डॉ. अनिल अवचट त्यांच्या अर्पणपत्रिकेत म्हणतात.. ‘लक्षात असू द्या- असंही एक जगणं असतं, समृद्ध, ज्यांनी फुलविल्यात जगण्याच्या बागा अनेकांच्या..’

जगण्यासाठी वेगळ्या वाटा धुंडाळणारे अनेक ‘वेडे’ समाजात असतात. आपल्याच धुंदीत काम करत असतात. आणि त्यायोगे इतरांचे जीवन समृद्ध करत राहतात. ही माणसे प्रसिद्धीपासून शक्यतो दूरच असतात. डॉ. अनिल अवचट आणि त्यांची लेखणी कशी कोण जाणे, पण त्या वेडय़ांपर्यंत पोहोचते. त्यांच्याशी गप्पा मारते. त्यांचं काम, त्यांची आव्हानं समजून घेते. आणि अगदी साध्या-सरळ भाषेत आपल्यापुढे मांडते.

१९९७  मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यरत’ पुस्तकाद्वारे अशा बऱ्याच वेडय़ांचं जगणं समाजापुढे डॉ. अनिल अवचटांच्या लेखणीने मांडलं होतं. आता ‘कार्यमग्न’ या पुस्तकातही दहा लेखांतून अशाच आणखीन दहा कार्यमग्न मंडळींबद्दल ते बोलतात.

वाटय़ाला आलेली दु:खं ही आव्हाने समजून स्वत:च्या व इतरांच्या आयुष्याला अर्थ देणारे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत. दु:खाने त्यांना खचवले नाही; उलट प्रेरणा दिली. वैयक्तिक फायदा-तोटय़ाचा हिशोब न मांडता, सुरक्षिततेचं कवच झुगारून देऊन या मंडळींनी आपापला लढा दिला.

गॅदरिंगमध्ये डान्स करताना अपंगत्व आलेल्या नसीमादीदींच्या आयुष्यात लेखक डॉ. अवचट डोकावले. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भेटले, तेव्हा ते प्रांजळपणे म्हणतात, ‘त्यांच्या जीवघेण्या प्रवासाचं जेव्हा दर्शन झालं, तेव्हा मनापासून शरमून गेलो. माझं फिल्मी कुतूहल धुळीला मिळालं.’ आपलं सगळ्यांचं असंच असतं, नाही का? एखादं प्रेक्षणीय स्थळ मनोरंजनासाठी बघायला जावं, तसं आपण अशा ठिकाणी जातो. काही अस्वस्थ आणि काही कौतुकाचे क्षण घालवतो आणि मग पुन्हा आपापल्या सुखी व सुरक्षित आयुष्यात रममाण होतो. डॉ. अवचट मात्र त्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या आयुष्यातलं बरंच काही टिपतात, मांडतात.

नसीमादीदींसारख्या सर्व मंडळींसाठी पायऱ्या म्हणजे ‘नो एन्ट्री’चाच बोर्ड. आपल्या डोळ्यांना तो नाहीतर कधीच दिसला नसता. या लेखामुळे ‘हेल्पर्स’ संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि अनेक अपंगांना ‘पाय’ मिळाले.

अनेक वर्षे जर्मनीत संशोधन करणारे डॉ. आनंद कर्वे आता फलटणच्या मातीत संशोधन करीत आहेत. तिथल्या लोकांमध्येच ते मिळूनमिसळून राहतात. छोटे छोटे प्रयोग करून लोकांना आर्थिक फायदा मिळवून देतात. त्यांच्यातला ताठ अन् काहीसा तुसडा माणूसही अवचटांच्या अघळपघळ भेटीमुळे थोडासा अघळपघळ बनतो आणि खुल्या दिलानं गप्पा मारत आपण केलेल्या संशोधनाची माहिती देतो.

राजेंद्र केरकर यांच्याबरोबर अवचट आपल्यालाही गोव्याच्या जंगलातून फेरफटका मारून आणतात. त्यांचा बिनधास्त स्वभाव आपल्या अंगावर काटा आणतो. डॉ. अवचटांच्या शब्दांसोबत आपले डोळेही गोव्याचा निसर्ग टिपत राहतात. हिरव्यागार डोंगराला झालेली लाल जखम म्हणजे जणू भलामोठा अल्सरच. तो आपल्याही डोळ्यांना दिसतो आणि मग आपलंही मन चरचरतं. एका मैदानासमोर उभं राहून- इथे पूर्वी तळं होतं.. आता ते मातीनं गच्च भरलंय, हे वाचून, बघून वाचकालाही प्रचंड खचायला होतं.

या व्यक्तींवर, त्यांच्या कार्यावर लिहिताना खरं तर अवचटांची लेखणी कुठेच फारशी भावविवश झालेली नाही. विव्हळलेली नाही. तरीही अशा वर्णनातून आपल्यापर्यंत पोहोचायचा तो विषाद पोहोचतोच. आणि आता तिथे काय परिस्थिती आहे, एकदा आपणही जावे का बघायला, असं कुतूहल आपल्याही मनात जागृत होतं. नाही म्हणायला गोव्यात झालेलं अभयारण्य हा उ:शाप डॉ. अवचट आपल्या विषादाला देतात.

लेखक अवचट या पुस्तकात डॉ. अविनाश पोळ या अवलिया डेंटिस्टची, विनायकदादा पाटील या सहृदयी राजकारण्याची, दामले-स्वामी या वल्लींची आपल्याला ओळख करून देतात. अमृता राणे या तरुण पिढीच्या पर्यावरणाच्या क्षेत्रात मॉरिशसमध्ये जाऊन काम करण्याऱ्या मुलीची आणि भाषातज्ज्ञ राजश्रीची आपली ओळखही या पुस्तकात होते. तत्त्वासाठी वैद्यकीय व्यावसायिकाविरुद्ध जिद्दीने खटला चालवून तो जिंकणारे नीलकंठबापूही इथेच आपल्याला भेटतात.

यातील प्रत्येकाने आपल्या आयुष्यासाठी एक वेगळीच वाट निवडली आहे. डॉ. अवचटांची लेखणी या सगळ्या माणसांचं, त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचं, त्यांच्या कार्यवैशिष्टय़ांचं छान चित्र आपल्यापुढे उभं करते. लेखकाला त्यांच्या कार्याबद्दल वाटलेलं आश्चर्य आणि आदर आपल्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचतो. तरीही फार भावनाविवश न होता काहीशा तटस्थपणे या व्यक्तिरेखा आपल्यापुढे उभ्या करण्यात डॉ. अवचट यशस्वी झाले आहेत. त्यांच्या ‘रिपोर्ताज्’ शैलीमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुस्तकाला साहित्यक्षेत्रात निश्चितच उच्च वाङ्मयमूल्य आहे. पण पुस्तकाचं महत्त्व एवढय़ावर थांबत नाही. साहित्यिक मूल्याबरोबरच या पुस्तकाचं सामाजिक मूल्यही मोठं आहे. कार्यमग्न लोकांचं कार्य समाजापुढे आल्यामुळे इतरांना प्रेरणा देण्याचं मोठं काम या पुस्तकामुळे झालं आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना थेट मदतही मिळाली आहे.

कार्यमग्न’- डॉ. अनिल अवचट,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

 पृष्ठे१६३ , मूल्य२००  रुपये