यांच्या स्वातंत्र्यविषयक विविध लेखांचे संकलन असलेल्या ‘अभयारण्य’ या वैचारिक लेखसंग्रहाची नवी आवृत्ती देशमुख आणि कंपनीने प्रसिद्ध केली आहे. देशातील सद्य:स्थितीलाही चपखल लागू पडणारे विचार प्रा. कुरुंदकरांनी फार पूर्वीच मांडून ठेवले आहेत. पैकी ‘व्यक्तिपूजा’ या सार्वकालीन रोगाची चिकित्सा करणारा या पुस्तकातील लेख आम्ही पुन:प्रसिद्ध करीत आहोत..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याला २५ वर्षे होत आलेली आहेत. एका मर्यादित अर्थाने आपले स्वातंत्र्य आता स्थिर झाले असून राष्ट्र क्रमाक्रमाने प्रौढ होऊ लागले आहे आणि त्याबरोबरच आपली लोकशाहीही प्रौढ होऊ लागली आहे. राष्ट्राच्या लोकशाहीच्या बाल्यावस्थेत निर्भयपणे ज्या चर्चा, चिकित्सा करणे आपल्याला जमले नसते त्या चर्चा आपण आता सुरू केल्या पाहिजेत. भोवताली ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा सर्वागीण आणि संपूर्ण अर्थ जनतेला आकलन झालेला असतोच असे नाही. शिवाय स्मरणशक्तीही अतिशय दुबळी असते. अशा अवस्थेत वेळोवेळी आपल्या सर्व श्रद्धा पुन:पुन्हा घासूनपुसून, तावूनसुलाखून घेण्याची गरज असते. याबाबत परंपरेने चालत आलेल्या भूमिका बदललेल्या परिस्थितीत कित्येकदा बाद होतात. कित्येकदा त्यांची मर्यादा आपल्याला दिसू लागते. कधी कधी तर अगदी मुळामध्ये जाऊन पाहिले म्हणजे आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आधार तपासून घेण्याची गरज निर्माण होते.

आपण समजतो तितके श्रद्धांची तपासणी करण्याचे कार्य सोपे नाही. स्वत:ला अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ म्हणविणाऱ्या मंडळींच्याही स्वत:च्या मनातील विविध श्रद्धा आणि पूर्वग्रह अशा मूलभूत तपासणींच्या आड येतात. श्रद्धांची अशी मूलभूत तपासणी करण्याचे कार्य ज्या दिवशी आपण सुरू करू, त्या दिवशी एका विद्वानाच्या निष्कर्षांवर असलेल्या सर्वाचे एकमत होईल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. एक तर तपासणी करताना जे दृष्टिकोण स्वीकारले जातात ते दृष्टिकोण नेहमीच एक असतील असे नाही. म्हणजे ज्या पुराव्यांच्या आधारे आपण तपासणी करणार, त्या पुराव्यांचा अर्थ आणि संदर्भ हुडकण्याची वेळ येताच ठिकठिकाणी दुमत होण्याचा संभव आहे. अशा वेळी जर तपासणीचे नियम आपल्याला पटले नाहीत तर परत त्यांची फेरतपासणीसुद्धा करून घ्यायला पाहिजे आणि ते काम न संतापता, न चिडता व्हायला पाहिजे. वैचारिक तपासणी होताना जी हुल्लडबाजी आणि आक्रस्ताळेपणा होतो, त्यामुळे वैचारिक स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. इतकेच खरे नाही, तर असत्याला सत्याची प्रतिष्ठा मिळाल्यामुळे ते जर तसेच दीर्घकाल सुस्थिर राहिले तर त्याचा परिणाम एकूण समाजाच्या हितावर अनिष्ट असा होतो.

सर्वसामान्य समाजाच्या मनात जे ग्रह-पूर्वग्रह असतात त्यांची निर्भयपणे चिकित्सा करण्याचे कार्य अलीकडे मंदावलेलेच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांच्याविषयी आपण चिकित्सक विचार करणार, ती जनतेची आराध्यदैवते आहेत. विशेषत: महाराष्ट्रात म. फुले, राजर्षी शाहू महाराज, लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ही पाच नावे अशांपैकी आहेत. थोडय़ाफार प्रमाणात आपापल्या अनुयायांसाठी म. गांधी, पू. विनोबा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची नावेही अशाचपैकी आहेत. वर ज्या नावांचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वाच्याच विषयी माझ्या मनात अतिशय आदर आणि कृतज्ञता आहे. पण ही कृतज्ञता आणि हा आदर मला एका गोष्टीकडे दुर्लक्ष करू देत नाही व ती गोष्ट म्हणजे ही की, या मंडळींना समाजाच्या दैवतांचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि म्हणून त्यांचा चिकित्सक अभ्यास करणे कठीण झालेले आहे.

ज्या माणसाला म. गांधींविषयी अतीव श्रद्धा आणि आदर, त्या माणसाने गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्याविषयीही आपल्या मनात अत्यंत आदर आहे, हे सांगणेच आपल्याला प्रथमत: पटत नाही. कारण आपण मनातल्या मनात दोन गोष्टींची सांगड घालून टाकलेली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तीची मते- निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे या दोन गोष्टी एकत्र संभवतात हेच आपण विसरून गेलेलो आहोत. वर्तमानकाळातील लोकांना ज्या व्यक्ती परस्परांच्या विरोधी उभ्या राहिलेल्या दिसतील, त्या व्यक्ती खरोखरीच भविष्यकाळातल्या मंडळींना एकमेकांच्या विरोधी वाटतील असे नाही. लो. टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या दोन पुरुषांकडे पाहणे जितके आवश्यक आहे, तितकेच दोघांच्या भूमिकांमधील फार मोठे साम्य पाहणेही आवश्यक आहे. आणि दोन परस्परविरोधी भूमिका कालांतराने एकमेकांच्या पूरक भूमिका ठरल्या, हेही पाहणे आवश्यक आहे. आज आम्ही स्वतंत्र भारतात लोकशाही नांदवीत आहोत. या लोकशाहीत संसदेतील सभासद कसा असावा? असे जर मला कुणी विचारले तर त्याबद्दल आदर्श म्हणून सांगताना टिळक आणि गांधीजी यांची नावे मला सांगता येणे कठीण आहे. टिळक आणि गांधी यांच्याविषयी मला कितीही आदर असला, तरी त्यांना कुशल संसद सदस्य होणे कुठवर जमले असते याविषयी मला दाट शंका आहे. कुशल संसद सदस्याचा आदर्श म्हणून जी नावे आपण घेऊ, ती घेताना गोखले या मवाळ- पक्षीयाचे, किंबहुना श्यामाप्रसाद मुखर्जी या जनसंघाच्या पक्षनिर्मात्याचे नाव घेण्यास संकोच वाटण्याचे काही कारण नाही. किंबहुना निष्णात कायदेपंडित म्हणून नाव घेताना मरहूम जीना यांचेही नाव घेण्यास लाज वाटण्याचे कारण नाही.

जीवनाला एकच एक कक्षा आणि गती नसते. अनंत पातळ्या, अनंत दिशा आणि अनंत गरजा यांनी जीवन बनलेले असते. त्यात एकेकांचा स्वतंत्र अधिकार असतो. म्हणून जी माणसे परस्परविरोधी दिसतात, तीही वंदनीय गुणांची प्रतिनिधी असतात. दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्तींविषयी नितांत आदर एकाच माणसाच्या मनात असू शकतो. इतकेच माझे मत नाही, तर ज्यांच्या मनात असा आदर नसतो, ती एकेरी माणसे जीवनाच्या सर्वागीण विकासाला अडथळा आहेत असेही मी मानतो.

आदराच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे- ज्या माणसांविषयी आपल्या मनात आदर असतो ती माणसे परिपूर्ण आहेत, अशी आपली धारणा असण्याचे काहीच कारण नसते. माझ्या मनात असा अतीव आदर पं. नेहरूंविषयी आहे. पण हा आदर कितीही असला तरी मी त्यांना परिपूर्ण मानण्यास तयार नाही. नव्या भारताचे भाग्यविधाते फार मोठे गायक होते अगर डॉक्टर होते किंवा इंजिनीयर होते अगर सायंटिस्ट होते, फार काय- बऱ्यापैकी कुस्तीगीर होते असे मी मानणार नाही. नेहरूंच्या मोठेपणाची ही क्षेत्रे नव्हेत याचे मला पूर्णपणे भान आहे. ते ज्या क्षेत्रात होते त्या क्षेत्रातच त्यांचा मोठेपणा शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण ते ज्या क्षेत्रात होते त्या क्षेत्रातीलही त्यांची सर्वच मते बरोबर होती असे समजण्याचे कारण नाही. आरंभीच्या काळात पंडितजी भाषावार प्रांतरचनावादी होते. नंतरच्या काळात त्यांना असे वाटू लागले की, भारतीय ऐक्यासाठी संमिश्र संस्कृती असणे आवश्यक आहे. त्यांना असेही वाटत होते की, अशी संमिश्र संस्कृती हैदराबाद संस्थानात निर्माण झालेली आहे. म्हणून हैदराबाद संस्थान टिकायला पाहिजे. त्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे शेवटच्या काळात ते भाषावर प्रांतरचनेचे पुरस्कत्रे उरलेले नव्हते. राजकारणाच्या क्षेत्रात झाले तरी नेहरूंची सर्वच मते पटण्याची आवश्यकता आहे, त्याशिवाय त्यांच्याविषयी आदर दाखविता येत नाही असे मला वाटत नाही. मते पटण्याचा आणि आदराचा संबंध नसतो. आदराचा संबंध त्या माणसाने केलेल्या थोर कार्याचे मोल पटण्याशी असतो.

सामान्यत्वे प्रत्येकाच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी आदर असतो. आई-वडिलांविषयीचा हा आदर त्यांची मते पटण्यातून निर्माण होतो असे समजणे चुकीचे आहे. उलट, बापाची मते ज्या मुलाला सर्वच्या सर्व पटतात, तो मुलगा वयाने मोठा झाला तरी बुद्धीने प्रौढ झाला काय, याविषयी मला फार मोठी शंका वाटत आलेली आहे. बापाची सर्वच्या सर्व मते पटणे हा मी एक प्रकारचा आंधळेपणा मानतो. आणि आपले स्वातंत्र्य सांगण्यासाठी बापाची कोणतीच मते न पटणे, हा मी दुसऱ्या प्रकारचा आंधळेपणा मानतो. कारण बापाजवळही अनुभवातून निर्माण झालेले सांगण्याजोगे पुष्कळसे ज्ञान असते. खरा प्रश्न बापाची मते पटण्याचा किंवा एकही मत न पटण्याचा नसतो, तर स्वत:चे मत असण्याचा असतो. ज्याला स्वत:ची मते आहेत, त्याला बापाची सर्वच मते पटणार नाहीत आणि एकही मत पटत नाही असेही घडणार नाही. उलट, स्वत:च्या भूमिकेवर दृढ असणाऱ्या शहाण्या माणसाला काही प्रमाणात सर्वाशीच सहमत असणे, काही प्रमाणात सर्वाशीच असहमत असणे भाग असते.

पण या मते पटण्या- न पटण्यावर कुणाच्याही बापाचे मोठेपण अवलंबून नसते. पित्याचे मोठेपण पुत्राचे संगोपन करणे, त्याला लहानाचा मोठा करणे, त्याला कर्ता करणे यावर अवलंबून असते. हे जे त्याचे कार्य आहे, त्याचे मूल्य ओळखता आले म्हणजे मते न पटूनही आदर शिल्लक राहतो. आणि हे कार्यच जर ओळखता आले नाही, तर मग आदर असला काय आणि नसला काय, या गोष्टीला फारसा अर्थ नसतो. व्यक्तीच्या जीवनात माता-पित्याचे जे स्थान असते, ते समाजाच्या जीवनात आदरणीय, थोर पुरुषांचे स्थान असते. हे स्थान त्या- त्या थोर पुरुषाच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. समाजातील त्याच्या कार्याच्या महत्त्वावर अवलंबून असते. त्याची मते पटण्या- न पटण्यावर अवलंबून नसते. उद्या जर एखादा माणूस लो. टिळकांविषयी त्यांच्या सुबोध मराठी भाषाशैलीबद्दल मला फार आदर आहे, असे सांगू लागला तर त्याच्या सांगण्याला मी फारसे महत्त्व देणार नाही.

लो. टिळकांविषयीचा आदर त्यांच्या सुबोध मराठी भाषाशैलीमुळे असू शकतो. पण या कारणामुळे त्यांच्याविषयी आदर बाळगणे याचा अर्थ त्यांना समाजजीवनाचे शिल्पकार व समाजाचे नेते म्हणून अमान्य करणे, हा आहे. भाषाशैली हा टिळकांच्या जीवनाचा आनुषंगिक भाग आहे. लो. टिळक भाषाशैलीमुळे समाजाचे नेते झालेले नाहीत, किंवा म. फुले यांना त्यांच्या भाषाशैलीमुळे, तिच्या खडबडीतपणामुळे त्यांच्या नेतृत्वाला बाधही आलेला नाही. जर कुणी लो. टिळकांना समाजनायक म्हणून मान्य करणारच नसेल तर ही त्यांची भूमिका मला पटत नाही, असेच मी म्हणेन. मी टिळकांना समाजाचे नायक मानतो. पण इतर कुणाला तसे ते वाटले नाहीत तर तेही मत त्याला ठेवण्याचा हक्क मी मान्य करतो. फार तर आपण कारणे मागू आणि त्यावर चर्चा करू. पण लो. टिळक हे नायक होते, हे एकदा मान्य केल्यानंतर समाजनेते म्हणून त्यांचे स्थान ठरवावे लागेल. ते भाषाशैलीवर अवलंबून नाही. समाजनेते म्हणून टिळकांचे जे स्थान आपण निश्चित करू, त्यावर त्यांच्याविषयीचा आदर अवलंबून राहील. लो. टिळकांची कित्येक मते पटण्या- न पटण्याशी त्याचा काही संबंध नाही.

कोणत्याही नेत्याविषयी डोळस अभ्यास करताना मी स्वत:ला एक प्रश्न विचारतो. आणि असा अभ्यास करणाऱ्या इतर कोणालाही तोच प्रश्न विचारतो. हा प्रश्न तीन विभागांचा आहे. या नेत्याच्या मोठेपणाची क्षेत्रे कोणती नाहीत, याची दिशा दाखवीत त्यांच्या मोठेपणाची क्षेत्रे कोणती आहेत, हे सांगा, हा या प्रश्नाचा पहिला भाग आहे. या नेत्याचे नेमके मोठेपण तुम्ही कशात मानता? त्याचे महत्त्व कोणते मानता, हे सांगा, हा या प्रश्नाचा दुसरा भाग आहे. त्या नेत्याच्या मर्यादा कोणत्या, चुका कोणत्या, त्याचा न पटणारा भाग कोणता, हे सांगा, हा तिसरा भाग आहे. कोणत्याही नेत्याचा असा तिहेरी अभ्यास आपण प्रामाणिकपणे करायला तयार आहोत काय? विशेषत: आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का? हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो. हे समाजाचे चिडणे मी समर्थनीय जरी मानले नाही तरी क्षम्य मानतो. पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर या आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असे मला वाटत नाही.

जोपर्यंत मी हे असे सर्वसामान्य भाषेत बोलत आहे, तोपर्यंतच सगळे ठीक आहे. पण उद्या मी लो. टिळकांच्या मर्यादा दाखवू लागलो तर पुणे खवळणार! राजर्षी शाहूंच्या मर्यादा दाखवू लागलो तर कोल्हापूर खवळणार! हे मला माहीत आहे. मी जे विवेचन करीन ते सर्वस्वी बरोबर आहे आणि सर्वमान्य समजावे, असा आग्रह कुणीच धरू नये. पण मला माझे विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण अपेक्षिण्याचा माझा हक्क आहे. वर खवळण्याचा उल्लेख केला आहे, त्याच्याशेजारी टाळ्यांचाही उल्लेख केला पाहिजे. जेव्हा मी टिळकांविषयी त्यांच्या मर्यादा सांगणारे लिहीन तेव्हा एक गट टाळ्या वाजवील. शाहू महाराजांविषयी लिहीन तेव्हा दुसरा गट टाळ्या वाजवील. आणि जर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिले तर वरील दोघेही गट एकत्र येऊन टाळ्या वाजवतील. नेत्यांची जात कोणती, यावर आदर बाळगणाऱ्यांची जात ठरते. आणि लिहिणाऱ्याची जात कोणती, यावर टाळ्यांचा अगर जोडय़ांचा कार्यक्रम ठरतो. ही घटना चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही.

आधीच लोकशाहीला मतांची अपेक्षा असते. म्हणून राजकीय नेते चिकित्सा सोडून दांभिकपणे सर्वाच्याच विषयी गोड बोलू लागतात. समाजाला श्रद्धास्थाने असतात, म्हणून विचारवंत एकाकी असतो. त्याने निर्भय बनले पाहिजे हे मान्य, पण आपणही सुजाण बनलो पाहिजे. जनतेच्या श्रद्धेविरुद्ध जाऊन निर्भयपणे चिकित्सा करण्याचे सामर्थ्य आणि अभ्यासाविषयी अनादर न बाळगता चिकित्सा करण्याचे सामर्थ्य मला तरी महाराष्ट्रात न. र. फाटक यांच्याइतके इतर कुणाजवळ आढळले नाही. पण त्यांच्यासारख्या श्रेष्ठ संशोधकावर १८५७ प्रकरणी किंवा रामदास संशोधन प्रकरणी जो गदारोळ उठला तो मी विसरू शकत नाही. याचा अर्थ फाटकांची सर्वच मते मला मान्य आहेत असे नाही. पण त्यांचा निकोप आणि निर्दोष आणि निराग्रही चिकित्सेचा आग्रह मला मान्य आहे. मखरात देवता ठेवून उत्सव साजरे करण्याच्या बालिशपणातून बाहेर पडण्याइतकी प्रौढता दाखविण्याची वेळ आली नाही, इतकाच या विवेचनाचा अर्थ.

– प्रा. नरहर कुरुंदकर