दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगलखोरांवर अश्रुधूर किंवा लाठीमार करणे आदी मार्गाचा वापर करण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहेत. काश्मीरसारख्या सतत धगधगत्या प्रदेशांत या अस्त्रांचा दंगेखोरांवर परिणाम होईनासा झाला आहे. अशा वेळी प्रक्षुब्ध दंगलखोरांना आणि नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या दहशतवाद्यांवर काबू मिळवण्यासाठी नव्या ना-प्राणघातक शस्त्रांचा वापर करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. अशा काही शस्त्रांविषयी..
कल्पना करा : सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे तशी तणावपूर्ण परिस्थिती आहे. शांततेचे आवाहन झुगारून देत संतप्त लोकांचा मोठा जमाव पोलीस/ सुरक्षा दलांवर चाल करून येत आहे. विखारी घोषणा देत पोलिसांवर दगडफेक करत आहे. स्थानिक पोलीस/ सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसमोर पेचप्रसंग उभा आहे. जमावाला काबूत आणण्यासाठी गोळीबार करावा तर आपलेच नागरिक मारल्याचा दोष माथी येऊन परिस्थिती आणखीनच स्फोटक बनण्याचा धोका; आणि काही कारवाई न करावी तर कर्तव्यात कसूर करून आपल्याच सहकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड केल्याचा ठपका येण्याची शक्यता. अशात अचानक जमावात चलबिचल होऊ लागते. आंदोलकांमधील काहींना उलटय़ा, काहींना जुलाब, तर काहींना डोकेदुखी, मानसिक अस्वस्थता आणि नैराश्य अशी लक्षणे जाणवू लागतात. नेमके काय होत आहे हे कोणालाच कळत नाही. परंतु काही वेळातच आंदोलक पांगतात. परिस्थिती नियंत्रणात येते. तणाव निवळतो..
हे स्वप्नरंजन नाही किंवा एखाद्या विज्ञानकथेचाही भाग नाही. असे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे आणि काही देशांनी दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा वापरही केला आहे. ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’ नावाने ओळखली जाणारी ही ना-प्राणघातक शस्त्रे (‘नॉन-लीथल वेपन्स’) म्हणजेच जीवघेणी न ठरणारी शस्त्रे आहेत. मानवी कान एका ठरावीक मर्यादेतील ध्वनिलहरीच ऐकू शकतात, किंवा डोळ्यांना ठरावीक तरंगलांबीचाच (वेव्हलेंथ) प्रकाश दिसतो. त्याच्या पलीकडील प्रकाशाला अवरक्त (इन्फ्रारेड) आणि अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरण म्हणतात. तसेच ध्वनीतही इन्फ्रा साऊंड आणि अल्ट्रा साऊंड असे प्रकार आहेत. त्यातील इन्फ्रा साऊंडमध्ये विलक्षण गुणधर्म आहेत. विशिष्ट तरंगलांबी किंवा वारंवारितेचा (फ्रीक्वेन्सी) इन्फ्रा साऊंड वापरल्यास वरील परिणाम साधता येतो. तो तात्पुरता असतो. काही वेळाने प्रभावित माणसे पुन्हा पूर्ववत होतात. ध्वनी ही एक ऊर्जा आहे. ती हवी त्या दिशेला प्रवाहित करता येते आणि तिचा एक शस्त्र म्हणून वापर करता येतो. म्हणून त्यास ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ म्हणतात. ध्वनी असल्याने तो दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवी कानांच्या मर्यादेपलीकडचा असल्याने तो ऐकूही येणार नाही. त्यामुळे दंगलीच्या वेळी कोणाला काय होत आहे हे कळणार नाही; परंतु अपेक्षित परिणाम मात्र साधला जाईल.
जगभरात अनेक वादग्रस्त प्रदेशांमध्ये असंतुष्ट नागरिक आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या सरकारी यंत्रणा यांच्यात असे संघर्षांचे प्रसंग नेहमीच येतात. रणांगणावर शत्रूशी सामना असेल तर एक वेळ अर्निबध बळाचा आणि स्फोटक सामग्रीचा वापर करणे समर्थनीय ठरू शकते. पण कायद्याच्या चौकटीत राहून विरोधाचा न्याय्य आणि घटनादत्त हक्क बजावणाऱ्या आपल्याच नागरिकांवर असा बळाचा वापर करण्याबाबत कायमच वाद होत राहिला आहे. अशा प्रकारची अनेक शस्त्रे प्रथम दहशतवादी किंवा शत्रूंविरोधात वापरण्यासाठी म्हणून बनविण्यात आली. मात्र, आता त्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावरील दंगल नियंत्रणात आणण्यासाठी तसेच दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ओलीस ठेवले असल्यास अशा प्रसंगी करण्याचा विचार सुरू आहे.
ना-प्राणघातक शस्त्रांपैकी सर्वसामान्य लोकांच्या परिचयाची शस्त्रे म्हणजे लाठीमार, अश्रुधूर, मिरीची पूड डोळ्यांत फवारणे, पाण्याच्या जोरदार फवाऱ्याचा मारा करणे किंवा रबरी गोळ्या झाडणे. पण हे उपायही पूर्णपणे धोकामुक्त नाहीत. रबर बुलेट्स म्हणून वापरल्या जाणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या म्हणजेही धातूच्या गाभ्यावर रबरी वेष्टण चढवलेल्या गोळ्या असतात. त्या कमी अंतरावरून वर्मी लागल्या तर जीव जाऊ शकतो. अश्रुधुराची नळकांडी फोडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बंदुकीतून ती डागली जातात. जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथे २००९ साली दोन महिलांवर बलात्कार करून त्यांना ठार मारल्याचा आरोप लष्करी जवानांवर केला गेला. त्यानंतर जनमत प्रक्षुब्ध होऊन तिथे मोठय़ा प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. ऑक्टोबर २००९ मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनात सुरक्षा दलांनी डागलेले धातूचे अश्रुधुराचे नळकांडे डोक्याला लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलन बरेच चिघळले. काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्येही पेलेट गन्स- म्हणजे छऱ्र्याच्या बंदुकांच्या वापराने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. असा गोळीबार कमरेच्या खाली करण्याचा नियम असूनही सुरक्षा दले जाणूनबुजून डोक्यावर आणि महत्त्वाच्या अवयवांवर नेम धरून हल्ला करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यातून सुरक्षा दले, सरकार आणि स्थानिक नागरिक यांच्यातील दरी वाढते आहे. मन्नान बुखारी यांनी ‘काश्मीर- स्कार्स ऑफ पेलेट गन : द ब्रुटल फेस ऑफ सप्रेशन’ नावाचे पुस्तकच लिहिले आहे. त्यात त्यांनी अशा प्रकारच्या छऱ्र्यानी डोळे गमावलेल्या तसेच जखमी होऊन कोमात गेलेल्या तरुणांची आकडेवारीसह व्यथा मांडली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर तरुण आंदोलनकर्ते जखमी होऊन त्यांच्या औषधोपचारांवर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा खर्च करावा लागत असल्याने काश्मीर खोऱ्यात ही नवीच समस्या उद्भवली असल्याचे त्यात म्हटले आहे. अशा घटनांमधून पेलेट गन्स किंवा अश्रुधुराच्या नळकांडय़ांच्या मर्यादा दिसून आल्या.
मॉस्कोमधील एका नाटय़गृहात २००२ साली दहशतवाद्यांनी अनेक नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यावेळी रशियाच्या सुरक्षा दलांनी प्रत्यक्ष कारवाईच्या आधी नाटय़गृहात गुंगी किंवा झोप आणणारा वायू सोडला होता. तो नेमका कोणता होता, हे माहीत नसले तरी तो ३-मिथिलफेंटानील किंवा फेंटानीलचा अन्य प्रकार असावा असा कयास आहे. या कारवाईत सुमारे ७०० ओलिसांपैकी १३० ओलिस आणि सगळ्या दहशतवाद्यांचा अंत झाला. पण या वायूच्या घातक परिणामांची आणि त्याच्या वापराच्या निर्णयाचीही उलटसुलट चर्चा त्यावेळी झाली. याशिवाय अशा घटनांत वापरता येऊ शकतील असे त्वचेचा दाह करणारे वायू आणि रसायनेही उपलब्ध आहेत. ती वापरून हल्लेखोर किंवा दंगलखोरांना काबूत आणता येते. अमेरिकेत नुकत्याच पोलिसांवर झालेल्या गोळीबाराच्या वेळी हल्लेखोराला संपवण्यासाठी तेथील सुरक्षा दलांनी रिमोट कंट्रोलने संचलित यंत्रमानवाचा वापर करून बॉम्बस्फोट घडवला. त्यावरूनही अशा तंत्रज्ञानाच्या नागरी वापराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
त्यामुळे आता सुरक्षा दलांना नव्या साधनांची गरज भासू लागली आहे. आधुनिक ना-प्राणघातक शस्त्रे याला पर्याय ठरू शकतात. नेट गन हा एक साधा आणि फारसा त्रासदायक नसलेला प्रकार आहे. त्यात बंदुकीतून लक्ष्यावर जाळी फेकली जाते. लक्ष्य केलेली व्यक्ती जाळ्यात अडकून तिच्यावर नियंत्रण आणता येते. तसेच ‘स्टिकी फोम गन’ नावाचा एक प्रकार आहे. त्यात बंदुकीतून डिंकासारखा चिकट, फेसाळ पदार्थ लक्ष्यावर सोडता येतो. याचा वापर केलेली व्यक्ती हात-पाय अंगाला चिकटून जागीच थिजून जाते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर जस्टिसच्या अर्थसाह्य़ातून सँडिया नॅशनल लॅबोरेटरीत हा संशोधन प्रकल्प साकारला होता. त्यानंतर सोमालियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत सहभागी झालेल्या अमेरिकेच्या मरिन कोअरच्या सैनिकांनी त्या बंदुका ऑपरेशन युनायटेड शील्डदरम्यान वापरल्या.
इलेक्ट्रोशॉक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स गन्स हा आणखीन एक प्रकार. यातील इलेक्ट्रोशॉक गनमधून एका वायरला जोडलेली पिनसारखी टोकदार वस्तू वेगाने बाहेर फेकली जाते. काही अंतरावरील व्यक्तीच्या अंगात ती सुई घुसते आणि तिच्या स्नायूंना हलका विद्युत् झटका देते. तर काही वेळा त्वचेचा दाह होण्याचीही सोय करता येते. त्याने भांबावलेल्या व्यक्तीला नियंत्रणात आणणे सोपे जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स गन्समधून विद्युत्चुंबकीय स्पंदने फेकली जातात. त्याने मोबाइल, टीव्ही, संगणक अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात. त्यामुळे आंदोलकांच्या संदेशवहनावर आणि माहिती प्रसारणावर नियंत्रण ठेवता येते. lr16
ही सर्व उपकरणे आणि तंत्रज्ञान विविध देशांनी वेगवेगळ्या परिस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहिले आहे. पण त्यांचा सरसकट वापर करण्यात अद्याप काही अडथळे आहेत. इन्फ्रा साऊंडचा ठरावीक शक्तीबाहेरचा वापर जीवघेणा ठरू शकतो. स्टिकी फोम तुलनेने कमी घातक आहे. पण तो चेहरा, डोळे अशा अवयवांवर चिकटून बसल्यास घातक ठरू शकतो. प्रत्यक्ष चिकट पदार्थ घातक नसला, तरी तो नंतर धुऊन काढण्यासाठी वापरले जाणारे द्रव पदार्थ (सॉल्व्हंट) त्वचेचा दाह करणारे आणि आरोग्याला अपायकारक आहेत. इलेक्ट्रोशॉक गन्सचा वापर हृदयविकाराच्या रुग्णांवर घातक ठरू शकतो. त्यातील विद्युतप्रवाहाची मात्रा व्यक्तीनुसार कमी-अधिक परिणामकारक असू शकते. ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स डिव्हायसेस’ आंदोलकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी करू शकतात, पण त्यांचा उलटा वापरही होऊ शकतो. दहशतवाद्यांच्या हाती ती पडली तर सुरक्षा यंत्रणांनाच ती घातक ठरू शकतात. समजा, एखाद्या मोठय़ा बँकेच्या मुख्यालयातील संगणकाच्या सव्‍‌र्हर रूमबाहेर, मोबाइल कंपनीच्या मुख्य सव्‍‌र्हरजवळ, उपनगरी रेल्वे वाहतूक केंद्रांच्या नियंत्रण कक्षाबाहेर किंवा विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमबाहेर त्यातून शक्तिशाली विद्युतचुंबकीय स्पंदने फेकली तर अदृश्य बॉम्बसारखा परिणाम साधता येऊ शकतो. तेथील सर्व संगणक आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली निकामी होऊन सर्व व्यवहार ठप्प होऊन अनागोंदी माजू शकते.
याशिवाय अशा तंत्रज्ञानाच्या वापराबाबत कायदेशीर आणि नैतिक प्रश्नही आहेत. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा कायदेशीर चौकटीत राहून विरोध व्यक्त करण्याचा अधिकार प्रमाण मानला गेला आहे. आंदोलक काही काळासाठी हिंसक बनले, किंवा नक्षलवाद्यांप्रमाणे त्यांनी शस्त्रे उचलली तरीही त्यांच्याविरुद्ध सैनिकी बळाचा वापर करण्याबाबत अद्याप एकमत नाही. पण काश्मीरसारख्या परिस्थितीत नागरिकांकडून घटनात्मक अधिकारांचा गैरवापर होत असल्यास आणि दहशतवाद्यांच्या सूत्रधारांकडून सामान्य नागरिकांना चिथावून त्यांचा मानवी ढालीसारखा वापर केला जात असेल तर त्यावर प्रभावी उपाय शोधणेही गरजेचेच आहे. अशा काळात ना-प्राणघातक शस्त्रांवर अधिक संशोधन करून ती व्यापक प्रमाणावर वापरायोग्य बनविणे आणि त्यांचा वापर करण्यासाठी सुरक्षा दलांना कायदेशीर चौकट उपलब्ध करून देणे राज्यव्यवस्थेला निकडीचे ठरते.
सचिन दिवाण  sachin.diwan@expressindia.com