शरीरातील टेस्टोस्टेरोनमुळे पुरुषाची लैंगिकता घडते, हे खरे असले तरी त्यातून पुरुषात बलात्कार, विनयभंग, स्त्रीची छेडछाड करण्याची वृत्ती बळावते, असा संबंध काहीजण जोडू पाहतात. परंतु तो साफ चुकीचा आहे. ‘निर्भया’ ते ‘कोपर्डी’ बलात्कार प्रकरणांचा वेध घेताना या ‘पुरुषी’ प्रवृत्तीचा पंचनामा करणे अपरिहार्य ठरते..

मी तेव्हा आठवीत होतो. वर्गातली माझी जागा खिडकीपाशी असायची. वर्ग तिसऱ्या मजल्यावर. खिडकीतून खाली दिसणाऱ्या सीनची मी रोज वाट बघत असे. वरून उघडय़ा असणाऱ्या बाथरूमवजा तट्टय़ांच्या आडोशात अंघोळ करणारी एक स्त्री दिसायची. तिची उघडी, ओली पाठ आणि काय काय दिसायचे. माझ्या अंगात काहीतरी उसळायचे. एकदा भूगोलाच्या सरांनी रेडहॅण्ड पकडले आणि रागाने ते म्हणाले, ‘कसला भूगोल शिकतोयस मोहन, आंऽऽ?’
स्त्रीदेहाकडे कसे बघावे याचे संस्कार आपल्यामध्ये लहानपणापासूनच रुजू लागतात. आपण जेव्हा १३-१४ वर्षांचे असतो तेव्हापासून हे ‘बघणे’ सुरू होते. पहिल्या पहिल्यांदा कसेतरीच वाटते. छानही वाटते आणि घाणही वाटते. फ्रेशही वाटते आणि थकायलाही होते. तेव्हा आपली नजर सरावलेली नसते आणि आक्रमकही नसते. तरी एक नवी लिंगकेंद्री सुखाची संवेदना तयार होत असते. पण कुठूनतरी आपल्याला हेही कळते, की असे राजरोस बघायचे नसते. मग आपण चोरून बघतो. नंतर आपण त्या नजरेला हळूहळू सरावतो. ही नजर एकदम सही, सहज आणि साहजिक आहे असेच आपल्याला वाटू लागते. स्त्रीदेहाकडे ‘तसेच’ पाहण्याची दृष्टी ‘कमावली’ जाते. तसे बघण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. असे मग केव्हातरी मनोमन ठरवले जाते. एखाद्या वेळी एखादी धीट मुलगी ‘काय रे ए मुडद्या, तुझ्या घरी आई-बहीण नाहीत का रे ऽऽ?’ असे विचारते तेव्हा आपण जरा जमिनीवर येतो. पण आपली आई-बहीण सोडून इतर कोणत्याही स्त्रीकडे आपण ‘तसे’ बघू शकतो असा संदेशही तेव्हा मिळतो.
स्त्रीदेहाकडे अशा उपभोगी नजरेने बघण्याचा अधिकार आपल्याला कसा मिळतो? हा अधिकार कोणत्या तत्त्वावर आधारित असतो? त्याला तत्त्व वगैरे कशाला? पुरुषलिंग हेच तत्त्व! ते तर जन्मापासून असतेच. म्हणून जन्मसिद्ध हक्क! कधी कधी हे लिंग शस्त्रासारखे भासते. अर्थात सर्वच मुलांना असे वाटत नाही. पण लिंगाचा शस्त्रीय, हत्यार म्हणून विचार काही मुलांच्या शरीर-मनामध्ये खोलवर रुजतो आणि नकळत या विचाराचीच नजर तयार होते. लिंग एखाद्या बायनाक्युलरसारखे डोळ्यांत येते. हे डोळ्यांतले ‘मुसळ’ स्वत:ला दिसत नाही, पण ते स्त्रियांना अचूक दिसते!
*******
पुढे काही वर्षांनी मी डॉक्टर झालो. पुरुष शरीरात ‘टेस्टोस्टेरोन’ नावाचे हार्मोन असते हे कळले. (आणखीही काही पुरुष-हार्मोन्स असतात.) ते आपल्या अंडकोषात आणि अ‍ॅड्रिनल ग्रंथींमध्ये तयार होते. ते तेथून रक्तामध्ये सतत झिरपत असते. आमचे एक प्राध्यापक ‘टेस्टोस्टेरोन’चा उच्चार करताना डोळे उगीचच मिचकवायचे. तर या टेस्टोस्टेरोनमुळे पुरुषाची एकूण लैंगिक व्यवस्था घडते, हे खरे. त्यामुळे पुरुषदेहाची बाहय़ रचनाही बदलते. दाढी-मिश्या वगैरे. शिवाय निसर्गत: लैंगिक आकर्षण निर्माण होते. या सगळ्या शास्त्रीय माहितीमुळे आपल्यात जे जे म्हणून काही होत असते, मनात उमटत असते, आणि जे काही शारीर अनुभव येतात त्याला चक्क शास्त्रीय आधार मिळतो. त्याचवेळी इतर पुरुषी गुणधर्मानाही शास्त्रीय बैठक प्राप्त होते. आक्रमकता, शौर्य, धाडस, धडाडी हेही या ‘टेस्टोस्टेरोन’मुळेच असते असे आपण छान ठरवून टाकतो. आक्रमकता रक्तातच असल्याने पुरुषाच्या ठायी असलेली आक्रमक नजर, अधिकार, उद्दामपणा, छेडछाड, हिंसा, शिवीगाळ, बेदरकारी, वेग, झिंग, व्यसनं वगैरे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून विनयभंग, बलात्कार हेसुद्धा टेस्टोस्टेरोनच्या वाढीव पातळीमुळे घडतात असे वाटायला लागते. ‘’ l am just a bundle of testosterone! I can’t help it !!’ ( मी तर केवळ एक टेस्टोस्टेरोनचा गुच्छ आहे. त्याला मी काय करणार!! ) असा भारी दृष्टान्त होऊ लागतो. ज्या मुलांना इतके सारे माहीत नसते त्यांनाही हे सारे निसर्गदत्त आहे असेच वाटू लागते. पण त्यावर कंट्रोल असायला हवा, असेही आपल्याला सांगण्यात येते. पण तो तसा कधी कधी राहत नाही. म्हणून त्यावर संस्कार, संयम, ब्रह्मचर्य, वीर्यसंग्रह वगैरे उपाय सांगितले जातात. पण तेही थकले आणि गुन्हे झाले की कडक शिक्षा असाव्यात अशी आपली मागणी असते. ती रास्तही आहे. पण या गोष्टी गुन्हय़ाची घटना घडून गेल्यानंतरच्या!
****
या टेस्टोस्टेरोनचा नीट शास्त्रीय शोध घेतला तर काय आढळते? हे एक बिचारे रसायन असते. साधे पाण्यासारखे नितळ असते. परीक्षानळीत ठेवले तर ते उसळत वगैरे मुळीच नाही! त्याची एक विशिष्ट रासायनिक रचना असते. त्याचा शरीरातल्या विविध अवयवांवर परिणाम होत असतो. कातडीचा तेलकटपणा, दाढी-मिशा येणे, स्नायूभार वाढणे, अंडकोषाची वाढ, वीर्य तयार होणे, शुक्राणूची वाढ होणे, मूत्रनळीच्या भोवतीचे स्पंज वाढणे (ज्यात रक्त भरल्याने लिंगताठरता येणे) असे बदल या हार्मोनमुळे होतात. तसे ते अगदी थोडय़ा प्रमाणात स्त्री-शरीरातही असते. पण याची पातळी पुरुषांत खूप जास्त असते.
यासंदर्भात वैज्ञानिकांनी अनेक अभ्यास केले आहेत. या हार्मोनची रक्तातली पातळी आणि पुरुषी आक्रमकता यामध्ये काही कार्यकारण संबंध आहे का, हे तपासण्यासाठी काही प्रयोग केले गेले. या प्रयोगांमध्ये हा कार्यकारण संबंध काही आढळला नाही आणि तसा निर्णायक पुरावाही सापडला नाही. एस. एम. अँडर्स आणि ई. जे. ड्न या शास्त्रज्ञद्वयीच्या मते, ‘रक्तातली टेस्टोस्टेरोनची पातळी वाढली की लैंगिक आक्रमकता वाढते असे आढळून आलेले नाही.’ यासंदर्भात केथेरिन सिम्प्सन यांनी केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, ‘पुरुषी लैंगिक आक्रमकतेशी पुरुषाचा पूर्वानुभव आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातून त्याला मिळालेले संदेश यांचा संबंध टेस्टोस्टेरोनच्या पातळीपेक्षा खूप जवळचा असल्याचे आढळले.’ डॅरील कॉन्नॉर, जॉन आर्चर, सी. डब्ल्यू. फ्रेडरिक या त्रयींच्या संशोधनातूनही अशाच प्रकारचे निष्कर्ष निघाले आहेत. असे अनेक अभ्यास अनेक देशांत झाले. त्यांत काही वेळा बलात्कारी पुरुषांच्या टेस्टोस्टेरोनचाही अभ्यास केला गेला आहे. अर्थात काही अभ्यासांतून पुढे असेही सिद्ध केले जाऊ शकेल, की शरीरातल्या रसायनांचा आणि आपल्या सामाजिक वर्तणुकीचा संबंध असतो. काही वेळा हा संबंध मानवी समाजाला थेट लावण्याचा मोह काही वैज्ञानिकांना होतो. त्याला ‘Biologysm’ म्हणजे ‘जीवशास्त्रवाद’ म्हणतात. एकेकाळी याला ऊत आला होता. अलीकडे त्याला खूप प्रतिष्ठा मिळत नाही हे एक बरे आहे. पण समजा, असा संबंध अगदी खरा आहे असे मानले तरी असा प्रश्न विचारायला हवा की, सो व्हॉट? माणूस म्हणून आपण काही वेगळे आहोत की नाही?
पुरुषी आक्रमकता, ताबा सुटणे, ताळ सुटणे, छेडछाड, शिवीगाळ, विनयभंग, जबरी संभोग, बलात्कार या गोष्टी जैविक नाहीत. त्या तथाकथित पुरुषधर्माच्या मुळाशी पुरुष म्हणून वाढताना कळत-नकळत झालेले संस्कार असतात. ही गोष्ट दिलासा देणारी आहे. ते संस्कार असल्याने- म्हणजे ते मूलभूत जैविक नसल्याने कितीही जुने आणि घट्ट झाले असले तरी काढून टाकता येतात. शरीरात निर्माण होणारी रसायने आणि शरीरप्रक्रिया यांचा जवळचा संबंध आहे. परंतु आपली कौटुंबिक आणि सामाजिक वर्तणूक मात्र आपल्या कौटुंबिक व सामाजिक संस्कारांवर आणि विचार-संस्कृतीवर अवलंबून असते.
अलीकडच्या काळात स्त्रीची ताकद वाढली, तिचा आत्मविश्वास वाढला, तिची स्व-प्रतिमा उंचावली म्हणून पुरुष मंडळींना काही प्रमाणात असुरक्षितता जाणवू लागली आहे यात शंका नाही. स्त्रीची ‘एम्पॉवरमेंट’ झाली की आपली ‘पॉवर’ कमी होते, अधिकारावर मर्यादा येते आणि आता स्त्री तशी ‘अव्हेलेबल’ नाहीये असे लक्षात येते. ‘एम्पॉवरमेंट’ म्हणजे स्वशक्ती आणि मुक्तीची एकत्र उमेदपूर्ण जाण; तर ‘पॉवर’ म्हणजे नुसती शक्ती आणि निव्वळ ओझं! या ओझ्याचा खरे तर त्रासच व्हायला हवा. तसा त्रास काही पुरुषांना होतोही. त्यातही एकूणच ‘पुरुष’ म्हणून आपण काही वेळा कमी पडतो. त्यातून अपराधीपणाही वाटतो. मग तो लपवण्यासाठी अधिकार गाजवावाच लागतो. हे सगळे फार विचित्र होऊन बसते.
या परिस्थितीतून काही पुरुषांना एक मार्ग दिसतो. तो महाभयंकर आहे. ‘ही पोरगी वर तोंड करून बोलते काय! म्हणे सक्षम झालीये! हिला माज आला आहे काय! हिला आता सरळच करतो!’ (म्हणजे तिचे दमन करतो, तिच्यावर अत्याचार करतो.) यात त्यांना अपराधीपणा तर वाटत नाहीच; आणि भीतीही वाटत नाही. कायदा? त्याला कोण भीक घालतो? आणि कोणाला कळणार आहे मी काय करतोय ते? पुरावाच नष्ट करायचा समूळ. जसे अलीकडे होते आहे ठिकठिकाणी.
यात स्त्रीच्या सक्षमतेचा सूड घेतलेला असतो. पण ही कृती शरीरातले टेस्टोस्टेरोन ठरवत नसते. सगळ्या अत्याचारांमध्ये सत्तेचा संबंध असतो. केवळ लैंगिक इच्छेची ऊर्मी आली आणि ती आवरतच नाहीये म्हणून बलात्कार केला जात नाही, तर जिथे आपली इच्छा, बळ चालत नाही तिथे नांगी टाकली जाते.
नवऱ्याने बायकोवर बलात्कार करण्याचेदेखील विचित्र समर्थन काही ‘टेस्टोस्टेरोनवादी’ अर्धवैज्ञानिक करताना दिसू लागले आहेत. त्यांच्या मते, पुरुषाच्या नैसर्गिक नियमानुसार पत्नीकडून पतीची कामवासना काही कारणामुळे भागविली गेली नाही तर तो साहजिकच अन्य पर्याय शोधतो. दुसऱ्या स्त्रीकडे जातो. पण ते अनैतिक समजले जाते. मग त्याच्यासमोर पत्नीवर बळजबरी करण्यावाचून अन्य मार्ग राहत नाही. कारण ते नैतिक आहे. (कारण ते कायदेशीर आहे.) एकूण काय, तर पुरुष त्याच्या शरीराच्या रासायनिक अवस्थेमुळे असहाय असतो असा समज निर्माण केला जातो. या असहायतेपोटी तो एकटय़ादुकटय़ा असहाय स्त्रीवर संधी मिळेल तेव्हा बलात्कार करतो, किंवा विनयभंग किंवा किमान छेडछाड तरी करतोच असे प्रतिपादन केले गेले आहे. याचे खापर विवाहसंस्था आणि त्यातून आलेल्या बंधनांवर फोडले जाते. अर्थात विवाहसंस्था, विशेषत: भारतीय विवाहसंस्था आणि त्यातून येणारी नातेसंबंधांतली बंधने यावर स्वतंत्रपणे बोलायला हवे. या बंधनांचा काच स्त्रीलाही तेवढाच (नव्हे, जास्तच!) बसत असतो, हेही ध्यानात घ्यायला हवे. ही बंधने जाचक होणार नाहीत याची काही सामाजिक-सांस्कृतिक योजना निश्चितपणे करायला हवी यात शंका नाही. परंतु त्याचा अत्याचार, बलात्कार वगैरेंशी कार्यकारणसंबंध जोडणे योग्य नाही.
आपण पुरुष आहोत म्हणजे काय आहोत, याचा शोध खरे तर वयात यायच्या आधीपासूनच सुरू होतो. पण तो फार लवकर संपतोही. या प्रश्नाची पौराणिक, ऐतिहासिक, अशास्त्रीय उत्तरे तात्काळ मिळतात. त्याचा विशेष अभ्यास करावा लागत नाही. आपण त्या वयातच सारे विचार थांबवतो. असे साचलेले, थबकलेले विचार डोक्यात घेऊन बसलेले तरुण माझ्यासमोर अनेकदा येत असतात. पुरुषांसाठी घेतलेल्या शिबिरांत याचा अनुभव नेहमी येतो. एका शिबिरात मी त्यांना असे सांगत होतो की, हस्तमैथुन वाईट नाही. त्यात पापभावना असण्याचे कारण नाही. सांगता सांगता सहजच मी विचारले की, हस्तमैथुन करताना तुमच्या डोळ्यांपुढे काय कल्पना (fantacy) असते, हे प्रामाणिकपणे लिहाल का? अनेकांनी जे लिहिले होते त्यात चक्क हिंसा दिसत होती. तेव्हापासून हस्तमैथुनही काही वेळा नैतिकदृष्टय़ा भयानक चुकीचे असू शकते असे मी सांगू लागलो आहे.
****
एकदा दक्षिण राजस्थानातील आदिवासी भागात गेलो होतो. आरोग्यसंवादाच्या एका कार्यशाळेत मी सांगत होतो की, स्त्रियांना, मुलींना अंघोळ करण्यासाठी नीट आडोसा हवा, दाराला कडी हवी, पुरेसे पाणी हवे, इत्यादी.. नंतर माझा एक आदिवासी मित्र मला म्हणाला, ‘मोहनभाई, आपण उद्या सकाळी नदीवर फिरायला जाऊ या.’ सकाळी नदीवर गेलो तेव्हा पाहतो तर स्त्रिया आणि पुरुष एकाच ठिकाणी कपडे काढून नदीच्या पात्रामध्ये मस्त न्हात होते. कोणी कोणाकडे ‘तसं’ पाहत नव्हतं. ते दृश्य मला अतिशय सुसंस्कृत वाटलं. अनेक आदिवासी समाजांत बलात्कार, विनयभंग वगैरे होतच नाहीत. याचा अर्थच असा, की आपल्या तथाकथित प्रगत समाजात इतर अनेक संस्कारांप्रमाणे पुरुषी संस्कारही आपल्या मनाला बाहेरून येऊन चिकटलेले असतात. निसर्गाने जे पुरुषपणाचे ‘हार्मोनल देणं’ दिलं आहे ते काढून टाकता येणार नाही. तसे करण्याची गरजही नाही. ते सुंदरच आहे. परंतु संस्कारांतून जे हीन मिळाले आहे ते निश्चितपणे काढून टाकता येईल. आपल्याला पुरुषी नजरेचे हे जड संस्कारी ओझे, आपल्याच डोळ्यांवर येणारे हे मुसळी वजन बाजूला नाही का ठेवता येणार? आणि एक सुंदर, सक्षम, सन्मानाचे, परस्पर सुखाचे नाते नाही का जोडता येणार?
डॉ. मोहन देस mohandeshpande.aabha@gmail.com

sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
Shukra And Rahu Yuti
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १८ वर्षांनंतर २ ग्रहांची होतेय ‘महायुती’; लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी
Viral Video Sister's dance on zingat song at brother's wedding girls stunning dance
Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच