महाराष्ट्रामध्ये आज अनेक प्रकाशक मराठीतून पुस्तके प्रकाशित करत आहेत. ‘केशव भिकाजी ढवळे’सारख्या संस्थेने तर शंभरी ओलांडली आहे. या प्रकाशन संस्थांमध्ये ‘पॉप्युलर प्रकाशन’ या अग्रगण्य संस्थेने ९० वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल सुरू केली आहे. अगदी नगण्य भांडवलावर सुरू केलेल्या या प्रकाशनाने आज मोठी झेप घेतलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यात असलेल्या या प्रकाशन संस्थेने हीरक महोत्सवानिमित्त किशोर आरस यांनी संकलित केलेला ‘पॉप्युलरचं अंतरंग’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. हा पॉप्युलरच्या ९० वर्षांचा लेखाजोखा आहे. पॉप्युलरने निर्माण केलेलं मराठी ग्रंथजगत, लेखक आणि त्यांच्या व्यवसायातील माणसांशी जपलेली नाती, संपादकीय धोरण, निर्मितीतील स्वागतशीलता, सहसंपादकांशी असलेले नाते, उत्तम लेखन आणि त्याच्या लेखकांचा घेतलेला शोध अशा अनेक बाबींवर या ग्रंथातून प्रकाश पडतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी वाङ्मयात जी  साहित्यकृतींची भर पडत गेली, त्यातील अनेक उत्तम कलाकृती या पॉप्युलरच्या मुशीतून बाहेर पडलेल्या आहेत. पॉप्युलरचे लेखक आणि त्यांच्या कलाकृती यांच्यावर नुसती नजर टाकली तरी जाणवते की, ही संस्था सांस्कृतिक जबाबदारी मानणारी संस्था आहे. त्यामुळे पुस्तके प्रकाशित करताना कुठलीही व्यावसायिक तडजोड न करता जे उत्तम आहे, ज्याला वाङ्मयीन मूल्य आहे अशा दर्जेदार पुस्तकांची निर्मिती पॉप्युलरने केलेली दिसते. सुमारे शंभरपेक्षा जास्त मान्यवर लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. मराठी सारस्वतातील जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या लेखकांची पुस्तके पॉप्युलरच्या नावाखाली प्रकाशित झाली आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘पॉप्युलर बुक डेपो’ ही पुस्तकांची विक्री करणारी संस्था. गणपतराव भटकळ हे त्याचे मालक. या बुक डेपोचा ‘पॉप्युलर प्रकाशन’ हा स्वतंत्र विभाग साठ वर्षांपूर्वी सुरू झाला. त्याची जबाबदारी रामदास भटकळ यांनी स्वीकारली. या साठ वर्षांत मराठी साहित्याने अनेक वाक् वळणे घेतली. नवसाहित्य, दलित, विद्रोही, स्त्रीवादी, ग्रामीण असे अनेक प्रवाह त्यात येऊन स्थिर होत गेले. या साऱ्यांची दखल पॉप्युलरने घेतलेली दिसते. १९५० च्या दशकात पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, दि. बा. मोकाशी, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सदानंद रेगे, इंदिरा संत, वा. ल. कुलकर्णी, म. वा. धोंड, श्री. के. क्षीरसागर, द. भि. कुलकर्णी, श्री. ना. पेंडसे, भाऊ पाध्ये, हमीद दलवाई अशा अनेक मान्यवरांच्या साहित्याची दखल पॉप्युलरने घेतली.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
student copying Nashik division
नाशिक : पहिल्या दिवशी नक्कल करणारे दोन जण ताब्यात, विभागात दहावी परीक्षेला सुरुवात
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
Kalyan Dombivli, municipal corporation, Tree Census, 7 Lakh Trees, Reveals,
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सात लाखाहून अधिक वृक्ष, दोन हजार ६५० वारसा वृक्षांचा समावेश

या पुस्तकाच्या अंतरंगात तीन विभाग आहेत. ‘चिरंतनाच्या मागावर’ या विभागात रामदास भटकळ यांनी २६ लहान लहान प्रकरणांत त्यांचा प्रकाशन व्यवसाय, निर्मिती, त्यांचे लेखक आणि कलाकृती यांचा धावता आढावा घेतला आहे. सुरुवातीच्या वीस वर्षांनंतर पॉप्युलरच्या परिवारात दाखल झालेल्या आणि सहसंपादनाची जबाबदारी स्वीकारलेल्यांची मनोगते दुसऱ्या विभागात आहेत. तर तिसऱ्या विभागात  रामदास भटकळ यांच्या सात मान्यवर समीक्षकांनी घेतलेल्या मुलाखती आहेत.

प्रकाशनाच्या पहिल्या वीस वर्षांत रामदास भटकळ यांनी स्वत: संपादक, मुद्रितशोधक अशी सर्व जबाबदारी सांभाळली. विद्यार्थिदशेतच, मित्राच्या ओळखीने रामदास भटकळ यांचा ‘मौज’च्या गटात प्रवेश झाला. त्यातून मौजचे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. ही भटकळ यांच्या आयुष्यातील प्रकाशन व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बाब ठरते. सुरुवातीलाच १९५२ मध्ये गंगाधर गाडगीळ यांच्या ‘कबुतरे’ व अरविंद गोखले यांच्या ‘कमळण’ या कथासंग्रहांच्या प्रकाशनाने पॉप्युलरच्या मराठी प्रकाशन विभागाचा श्रीगणेशा झाला. याआधी पॉप्युलरने बरीच इंग्रजी पुस्तके प्रकाशित केलेली दिसतात. गाडगीळ, गोखले, पु. भा. भावे आणि व्यंकटेश माडगूळकर ही चार नावे त्या वेळी आघाडीवर होती, ज्या वेळी मराठी कथेने ‘नवकथा’ हे रूप धारण केले होते. हे सर्व जण पॉप्युलरचे मानकरी ठरले. हे भटकळ अभिमानाने लिहितात. प्रकाशकाचे काही धोरण असते; त्या धोरणात न बसणाऱ्या साहित्याला, मग ते मान्यवरांचे का असेना, त्याला नकार देण्याचे धाडस प्रकाशकाकडे असेल, तरच तो आपल्या व्यवसायाची गुणवत्ता सांभाळू शकतो. भटकळांमध्ये ते धाडस होते, त्यामुळे वसंत कानेटकरांसारख्या मातबर लेखकाचे समाजातले आणि साहित्यातले स्थान मोठे असतानाही भटकळांनी त्यांच्या काही पुस्तकांना नकार दिला. मात्र ‘घर’सारखी संज्ञाप्रवाही कादंबरी आवर्जून प्रकाशित केली आणि त्यांची इतर पुस्तकेही. लेखकांची निवड करताना पॉप्युलर कोणत्या स्तरावर विचार करणार याचं मोजमाप करण्याचा निकष किंवा मानदंड गाडगीळांच्या साहित्याने निर्माण केला. पॉप्युलरची वाङ्मयीन दृष्टी त्यातून ठरत गेली. याचा एकूण आलेख वाचायला मिळतो. हा सर्वच आढावा आणि त्यांचे धोरण रामदास भटकळ यांनी अत्यंत विवेचकपणे मांडले आहे.

प्रकाशन व्यवसायातील भटकळांची दृष्टी नवनवे आणि उत्तम ते हेरण्याची होती. त्यामुळे कथा या साहित्य प्रकाराप्रमाणेच कविता, नाटय़, समीक्षा, बालसाहित्य याकडेही त्यांची दृष्टी वळलेली दिसते. प्रकाशन संस्था स्थिरस्थावर होते आहे त्याआधीच, म्हणजे १९५४ मध्ये मंगेश पाडगावकर यांचा ‘जिप्सी’ हा कवितासंग्रह त्यांनी प्रकाशित केला आणि कवितेचं पुस्तक खपत नाही, याला ‘जिप्सी’ हे अपवाद ठरलेले दिसते. कारण तीन महिन्यांत जिप्सीची पहिली आवृत्ती खपली आणि दहा वर्षांत एकाच कवीची – पाडगावकरांची कवितेची दहा पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रमही पॉप्युलरने केला. उत्तम साहित्य शोधायचे एवढेच नाही तर ते मराठी रसिकांच्या घराघरांत पोहोचवायचे हे पॉप्युलरच्या यशाचे गमक भटकळांच्या दूरदृष्टीमध्ये आणि चोखंदळ निवडीमध्ये होते. पॉप्युलरने पुढील काळात कुसुमाग्रज, संत, रेगे, ग्रेस, महानोर या मान्यवरांचे संग्रह प्रकाशित केलेले दिसतात. प्रकाशनाच्या त्या त्या टप्प्यावर घडलेल्या वाङ्मयीन घडामोडी, सामाजिक परिस्थिती याचाही आढावा भटकळांनी घेतला आहे. त्यामुळे मराठी साहित्य प्रवाहाचे बदलत गेलेले स्वरूप अधोरेखित होते.

नाटकांच्या बाबतीत उत्तमोत्तम नाटय़संहितांचं प्रकाशन करणारी पॉप्युलर ही एकुलती एक प्रकाशन संस्था ठरली आहे. बालसाहित्यात ‘राणीचा बाग’ हे विंदा करंदीकर यांचे बालगीतांचे पुस्तक मराठी बालवाङ्मयातले अभिजात पुस्तक ठरले आहे. सदानंद रेगे, सरिता पदकी, भा. रा. भागवत, निर्मला देशपांडे यांचे बालसाहित्य पॉप्युलरने प्रकाशित केले. पण बालसाहित्य हा विभाग अल्पजीवी ठरलेला दिसतो. पॉप्युलरने आणखी बालसाहित्य प्रकाशित केले असते तर बालसाहित्यात चांगली भर पडली असती.

गंगाधर गाडगीळांच्या समकालीन असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कथालेखक जी. ए. कुलकर्णी हे योगायोगाने पॉप्युलरच्या परिवारात आले आणि स्थिर झाले. पॉप्युलरने प्रकाशित केलेले ‘कबुतरे’ आणि ‘कमळण’ हे उत्तम कथासंग्रह होते. त्याचा पॉप्युलरने मानदंड म्हणून उपयोग केला, पण जीएंचे कथासाहित्य प्रकाशित केल्यावर इतर कोणाचे कथासंग्रह प्रसिद्ध करावेत, असा संदेह निर्माण झालेला दिसतो.

पॉप्युलरने श्री. के. क्षीरसागर, वा. ल. कुलकर्णी, दि. के. बेडेकर यांची समीक्षेवरची महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली. त्यातून पॉप्युलरच्या संपादकीय धोरणाला वेगळेपण लाभलेले दिसते. गं. त्र्यं. देशपांडे यांचे ‘भारतीय साहित्यशास्त्र’, ज्यामुळे त्यांना पुढे नागपूर विद्यापीठाची डी.लिट. पदवी लाभली तो ग्रंथ तसेच पद्माकर दादेगावकर यांचा प्रबंध असे वेचक वैचारिक साहित्यही पॉप्युलरने प्रकाशित केलेले दिसते. यातून संपादकाची दृष्टी कशी चौफेर असावी याचा प्रत्यय येतो. एम. एस. नाडकर्णी संपादित समग्र बालकवींचे प्रकाशन तसेच उद्धव शेळके, भाऊ पाध्ये, स. मा. गर्गे, भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरींचं ‘बहिणाईची गाणी’ असे निरनिराळ्या क्षेत्रांतील मराठी कवी, लेखक, विचारवंत शोधून काढण्याचा प्रयत्न पॉप्युलरने केला. पुस्तकांची निवड करताना अचूक दृष्टी भटकळांमध्ये होती. त्यामुळे या व्यवसायातून आर्थिक लाभ किती होईल याचा विचार न करता वाचकांना काय सकस लेखन देता येईल, यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. हा सर्व आढावा अत्यंत सुसंगतपणे त्यांनी मांडला आहे. विंदा करंदीकर, कुसुमाग्रज आणि भालचंद्र नेमाडे हे तीन ज्ञानपीठ विजेते मराठी लेखक पॉप्युलरचे लेखक आहेत, हे पॉप्युलरच्या निवडीतील मानाचे तुरे आहेत. शाश्वत वाङ्मयीन गुणवत्तेला कायम नजरेसमोर ठेवून पॉप्युलरची वाटचाल झाली आहे, हे निर्विवाद आहे.

पॉप्युलरच्या प्रकाशन विभागाचे संपादक म्हणून रामदास भटकळांनी २० वर्षे एकहाती काम पाहिले, पण प्रकाशनाचा व्याप वाढायला लागल्यावर त्यांनी सहसंपादकांचे सहकार्य घेतले आणि त्यांच्यावर प्रकाशनाच्या संपादनाची जबाबदारी टाकली. मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पांगे, अस्मिता मोहिते या सहसंपादकांनी दुसऱ्या विभागात त्यांचे सहसंपादकांचे अनुभव आणि पॉप्युलर परिवाराशी असलेले नाते विशद केले आहे. त्या त्या टप्प्यावर आपली जबाबदारी पार पाडताना एक उत्तम वस्तुपाठ त्यांना कसा मिळत होता आणि त्यातून त्या संपादनाची जबाबदारी कशा पार पाडत होत्या याचे नेटके चित्रण येते. मृदुला जोशी म्हणतात, स्नेहप्रभा प्रधान यांच्या ‘स्नेहांकित’ या आत्मचरित्राचे स्वतंत्रपणे संपादन करताना संपादन करणे म्हणजे काय हे समजले. हस्तलिखितावर संस्करण करून मुद्रणप्रत तयार करणे वगैरे. नव्याने प्रकाशन व्यवसायात पडणाऱ्यांना संपादनासाठी हा मोलाचाच सल्ला या सर्व मनोगतांतून मिळतो. यानंतर पॉप्युलरमध्ये ३५-४० वर्षे व्यवस्थापन ते डायरेक्टर असा प्रवास करणाऱ्या रघुनाथ गोकर्ण यांचे मनोगत येते. दुसऱ्या संपादक अंजली कीर्तने मनोगतात म्हणतात, ‘पुस्तकाची निर्मिती करता करता जीवन बहुमुखी झाले.’ हस्तलिखित निवडीपासून पुस्तक पूर्ण होईपर्यंतचे स्वातंत्र्य रामदास भटकळ यांनी दिले, हे त्या आवर्जून लिहितात. सहकाऱ्यांवर एकदा जबाबदारी टाकल्यावर त्यात ढवळाढवळ न करता त्यांच्यावर विश्वास दाखवणे ही बाब खूप महत्त्वाची आहे. शुभांगी पांगे या तिसऱ्या सहसंपादक. त्यांना पॉप्युलर हे विस्तारित कुटुंब वाटले. लेखकांबरोबर पुस्तक करताना आलेले कडू-गोड अनुभव त्यांनी दिले आहेत. आता अस्मिता मोहिते या संपादकपद सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यकाळात लेखकांची नवी फळी उभी राहिली आहे. अनिल धाकू कांबळी, कृष्णात खोत, मनस्विनी लता रवींद्र, अशोक कौतिक कोळी आदी. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत ‘पॉप्युलर मित्रमंडळ’ची योजना आखली आणि ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अस्मिता मोहिते यांनी ‘प्रिय रसिक’ ही गृहपत्रिका चालू करण्याची हिंमत धरली. ती खूप लोकप्रिय झाली. साठ वर्षांची पॉप्युलरची सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरा कायम ठेवण्याचा आत्मविश्वास त्यांना वाटतो. या चारही संपादिकांचे योगदान पॉप्युलरच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे आहे, हे त्यांची मनोगते वाचताना प्रकर्षांने जाणवते.

तिसऱ्या भागात मान्यवर व समीक्षकांनी रामदास भटकळ यांच्या घेतलेल्या मुलाखती आहेत. रंगनाथ पठारे हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार. त्यांनी कादंबरी प्रकाशनाबरोबर एकूणच या संस्थेच्या साहित्यिक धोरणाविषयी व व्यवस्थापनाविषयी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यातून भालचंद्र नेमाडे ते आजच्या कादंबरीकारांचा प्रवास उलगडत जातो. अरुणा दुभाषी यांनी कथेसंबंधी मुलाखत घेतली आहे. त्यातून पॉप्युलरने गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, हे त्यांच्या प्रकाशित पुस्तकांवर नजर टाकली असता सिद्ध होते. हे या मुलाखतीचे फलित आहे. सुधा जोशी यांनी कवितांच्या प्रकाशनाविषयी चर्चा केली आहे, तर ‘नाटय़रंग’ ही मुलाखत रत्नाकर मतकरी यांनी घेतली आहे. चरित्र, इतिहास आणि सामाजिक शास्त्र या विषयांवरची मुलाखत ज्येष्ठ संशोधक आणि पत्रकार अरुण टिकेकरांनी घेतली आहे. वसंत सरवटे यांनी बालवाङ्मयाविषयीचे भटकळांचे धोरण यावर प्रकाश टाकला आहे. या सर्वच मुलाखती महत्त्वाच्या आहेत.

पुस्तक वाचून पूर्ण केल्यावर जाणवते की सुरुवातीपासून आजपर्यंत पॉप्युलरने पुस्तक प्रकाशनाविषयी मनात धरलेला मापदंड तोच आहे. पॉप्युलरने कोणताही साहित्यप्रकार वज्र्य मानला नाही. जुने लेखक- नवे लेखक असा भेदभाव केला नाही. गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या त्यांच्या साहित्यकृती आजही महत्त्वाच्या वाटतात. आज प्रकाशित केलेल्या पन्नास वर्षांनंतरही महत्त्वाच्या ठरतील. त्यामुळे खपाकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही, तर उत्कृष्ट कलाकृती प्रकाशित करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पॉप्युलर प्रकाशन आज पहिल्या रांगेत आहे. या ग्रंथाने मराठी वाङ्मयात एका चांगल्या दस्तऐवजाची भर पडली आहे. प्रकाशन व्यवसायाची वाटचाल ही अवघड आहे. पण भटकळांसारख्यांनी कष्टपूर्वक ती यशस्वी केली आहे, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो.

‘पॉप्युलरचं अंतरंग’

संकलन – किशोर आरस,

ग्रंथाली प्रकाशन,

 पृष्ठे – ३१५, मूल्य – ४०० रुपये

डॉ. मंदा खांडगे