जुनाट शस्त्रास्त्रे, अपुरी रसद, अव्यवहारी व्यूहरचना, कौल- थापर- पलित या ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील बेबनाव, सेनाधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याची तत्कालीन संरक्षणमंत्र्यांची वृत्ती इत्यादी अनेक कारणांमधून स्वातंत्र्योत्तर भारताचा ६२ च्या युद्धात झालेला निर्णायक पराभव ही घटना वर्दीवरील पदकांपेक्षा राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रप्रेम ही पदके ज्यांना जास्त भूषणास्पद वाटतात, त्या माजी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांना किती जिव्हारी लागली असेल याची कल्पना येईल. त्यांना तो स्वत:चा पराभव व अपमान वाटला. म्हणूनच पराभवाची ही गाथा त्यांना ‘न सांगण्याजोगी गोष्ट’ वाटते. लेखक या युद्धाची काही बाबतीत पानिपतच्या युद्धाशी तुलना करतात.
जगातील अनेक युद्धांचा, महायुद्धांचा व त्यामागील ऐतिहासिक घटनांचा अभ्यास, संबंधित विषयावरील प्रचंड वाचन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल अद्ययावत माहिती ह्य पाश्र्वभूमीवर भारतासारख्या खंडप्राय देशासाठी ६२ ची घटना त्यांना एक संधी वाटते व त्याच्या अभ्यासातून देशाने कशी वाटचाल करायची ह्यचे आव्हान वाटते. म्हणून येणाऱ्या अनेक पिढय़ांना या घटनेची सखोल माहिती व्हावी याची तळमळ वाटते. पंधरा वर्षांच्या कालावधीत अनेक पुस्तकांचा, अनेक कागदपत्रांचा अभ्यास यांवरून व वर्दीतील दिवसांमध्ये युद्धभूमीवर घालवलेली अनेक वर्षे ह्यच्या अनुभवांच्या शिदोरीवर हा युद्धपट तयार झालेला आहे. ६२च्या युद्धावर एवढे विस्तृत लिखाण आजपर्यंत झालेले नसावे.
राष्ट्र ही संकल्पना विसाव्या शतकात उदयास आली. त्याबरोबरच राष्ट्राच्या आखीवरेखीव सीमा हा भागही ह्यच शतकात तेवढाच महत्त्वाचा ठरला. किंबहुना राष्ट्र या संकल्पनेच्या व्यवहारातील अस्तित्वासाठी सीमारेषा नक्की करणे हा एक अपरिहार्य भाग ठरला. पण ह्य सीमारेषा नक्की करताना त्याच्यापाठी असलेला इतिहास कारणीभूत ठरत होता. त्याचाच ऊहापोह मेजर जनरल यांनी पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात विस्तृतपणे केला आहे. देशाचा इतिहास, राज्यकर्त्यांचा इतिहास, आर्थिक वा सामाजिक गोष्टींचा इतिहास आपण वाचत असतो. पण सीमारेषांचा इतिहास व त्यामागचे राजकारण ह्यंचा इतिहास व तोही कित्येक शतके मागे नेणारा, प्रथमच वाचला. अर्वाचीन इतिहासात ब्रिटिश इंडियाचे आपण नागरिक असल्यामुळे अनेक गोष्टी आपल्या हातात नव्हत्या व जे केले गेले त्याचे फळ आपल्या पदरात पडले, हे जरी खरे असले तरी त्याबाबतीत आपल्याकडे कोणत्याही पातळीवर जागरूकपणा नव्हता. उलट १९२८च्या काँग्रेसच्या अधिवेशनात जे मत मांडले गेले ते देशहिताला प्रतिकूलच होते. उलट चीन प्रथमपासूनच चालढकल करत होता व ह्य सर्व विषयांकडे धूर्तपणे पहात होता. ब्रिटिशांचे नेपाळ, भूतान व सिक्किम ह्यविषयीचे धोरण भारताच्या पथ्यावर पडले तर मॅकमोहन रेषा (नेफाकडील) व जॉन्सन-अरडघ रेषा (लडाखकडील) ह्य संबंधातील संदिग्धता भारताला त्रासदायक ठरली.
दोन्ही सीमेवरती विशेषत: नेफा सीमेवरती ज्या ज्या चकमकी झाल्या त्याचे वर्णन एवढे वास्तविक व तपशिलात आहे की त्याचे ‘आंखो देखा हाल’ अशा शब्दांतच कौतुक करावे लागेल. प्रत्येक चकमकीबरोबर त्या वेळचे मानचित्रही दिले आहे, ज्यायोगे लढाया कशा खेळल्या गेल्या असतील ह्यची पुरेपूर जाण होते. त्याच वेळेस त्या वेळच्या कठीण वास्तवाचेही भान येते. मानचित्राद्वारे वर्णन करावयाची कल्पना खरोखरीच प्रशंसनीय आहे. दोन्ही सीमेवरची मानचित्रे नेहमीच्या वावरातील नसल्यामुळे सुरुवातीस थोडी अडचण नवागतांना येण्याची शक्यता आहे. पण थोडे लक्ष घालून पाहिल्यास त्यातील मजाही कळते व त्या भागातील भौगोलिक वास्तवताही कळते. लेखक या युद्धानंतरच लष्करातील सेवेत भरती झाल्यामुळे त्यातील बारकावे मिळवावयास सोपे गेले असेल हे नक्की. पण ते लेखणीद्वारे उतरणे व वाचकालाही चटका लावून जाणे ह्यत लेखकाचे कौशल्य आहे.
युद्धातील लहान लहान लढायांचे आपले चित्त खेळवून ठेवते. त्या सर्व लढायांत सर्वात जास्त जर रोमहर्षक लढाई कोणती असेल तर ती रेझलांगची लढाई. लेखक तर त्याचे वर्णन ‘लष्करी इतिहासातील देशभक्तीचे, स्वार्थत्यागाचे, अहमहमिकेचे आणि अपरिमित विजिगीषू वृत्तीने कोरलेले सोनेरी पान’ या शब्दांत करतो. पाच तासांच्या त्या धमासान लढाईतून अनेक परमवीर चक्र, वीरचक्र, अतिविशिष्ट सेना पदाधिकारी निर्माण झाले. त्या लढाईवर तर एखादा चित्रपट निर्माण व्हावा. जवळजवळ १६ पृष्ठे ह्य लढाईसाठी व्यापली आहेत.
इतिहासात अनेक लढाया लढल्या गेल्या असल्या तरी डावपेचात्मकदृष्टय़ा काही लढायांचे महत्त्व असते. त्याच्याबद्दल नेहमी लिहिले जाते, बोलले जाते व अनेक वेळा तो अभ्यासाचा एक विषय असतो. ब्रिटिश इंडियामधील कोहिमाची लढाई अशीच एक ऐतिहासिक लढाई होती. डावपेच व सामरिकदृष्टय़ा त्याला खूप महत्त्व होते. ती लढाई ब्रिटिश हरले असते तर इतिहासालाच वेगळे वळण देणारे ठरले असते. म्हणूनच विषयाशी थेट संबंध नसताना लेखकाने त्यास पुस्तकात महत्त्वाची जागा दिली आहे. पूर्वाचलातील त्याचे स्थान व भौगोलिक साम्य व जवळीकता हेही त्यासंबंधी अनुकूल मुद्दे लढाई समजून द्यावयास मदत करतात.
६२च्या युद्धाच्या पराभवोत्तर अभ्यास करण्यासाठी एक हेंडरसन ब्रुक्स समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या स्थापनेपासून अहवाल देईपर्यंत त्यात अनेक त्रुटी होत्या. त्याही लेखकाने निदर्शनास आणून दिल्या आहेत. अर्थात त्या अहवालाचा (आजपर्यंत अधिकृतपणे गोपनीय) संकेतस्थळारील उपलब्धीनुसार अभ्यास करून त्याचे अनेक दाखले पुस्तकात दिले आहेत. त्या अहवालापेक्षाही लेखकाने केलेला अन्य अभ्यास व पायपीट हीच जास्त प्रभावी वाटते. पूर्णपणे अहवाल बाहेर आल्यानंतर व सतत चालू असलेल्या त्यातील वावरामुळे येणारी प्रत्येक आवृत्ती नवनवीन भर घालून येईल अशी अपेक्षा आहे. त्यातूनच जास्तीतजास्त व्यावहारिक सत्याकडे जाता येईल व पुढील मार्गक्रमण करता येईल.
सत्तरावे ते दशक आज इतिहासजमा झाले आहे. त्याच्याबद्दल फक्त चिकित्सा करणे आज आपल्या हातात आहे. ती आपण अनेक प्रकारे करत आहोतच. हे पुस्तक त्याबाबतीत खरोखर आदर्श आहे. पण आजची परिस्थिती काय आहे व आपण आज काय केले पाहिजे ह्याचा विचार आपण सर्वसाधारणपणे करीत नाही. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात ह्यासंबंधी विचार केला आहे. चीन व भारत ह्याच्या सध्याच्या क्षमतेमधील तफावत, चीनच्या वेगवेगळ्या आघाडीवरील क्षमतांचे मूल्यमापन, चीनची राजकारणातील व रणनीतीतील धोरणे, तिबेटची भूमिका, भारत चीन संबंध, भारताची ह्य पाश्र्वभूमीवर असलेली व असावयाची भूमिका ह्या व अनेक बाबी अत्यंत गंभीर व प्रगल्भतेने मांडल्या आहेत. सर्वसाधारण नागरिकापासून ते वरिष्ठ राजकारण्याची काय भूमिका व कर्तव्य असावे हे ह्यत स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.
लेखनाविषयी काही गोष्टी विशेष वाटल्या. राजकारण्यांनी व काही अधिकाऱ्यांनी अनेक घोडचुका केल्या. ते वाचताना आपल्या अंगाचा तिळपापड होतो. पण कुठेही हे भाषेद्वार प्रकट झाले नाही. अतिशय सभ्य भाषेत सर्व सूर लावले आहेत. तीच गोष्ट आपल्या सैनिकांच्या त्यागाबद्दल. वाचताना मन भरून येते व डोळ्यात पाणी येते. तेथेही अति भावनाशील न होता पण कृतार्थ शब्दात त्याचे वर्णन आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांनी वाचावे. त्यातील विचार नव्या पिढीपर्यंत पोचावा ह्यला महत्त्व आहे. महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठी त्याचा विचार संबंधितांनी जरूर करावा.
‘न सांगण्याजोगी गोष्ट’- ६२ च्या पराभवाची शोकांतिका : मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे ४०१, मूल्य- रु. ३७५.
वि. प्र. नवरे viveknavare@yahoo.in