नुकत्याच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं व्यक्तिमत्त्व साधं, स्नेहाद्र्र, काव्यमय होतं. त्यांच्या लेखनातूनही ते प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या निकटतम सुहृद व  कवयित्री प्रभा गणोरकर यांनी रेखाटलेलं त्यांचं शब्दचित्र..

शिरीष पै हे नाव मी प्रथम ऐकले ते निर्मला देशपांडेकडून. १९६३-६४ च्या दरम्यान निर्मलाच्या यजमानांचा मुक्काम नागपूरला होता. त्यावेळी ती मधूनमधून नागपूरला चक्कर टाकायची. तेवढय़ातच पुसदला विदर्भ साहित्य संघाचे संमेलन झाले. त्यावेळी अण्णासाहेब खापर्डे, सुरेश भट, मधुकर केचे अशा दिग्गज कवींच्या गावातली मी लिंबूटिंबू कवयित्री असल्याने, बहुधा केंच्यांच्या शिफारसीमुळे असेल कदाचित, मला कविसंमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली. ‘आज फोफावली भांग, कुठे दिसेना तुळस’ ही कविता मी तेव्हा वाचल्याचे आठवते. पण त्याहून आठवते ती धबधब्यासारख्या केसांचा ऐटदार अंबाडा घातलेली निर्मला आणि तिचे सारखे शिरीषविषयीचे बोलणे. केच्यांनी संमेलनात माझी निर्मलाशी ओळख करून दिली. केचे सर्वसंचारी. त्यांची शिरीषची चांगली ओळख होती. केच्यांचे मुक्ताशी लग्न झाले तेव्हा शिरीषने ‘हंसे मुक्ता नेली, मग केला कलकलाट काकांनी’ ही मोरोपंतांची आर्या त्यांना पत्रात कळवली होती. ‘बाळ म्हणाले आई, मी गंगेत बुडाले’ ही शिरीषची एक ओळ केच्यांनी आपल्या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत लिहिली होती.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा

पण शिरीषशी माझी भेट झाली ती ‘मराठा’च्या कचेरीत. तिथे मी तिला प्रथम पाहिले. सावळा, गोल, प्रसन्न चेहरा. उंचपुरा बांधा. मोठे कुंकू. त्याचवेळी कचेरीत सहज आलेल्या हृदयनाथ मंगेशकर आणि भारती यांची तिने मला ओळख करून दिली. आपल्या घरी नेले. तिथे तिने माझी व्यंकटेश पै यांच्याशीही ओळख करून दिली. देखणे, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. शिरीष त्या काळात ‘मराठा’ आणि ‘नवयुग’ सांभाळीत असे. पुढे नामवंत झालेल्या अनेक साहित्यिकांशी तिचा संपर्क होता. तेंडुलकरांनी आपल्या एका नाटकाच्या प्रारंभी ‘अशीही एक लढाई असते, जिचा शेवट असतो पराभव..’ अशी शिरीषची ओळ टाकली होती. आचार्य अत्र्यांसारखे पहाडाएवढे व्यक्तिमत्त्व वडील म्हणून तिला लाभलेले. पण शिरीषच्या वागण्या-बोलण्यात एक साधेपणा होता. आमच्यात वयाचे बरेच अंतर होते, पण तिचे कोणतेच मोठेपण तिने वागण्यात दिसू दिले नाही. म्हणून तर सासवडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहण्याची दुर्बुद्धी मला झाली तेव्हा मी तिला भेटले. तिने माझे नाव सुचवले. राजेंद्रला तिथल्या लोकांकडे माझ्यासाठी शब्द टाकायला सांगितला. माझी निवड झाली नाही तेव्हा मला फोन केला. असा लाघवी स्वभाव आणि हृद्य माणूसपण शिरीषच्या स्वरूपात मला वारंवार भेटत राहिलं.

चर्चगेटला मी राहत होते तेव्हा वृंदा लिमये, वासंती मुझुमदार, शिरीष, उषा मेहता, निर्मला देशपांडे अशा आम्ही सगळ्याजणी एका संध्याकाळी माझ्या घरी जमलो आणि त्या वर्षी शांताबाई अध्यक्ष झाल्या पाहिजेत असा ठराव संमत केला! वास्तविक शिरीषने एवढे उदंड लेखन केले आहे, की तिनेच खरे तर संमेलनाच्या अध्यक्षपदी यायला हवे होते. लेखनाच्या सर्व विधा तिने सहजी हाताळल्या आहेत. अगदी थोडक्यात तिने उभे केलेले व्यंकटेश पै यांचे व्यक्तिचित्र मला आठवते. आचार्य अत्र्यांच्या संदर्भातले तिचे लेखन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवणारे तर आहेच; पण तिचे त्यांच्यावर किती प्रेम होते हेही परोपरीने व्यक्त करणारे आहे. त्यांची प्रकृती खालावली तेव्हा ती किती विकल  झाली होती ते मी पाहिले आहे. व्हीलचेअरवर तिच्या पपांची भेटही तिने मला घडवून आणली होती. तिच्या दृष्टीने ते फक्त तिचे पपा होते. त्यांचे सारे काही तिच्या दृष्टीने क्षम्य होते. आणि हा गुणही तिने तिच्या पपांकडूनच उचलला होता.

शिरीषच्या स्वभावात एक आगळीच स्निग्धता, मार्दव होते. निर्मला फटकळ. काहीशी चहाटळही. पण शिरीषकडून मी तरी कुणाच्या कुचाळक्या, निंदा ऐकल्या नाहीत. तिच्या स्वभावातले मार्दव, दिसेल ते सुंदर टिपण्याची वृत्ती हायकूंमधून सतत दिसत राहते. पण तरीही तिच्यात खूप सोसण्यातून आलेली एक खिन्नताही मला जाणवत आली आहे. ती तिच्या चेहऱ्यावरही मला दिसत असे. ‘हृदय अर्पण करतात, ती माणसं निराळीच असतात.. जशी हसतात फुलं,  पूर्ण उमलतात, उधळतात गंध, गळून पडतात.. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात.. ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय  देतात..’  शिरीष अशी हृदय देणाऱ्यांमधली एक होती. आमच्या पिढीच्या सगळ्याच कवयित्री रोमँटिक होत्या. पण शिरीषच्या कवितेत त्यातले नैराश्य, औदासीन्य अधिक तीव्रतेने उमटलेले आहे. निर्मलाच्या कवितेत मुलीचे एक साजिरे रूपडे दिसते. पण त्याच काळात शिरीषने मात्र- ‘माझ्या चिमण्या पिलांनो, माझ्यापासून सुखरूप रहा, जळत असताना कसे ठेवावे तुम्हाला सावलीत, अजून शिकले नाही..’ अशा ओळी लिहिल्या आहेत. असोशी उत्कटता, आर्तता, व्याकूळता हे मला शिरीषच्या कवितेतून सतत पाझरताना दिसणारे आवेग आहेत. तिच्या ‘हायकूं’मध्येदेखील रंग आहेत. पण ते नेहमीच सुंदर, प्रसन्न, आनंदाचे नाहीत. हे काही क्षण पाहा..

‘सहन होत नाही, कुणाचं तरी फावडय़ानं, रस्त्यावरलं माती खरडणं..’

‘जाग आली, आपल्या श्वासोच्छ्वासाची, मध्यरात्री भीती वाटली..’

‘कधी सुकलं हे झाड, ज्याची सुगंधी फुले, मी फांदी वाकवून हुंगत गेले..’

‘खिडकीपाशी निमूट बसणे, एकामागून एक फुलांना, गळताना बघणे..’

‘पोपटी पालवी बघताना, भरून आले डोळे, तिचे थोडे दिवस उरले..’

कादंबरी, कविता, कथा, नाटके, ललित लेख, बालसाहित्य या वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनात शिरीषने रमून पाहिले. पण ती खरी व्यक्त झाली ती कवितेतच. आणि नंतरच्या काळात हायकूंमधून. अलीकडच्या काळात तर मला वाटते, मनातला प्रत्येक विचार, जगलेला प्रत्येक क्षण, टिपलेले प्रत्येक दृश्य ती ‘हायकू’तूनच व्यक्त करीत राहिली. मूळ हायकूकार ‘बाशो’प्रमाणे तीही रोज हायकू लिहीत राहिली. ‘माझे हायकू’, ‘फक्त हायकू’, ‘हेही हायकू’, ‘नवे हायकू’.. आम्ही भेटलो तेव्हा तिने तिचा ‘थोडे हायकू’ हा संग्रह मला दिला आणि म्हणाली, ‘अलीकडे तू पाडगांवकरांच्या नव्या संग्रहावर लिहिले आहेस. मला तो वाचायचा आहे.’ मी मौजेतून मिळवून तिला तो नेऊन दिला. नंतर काही दिवसांनी तो वाचल्याचा तिचा फोनही आला. समकालीन कविता ती आवर्जून वाचत असे. त्यातूनच तिने विजया संगवईबरोबर आम्हा काही कवयित्रींच्या कविता जमवून संग्रह संपादित केला, त्याला प्रस्तावनाही लिहिली. सुरेश भटांच्या कवितांनाही तिने प्रस्तावना लिहिली. लिहिणे, वाचणे आणि मनातल्या मनात लिहून नंतर ते कागदावर उतरवणे.. असाच तिचा अलीकडचा आयुष्यक्रम असणार. अलीकडे पुष्कळदा तिला बरे नसे. मृत्यूचेही विचार तिच्या मनात येत असणार. तिच्या ‘हायकू’तून ते आले आहेत..

‘देहातला प्राण, निरोप घेतो, तेव्हा कुठून जातो?’

‘आली आहे वृत्तपत्रात, मृत्यूची बातमी कुणाच्या तरी, येईल माझीही केव्हातरी’

‘आता वय खूप झालंय, सुंदर पाऊस बघताना आजचा, वाटत असेल का हा शेवटचा?’

शेवटच्या क्षणी, शिरीष, कोणता विचार होता तुझ्या मनात?