वैयक्तिक व सामाजिक पातळीवर जीवनाला घेरून असणाऱ्या असंख्य प्रश्नांचा  शोध आपल्या लेखनातून घेणारे ज्येष्ठ कादंबरीकार  श्याम मनोहर यांचे ‘कविता’ या साहित्यप्रकाराच्या वाचनाविषयीचे मुक्तचिंतन..

कवितावाचनाचे अनेक उपक्रम असतात. अनेक कवींच्या कविता एकत्रितपणे ऐकायला मिळतात. एकाच कवीच्या कविता ऐकायची संधी कधी कधी मिळते. कवीची मुलाखत असते, त्यात त्या कवीच्या वा इतर कवींच्या कविता वा कवितांचे अंश कवी उद्धृत करतो. ‘कविता’ यावर एखाद्या अभ्यासकाचे व्याख्यान असते, त्यात अनेक कवींच्या कविता वा अंश उद्धृत होतात. कवितासंग्रहाचे प्रकाशन, कवीला पुरस्कार अशा समारंभांतून कविता ऐकायला मिळतात. आपल्या नात्यातले, ओळखीतले कुणी हौसेने कविता लिहितात, वाचून ऐकवतात.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

कवितेसंदर्भात.. एकूणच साहित्यासंदर्भात जे सार्वजनिक उपक्रम होतात, ते कर्मकांडात अडकणार नाहीत, हे होण्यासाठी बुद्धिपुरस्सर प्रयत्न करावे लागतात.

कविता ऐकणे समाजात घडतेय. श्रोतेपणाची परंपरा आपल्याकडे भक्कम आहे.

आपल्या सभ्यतेत धार्मिक ग्रंथवाचनाची परंपरा आहे. इतकेच नव्हे, तर धार्मिक ग्रंथवाचनाची निमित्तेही निर्माण झालेली आहेत.

आपल्या सभ्यतेत कवितेचा इतिहास आहे. प्राचीन कविता, संतकविता, पंतकविता, नवकविता, साठोत्तरी कविता अशा प्रकारे कवितेचा इतिहास असलेले ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. मात्र सर्वसाधारण नागरिकांपर्यंत कवितेचा इतिहास पोचलेला नाही.

आपल्या सभ्यतेत कवितावाचनाची परंपरा नाही. वेगवेगळ्या कालखंडातले अमूक कवी, अमूक कविता नागरिकांनी वाचल्याच पाहिजेत, असे आपल्या सभ्यतेत स्थिर झालेले नाही. कविता जणू त्या त्या कालखंडापुरत्या आहेत. त्या त्या कालखंडात काही कवी, काही कविता प्रसिद्धी पावतात. पुढच्या कालखंडात ते कवी, त्या कविता विस्मरणात जातात. अशाने परंपरा निर्माण होत नाही. एखादा नागरिक कविता वाचतो, अनेक कविता वाचतो आणि आपल्या रुचीनुसार अमूक कविता आवडतात म्हणतो. वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या कविता आवडीच्या ठरतात. हे स्वाभाविक असते, पण यातून कवितावाचनाची परंपरा निर्माण होत नाही. सर्व कालखंडांतल्या सर्व, किंवा जास्तीत जास्त, किंवा थोडय़ाशा तरी कविता सर्वसाधारण नागरिक वाचू शकणार नाही, हे उघड आहे. सर्व कालखंडांतल्या सर्व कविता किंवा जास्तीत जास्त कविता कवितेच्या अभ्यासकाने वाचायच्या असतात, हे उघड आहे. कवितेच्या अनेक जाणकारांनी हे करायचे असते.

कविता म्हणजे काय? अशा प्रश्नासह अनेक प्रश्न निर्माण करून, बुद्धी पणाला लावून चर्चा करून त्या, त्या कालखंडातल्या श्रेष्ठ, उच्च दर्जाच्या कविता, कवी ठरवले जातात. अशातून समाजात अभिरुची निर्माण होते. अभिरुची निर्माण होणे म्हणजे परंपरा निर्माण होणे. परंपरेत सर्वसाधारण नागरिक स्वत:ची रुची जपतो, पण अभिरुचीपर्यंत जाऊ शकतो. अशा परंपरेत कालातीत कविता कोणती हेही उघड होते. परंपरेची पुन्हा पुन्हा तपासणीही होत राहते. सर्वसाधारण नागरिक कवितेबद्दल जागा राहतो. परंपरा निर्माण होण्यात कवींचे कविता वा इतर कशाहीबद्दलचे चिंतन महत्त्वाचा भाग बनते. इतकेच नव्हे, तर कवीच्या जगण्याच्या, वागण्याच्या गोष्टीही परंपरा निर्माण होण्यात महत्त्वाच्या ठरतात. परंपरेतल्या कवींच्या गोष्टी सर्वसाधारण नागरिकांना कवितेकडे आकर्षित करतात.

सिनेमा पाहणे, नाटक पाहणे, गाणी ऐकणे या नागरिकांच्या गरजा झालेल्या आहेत. कविता वाचणे ही गरज झालेली नाही. सिनेमा, नाटक, गाणी यांत करमणूक मूल्य असते. कवितेत करमणूक मूल्य नसते. नसते?

सिनेमाचा गाजावाजा होतो. गाणी टीव्हीवर, रेडिओवर चोवीस तास असतात. कविता नागरिकांपर्यंत पोचण्याच्या काही पद्धती नाहीत. नागरिकांना वर्तमानपत्र ही गरज झालेली आहे. वर्तमानपत्रात कवितेला क्वचित जागा असते. कवितासंग्रह हल्ली मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्ध होताहेत. सर्व नागरिकांना हे माहीत तरी आहे का?

कविता हा छोटा वाङ्मयप्रकार आहे. पुस्तकात छोटी जागा व्यापतो. वाचायला कमी वेळ लागतो. सर्वसामान्यांना थोडय़ा वेळचे काहीही करणे मानसिकदृष्टय़ा सोसत नाही. कवितेत उघड उघड फार घडत नाही. सर्वसामान्यांना खूप घडलेले, मन भरून जाईल, टाइमपास होईल असे हवे असते आणि पायऱ्या पायऱ्याने घडत जाणारे, घडणाऱ्यामधले तर्क अत्यंत स्पष्ट असणारे हवे असते.

कविलोक, कवींचे मित्र वर्तुळ, समीक्षक, अभ्यासक, संपादक, मराठी विषय म्हणून शिकवणारे, शिकणारे, तरुणपणी हौस म्हणून असे लोक कविता वाचतात. सर्वसाधारण नागरिकाने कविता वाचल्या पाहिजेत, असे म्हणणे अवास्तव आहे का?

समाजातल्या किती टक्के नागरिकांनी कविता वाचल्या, की तो समाज विकसित म्हणता येईल, यावर संशोधन व्हायला हवे.

सर्वसाधारण नागरिकांच्या कवितेबद्दल काही खास हरकती असतात. हल्लीच्या कविता कळत नाहीत. (‘हल्लीच्या’ हा शब्दप्रयोग मर्ढेकरांच्या कवितेपासून चालू आहे.) हल्लीच्या कवितेत भलतेसलते शब्द असतात. श्लील-अश्लील, सुंदर-कुरूप, सुबोध-दुबरेध ही द्वंद्वे अजून मिटलेली नाहीत.

कवितेच्या जाणकार वाचकांच्या, अभ्यासकांच्या मनात कवितांचे प्रकार असतात. दलित कविता, ग्रामीण कविता, विद्रोही कविता, भावकविता, मर्ढेकरयुगीन कविता, साठोत्तरी कविता, नव्वदोत्तरी कविता.. सर्वसाधारण नागरिकांना कवितांचे प्रकार क्वचित माहीत असतात.

हे सर्व असले तरी सर्वसाधारण नागरिकाने मुद्दाम वेळ काढून एकटय़ाने कविता वाचावी. एकटय़ाने कविता वाचणे हे दृश्य गुप्त असले तरी अनेकजण हे करतील, तर सभ्यतेत उघड होईल.

कविता हा छोटा वाङ्मयप्रकार असतो. त्यामुळे पटकन वाचून ‘टाकायचा’ मोह होतो. ‘टाकणे’ हे क्रियापद कसे आहे, ते एकदा समजून घेणे आवश्यक आहे. जेवण करून टाकू, काम करून टाकू, चहा टाकलाय.. काम करून टाकू? असे? काम करून टाकायचे? काम करण्यात रस नाही? टाकणे म्हणजे संबंध सोडून देणे. काम करून टाकायचे म्हणजे कामाशी संबंध सोडून द्यायचा. जुन्या जमान्यात नवऱ्याने बायकोशी संबंध सोडल्यावर ‘तिला नवऱ्याने टाकलेय’ असे शब्दप्रयोग करत. कविता वाचून टाकायची नाही, संबंध सोडायचा नाही.

आपण रस्त्याने जाताना दुकानाच्या पाटय़ा वाचतो. टीव्हीवर जाहिराती, छोटय़ा पट्टीवर आलेल्या जाहिराती वाचतो. वर्तमानपत्र वाचतो, कथा- कादंबरी वाचतो. या वेगवेगळ्या वाचनांची वेगवेगळी कौशल्ये असतात. वाचनाची कौशल्ये यावर संशोधन व्हायला हवे. हा आपल्या सभ्यतेतला प्रश्न आहेच. प्रगत सभ्यतेतले संशोधन आपण अभ्यासावे. आपल्या सभ्यतेतले प्रश्न आपण निर्माण करून संशोधन करायला हवे. तोवर नागरिकांना स्वत:च वाचनाची कौशल्ये धीराने हस्तगत करावी लागणार आहेत.

कविता वाचायला लागायचे.

कविता, अगदी मुक्तछंदात असली तरी, कवितेच्या पहिल्या शब्दापासून आपण वाचन करू लागतो, तेव्हा आपण गद्य वाचल्याप्रमाणे नाही वाचत; गद्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वाचतो. आपण गाणे ऐकतो तेव्हा आपले लक्ष गाण्याच्या चालीकडे आपोआप असते. गाणे म्हणजे चाल, असा संस्कार आपल्यावर झालेला असतो. कविता हा गाणे या प्रकाराशी नाते ठेवणारा प्रकार आहे. म्हणून आपण कविता, मुक्तछंदात असली तरी, गद्याप्रमाणे न वाचता काही तरी चालीत वाचतो. कवितेत शब्दांची, ओळींची मांडणी असते. ती मांडणी कविता वाचायची चाल सुचवते. चाल म्हणजे शब्दातल्या, ओळीतल्या थांबण्याच्या, कमी-अधिक वेग घेण्याच्या जागा. कवितेच्या पहिल्या वाचनात या जागा अंधूकपणे सापडतात. कवितेच्या पहिल्या वाचनात कवितेतले काही शब्द, काही उपमा, काही संदर्भ, काही ओळी आपले चित्त आकर्षितात, आपण चकित होतो. आपल्याला वाटते, हे आपल्याला आधी कसे सुचले नाही? काही वेळा कवितेतल्या काही ओळींनी, काही शब्दांनी, काही उपमांनी आपल्याला धक्का बसतो, क्वचित नकोसे होते. कवितेच्या पहिल्या वाचनात काही अर्थ उमजतो.

सगळी कविता पूर्ण समजली नाही, असे होऊन आपण कविता वाचणे बंद करतो. एकदा वाचले की सगळे कळले पाहिजे, अशी आपली धारणा असते. पहिल्या झटक्यात सगळे कळते, असे जगात काही आहे का?

आपण शाळेत, महाविद्यालयात अनेक विषय शिकतो, परीक्षा देतो, पास होतो. शंभरपैकी शंभर गुण पडत नसतात. म्हणजे सगळेच्या सगळे ‘येत’ नसते. कोणताही विषय लगेच कळलाय, पूर्णपणे कळलाय, असे होत नसते. गंमत अशीही असते, आठवीत शिकलेल्यातले नववीत वा दहावीत कळते. ग्रॅज्युएशनला शिकलेल्यातले पुढे चार-पाच वर्षांनी कळते. आपले मित्र, नातेवाईक, कुटुंबीय, समाज, इतकेच काय, आपण स्वत: कधीच संपूर्णपणे कळत नसतो. अब्जावधी वर्षे झालीत, मृत्यू घडत आलेत, मृत्यूचे कोडे अजून तसेच आहे. सगळे सगळे संपूर्णपणे न कळता आपण जगत राहतो.

कविता पहिल्यांदा वाचल्याबरोबर संपूर्णपणे कळली पाहिजे, या धारणेतून वाचकाने मुक्त व्हायला हवे.

काही काही कळणे आपोआप घडते. दृष्टी आहे, बघणे आपोआप घडते. सूर्योदय बघितला जातो. सूर्योदय आपोआप कळतो. श्रवणेंद्रिय आहे, ऐकणे आपोआप घडते. पंचेंद्रियांमार्फत आपोआप काही काही कळते. दृष्टीतर्फे सूर्योदयाचे सौंदर्य आपोआप जाणवते. श्रवणेंद्रियांमुळे गाण्याचे सौंदर्य आपोआप जाणवते. निसर्गाने ही देणगी दिलेली आहे.

सूर्योदय झाला; पक्ष्यांना आपोआप कळते. पक्षी हिंडू, फिरू, उडू लागतात. वसंत ऋतू आला; कोकिळेला आपोआप कळते, कोकिळा कुहूकुहू करू लागते. निसर्गाने ही देणगी पक्ष्यांना दिलेली आहे.

सूर्योदय म्हणजे काय? आकाशात रंग किती आहेत, कोणते आहेत? सूर्य पृथ्वीभोवती फिरतो काय?.. हे प्रश्न माणसाला पडतात. पशुपक्ष्यांना नाही पडत.. की पडतात? असाही प्रश्न माणसाला पडतो.

कळायचे निसर्गाने जेवढे दिलेय तेवढय़ावर जगायचे, असे पशु-पक्ष्यांचे असते. निसर्गाने जेवढे कळणे दिलेय तेवढय़ावर जगायचे, असे माणसाचे नसते. निसर्गत:, आपोआप काही कळते. ते थोडे असते, न कळणारे खूप असते. माणसाला अनंत कुतूहले, प्रश्न असतात. माणसाला सर्व, एकुणेक कळून घ्यायचे असते. त्यासाठी निसर्गाने माणसाला एक देणगी दिलीय, इतर सर्व सजीवांना सोडून फक्त माणसाला ठोकपणे देणगी दिलीय. बुद्धी.

गंमत अशी आहेय, निसर्गाने माणसाला कुतूहले दिलीत, कुतूहले शमवण्यासाठी बुद्धी दिलीय; पण बुद्धी वापरलीच पाहिजे, अशी प्रेरणा निसर्गाने माणसाला दिलेली नाहीये. माणसाने बुद्धी वापरावी किंवा न वापरावी, निसर्गाने एवढे एकच स्वातंत्र्य माणसाला दिलेले आहे.

आपोआप थोडे कळते. आपोआपच्या विरुद्ध शब्द आहे- मुद्दामून. आपोआप न कळणारे मुद्दामून प्रयत्न करून कळून घ्यावे लागते. कुतूहले आपोआप शमत नाहीत, त्यासाठी मुद्दामून प्रयत्न करावे लागतात. मुद्दामून बुद्धी वापरून माणसाने विज्ञाने, शास्त्रे, कला निर्माण केल्यात. कळण्यासाठी मुद्दामून बुद्धी वापरण्याचा योग माणसाने करायचा असतो. मुद्दामून बुद्धी वापरून कविता कळून घ्यायची असते.

आपल्याला हे कळते, की आपल्याला सगळे कळलेले नाही आणि आपण न कळलेले कळून घेण्यासाठी उत्सुक असतो. कुतूहल, उत्सुक असणे ही जगण्यातली सर्वोत्तम स्थिती होय.

आपण कविता पुन्हा वाचतो, पुन्हा पुन्हा वाचतो, वेगवेगळ्या वेळी एकटे होऊनही वाचतो. चाल अधिक कळते, लय अधिक जाणवते.

कवितेत वस्तू असतात, प्राणी असू शकतात. माणसांची सुख-दु:खे असतात, ऋतू असतात, वेळा असतात, काळ असतो, वेगवेगळ्या काळांच्या तुकडय़ांचे संदर्भ असू शकतात. कवितेत सभ्यतेतले काही काही, संस्कृतीतले काही असते. त्यावरून कवितेचा विषय कळतो.

कवितेत वस्तूंची, प्राण्यांची, माणसांची, माणसांच्या सुख-दु:खांची, सभ्यतेची, संस्कृतीची विशेषणे असतात. क्रियापदांची क्रियाविशेषणे असतात. त्यावरून कवितेच्या विषयाचे कवितेत काय होतेय, हे कळते. कविता पुढेपुढे जात राहते. कवितेला वाट असते. कविता कोणत्या वाटेने जातेय, हे कळते.

कवीही कळून घ्यायला उत्सुक असतो. न कळलेले, अज्ञातातले कळून घ्यायला उत्सुक असतो. कवितेतर्फे तो शोधत असतो. कविता म्हणजे शोध घेण्याची पद्धत.

कविता वाचताना कविता काय सांगत्येय, याची आपल्याला उत्सुकता लागते, वाढते. विषय उलगडत जातो. आपण गुंगून जातो. कविता संपते.

श्रेष्ठ कविता सृष्टी, विश्व, जीवन यांतले अज्ञात असे काहीतरी शोधून देते. हाच कवितेचा आशय होय.

सृष्टी, विश्व, जीवन यांचे काही ना काही आकलन होणे, याशिवाय माणसाला अंतिमत: दुसरे काय हवे असते? आपण गंभीर आनंदित होतो. गंभीर आनंदित होणे ही जगण्यातली दुर्मीळ स्थिती असते. शिवाय कविता आपल्याला भाषेचा अर्क

देते. भाषेचा अर्क जाणण्यासाठी कविता हा वाङ्मयप्रकार खूप उपयोगी ठरतो. भाषेचा आनंद मिळतो. हा दुसरा आनंद.

कविता आपल्या आत हालत राहते.

गाणे भावना, बुद्धी या पातळ्यांवर जाते, पण तिथे थांबत नाही. गाणे शारीरिक पातळीवर परिणामकारक होते. कविता भावना, बुद्धी या पातळीवर राहते. शारीरिक पातळीवर परिणाम करत नाही.

आपण गाणे ऐकत राहतो आणि शारीरिक पातळी सोडून बौद्धिक, भावनिक पातळीवरचे जगणे होण्यासाठी कविताही वाचू लागतो, कवितासंग्रह वाचू लागतो. आपल्या परिघातल्या लोकांना कविता वाचा म्हणू लागतो. कविता वाचणे आपली गरज होते.

परंपरा अशी सुरू होते.

कवितेच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी, प्राध्यापकांनी – अशा मोजक्या लोकांनी कवितेचे वाचन केल्याने कवितेचा इतिहास निर्माण होतो. सर्वसामान्य नागरिकांनी कवितेचे वाचन केल्याने परंपरा निर्माण होते. परंपरा ती, की ज्यामध्ये व्यक्तीच्यात आणि समाजात कला, शास्त्रे, तत्त्वज्ञाने अशांतल्या गहन प्रश्नांबद्दल कुतूहले कार्यरत होतात.

राजेशाही होती, तेव्हा प्रजेच्या जीवनात आणि समाजात राजा केंद्रस्थानी राहील अशी व्यवस्था केली जायची. तरी, बुद्धिमान लोक कला, शास्त्रे, तत्त्वज्ञाने यांतल्या गहन प्रश्नांचा वेध घेत होते. त्यातून राजेशाही नष्ट झाली आणि लोकशाही आली.

लोकशाहीत नागरिकांच्या, समाजाच्या जीवनात राजकारणी केंद्रस्थानी राहतील अशी व्यवस्था केली जातेय. बुद्धिमान लोकांनी कला, शास्त्रे, तत्त्वज्ञाने अशांतल्या गहन प्रश्नांचा वेध घेऊन थेट नागरिकांपर्यंत पोचले पाहिजे, तेव्हा लोकशाही सिद्ध होईल.