डावपेचांच्या पातळीवर आजचे सरकार जुन्या सरकारपेक्षा खूपच जास्त सक्षम आणि यशस्वी आहे. या सरकारने सबळ राहण्याचे आश्वासन दिले, पाळले आणि त्याची जबरदस्त जाहिरात केली. या ताकद दाखविण्यात लोकशाही, स्वायत्त संस्था वगैरेंची तुडवणूकही केली. त्यासाठी दिवाणखानी चर्चामध्ये लोकशाही आता निर्थक ठरते आहे व तिला तिलांजली देणे गैर नाही, असेही मांडले जाऊ लागले आहे. यात ‘स्वातंत्र्य’ या मूल्याबाबतची तुच्छता आहे.

राजर्षी शाहूमहाराज गौरवग्रंथात नोंदलेली एक घटना अशी : दरबारातल्या चर्चेत एका गृहस्थांचे मत महाराजांच्या मतावेगळे होते. हे गृहस्थ मत बदलायलाही तयार नव्हते. आपल्या रोखठोक स्वभावाप्रमाणे महाराजांनी त्यांना फटकारले. दरबार संपताच हे गृहस्थ घरी गेले व त्यांनी कुटुंबीयांस आवराआवर करा, असे सांगितले. कारण संस्थानात राहून राजाशी वाकडे घेणे शक्य नव्हते. पण तेवढय़ात महाराजांकडून एकजण आला आणि म्हणाला, ‘‘महाराज म्हणाले, तुम्ही जायच्या तयारीत असाल. ते म्हणाले, जाऊ नका! म्हणाले, आम्हाला विरोध करणारे दरबारात हवेत.’’ ही कहाणी दहाएक वर्षांपूर्वी ‘आजचा सुधारक’ने उद्धृत केली होती. परंतु आता नेमका संदर्भ हाताशी नाही.

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Paytm Payments Bank
Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँडरिंगप्रकरणी मोठा दंड, अर्थ मंत्रालयाची कारवाई
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

या स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या घटनेच्या नमुन्याच्या कहाण्या स्वातंत्र्यानंतरही ऐकू येत. ‘शंकर्स वीकली’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचे चित्रकार-संपादक सरकारचा चांगलाच समाचार घेत. बऱ्याचदा त्यांचा रोख पंतप्रधान नेहरूंवरही असे. एकदा नेहरू व शंकर यांची भेट झाली. ती संपताना नेहरू म्हणाले, ‘‘नेव्हर स्पेअर मी, शंकर!’’ ..म्हणजे ‘मला कधीही ‘सोडू’ नकोस!’ डॉ. राममनोहर लोहिया, बॅ. नाथ पै हे नेहरूंचे कठोर टीकाकार होते. लोकसभेतली त्यांची भाषणे ऐकायला नेहरू आवर्जून हजर राहात.

आणीबाणीत अनुभवलेला एक प्रकार असा- आमच्या बांधकाम कंपनीचे कार्यालयीन अधीक्षक इंदूरकर रा. स्व. संघाचे सक्रिय सदस्य असल्याने तुरुंगात होते. त्यांचा पगार घरी पोचवला जात असे. माझे वडील महिन्यातून एकदा तुरुंगात इंदूरकरांना भेटायला जात. दरवेळी विचारत- ‘‘कोणाच्या कुटुंबाला बाहेर मदत हवी आहे का?’’ एकदाच इंदूरकरांनी अशी मदत द्यायला सांगितले. तीही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदा प्रसाद कश्यप यांच्या कुटुंबाला!

आणीबाणी उठल्यावर लवकरच माझे वडील वारले. इंदूरकरही निवृत्त झाले. पण इंदूरकर, बिंदाजी आणि मी- आमचे स्नेहबंध त्या दोघांच्या हयातीत कायम राहिले.

अशा घटना, कहाण्या, अनुभवांमुळे भारतीय संस्कृती सहिष्णु आहे असे म्हणता येत होते. अगदी संजय गांधींच्या अपमृत्यूनंतरचा मोरारजी देसाईंचा शेरा- ‘‘कुटुंबावर मोठाच आघात!’’ हाही सहिष्णु परंपरेतलाच. सहिष्णुता होती; कारण मते व त्यातून उद्भवणारे मतभेद हे खरेखुरे, मनापासूनचे व विवेकी असत. ‘मतभेद’ हा शब्द शत्रुत्वाचा समानार्थी मानला जात नसे.

पण आज काय स्थिती दिसते?

आजचे भारत सरकार व त्याने ज्याची जागा घेतली ते ‘यूपीए-२’ सरकार यांच्या अंतिम ध्येयांमध्ये फरक होते व आहेतच. जसे- एक पक्ष स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवतो, तर दुसऱ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना ‘सिक्युलर’ (Sickular) म्हणायला लाजत नाहीत. धर्म आणि राजकारण व शासन- प्रशासन यांच्यात पूर्ण फारकत दोन्ही पक्ष करू शकलेले नाहीत. आजच्या सरकारातले अनेकानेक नेते तशी फारकत करूही इच्छित नाहीत. उलट, तशी फारकत रोगट मानली जाते, असे ‘सिक्युलर’ हा शब्द दर्शवतो.

पण ध्येयांमधले फरक धोरणांमध्ये मात्र उतरताना दिसत नाहीत. आधार कार्डाचा वापर, अमेरिकेशी अणुकरार करणे, वस्तू व सेवा कर ऊर्फ जी. एस. टी.- अशा कोणत्याही मुद्दय़ाबाबत दोन सरकारांच्या भूमिकांमध्ये असलेले फरक तपासायला सूक्ष्मदर्शक लागेल. अर्थात, श्रेय कोणी घ्यायचे, यावर दोन्ही पक्ष जोराने ‘मी’ असेच म्हणतात!  याचे कारण दोन्ही सरकारांची विकासाची व्याख्या साधारणपणे एकच आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन- ऊर्फ जी. डी. पी. वाढणे.. वाढत्या वेगाने वाढणे म्हणजेच विकास, असे दोन्ही सरकारांचे मत आहे.

पण सरकारांपुढचे प्रश्न नेहमीच अर्थ-राजकीय असतात. त्यांच्यात आर्थिक भाग, राजकीय भाग असे फरक पाडता येत नाहीत. आधार कार्डात नोंदलेली माहिती जर सरकार गुप्त ठेवू शकत नसेल तर जिथे-तिथे आधारचा संदर्भ मागणे हा नागरिकांच्या खासगीपणावर मोठाच आघात ठरू शकतो.

अणुऊर्जेच्या उत्पादनात अंगभूत धोके असतात; ज्यामुळे संभाव्य अपघातांची जबाबदारी संयंत्र पुरवठादारावर टाकली जायलाच हवी. कारण अणुऊर्जेबाबतचे अपघात मोठय़ा भूभागांना हजारो वर्षांसाठी निरुपयोगी करू शकतात. चेर्नोबिल (सोव्हिएत रशिया), विंडस्केल (ग्रेट ब्रिटन), थ्री माईल आयलंड (अमेरिका), फुकुशिमा (जपान) ही अत्यंत प्रगत देशांमधल्या अपघातांची यादी हेच दाखवते- की अणुऊर्जेचे महाभूत सांभाळूनच जागवलेले बरे; नाहीतर कुडनकुलम्, जैतापूर हे परिसरच आपण गमावून बसू.

असे सारे असूनही दोन्ही सरकारे प्रत्यक्षात मात्र सारखेच वागता-बोलताना ‘‘आम्ही त्यांच्याइतके निष्काळजी नाही/ नव्हतो,’’ हे ठासून सांगतात. म्हणजे खरे तर धोरणाच्या पातळीवर राजकारणी- प्रशासकीय वर्गात आज अंतर्गत मतभेद नाहीत; मग पक्षोपपक्ष वेगवेगळे का असेनात!

आणि मतभेद नाहीत तेव्हा सहिष्णुताही अनावश्यक आहे. जेव्हा दुसऱ्याचे म्हणणे आपल्या भूमिकेपेक्षा वेगळे असते तेव्हा ‘‘म्हणू द्या त्यांना हवं ते!’’ म्हणण्याने थोडी दिलदारी दाखवता येते. पण जर तेही आपल्यासारखेच म्हणत असतील तर मात्र हा श्रेय लाटण्याचा प्रकार ठरतो. मग कुठली सहिष्णुता आणि कुठले काय! ध्येये वेगळी मानावी लागतात. धोरणे एकसारखी आहेत, तेव्हा यशस्वी डावपेच जिंकणारच!

आणि या पातळीवर.. डावपेचांच्या पातळीवर आजचे सरकार जुन्या सरकारपेक्षा खूपच जास्त सक्षम आणि यशस्वी आहे. या सरकारने सबळ राहण्याचे आश्वासन दिले, पाळले आणि त्याची जबरदस्त जाहिरात केली. या ताकद दाखविण्यात लोकशाही, स्वायत्त संस्था वगैरेंची तुडवणूकही केली. त्यासाठी दिवाणखानी चर्चामध्ये लोकशाही आता निर्थक ठरते आहे व तिला तिलांजली देणे गैर नाही, असेही मांडले जाऊ लागले आहे. यात ‘स्वातंत्र्य’ या मूल्याबाबतची तुच्छता आहे. शिस्त, संकुचित देशप्रेमाच्या व्याख्या, शक्तिपूजन यांतून ‘समता’ हे मूल्य नाकारले जात आहे. देशांतर्गत व परदेशी शत्रू ठरवून, ठसवून बंधुभावाचा धिक्कार केला जात आहे.

खासगी सेना, पगारी सायबर सेना, बारकाईची माध्यम-‘हाताळणी’ अशा नवनव्या डावपेचांमधून विचारप्रणालीबाबतची, विचारवंतांबाबतची तुच्छता जास्त जास्त अधोरेखित होत आहे. अर्वाच्य भाषा, व्यक्तिगत नालस्ती, अमानुष धमक्या अशा टप्प्यांनी संवादाचा दर्जा घसरत घसरत नळावरच्या भांडणाच्या पातळीला पोहोचला आहे. ही स्थिती आणि सहिष्णुता यांचा काहीही संबंध नाही असे माझे आकलन आहे.

पण मला भारतीय समाजात व बाहेरही संवाद हवा आहे. लोकांमध्ये खरीखुरी विवेकी मते उत्पन्न होऊन हवी आहेत. जीडीपी, शिस्त, देशप्रेम या संकल्पना केवळ आकडेवारी व घोषणाबाजीतून मांडल्या न जाता त्यांच्यामागे मूल्यविचारही हवा आहे. त्यासाठी नक्षली, काश्मिरी फुटीर अशा साऱ्यांशी बोलत राहावे असेच मला वाटते. एकच उदाहरण देतो.. स्कँडिनेव्हियन देश ‘आमच्याकडे महाल नाहीत आणि झोपडपट्टय़ाही नाहीत,’ असे गर्वाने सांगतात आणि ते खरेही आहे. यात समता हे मूल्य आहे; जे मला ‘सब का साथ, सब का विकास’मध्ये दिसत नाही. कारण त्या घोषणेला अनुरूप धोरणे दिसत नाहीत.

पण मी ‘एक तीळ सातजणांनी करंडून खावा,’ असे म्हणणाऱ्या नामदेव ढसाळांच्या ‘माण्सां’पैकी आहे. जीवसृष्टी आणि माणसांचा इतिहास हा स्पर्धेइतकाच, किंवा जरा जास्तच सहकार्यानेही पुढे जाण्याचा, जास्त जास्त ‘मानवी’ होण्याचा आहे, असेच माझे वाचन व माझा अभ्यास मला सांगतात.

मला नळावरची भांडणे कशी आवडणार?

पण मला काय आवडते याला तरी महत्त्व काय? आजच्या अतिकार्यक्षम डावपेच वापरणाऱ्या सत्ताधीशांच्या अखत्यारीत आपले काय होणार, हेच केवळ महत्त्वाचे!आज देश हे एक कुरण झाले आहे. त्यावर मेंढय़ा कोणी चाराव्यात, यावरच्या वादांना ‘राजकारण’ म्हटले जाऊ लागले आहे. या वादात एका पक्षाने चराईचे हक्कच नव्हे, तर बहुतांश मेंढय़ाही जिंकून घेतल्या आहेत. (आणि ‘तिकडे’ असताना पापी असलेली मेंढी ‘इकडे’ येताच पुण्यवान कशी झाली, ते सांगताना आपले मुख्यमंत्री गडबडून जात आहेत!)

तर देशाच्या सीमांमध्ये ज्याला सत्ताधीशांनी दबावे असा शत्रू उरलेला नाही. बाहेरील शत्रूंपैकी जास्त कुरबुरी करणारा, कुरापती काढणारा शत्रू स्वत:च अंतर्गत वादांनी ग्रस्त आहे. जास्त संयत शत्रू शांतपणे फास आवळतो आहे. पण आजची आंतर्देशीय संस्कृती बाहेरच्या शत्रूला नियंत्रणात ठेवेल असे परराष्ट्र धोरण आपण आखू शकतो. (मी नावे घेत नाही. कारण माझ्या मते, मी ‘केवल’ (abstract) विश्लेषण करतो आहे!) यापेक्षा मोठा धोका मात्र कुरणाच्या मर्यादितपणातून उभा ठाकतो. कोणत्याही भूभागात मोजकीच नैसर्गिक संसाधने असतात. त्यांच्या वापरात उधळमाधळ चालत नाही, हे तर झालेच; पण त्यांच्या वापरातली विषमताही डोळ्यांवर येते. आज पश्चिम व उत्तरेचे अनेक प्रांत- जे मूक आणि बोलभांड आंदोलनाने ग्रस्त आहेत- त्यांचा विचार करा. कोणीतरी खूप काही उपभोगते आहे आणि आपल्याला मात्र तिथवर पोचू दिले जात नाही, या भावनेतूनच रेड्डी, मराठा, पटेल, मीणा, गुजर, जाट वगैरे आंदोलने उभी राहिली आहेत.

आणि ही आंदोलने शमवायला जास्त जास्त निसर्गदोहन होत आहे. ‘‘नाही, नाही; आम्ही नवनवे स्रोत विकसित करू!’’ हा दावा रंगीत बुडबुडे फुगवणारा आहे. तसले साबणाचे फुगे फुटताना डोळ्यांत साबण जाऊन रडू येते. एक लक्षात ठेवावे, की आजवर या पृथ्वीवर उद्भवलेल्या कोटय़वधी जीवजातींपैकी एखादा टक्काच ‘हयात’ आहेत. कित्येक जीवजाती तर कोटय़वधी वर्षे जगून लाखभर वर्षांत लोप पावल्या. आजच्या रूपातला माणूसच लाखभर वर्षे जुना आहे. जर तो अडाणी झ्याकीत गेला, ‘‘काऽऽही होत नाही!’’ म्हणत राहिला, तर तो दोन-चार पिढय़ांतही संपू शकेल.

तेव्हा विचार कराच- की एक तीळ किती जणांनी करंडून खावा. नाहीतर आहेच- चीनशी स्पर्धा करत जीडीपी वाढवणे!

नंदा खरे nandakhare46@gmail.com