‘ब्रह्मदेश’ हा बहुधा स्वत: ब्रह्मदेवानेच निर्माण केला असावा. त्याचाच संदेश सम्राट अशोकाला मिळाला आणि त्याने बौद्ध धर्मप्रसारासाठी संघमित्रा व महेंद्र यांची ब्रह्मदेशात पाठवणी केली. ब्रिटिशांनी त्याला ‘Burma’ म्हटलं. आत्ताचं ‘म्यानमार’! ‘Golden Land’ हे त्याला मिळालेलं नामाभिधान ब्रह्मदेश प्रत्यक्ष पाहिल्यावर खरंच समर्पक वाटतं. संपूर्ण ब्रह्मदेश सोनेरी कळस असलेल्या सुमारे अडीच ते तीन हजार पॅगोडांनी भरगच्च भरलेला आहे. इथे-तिथे सर्वत्र छोटे पॅगोडा. तर मध्यवर्ती यानगॉन (किंवा येंगान) मधील ९० टन सोन्याचा भव्य, लखलखणारा पॅगोडा. या ठिकाणी हजारो माणसांची सतत वर्दळ. पण कुठेही अस्वच्छता आढळत नाही. बुद्धाच्या कुठे उभ्या मूर्ती, तर कुठे बसलेल्या. पद्मासनातील. कुठे ४८ फूट लांबीची भव्यदिव्य, कोरीव अशी झोपलेली देखणी बुद्धमूर्ती. जागोजागी हातात कमंडलू घेतलेले बौद्ध भिक्खू-भिक्खूणी! शांतीचा प्रचार करणारे बुद्धाचे सच्चे पाईक! मोठमोठे मठ. त्यात हजारावर भिक्खू. पण कुठे गडबड नाही. ठरल्याबरहुकूम शांतपणे आपापले काम करणारे. अभ्यास करणारे भिक्खू विद्यार्थी! वयोगट ५ ते ५० वर्षे. भिक्खू पुरुषांची भगवी, तर स्त्रियांची पांढरी वस्त्रे.

सिंगापूर, थायलंड, जपान, चीन, श्रीलंका हे बौद्धधर्मीय देश पाहिले, पण सर्वात जास्त जाणवला तो म्यानमारमधील बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार. स्तूप, शिलालेख, पॅगोडा, पुतळे अशा प्राचीन गोष्टी इथे खूपच आढळतात. येंगानच्या बाहेर पॅगोडाच्या सान्निध्यातच असलेल्या हॉटेलमध्येच आमचे वास्तव्य  होते. त्यामुळे जिकडे तिकडे बुद्धच बुद्ध! इथलं शांत, आल्हाददायक वातावरण मनाला खूपच भावलं.

ब्रह्मदेश हा तसा अगदी छोटा देश. भारतातील एखाद्या राज्याएवढा! पण त्यातही सात राज्ये आहेत. लोकसंख्या साडेसात लाख. ८० टक्के बौद्ध, ३ टक्के हिंदू व मुस्लीम, एक टक्का ख्रिश्चन व उर्वरित अन्यधर्मीय. हे सारे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.

उंच-सखल प्रदेश. सदाहरित. रंगूनला (येंगान) लाभलेला देखणा समुद्रकिनारा. एकुणात सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला असा हा देश. स्वच्छ, निर्मळ झुळझुळ वाहणारे झरे. इथली विस्ताराने मोठी, कमी दरात माणसं, लाकड, सामान, भाजीपाला वगैरेची वाहतूक करणारी, शेतीला पाणी पुरवणारी, सर्वतोपरी जीवनदायी अशी इरावती नदी! एकंदरीत विहिरी, तलाव, झरे, नदी व समुद्र हे सारे जलस्त्रोत ब्रह्मींचे सखेसोयरे.

बँकॉकहून येंगॉनला आलो आणि पहिल्या दिवशी न्याहारीनंतर लगेचच स्थलदर्शनासाठी निघालो. प्रथम दोन हजार वर्षांपूर्वीचा Sule Pagoda पाहिला. जगातील largest Ruby and precious stones पाहिले. ते श्रीलंका, सिंगापूरसारखेच वाटले. नंतर आम्ही ‘हाऊस ऑफ मेमरीज’मध्ये जेवण घेतलं. त्याचे मालक दीनानाथजी हे नेताजींच्या कुटुंबीयांपैकी एक. या ठिकाणी आझाद हिंद बँक होती. तसंच हे नेताजींचं गुप्त वास्तव्याचं ठिकाण होतं. संपूर्ण लाकडी कोरीवकाम केलेली, चांगली जतन केलेली अशी ही वास्तू आहे. आज तिचं रूपांतर हॉटेलमध्ये केलं गेलं आहे. नेताजींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या वास्तूत आम्ही त्यांचे स्मरण करत भोजनाचा आस्वाद घेतला. निघताना त्यांच्या शौर्याला सलाम करत सगळी वास्तू डोळे भरून पाहून घेतली. मोगलांचा शेवटचा बादशहा बहादूरशहा याची कबरही आम्ही पाहिली.

ब्रह्मदेशातलं दुसरं मोठं शहर.. वेंगान. इथे प्रसिद्ध ‘पोपा टेम्पल’ आहे. पोपा म्हणजे पुष्प. पाली भाषेतील ‘पुपा’चा अपभ्रंश ‘पोपा.’ चाफ्याची, सोनचाफ्याची अतिशय सुंदर, आकर्षक, मंद सुगंध असलेली फुले पॅकबंद बाटल्यांत इथे विक्रीला होती. घ्यायचा मोह होत होता, पण प्रवासात कमीत कमी सामान वागवायचं ठरवलं असल्यानं तो टाळला. ११ व्या शतकातील पुरातन ब्रह्मा-विष्णू-महेशाचे हे मंदिर. ब्रह्मदेवाचे एक मंदिर भारतात पुष्कर सरोवरानजीक आहे. हे दुसरं! अन्यत्र कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. विस्तारानं मोठं. उजाड माळावर अतिशय सुंदर कोरीवकाम असलेलं. परंतु उपेक्षित, अतिशय दयनीय अवस्थेतलं. एकीकडे लखलखणारे सोन्याचे पॅगोडा, तर दुसरीकडे हे भकास ओकेबोके मंदिर! मन उदास झालं.

ज्याचं समस्त भारतीयांना सर्वाधिक आकर्षण वाटतं, ज्या ठिकाणी लो. टिळकांनी तुरुंगवास भोगला आणि ‘गीतारहस्य’ या पवित्र ग्रंथाची रचना केली, ती पुण्यभूमी म्हणजे मंडाले. पण तिथे सशस्त्र पहारा असल्यामे आम्हाला फक्त लांबूनच ते ठिकाण पाहावं लागलं. आमच्यासोबत लो. टिळकांचे खापरपणतू  शैलेश टिळक हेही होते. त्यांनाही ती वास्तू पाहून भरून आले. साऱ्यांचे हात आपोआपच जोडले गेले.

नंतर आम्ही आपल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये  ब्रिटिशांनी स्थानबद्धतेत ठेवलेल्या ब्रह्मदेशच्या थिबा राजाचा तिथला लाकडी, सुंदर नक्षीकाम केलेला राजवाडा पाहिला. १७८२ मध्ये तो बांधला होता. त्याला ४२ राण्या होत्या. प्रत्येकीला वेगळा महाल. बाकीचे महाल बॉम्बस्फोटांत उद्ध्वस्त झाले. फक्त एकचा शिल्लक राहिला. संध्याकाळी जगातील मोठी ट्रल्लॠ४ल्ल इी’’ पाहिली. त्यावर एका लाकडी जाडजूड ठोकळ्याने प्रहार करायचा, की त्याचा नाद सारा परिसर निनादून टाकतो. पण तो ठोकळा एकटय़ाने उचलणं कठीण होतं. त्याकाळी बांधलेला एक लाकडी, पण मजबूत ब्रीजही आम्ही पाहिला.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ज्या ठिकाणी घडला ते सुभाषबाबूंचे इथले घर आजही सुस्थितीत आहे. हे संपूर्ण लाकडी, दुमजली घर आहे. त्यात त्यावेळचे फर्निचर आणि त्यांच्या काही वस्तू आहेत. त्यांची झोपण्याची, अभ्यासाची, बैठकीची खोली पाहत असताना ‘जरा याद उन्हे भी कर लो..’ ही ओळ नकळत मनात आली. गावाबाहेर टेकडीवर दूर घनदाट जंगलात ते आहे. मनात आले, त्यावेळी ते किती निर्जन असेल! आम्ही सर्वजण चौथऱ्यावर जमलो. ‘नेताजी सुभाषचंद्र की जय’ म्हणत नेताजींच्या विजिगीषु वृत्तीला सलाम केला. ही त्यांची कर्मभूमी होती. इथूनच रंगूनला प्रोव्हिजनल सरकार व आझाद हिंद सेनेची स्थापना करायचे त्यांनी ठरवले. याच ठिकाणी आझाद हिंद सेनेतील सैनिकांनी देशासाठी बलिदान केले. एक खंत मात्र मनात दाटून आली. कुठेही त्यांचा किंवा लोकमान्यांचा फोटो आढळला नाही. तेथील कारभारी म्हणाला, ‘गेल्या सत्तर वर्षांत कुणी भारतीय इथे फिरकलेच नाहीत.’ असो. ते घर आता सरकारी गेस्ट हाऊस झाले आहे. परवानगी काढूनच ते पाहावे लागते.

आमच्या सोबत शरद नेने हे पर्यटक होते. रंगून हे त्यांचे जन्मस्थान. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे ते ९१ नंबरचे घर पाहिले. त्यांना आपलं इथलं बालपण आठवलं. हृदय भरून आलं. त्यांच्या जुन्या घरातील कोरीवकाम असलेला जीना मालकाने तसाच ठेवलेला आहे. तो पाहून बालपणीच्या त्यांच्या स्मृती जागृत झाल्या. आज त्यांचे वय ८१ र्वष आहे. १९४२ साली ते सात वर्षांचे असताना दुसऱ्या महायुद्धात बॉम्बवर्षांव होऊ लागल्यामुळे ब्रह्मदेशहून ४२ दिवस चालत त्यांना कलकत्ता गाठावं लागलं होतं. त्यावेळी आपलं  इथलं घरदार, गुरेढोरं, मालमत्ता, जिव्हाळ्याची माणसं सोडून एका वस्त्रानिशी २०० कुटुंबे भारतात परत आली होती. शरद नेने तेव्हा सात वर्षांचे होते, पण त्यांना सगळं आठवत होतं. आपलं बालपण जिथे गेलं ते घर, तो परिसर पाहून त्यांना खूप आनंद झाला. आम्हीही त्यांच्या आनंदात सहभागी झालो.

ब्रह्मदेशचे हवामान काहीसे आपल्यासारखेच आहे. जणू दुसरं कोकण, गोवा वा श्रीलंका! बाकी नारळ मॉरिशससारखे पिवळे, लक्षद्वीपसारखे छोटे, हिरवे पोपटी, तर काही श्रीलंकेसारखे मोठमोठे घोसच्या घोस असणारे. नारळांची विविधता इथे पाहायला मिळते. पण प्रत्येक ठिकाणच्या शहाळ्यातील पाण्याच्या चवीत फारसा फरक जाणवला नाही. बाकी वृक्षवल्ली विपुल. त्यामुळे घरे लाकडी. सुंदर, कोरीव नक्षीकाम केलेलं फर्निचर. प्रशस्त राजवाडे. विशेष म्हणजे इथे घरांची छपरे निळी, लाल, पिवळी, रंगीबेरंगी होती.

मुबलक प्रमाणात साग. घनदाट हरित जंगल. त्यात राहणारे पांढरे हत्ती अन् पाढऱ्या गायी. बाजारांत लाकडी खेळणी व वस्तू, बांबूपासून बनवलेल्या पर्स, पक्षी वगैरे विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. कोवळ्या बांबूची पाने भाजी म्हणून खातात. त्याची भजी, लोणचंही छान लागतं. इथे जेवण आपल्यासारखंच. प्रामुख्याने भात व भाताचे प्रकार.

इथे नारळाच्या झाडावर बुंध्यापासून पाच फुटांवर वाळलेल्या झाडाचे खोड कापून गोल बांधतात आणि त्यांत पुष्परचना करतात. ती अतिशय सुंदर दिसते.

ब्रह्मदेशी माणसं गरीब, मागास असली तरी मनमोकळ्या स्वभावाची आहेत. त्यांची राहणी साधी. पुरुष मात्र स्त्रियांपेक्षा चणीने लहान वाटले. काटक, पण उंचीने लहानसर. ब्रह्मी लोक दिसायला बंगाली, नेपाळी आणि चिनी यांची भेसळ असल्यासारखे वाटतात. सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सहभाग आढळतो. त्यांची गोड वाणी, स्वभावातील मार्दवता, आतिथ्यशीलता व प्रामाणिकपणा प्रकर्षांने जाणवला. एकंदरीत म्यॅनमार म्हणजे स्वर्गच!

अंजली बापट

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड