़ूस्टन येथे मंगळोत्सुकांचा जो मेळा भरला होता त्यात ही सगळी माहिती देण्यात आली. नुसते अवकाशस्थानकात जास्त दिवस वास्तव्य केल्याने मंगळस्वारीची पूर्वतयारी होणार नाही. हवाई बेटांवर नासाने मंगळावरील वास्तव्यासाठी कणखर मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने मौना लोआ येथे एक हजार फुटांच्या घुमटाकार बंदिस्त जागेत सहाजणांना आठ महिने ठेवले होते. या चमूत एक फ्रेंच खगोल-जीवशास्त्रज्ञ, एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि वैमानिक, वास्तुरचनाकार, पत्रकार व मृदा वैज्ञानिक अशा चार अमेरिकी लोकांचा समावेश होता. ३६ फूट व्यास व २० फूट उंची असलेल्या घुमटाकार वास्तूत त्यांना नेहमीच्या जगापासून दूर ठेवण्यात आले होते. मार्था लेनियो या कॅनडातील महिलेने या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यात विशेषकरून आठ महिने सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्याने होणारे मानसिक परिणाम तपासण्यात आले. नासाच्या मंगळ मोहिमेसाठी लडाखमध्येही खगोल-जीवशास्त्राच्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत. नासामध्ये अंतर्गत पातळीवरही सराव मोहिमा सुरू आहेत. त्यातून मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य मंगळवीरांकडे कोणती गुणवैशिष्टय़े हवीत, हे सांगता येईल. नासाने २०३० पर्यंत मंगळावर माणूस पाठवण्याचे ठरवले आहे. अवकाश प्रवास हा तसा ‘खतरों के खिलाडी’च करू शकतात. मंगळावर जाऊन परत येणे हे सध्या तरी स्वप्नच आहे. अंतराळवीर स्कॉट केली यांच्या मते, अवकाश प्रवास खूपच जोखमीचा असतो. चुकीला शून्य वाव असतो. माणसाला मंगळावर नेण्याची मोहीम निघाली व त्याला दोन-अडीच वर्षे लागली तरी ते अशक्य नाही. अवकाशात पृथ्वीनिकटच्या कक्षेत जाण्यासाठी तुम्ही अंतराळवीर असण्याची यापुढे गरज राहणार नाही. कारण लवकरच खासगी कंपन्या तुम्हाला अवकाशाची सफर घडवून आणतील. अर्थात त्यासाठी किमान तंदुरुस्ती असावी लागेल, असे स्कॉट केली सांगतात. मंगळावर जाण्याच्या दृष्टिकोनातून बरेच संचित स्कॉट केली व इतर अंतराळवीरांनी जमवले आहे. अनुभवाची ही शिदोरी भावी मंगळवीरांना कामी येईल.
पोशाख, व्यायाम व स्वच्छता
अवकाशस्थानकात वातावरणीय दाब निर्माण केला जातो. नेहमीचा स्पेस सूट तर असतोच. इतर कपडे पृथ्वीवरच्या सारखे असतात. कपडय़ांचे अनेक सेट न्यावे लागतात. कॉटनचे शर्ट-पँट असतात. इस्त्री करता येत नाही. अवकाशस्थानकात शॉवर घेता येत नाही. हातसुद्धा लिक्विड सोपच्या टॉवेलने पुसावे लागतात. केसांना पाणी नसलेला श्ॉम्पू लावावा लागतो. त्याला धुवायची गरज लागत नाही. नंतर कोरडय़ा टॉवेलने केस पुसले जातात. शरीर श्ॉम्पू असलेल्या टॉवेलने पुसावे लागते. स्वच्छतागृहात व्हॅक्यूम क्लीनरसारखे तंत्र वापरून स्वच्छता राखली जाते. झोपताना स्लीपिंग बॅग वापरतात व त्या पट्टय़ाने बांधलेल्या असतात. आठ तास झोप आवश्यक असली तरी प्रत्यक्षात सहाच तास झोप मिळते. ट्रेडमिल व अर्गोमीटरवर व्यायाम केला जातो.
अन्न-पाणी सेवन
१९६० च्या सुमारास अवकाशस्थानकात अ‍ॅल्युमिनियमच्या टय़ूबमधून अन्न दिले जात होते व त्यासाठी जास्त जागा लागत होती. १९७० पासून अवकाशातील मेनूत असलेले पदार्थ नव्या तंत्रज्ञानाने वाढले. पृथ्वीसारखेच अन्न तेथे दिले जाते. सध्या अवकाशस्थानकात दीडशे प्रकारचे अन्नपदार्थ आहेत. ते कालांतराने तीनशेपर्यंत जातील. प्लॅस्टिक वेष्टनामध्ये अन्नपदार्थ दिले जातात. काही अन्नपदार्थ गरमही केले जातात. फळे, ब्रेड, स्पॅघेटी, पीनट बटर असे अनेक पदार्थ त्यात आहेत. पाणी स्ट्रॉने प्यावे लागते. एक थेंब सांडला तरी तो हवेत फिरून यंत्रसामुग्रीचे नुकसान करू शकतो.
अवकाश पर्यटन
रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन अ‍ॅटलांटिक कंपनीने ‘युनिटी’ हे अवकाशयान तयार केले असून, दोन पायलट व सहा प्रवाशांना घेऊन हे यान पृथ्वीच्या वर १०० कि. मी. किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर जाते. ७०० जणांनी या प्रवासासाठी नावे नोंदवली असून, त्याचे १७.१७ कोटी रुपये कंपनीने घेतले आहेत. एलन मस्क यांची स्पेसएक्स, जेफ बेझॉस यांची ब्लू ओरिजिन, पॉल अ‍ॅलेन यांची स्ट्रॅटोलाँच सिस्टिम व बोइंग या कंपन्या अवकाश पर्यटनाच्या क्षेत्रात अग्रेसर आहेत.
मंगळावर जाण्यासाठीचे पर्याय
मंगळावर जाण्यासाठी मिनिमम ट्रान्सफर ऑर्बिट- म्हणजे जवळच्या मार्गाची संकल्पना प्रथम वॉल्टर हॉमन यांनी १९२५ मध्ये मांडली. मंगळावर कमी काळात जाणे आवश्यक आहे, नाहीतर अंतराळवीरांना जास्त प्रारणांचा सामना करावा लागतो. अणु-अग्निबाणाच्या मदतीने म्हणजे द्रव हायड्रोजन वापरून सात महिन्यांत तेथे जाता येईल. व्हेरिएबल मॅग्नेटोप्लाझ्मा अग्निबाण वापरल्यास पाच महिन्यांत मंगळावर जाणे शक्य आहे. तर अँटी-मॅटर किंवा प्रतिद्रव्य वापरून ४५ दिवसांत मंगळ गाठता येईल. पण ते प्रतिद्रव्य तयार करता आले व केले तर त्यासाठी २५० दशलक्ष डॉलर्स इतका खर्च येईल. पण अजून तरी प्रतिद्रव्य शोधता किंवा तयार करता आलेले नाही.

 

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

राजेंद्र येवलेकर
rajendra.yeolekar@gmail.com