मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
readers reaction on different article of chaturang
पडसाद : ‘पुरुषी एकटेपण’ पटले
amravati former mla abhijit adsul marathi news, abhijit adsul navneet rana marathi news
एकनाथ शिंदे गटाच्या माजी आमदाराचा दावा, म्हणाले, “नवनीत राणांची उमेदवारी…”

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘२ँस्र्’ या शब्दावरून ‘२ँस्र्स्र्ी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधडय़ा उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य:युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बाका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ्  स्टोन डेफ्!

सई परांजपे saiparanjpye@hotmail.com