महानुभाव पंथातील पहिली आत्मकथा ठरलेल्या बा. भो. शास्त्री लिखित ‘मार्गस्थ’ हे दोन खंडीय आत्मचरित्र आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. महानुभाव साधकाचे वैयक्तिक जीवन आणि पंथाच्या वाटचालीचे आत्मचिंतन असलेल्या या पुस्तकातील मनोगताचा हा संपादित अंश..

मी महानुभाव पंथात आल्यावर साक्षर झालो. महानुभाव साधूंच्या मार्गदर्शनानेच मला प्रेरणा मिळाली आणि काही साहित्याचे प्रकार हाताळता आले. त्यातून मला आत्मचरित्र लिहावंसं वाटलं. आत्मचरित्र लिहिण्याएवढे आपण मोठे नाहीत, हा न्यूनगंड इतरांप्रमाणे माझ्याही मनात होताच; पण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीने मला दिलासा दिला. गरुड उंच भरारी घेतो म्हणून इतरांनी उडू नये काय? बस्स! हाच माझ्या चिमण्या मनाला थोडासा आधार मिळाला आणि मी लिहिण्याचा निर्धार केला.

महात्मा गांधी, आचार्य प्र. के. अत्रे, ना. सी. फडके, यशवंतराव चव्हाण या थोरांची आत्मचरित्रं वाचली; तसेच ‘कोल्हाटय़ाचं पोर’, ‘बलुतं’, ‘उपरा’देखील वाचलं तेव्हा आपल्यासारखी सामान्य माणसंही लिहू शकतात हे लक्षात आलं. आज तर अनेक लोक आत्मचरित्रं लिहिताना दिसतात. पण ज्यांनी मराठीतला आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला, ज्यांनी आजपर्यंत साडेसहा हजार ग्रंथांची मराठी सारस्वतात भर टाकली, ते महानुभाव साडेसातशे वर्षांपासून अबोलच राहिले. त्यांना आपलं दैन्य दाखवून सहानुभूती मिळवायची नव्हती आणि सामथ्र्य दाखवून सन्मानाची अपेक्षाही करायची नव्हती; पण ते स्वत:ला सतत लपवत राहिले.

तोच धागा पकडून मी बोलायचं ठरवलं. माझ्यातल्या ‘मी’ला डोकं वर काढू न देता माझ्या भोवतालच्या घटना सांगाव्यात असं वाटलं. आपण बोललो तर त्यात महानुभाव असेलच; ज्या समाजात वाढलो त्याचं प्रतिबिंब असेल, पंथाचे आचार-विचार, यश-अपयश असेल. यात महानुभावांचं मोठेपण तर आहेच; थिटेपणही आहे. माझं सुख-दु:ख आहे, माझ्याकडून झालेले अपराध आहेत, माझं थोडंसं ज्ञान आहे व भरपूर अज्ञान आहे.

महानुभाव पंथ हा संघर्षांत टिकून राहिलेला पंथ आहे. चातुर्वण्र्यावर हल्ला करणारा, वैदिक कर्मकांडे नाकारणारा, देवी-देवतांना न मानणारा, स्त्रियांना समान अधिकार देणारा, व्रतवैकल्यं, अंधश्रद्धा नाकारणारा, स्वतंत्र दर्शन निर्माण करून बुद्धानंतर बंडखोरी करणारा महाराष्ट्रामधला हा पहिलाच पंथ आहे. या द्रोहामुळे प्रस्थापित कर्मठांनी अपप्रचाराची पेरणी केली. महानुभावांचं तोंड पाहू नये, त्यांना रस्ताही सांगू नये, असा प्रचार केला गेला. जे दु:ख अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्याही वाटय़ाला आलं नाही, ते महानुभावांच्या वाटय़ाला आलं होतं. ज्यानं शुभ केलं त्यालाच अशुभाच्या यादीत टाकलं गेलं. महानुभावाचा ‘मानभाव’ असा शिवीवाचक शब्द बनवला. ज्या पंथाने सामान्य माणसाला समतेची व ज्ञानाची दृष्टी दिली, त्याला बदनाम केलं गेलं, तरीही दु:खाचे कढ गिळत महानुभाव आपल्या रस्त्याने मार्गस्थ होत होता. आजही गोदावरीच्या काठावरचे बरेच लोक महानुभावांना रस्ता सांगत नाहीत. तोंड पाहताच थुंकतात, हा माझा अनुभव आहे.

हा लोकांचा दोष नाही. त्यांचा करून दिलेला गैरसमज आहे. पण महानुभावाने एवढे बेसावध असावं का? संस्कृताच्या खडकाला फोडून त्यातून तत्त्वज्ञानाची भागीरथी मराठीत आणणारा हा पंथ मौन का धरतो? भागवतातला कृष्ण प्रथम मराठीत सांगणारा आणि राजा रामदेवाच्या दरबारात रुक्मिणीचं प्रथम लग्न महाकाव्याच्या थाटात लावतो- असा हा पंथ, राजा रामदेवाच्या पत्नीला गुरुमंत्र देणारा हा पंथ, सामान्य माणसाला त्याच्या मराठी भाषेतच मोक्षाचं तत्त्वज्ञान सुलभ करून सांगतो. हे त्याचं स्वरूप. पण गंगाकाठची पायवाट का दुरुस्त करीत नाही?

याच महानुभाव पंथाने पाकिस्तानात सत्तेचाळीस मंदिरं बांधली होती. राघोबाच्या आधी महानुभावांनी अटकेपार मराठी नेली. अफगाणिस्तानात मंदिरं निर्माण केली. पण महाराष्ट्रात, स्वत:च्या जन्मभूमीत हा पंथ अपमान का सहन करीत होता? ‘शब्दी सामथ्र्य आती’ या सूत्रातली ऊर्जा कुठे गेली? त्याने आपल्या शब्दसामर्थ्यांने लोकांचे गैरसमज दूर करायला नको होते का? पण तसं झालं नाही.

याला कारण सतराव्या शतकानंतर महानुभावांकडे जमिनीवर प्रचार-प्रसार करणारे प्रचारक नव्हते. ग्रंथनिर्मिती पूर्ण थांबली होती. आम्ही स्वामींनी सांगितलेलं भगवान श्रीकृष्णचरित्र जरी सांगितलं असतं तरी समाजप्रबोधन करता आलं असतं. पंथीय तत्त्वज्ञानातलं रहस्य न सांगता लोकांशी जवळीक साधता आली असती. नरेंद्राने जाहीर रुक्मिणी सैंवराचं वाचन केलं, तो ग्रंथ गुंडाळून न ठेवता त्या एकाच ग्रंथाचा प्रसार केला असता तरी लोकांमध्ये पंथप्रेम निर्माण झालं असतं. प्रेमाला खोटं बोलता येत नाही. ज्यांनी सत्याचा रस्ता सोडला त्यांनीच आम्हाला खरा रस्ता सांगितला असता, घृणा संपली असती, थुंकी बंद झाली असती.

आज लोकांनी सागरात, आभाळात, जमिनीवर चांगले रस्ते तयार केले आणि आम्ही शंभर किलोमीटरचा रस्ता सातशे वर्षांतही तयार केला नाही. रस्ता तयार न करणाऱ्या नेत्याला कुणी मत देत नसतं. हे सत्य कुणी नाकारू शकत नाही. आणि असंच असेल तर खरंच न-कर्त्यां लोकांचं तोंड पाहू नये असं म्हणणाऱ्यांचा राग येण्याचं कारण नाही. विश्वकल्याणाचं, ज्ञानाचं रहस्य लपवून ठेवलं म्हणून तोंड पाहू नये असं कुणाला वाटत असेल तर ते चूक नाही. स्वामींनी सांगितलेलं जीवनविषयक सोपं तत्त्वज्ञान आपलं पांडित्य-प्रदर्शनासाठी किचकट बनवलं म्हणून समाज नाराज असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. नंतर पंथाचा अपेक्षित प्रचार झाला नाही याला एकच कारण आहे, ते म्हणजे पंथप्रचाराचा अभाव.

नंतरच्या महानुभाव पंथाने भाष्यग्रंथावर जिवापाड प्रेम केलं. जे पूर्वजांनी दिलं त्याच्या मनन-चिंतनात वेळ घालवला.. त्याचा सांभाळ केला. चोवीस भाष्यकारांनंतर भाष्याला विराम दिला. नवी निर्मिती थांबली. परंपरेच्या पोथ्या आश्रमात होऊ लागल्या. विद्वानांच्या ज्ञानात भर पडली; पण सामान्यांच्या पदरात काहीच पडत नव्हतं. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या पोथ्यांतलं प्रबोधन साध्याभोळ्या लोकांच्या डोक्यावरून जाऊ लागलं. विषय महत्त्वाचा होता; पण प्राध्यापकांसमोर जे व्याख्यान द्यावं ते बालवाडीतल्या मुलांसमोर दिलं जाऊ लागलं. कृष्णाचं विश्वरूप मोठंच आहे; पण दिव्यदृष्टी नसेल तर अर्जुनही म्हणाला होता, ‘देवा, तू अवघड झाला माझ्यासाठी. स्वत:ला लहान कर, पूर्वरूपात ये, सोपा हो.’ तसं आम्ही सामान्यवर्गासाठी प्रबोधन तयार केलं नाही. समाजाला ओलावा देणारं निरूपण दुर्लक्षित केलं गेलं. पोथी म्हणजे जाणत्या विद्वानांसाठी घेतलेले वर्ग; पण साधं-सरळ लोकांना कळेल असा स्तर तयार झाला नाही. म्हणून हा पंथ समाजात पसरला नाही.

परंपरा व परिवर्तनाच्या सीमारेषेवर असलेल्या प्रचारकांची फळी तयार होणं गरजेचं होतं. वाचनसंस्कृती पुसट झाली. प्रचारकांसाठी प्रशिक्षण नव्हतं. लेखकांना प्रेरणा नव्हती. जेव्हा गरज पडायची तेव्हा कुणातरी साहित्यिकाला हाताशी धरून लिहायला सांगत होतो. गरज आमची; दृष्टी लेखकाची होती. आमचंच घडय़ाळ आमच्या हातात; पण आम्ही वेळ दुसऱ्याला विचारत होतो. बोटावर मोजण्याएवढे पुरोगामी विचारांचे; पण ते रूढीच्या ओझ्याने दबले होते.

ही उपेक्षा सामान्य लोकांमध्येच आहे असं नाही. ‘लीळाचरित्र’ हा मराठीतला आद्यग्रंथ म्हणून सर्वच मराठी साहित्यिकांनी त्याला मान्यता दिली आहे. दोन-तीन साहित्य संमेलनांचे अध्यक्ष सोडले तर कुणी तसा उल्लेख करताना दिसत नाही. केला, तरी दबक्या आवाजात उल्लेख करताना दिसतात. सगळं मान्य करूनही महानुभाव बेदखल का होतो? कारण आमचा साहित्यातला भूतकाळ चांगला असला तरी वर्तमानकाळात समाजजीवनाशी निगडित असलेलं साहित्य निर्माण होत नव्हतं. हिताचा भाव घेऊन साहित्य साहित्यिकांना मिळत नव्हतं. साहित्यिकांनी कदाचित तसा अवसर संमेलनात दिलाच, तर आमच्याकडे सादरीकरण नव्हतं, मांडणी नव्हती. भाष्य घोकण्यासाठी होतं, काव्य पारायणासाठी होतं, भजनं गाण्यापुरती होती. पंथपरिघाबाहेरचा विचार न करता आम्ही रिंगणातच गोल गोल फिरत होतो. आखून दिलेली चौकट होती. रावण नसताना लक्ष्मणरेषेचं जाळं होतं. सीता नसताना वनवास होता. सोन्याचं हरीण नसताना मोह होता व राम नसताना आमच्या जीवनात आराम होता, असं कुणी म्हटलं तर मला त्याचं वाईट वाटणार नाही.