प्रसिद्ध कथालेखिका आशा बगे यांचा ‘अनुवाद’ या शीर्षकाचा नवा कथासंग्रह मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केला आहे. मनाचा तळ दाखवणाऱ्या अतिशय तरल आणि सहज अशा या कथा बदलत्या काळाचे संदर्भ घेऊन येतात. आयुष्य जगून पक्व झालेला समंजस शांतपणा त्यांच्या कथेच्या उत्कट अभिव्यक्तीत दिसतो. वरवर पाहता साधे वाटणारे प्रसंग, पात्रे, वाक्ये अंतर्यामी काहीतरी ठेव घेऊन आलेली असतात, असे कथा वाचून झाल्यावर जाणवते. मानवी नात्यांमधील परस्परसंबंधांचा, माणसाच्या अकल्पित वर्तनाचा, ताíकक-अताíकक वागण्याचा अन्वयार्थ ही कथा उकलत राहते. लेखिकेच्या मनातल्या कथाबीजांचाच जणू हा ‘अनुवाद’ नि विस्तार आहे.

संग्रहातील बारा कथांपकी बहुतेक सर्व कथा कुटुंब चौकटीच्या आसपासच्या प्रदेशाचा शोध घेतात. लेखिका नागपूरच्या आहेत, त्यामुळे की काय, त्यांच्या लेखनात टळटळीत ऊन, घाम, कूलर इत्यादी संदर्भ सतत येतात. त्यांच्या एका कथेचे नाव आहे – ‘उन्हं’, तर दुसऱ्या एका कथेचे नाव आहे ‘ऊन’. ही प्रादेशिकता वातावरणनिर्मिती करते. कधी गीतेतला श्लोक, कधी गौळण, कधी एखाद्या इंग्लिश कवितेतील ओळी, तर कधी ज्ञानेश्वरी, मोरोपंत यांची उद्धृते कथेला विलक्षण संदर्भ देतात. शास्त्रीय संगीतातली चीज, रागसुद्धा कथेत रंग भरतात. कथेचा निवेदक वा निवेदिका वाचकांनाही सहज सोबत नेतात. इतकी कथनशैली अनलंकृत तरीही पकड घेणारी आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

या संग्रहात आजोबा किंवा आजीचे आपल्या नातीशी-नातवाशी असलेले भावबंध अनेक कथांमधून दिसतात. याशिवाय विशिष्ट  हेतूने घर सोडून दूर गेलेल्या, पळून गेलेल्या व्यक्तीच्या, तसेच मृत व्यक्तीच्या बऱ्यावाईट आठवणींनी कथांचे अंतरंग भारल्यासारखेही जाणवते. बालपणीच्या आठवणींचा तसेच अनुवंशाने आलेल्या गुणवैशिष्टय़ांचा मागोवा घेत केलेला प्रवासही काही कथांचा गाभा असल्याचे दिसते. प्रत्येक कथा कुठलातरी अंत:शोध घेते आणि वाचकाला त्या त्या अनुभूतीशी जोडू पाहते. कथेमधील कथावस्तू आणि कलावस्तू जीवनानुभवातून आल्याने त्या काळाच्या पल्याड प्रवास करणाऱ्या ठरतात.

‘सगर्भ’ या कथेतला श्रीनिवास हा दत्तक पुत्र. स्वत:  त्वचारोग तज्ज्ञ असलेल्या श्रीनिवासला त्याच्याच शरीरावर डाग आलेले दिसतात. एक प्रकारचा गंड मनात बाळगून तो जगत राहतो. सरदेशमुखांच्या घरात तो दत्तक घेतलेला असतो. ते डाग आपल्या कुठल्या अज्ञात आई-बापाची ‘देणगी’ आहे, हा विचार त्याला छळत राहतो. बाळंतपणाला आलेली बहीण, धन्वंतरी आजोबा आणि एक कुरूप डॉक्टर मत्रीण यांच्या समांतर उपकथांमधून श्रीनिवास स्वत:ला उलगडत जातो. ‘गोष्ट आदिलची’मध्ये वडिलांची बदली झाल्याने दूर शहरात जावे लागणार या विचाराने व्याकूळ झालेला आदिल भेटतो. आपले घर, घरातली मंडळी, परिसर, मित्र, खेळ यांचे तो जणू भरभरून दर्शन घेतो. एकत्र कुटुंबात आश्रयाला आलेली विवाहित आत्या नि तिचा मुलगा यांच्या समांतर कहाणीत आजोबांच्या कणखर भूमिकेची छाप पडलेली दिसते. काही गोष्टी स्पष्ट न सांगता सूचित करण्याची वा वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून देण्याची लेखिकेची रीत आहे. ‘उन्हं’ या कथेतली नीरजा कॅलिफोíनयावरून बाळंतपणाला भारतात- माहेरी आलेली असते. ही भाषा शिक्षिका आहे. बालपणी पळून गेलेल्या बहुला आत्याचा- जी एका लावणी गायिकेची मुलगी असते – शोध घेता घेता ती भाषेचे मूळ, अनुवंशाने जिन्समध्ये उतरून आलेले गुणावगुण शोधण्याचाही यशस्वी प्रयत्न करते. अनुवंशिकता आणि स्वभाव-सवयी पण कशा पुढच्या पिढीत उतरतात, याचाही शोध आहेच. कुंडल या पौगंडावस्थेतल्या मुलाचे आणि दुसऱ्या एका गरीब अबोल मुलाचे अव्यक्त नाते उलगडलेय ते ‘ग्राउंड’ नामक कथेत. याही कथेत वाचकांना गुरफटून टाकणारे सूक्ष्म धागे आहेत. लेखिका कोणत्याही वयोगटातल्या भावविश्वाशी, त्याला लगडून येणाऱ्या विषयांशी जोडलेली आहे. पोरांचा क्रिकेट असो, की इंटरनेट, वैद्यकीय क्षेत्र किंवा पुराणग्रंथातली माहिती असो, लेखिकेची बहुश्रुतता पानोपानी दिसते. एखाद्या ठिकाणाचे, प्रसंगाचे, व्यक्ती-स्वभावाचे बारकाईने घडवलेले दर्शन साधेच पण प्रभावी आहे.

कॉलेजविश्व, त्यातही होस्टेलमधले वास्तव अनुभव आणि सोबत रणरणते ऊन घेऊन येते ‘खोटी’ ही कथा. कळत नकळत पण निरुपद्रवी खोटे बोलण्याची सवय असलेल्या कनका नामक बिनधास्त पोरीने तिच्या बालपणीच आईवडिलांना गमावलेले असते. ती दूरच्या मावशीकडे वाढते. ‘आपल्या घरापासून दूर कुठंतरी वाढलं की विचित्र सवयी लागतात..’ असे तिच्या वागण्यामागचे मानसशास्त्रीय कारणही लेखिका सांगते. ही बिनधास्त कनका आणि निवेदिकेच्या नात्यांची ही कथा. इथेही कुठला ना कुठला शोध आहेच. ‘दंश’, ‘अनुवाद’, ‘अनाहत’ आणि ‘मुद्रा’ या कथासुद्धा विभिन्न ताणतणावांचे आंदोळ घेत जातात. ‘दंश’ कथेत बालपणी आपल्या ध्येयासाठी घर सोडून गेलेल्या आईमुळे पोरक्या झालेल्या मुलांना त्यांची आजीच सांभाळते. ‘थकतो माणूस. पडलेल्या पॅटर्ननंही थकतो आणि पॅटर्न मोडूनही थकतो.’ अशी बोलकी वाक्ये अंतर्मुख करतात. खूप वर्षांनी आलेल्या आईच्या त्रोटक पत्रामुळे डॉक्टर आदिनाथ आईचा शोध घेत एका दुर्गम गावी जातो. पण एका सेवाभावी संस्थेचे काम करणारी आपली आई निधन पावल्याचे त्याला समजते. या योगायोगाच्या गोष्टी. अतिशय संयत आणि आहे ते सहज स्वीकारायला सांगणारी ही कथा. ‘अनुवाद’ या कथेत वडिलांनी हयातीत एका पुस्तकाच्या अनुवादाचे काम घेतलेले असते. ते अर्धवट काम मुलगी पूर्ण करते, पण प्रकाशक या ना त्या कारणाने ते अनुवादित पुस्तक प्रकाशितच करत नाहीत. त्या सगळय़ा प्रक्रियेचे, ग्रंथ-व्यवहारातील व लेखक-प्रकाशक यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे आणि मूळ लेखकाच्या वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन या कथेत पाहायला मिळते. ‘अनाहत’मध्ये डॉक्टर होऊ घातलेल्या केतनच्या आत असलेल्या लेखकाचे, नाटककाराचे, लेखनामागच्या तगमगीचे आणि नाटक – जीवन यांच्यातील ताण्याबाण्याचे चित्रण करते. ‘मुद्रा’ या कथेतल्या सावत्र बहिणी आपल्या दिवंगत आजीच्या गायकीचा शोध घेतात. एक मुलगा झाल्यावर गाण्याच्या ओढीने एकेकाळी घर सोडून गेलेल्या, ख्याल गाणाऱ्या आजीच्या गायकीचा तो शोध! कलेसाठी वा ध्येयासाठी घर सोडून जाणाऱ्या स्त्रिया आणि मग त्यांचा मागोवा नि त्यांच्यातले गुणावगुण अनुवंशाने ज्यांच्यामध्ये उतरली ती नवी पिढी हे अनेक कथांचे सारांश आहेत. ‘पस’ या कथेतली मुलगीही आईबापाच्या घटस्फोटामुळे आजीकडे वाढली आहे. उशिरा ठरलेल्या लग्नाने ती मोहरलीय, पण अनेक विघ्नांना ती कणखरपणे सामोरी जातेय..

आशा बगे यांच्या सगळय़ा कथा खूप तरल आहेत. सूक्ष्मपणे त्या एखाद्या विषयाला धरून ठेवतात. तुटलेल्या कुटुंबाच्या काही गोष्टी असल्या तरी त्यात मागे उरलेल्या कुटुंबाचा खूप त्रागा नाही. खूप सारे ड्रामॅटिक्स नाहीत. आकांत नाही. परिस्थितीचा संयत, समंजस स्वीकार आहे. एकामागून एक प्रसंग आदळत नाहीत. विशिष्ट अभिरुची जतन करणाऱ्या या कथा आहेत. त्यातील गाळलेल्या जागा वाचकाने भरायच्या आहेत. त्यामुळेच की काय, काही कथा फारसे काहीच ‘बोलत’ नाहीत. त्यांना काय सांगायचंय, हे सूचित होते, पण सुस्पष्ट होत नाही. कथेकडे ढोबळपणे बघणाऱ्यांना त्या अमूर्त वाटू शकतील. कथेतली व्यक्तिमत्त्वे आणि कथानकाचे बीज संथपणे, क्रमाक्रमाने उलगडत जाते. कथेतील वातावरण, ऊन, पाऊस, निसर्ग, संगीत एखाद्या पात्रासारखे सोबत करतात.

‘अनुवाद’चे मुखपृष्ठ विवेक रानडे यांनी अमूर्त शैलीत छान साकारले आहे. मुद्रितशोधनाच्या मात्र सुमारे १० ते १२ चुका आहेत. अर्पणपत्रिकेतही मुद्रितशोधनाची चूक आहे. बाकी हा कथासंग्रह मनातल्या अंतर्मनाला स्पर्शून जातो, हे नक्की!

‘अनुवाद’ – आशा बगे,

मौज प्रकाशन गृह, मुंबई,

पृष्ठ – १९३, मूल्य-  २०० रुपये

आश्लेषा महाजन – ashlesha27mahajan@gmail.com