गोविंदराव तळवलकर- ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो- त्यांच्या वास्तूबद्दल लिहिताना असंख्य आठवणींचे ढग गर्दी करतात. मांजरी जशी आपल्या पिल्लांची जागा सात वेळा बदलते, त्याप्रमाणे आम्ही डोंबिवलीमध्ये निरनिराळ्या वास्तूंमध्ये राहिलो. एकेका वास्तूमध्ये आम्ही साधारणत: एक तप होतो.

मला आठवते तेव्हापासून काही वर्षे वाटव्यांच्या बंगल्यासमोरच्या चाळीत आमचं वास्तव्य होतं. डबल ब्रेस्टचा लाल कोट आणि टोपी घालून, गळ्यात पाटी-दप्तर व हातात डबा घेऊन रेल्वे लाइन ओलांडून आम्ही लोकल बोर्डाच्या शाळेत जात असू. येथे राहत असतानाच आमच्या वडिलांची चोळा पॉवर हाऊसची नोकरी सुटली, तेव्हा त्यांनी ओल्या वस्त्रांनी केलेली देवपूजा मनावर कायमची कोरली गेली आहे.

पुढे आम्ही जवळच्याच कारेकरांच्या बंगल्यात राहण्यास आलो. त्या वयात आम्ही दोघे खूप हूड होतो. खूप दंगामस्ती करायचो. त्याचा शेजाऱ्यांना त्रास व्हायचा. शेवटी आमच्या प्रतापांमुळे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा घेणे भाग पडले!

आता आम्ही स्टेशनजवळ भगत यांच्या वाडय़ात राहायला आलो. या वास्तूत खूप घडले. खूप बरे, खूप वाईट. आम्ही निवळलो होतो. वाचनाची आवड या वास्तूमध्येच आम्हा दोघांना लागली. अण्णा आमच्या समोरच्या गोविंद करसन लायब्ररीचा सेक्रेटरी झाला व त्याने तन-मन त्यासाठी वाहिले. अहोरात्र तो त्यासाठी झटला. नवीन नवीन पुस्तके घरात यायची. त्यांना कव्हर घालण्यात, ती वाचून काढण्यात फार आनंद वाटायचा. अण्णाचे वाचन खूपच होते. तो चर्चासत्रांत भाग घेत होता. त्याच्या कर्तृत्वाला नवे नवे कोंब फुटत होते. मात्र, तत्त्वासाठी त्याने त्यावेळी काही संस्थांमधून आपले अंग काढून घेतले होते असेही आठवते.

आमची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. मॅट्रिक झाल्यानंतर अण्णाने कॉलेजात जावे की नोकरी करावी, या वादात आमच्या आईने त्याने शिकावे म्हणून आग्रह धरला. पण वडिलांचा पगार दोन-दोन, तीन-तीन महिने होत नसे. तेव्हा अण्णाने फॉरिन पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी धरली. अतिशय कष्ट पडत होते तरी त्याने नेटाने नोकरी व अभ्यास केला. ही नोकरी त्याच्या वृत्तीला अजिबात पोषक नव्हती. परंतु त्याचा स्वभाव अत्यंत शांत, सोशीक असल्यामुळे मनातली वादळे ओठावर कधीच आली नाहीत. (हा स्वभाव अजूनही तसाच आहे. झणझणीत अग्रलेखाबद्दल कोणाचे खरमरीत पत्र येवो वा गौरव होवो; त्याचा तोल कधी गेला नाही. पत्रकाराच्या आयुष्यात असे खूप प्रसंग येतात. एखाद्या बातमीने वादळ निर्माण होते. अग्रलेखाने सर्व हादरून जातात. पण हा शांत असतो. त्याच्या एका अग्रलेखाने स्वत:च्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणे कठीण झाले होते!)

अण्णामुळे मोठमोठे लेखक या भगतांच्या घराची पायधूळ झाडून गेले आहेत. या घराभोवती फुलझाडं व फळझाडं खूप होती. उन्हाळ्यात अंगणात आमच्या अंगावर मोगरा चवऱ्या ढाळायचा व उन्हाळा सुस व्हायचा. प्राजक्ताचा सडा पडलेला असायचा. अंगण सुरेख होते. अशा वातावरणात ना. सी. फडके आमच्याकडे तीन दिवस वास्तव्य करून होते. फार खूश होते. येथेच माडखोलकरांचा मिश्कीलपणा आम्हाला जवळून बघायला मिळाला. दत्तो वामन पोतदारांचा अघळपघळपणा आणि गोवर्धन पारिख यांचा घनगंभीर आवाज या वास्तूने ऐकला. श्री. म. माटे यांचे तुरुतुरू चालणे व श्री. के. क्षीं.चा स्वत:वरील उद्विग्न विनोद इथेच ऐकायला मिळाला. एस. एम. जोशी तर आम्हाला घरच्यासारखेच होते. गोपीनाथकाका, शरदकाका, ह. रा. महाजनी यांच्या गप्पा इथेच रंगायच्या. या गप्पा आज आठवल्या की वाटते, त्यांचा अण्णावर नक्कीच परिणाम झालेला आहे. विशेषत: अण्णामधील टीकाकार श्रीकेक्षींनी घडवला व लालित्यपूर्ण लेखक गोपीनाथकाकांनी घडवला असे मला नेहमी वाटते.

या वास्तूमध्ये संगीताचीसुद्धा बीजे पेरली गेली. शरद तळवलकरांनी (आमचे काका) एक ग्रामोफोन व सैगल, पंकज मलिक, काननदेवी, के. सी. डे यांच्या बऱ्याचशा ध्वनिमुद्रिका आणल्या होत्या व त्या बरेच महिने आमच्याकडे होत्या. त्या इतक्या वेळा आम्ही ऐकल्या, की मी पुढे पुढे सैगल, पंकज मलिक यांच्यासारखा आवाज काढून ती गाणी म्हणत असे! आमचे घर वाङ्मय व संगीतमय झाले होते. पैशाच्या विवंचना या सर्व आनंदापुढे फिक्या वाटत होत्या. सैगल स्वर्गवासी झाले ही बातमी आईने मला सांगितली ती संध्याकाळ मला अजूनही आठवते.

या वास्तूने अण्णाच्या प्रेमाला पालवी फुटलेली पाहिली आहे. ‘शाकुंतल’ शिकण्याच्या निमित्ताने एक शकुंतला या दुष्यन्ताच्या प्रेमात पडली. मी निरोप्याचे काम करत होतो. त्यांचे प्रेम सफल झाले. प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. त्यानंतर त्यांचा संसारही यथास्थित वाढला आहे. त्यांच्या दोन्ही मुलींनी उत्तम शिक्षण घेतले आहे. थोरली इंग्लंडमधील एफ. आर. सी. एस. चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली आहे व दुसरी ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून नुकतीच इंग्लंड येथे गेली आहे.

पण हे सर्व पाहायला आमची आई मात्र राहिली नाही याचे आम्हाला वाईट वाटते. इथून काही वर्षे या घरावर बरेच काळे ढग आले होते. आई गेल्यावर आम्ही पोरके झालो. विशेषत: आनंदाच्या प्रसंगी आईची उणीव आम्हाला फार भासली.

भगतांच्या वास्तूमध्ये असतानाच अण्णाला ‘लोकसत्ता’मध्ये सहसंपादक म्हणून त्याच्या अत्यंत आवडीचे काम मिळाले. हे काम त्याने अगदी मन:पूर्वक केले. गाडीत केव्हा बघावे तर अण्णा वाचतच असायचा. (तेव्हा लोकलच्या प्रवासात वाचन होई!)

भगतांच्या वास्तूतून आम्ही पित्रे बिल्डिंगमध्ये राहावयास आलो. येथेच भाषाप्रभू भाव्यांशी अण्णाची घनदाट मैत्री जमली. १९५७ नंतर जागेच्या अडचणीमुळे अण्णा जवळच असलेले त्याचे सासरे श्री. गोरे यांच्या बंगल्यात राहावयास गेला. तेथे जागा भरपूर म्हणून अण्णाने बागकाम करायला सुरुवात केली. अण्णाने जोपासलेल्या विविध प्रकारच्या सुवासिक फुलांनी वातावरण सुगंधमय करून टाकलं. रविवारी भावेअण्णा बागेतील फुलांचा सुगंध घेत, तोंडाने गाणे गुणगुणत अण्णाच्या घरात प्रवेश करीत. मग हे दोन्ही अण्णा उत्फुल्लपणे मनसोक्त भटकंतीला बाहेर पडत. क्वचित वा. य. गाडगीळ त्यांच्याबरोबर दिसत.

एक प्रकारे हे सुंदर व भारलेले दिवस होते. अण्णाचे मन आवडीच्या विषयांत मनसोक्त विहार करीत होते. नव्या नव्या विषयांना ते भिडत होते. इतक्यातच या सुंदरतेला गालबोट लागले. आमचे पितृछत्र हरपले. आमचे वडील जितके तापट होते तितकेच प्रेमळही होते. अण्णाच्या अबोल स्वभावाचे मूळ वडिलांच्या तापटपणात मिळेल असे वाटते. वडिलांच्या निधनानंतर काही काळातच अण्णा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाला.

‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक म्हणून अण्णाची निवड झाली तो दिवस जुन्या डोंबिवलीकरांच्या स्मरणात कदाचित अजूनही असेल. त्याच दिवशी डोंबिवलीकरांच्या वतीने त्याचा भव्य सत्कार झाला. त्या दिवशी व्यासपीठावर पु. ल. देशपांडे, कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर, भाषाप्रभू पु. भा. भावे व भालचंद्र पेंढारकर हे अण्णाचे जिवलग मित्र होते. प्रथम अण्णाच्या घरी सर्व जमले होते तेव्हा सर्वाच्याच आनंदाला भरते आले होते. आता आठवते त्याप्रमाणे, शं. ना. नवरेही या प्रसंगी हजर होते. डोंबिवलीमध्ये इतकी उत्स्फूर्त सभा पूर्वी कधी झाली नव्हती व पुढे होणारही नाही.

‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाल्यानंतर अण्णा डोंबिवली सोडून मुंबईला गेला. तेथे त्याला खूप मोठा, प्रशस्त ब्लॉक मिळाला. त्याची पुस्तकांची आवड त्याने या जागेत पुरेपूर जोपासली आहे. नजर जाईल इथवर पुस्तकांच्या रॅक्स भरलेल्या दिसतात. अजूनही रात्री एक वाजेस्तोवर त्याचे वाचन चालते. भाषण देण्याचा त्याचा स्वभाव नाही. व्याख्याने, सभा-संमेलने इथे तो दिसणार नाही. त्यामुळे तो शिष्ट आहे असा गैरसमज निर्माण होतो. पण आपल्यात काय कमी आहे याची त्याला मनोमन जाणीव आहे. शोकसभेला आणि बारशाला सारख्याच उत्साहाने भाषणे करणाऱ्यांमध्ये म्हणूनच तो दिसत नाही.

आज मी व माझा धाकटा भाऊ ज्या चांगल्या परिस्थितीत आहोत, त्याचे श्रेय आम्ही आमच्या अण्णाला देतो. घार जशी आपल्या पिल्लांची कितीही उंचीवर असली तरी काळजी घेते, तसेच आमच्या अण्णाचे आहे. हाच आमच्या अण्णाचा मोठेपणा.                                                     (अशोक कोठावळे संपादित ‘लेखकाचे घर’ या पुस्तकातून साभार.)