पं. गंगाधरपंत आचरेकर यांनी हिंदुस्थानातली  बावीस श्रुतींची पहिली श्रुतीपेटी सिद्ध केली आणि भारतीय संगीतातील रागांमधील स्वरांचे दर्जे व्यक्त करण्याचे सामथ्र्य तिला दिले. त्यांची ही श्रुतीपेटी हे एक अभिनव, कल्पक संशोधन होतं. गंगाधरपंतांना या श्रुतीपेटीचं पेटंट मिळवायचं होतं. ते त्यांना अखेपर्यंत मिळालं नाही. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांची ही लाडकी श्रुतीपेटी अज्ञाताच्या अंधारात फेकली गेली. परंतु तिला पुनर्जन्म मिळायचा होता. त्या पुनर्जन्माची अनवट कहाणी..

वयाच्या विसाव्या वर्षीच मोठमोठय़ा पंडितांना लाजवेल असं ज्ञान गंगाधरपंत आचरेकरांना प्राप्त झालं होतं. ते जेव्हा समकालीन विद्वानांशी विषयानुरुप चर्चेला बसत तेव्हा त्यांचं वाचन, चिंतन, मनन आणि एकूणच प्रचंड अभ्यास असल्याचा प्रत्यय चर्चेत सहभागी पंडितांना येऊ लागला. एवढी विद्वत्ता असूनही त्यांच्या स्वभावातील विनम्रपणामुळे चर्चेअंती थोर विद्वान त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि सिद्धान्तांचे अंकित  होऊन जात असत. कोकणातल्या आचरे या अगदी लहानशा, पण कलासंपन्न गावात जन्मलेल्या गंगाधरपंतांना याच वयात थेट सौराष्ट्रातल्या राजकोट शहराजवळ केवळ राजपुत्रांसाठीच असलेल्या ‘राजकुमार कॉलेज’मध्ये संगीत विषयाचे  प्रोफेसर म्हणून नियुक्ती होण्याचं भाग्य लाभलं नसतं तर नंतरच्या काळात भारतीय संगीतावर त्यांनी केलेलं प्रचंड मूलभूत संशोधन कदाचित झालंही नसतं. काळ आपलं काम करतो, ते असं. ही गोष्ट १९०५ सालची. नंतरची साडेचार- पाच वर्षे हा गंगाधरपंतांच्या आयुष्याच्या पुढच्या सुवर्णकाळाची पायाभरणी करणारा काळ होता.

गंगाधरपंतांचं श्रुतिशास्त्रविषयक संशोधनकार्य अगदी शिखरावर पोहोचलं होतं. त्या परभाषिक प्रांतात त्यांच्या संशोधनकार्याला राजाश्रय लाभला होता. त्यांच्या  गायनाच्या व वादनाच्या एकल मैफली तसेच जुगलबंद्या अनेक राजमहालांमध्ये आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणी जाणकारांची वाहवा मिळवत होत्या. बालपणी आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात त्यांनी श्रद्धेने सेवा दिली होती. त्या सेवेचा कृपाप्रसाद देताना रामेश्वराने त्यांना अल्पवयातच उच्चासनी बसवलं होतं. आचार्य आचरेकरांना सोन्याचे  दिवस आले होते. पण ईश्वराचे हिशोब वेगळे असतात आणि नियतीच्या बेरजा-वजाबाक्याही वेगळ्या असतात.

कुटुंबीयांच्या इच्छेपोटी ते पुन्हा परत येण्याचा विचार करू लागले तेव्हा त्यांचे चिरंजीव (श्रुतिशास्त्रकार बाळासाहेब आचरेकर) बाळकृष्ण सहा वर्षांचे होते. मुलावर घरचे, वडिलधाऱ्यांचे संस्कार व्हावेत, त्यांचा सहवास मुलाला मिळावा असा विचार त्यामागे होता. पण स्वमुलखात परत येण्याचा गंगाधरपंतांचा निर्णय चुकीचाच होता बहुधा. निदान पुढच्या काळात  घडलेल्या गोष्टी बारकाईने पाहिल्या असता तरी तसंच म्हणावंसं वाटतं.

त्यावेळी असा योगायोग घडला. पुण्याच्या ‘ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ येथे गायन शिक्षकाचे पद भरण्यासाठी अर्ज केलेल्या चाळीस जणांच्या लेखी आणि तोंडी परीक्षेत गंगाधरपंत पहिले आले आणि त्यांची नियुक्ती झाली. ट्रेनिंग कॉलेजमधला काळ त्यांच्या गायनकर्तृत्वाचा आणि नवनिर्मितीचा काळ ठरला. अनेक गोष्टी त्यांनी नव्याने शिकून घेतल्या. उर्दू भाषा, खगोल-ज्योतिष, रत्नपरीक्षा, घडय़ाळ इत्यादी यंत्रांची दुरुस्ती यांत ते वाकबगार झाले. वाद्ये दुरूस्त करून पुन्हा उत्तम वाजती करणं, हे तर त्यांना सहजसाध्य होतं. पण वाद्यं नव्याने बनवणं ही अवघड विद्याही त्यांनी आत्मसात करून घेतली होती. राजकोटला असताना केलेलं लिखाण व बनविलेली वाद्यं त्यांनी इथे आणली होतीच. ते काम इथे जोरात सुरू झालं. त्यांनी घरच्या घरी पाच बीन बनविले. आणि विशेष प्रकारचा मृदंगही तयार केला. भारतीय संगीत व संगीतशास्त्राचे निष्णात ज्ञानवंत असलेल्या पं. गंगाधरपंतांचा ‘बीनकार’ आणि ‘संगीतशास्त्रज्ञ’ म्हणून दबदबा व लौकिक होता. गंगाधरपंतांचे संगीतशास्त्राशी संबंधित लेखन कायम गायक, वादक व अभ्यासकांना सूर्यप्रकाशासारखं मार्गदर्शक ठरलं आहे व पुढेही ठरेल.

भारतीय संगीत स्वरमीमांसा, शास्त्रीय संगीत राग- पद्धती, स्वरशास्त्रातील गुणोत्तरे, भारतीय संगीत- स्वरशास्त्र, चल व ध्रुव वीणा, संपूर्ण श्रुतिमंडल, षड्जपंचम भाव व बावीस श्रुतींची स्थाने, श्रुतींची स्वरांत विभागणी, चलवीणेत व ध्रुववीणेत स्वरसंक्रमण, शुद्धकाकल्यन्तर अर्वाचीन वीणा, केदार थाटातील श्रुतिस्वरसिद्धान्त, षड्जपंचमांची अविकृतता, केदार रागलक्षण व केदारातील जन्यथाट, शुद्धकल्याण थाटाश्रित राग, प्रचलित वीणेवरील मध्यमाच्या तारेने स्वरांची बदललेली नावे- हे सर्व लेखन पाहता गंगाधरपंत आचरेकरांच्या स्वरशास्त्रामधील कामगिरीची कल्पना येईल. तथापि, ‘मत्सरीकृता मूच्र्छने’चे दोन भाग ही आज दुर्मीळ झालेली छोटी ठाशीव पुस्तकं अपार महत्त्वाची आहेत.

त्यांचे संगीतविषयक प्रयोग पाहता ते महान शास्त्रज्ञ होते हे लक्षात येते. सारणा प्रयोगाचं सतारीवर दिग्दर्शन प्रथम त्यांनी केलं. असा प्रयोग संगीतविश्वात प्रथमच घडला. आचार्य गं. भि. आचरेकरांनी हिंदुस्थानातली पहिली श्रुतीपेटी सिद्ध केली आणि भारतीय संगीतातील रागांमधील स्वरांचे दर्जे व्यक्त करण्याचे सामथ्र्य तिला दिले. त्यांची श्रुतीपेटी हे एक अभिनव, कल्पक संशोधन होय. यासाठीचा अभ्यास जरी ते आयुष्यभर करत आले होते, तरी प्रत्यक्ष ही श्रुतीपेटी तयार झाली ते साल होतं- १९२७. बावीस श्रुतींची ही हार्मोनियम त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी बनवली. तत्कालीन वृत्तपत्रांमधून तिची प्रचंड स्तुतीपर चर्चा सुरू झाली. गायक, वादक, जाणकारांना कौतुक वाटावं असाच हा शोध होता. साहजिकच पुण्याच्या टिळक रोडवर चिमणबागेतल्या गंगाधरपंतांच्या घरी उत्सुक जाणकारांची रीघ लागून राहिली. त्यात मोठमोठे गायक, वादक होते. गंगाधरपंत प्रत्येकाला अतिशय आवडीने या श्रुतीपेटीचं दर्शन घडवीत होते.. तंत्र समजावून देत होते. गंगाधरपंतांना या श्रुतीपेटीचं पेटंट मिळवायचं होतं. ते त्यांना अखेपर्यंत मिळालं नाहीच; पण त्यांच्यामागे सदैव लकडा लावणाऱ्या गोविंदराव टेंब्यांना अशी पेटी बनवून घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. गंगाधरपंतांची या निर्मितीचं पेटंट घेण्याची इच्छा होती. त्यामागची त्यांची भूमिका एका तपस्व्याची होती; व्यावसायिकाची नव्हती. काळाच्या ओघात पुढे अशा श्रुतीपेटय़ा बनवायचा प्रयत्न करणाऱ्या कारागीरांनी श्रुतीशास्त्राच्या नियमांशी तडजोड करू नये, कुणा नवख्याच्या हातून या बनावटीत काही चूक, काही त्रुटी राहून जाऊ नये, ही त्यांची त्यामागे तळमळ होती.

पुढे गिरगावात कांदेवाडीत राहणाऱ्या एच. पी. भगत या कारागीरांना मदतीला घेऊन रघुवीर रामनाथकर यांच्या मदतीने गोविंदराव टेंबे यांनी आचरेकरांकडील रेखाचित्रं व फोटोग्राफ्सनुसार नवी पेटी बनवून घेतली आणि ते ती आवडीने वाजवू लागले. पण तिकडे गंगाधरपंतांना मात्र पेटंट न मिळाल्याच्या प्रकरणाचा फार मन:स्ताप झाला. या प्रयत्नांत असतानाच १९३७ साली त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९३९ साली ते दिवंगत झाले. त्यांचे लेखन, अनेक वाद्यांची नवनिर्मिती थांबून गेली आणि भारतीय शास्त्रीय संगीताला मोठी देणगी असलेली त्यांची लाडकी श्रुतीपेटी अज्ञाताच्या अंधारात दिसेनाशी झाली.

अंधारात लुप्त झालेल्या या अपूर्व संशोधनाला पुन्हा एकदा तेज प्राप्त झालं ते गंगाधरपंतांचे चिरंजीव बाळकृष्ण यांच्यामुळेच. ते स्वत: वाद्यदुरुस्तीमध्ये निष्णात होते. त्यामुळे रुग्णशय्येवरील वडिलांची सेवा करताना त्यांच्याकडून मिळालेलं प्रचंड ज्ञान ही त्यांची शिदोरी होती. गंगाधरपंतांचं नवनिर्मितीचं ठप्प पडलेलं काम एवढय़ा तापत्रयानंतर, एवढय़ा वर्षांनंतर अशा रीतीने पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झालं होतं.

बाळकृष्ण म्हणजेच पुढे ज्यांना श्रुतीशास्त्रकार बाळासाहेब आचरेकर म्हणून ओळखलं गेलं, यांचा स्वत:चा संगीतविषयक अभ्यास वडिलांच्या सहवासाने प्रचंड झाला होता. त्यांचं स्वत:चं लिखाण अफाट होतं. वाचण्यासाठी आणलेले संदर्भग्रंथही ते संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात उतरवून घेत असत. संगीतशास्त्राचं एवढं ज्ञान असूनही बाळासाहेबांनी उपजीविकेच्या इलेक्ट्रिसिटीच्या व्यवसायात पूर्ण लक्ष गुंतवलं होतं. कारण श्रुतीपेटीबाबत वडील गंगाधरपंतांना आलेले कटू अनुभव त्यांनी पाहिले होते. पण एका अनपेक्षित घटनेमुळे बाळासाहेब पुन्हा एकदा संशोधनाकडे वळले. झालं असं की, पं. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांनी लिहिलेला ‘श्रुतीदर्शन’ नावाचा ग्रंथ एका वृत्तपत्राकडून परीक्षणासाठी बाळासाहेबांकडे आला. त्यातील गंगाधरपंतांच्या कार्यावरील टीका वाचून बाळासाहेबांनी अभ्यासास प्रारंभ केला. त्यांना श्रुतींच्या गणितांचा उलगडा होऊ लागला. संस्कृत, मराठी, इंग्रजी संदर्भग्रंथांच्या केलेल्या हस्तलिखित नकला यावेळी कामी आल्या. ‘श्रुतीशास्त्र’ हा अवघड विषय त्यांना खोलवर स्फटिकासारखा स्वच्छ दिसू लागला. या तपश्चर्येतूनच ‘संगीतकलाविहारा’त ‘श्रुतीदर्शन’ ग्रंथाच्या परीक्षणाचे पंधरा दीर्घ लेख उदयाला आले. या अभ्यासामधूनच पुढे ‘भारतीय संगीत व संगीतशास्त्र’ हा संगीत क्षेत्राला पथदर्शक व पूजनीय असलेला ग्रंथ त्यांच्या हातून लिहिला गेला. वृद्धावस्थेत मधुमेहाच्या अतिरेकाने बाळासाहेबांना फार त्रास झाला. या दुखण्यातच पुढे दहा वर्षांनी ते गेले. परंतु हयात असेपर्यंत त्यांनी गंगाधरपंतांचं स्वत:चं लिखाण, ग्रंथसंपदा व गंगाधरपंतांची सर्व वाद्यं आणि विशेषत: श्रुतीपेटी जीवापाड सांभाळली.

गंगाधरपंतांच्या ‘त्या’ पेटीविषयीचं गूढ आकर्षण मनात ठेवूनच संगीत क्षेत्रातला प्रत्येकजण वावरत होता. त्या अनेकांपैकी हार्मोनियमवादक तुळशीदास बोरकर हेही एक होते. बोरकरांचा गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर स्नेह जुळल्यानंतर एकदा त्यांनी स्वत: बनवून घेतलेल्या श्रुतीपेटीवर वादनही ऐकवलं. तुळशीदास बोरकरांना ते म्हणाले, ‘तुम्ही जर गंगाधरपंतांची बावीस श्रुतींची पेटी ऐकली तर आनंदाने बेहोश व्हाल!’ त्यांनी बोरकरांकडे त्या पेटीचं रसभरीत गुणवर्णन केलं आणि अद्यापही ती बाळासाहेबांकडे असल्याचं सांगितलं. अनेक प्रयत्नांनंतर बोरकर बाळासाहेब आचरेकरांकडे पोहोचले. त्या दोघांची प्रदीर्घ चर्चा झाली. एकदा बोरकरांनी बाळासाहेबांना नमस्कार केला व धीर करून म्हणाले, ‘ही पेटी माझा परमेश्वर आहे. आपण ती मला द्याल का?’ गेली पन्नास वर्षे बाळासाहेबांनी ती पेटी जीवापाड जपली होती. ती त्यांच्या वडिलांचं ‘फाइंड’ होती. संगीत क्षेत्राचा अभिमान होती. ही पेटी त्यांच्या गर्वाचं स्थान होती. ती त्यांचाही परमेश्वरच होती. त्यांनी सावकाश डोळे उघडले. बोरकरांच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं व उद्गारले.. ‘दिली.’

तुळशीदास बोरकरांनी पेटीचा अभ्यास सुरू केला. रचना लक्षात घेतली. पेटी जुनी झाली होती. तिला वाजती करण्यासाठी बरंच काम करावं लागणार होतं. पेटीचं मटेरिअल विदेशी होतं. चांगले सूर मिळतात का, पाहण्यात र्वष गेली. शेवटी अभ्यासाअंती बोरकरांनी तशीच श्रुतीपेटी पुन्हा बनवून घेण्याचा चंग बांधला. सात वर्षांनी नवी पेटी बांधली गेली. २००७ साली खास जाहीर कार्यक्रम करून ही नवी पेटी बोरकरांनी रसिकांसमोर सादर केली. वाजवली. आणि तिचा सर्व इतिहास सांगून आचार्य गं. भि. आचरेकर व बाळासाहेबांप्रति ऋण व्यक्त केलं. आता बोरकर गुरुजींनी सत्तरी ओलांडली आहे. आताच्या काळात गंगाधरपंतांनी सिद्ध केलेल्या श्रुतीशास्त्राची आवड असणारा ज्ञानी मिळणं अवघडच. या नव्या पेटीचं पुढे काय होणार, ही चिंता त्यांना लागून राहिली होती. गंगाधरपंतांचं मूर्तिमंत श्रुतीशास्त्र लयाला धाडण्याचं नियतीनं ठरवलं होतं; पण रामेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं.

श्रुतीशास्त्राच्या ध्यासाने झपाटलेला एक वेडा पंडित अजून शिल्लक होता. पं. मुकुल शिवपुत्र.. साक्षात गंधर्व! पं. कुमार गंधर्वाचे चिरंजीव. पं. मुकुल शिवपुत्र तेव्हा २२ वर्षांचे होते. बाळासाहेब आचरेकरांचा ‘भारतीय संगीत व संगीतशास्त्र’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून मुकुल घरात वडिलांच्या तोंडून सतत बाळासाहेब, गंगाधरपंत व श्रुतीशास्त्र याविषयीच ऐकत आले होते. त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. त्यांनी तडक पुणे गाठलं. खरं तर तेव्हा बाळासाहेबांच्या पायांना मधुमेहातिरेकाने जखमा झाल्या होत्या. त्यांच्या चालण्या-फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. तरीही ते समरसून विद्यादान करीत होते. कारण समोरचा शिष्य देहभान हरपून शिकत होता. बाळासाहेबांनी त्या दोन वर्षांत मुकुलजींना श्रुतीशास्त्राचं संपूर्ण ज्ञान दिलं. आयुष्यातील सगळ्या स्थित्यंतरांत श्रुतीशास्त्राची बाळासाहेबांनी शिकवलेली गणितं मुकुलजींच्या मनात सतत मांडली जात होती. गंगाधरपंतांचे प्रयोग बाळासाहेबांच्या मुखातून पं. मुकुल शिवपुत्रांच्या बुद्धिमान डोक्यात येऊन बसले होते. गेली कित्येक वर्षे मुकुलजी ‘सुसंवादिनी’च्या निर्मितीप्रक्रियेत आकंठ बुडून गेले आहेत. त्यांची त्यासाठीची मेहनत आम्ही जवळून पाहिली आहे. त्यांच्या तळमळीला यश यावं असंही फार वाटायचं.

तुळशीदास बोरकरांना भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांनी दिलेली पुस्तकं मी वाचून काढली. त्यांच्या ‘साथसंगत’मध्ये पुस्तकाच्या अखेरीस प्रो. पं. गं. भी. आचरेकर यांच्या ‘त्या’ कार्यात श्रुतींच्या हार्मोनियमचा उल्लेख पाहून मी उडालेच. आचार्य आचरेकरांची ती ऐतिहासिक निर्मिती बोरकर गुरुजींनी स्वत:कडे घेऊन पुनरुज्जीवित केल्याचं वाचून मी थक्क झाले. गेली कित्येक वषेर्ं मुकुलजीही ‘सुसंवादिनी’च्या निर्मितीप्रक्रियेत आकंठ बुडून गेले होते. प्रचंड प्रयत्नांनंतरही त्यांना अशी पेटी बनवून मिळत नव्हती. जुनी व नवी श्रुतीपेटी बोरकर गुरुजींकडे असल्याचं कळल्याने मुकुलजी हर्षभरीत झाले. बोरकर गुरुजी व मुकुलजी प्रेमाने एकमेकांना भेटले. आपल्या कल्पनेतला तो आविष्कार समोर प्रत्यक्षात पाहून मुकुलजी थक्क झाले. बोरकर गुरुजींनी अत्यंत मायेने मुकुलजींना पेटीची संरचना दाखविली. ‘मला दोन हात शिकवाल का?’ मुकुलजींनी बोरकर गुरुजींना विचारलं. संगीतातल्या महान पंडिताचा तो विनय पाहून बोरकर गुरुजी सद्गदित झाले. पं. मुकुल शिवपुत्र यांनी या संवादिनी-साधकाकडून गंडा बांधून घेतला व गुरुजींचं मार्गदर्शन मागितलं. गुरुजी गहिवरले. निघताना मुकुलजी म्हणाले, ‘मला माझ्या पुढील संशोधनासाठी ही पेटी वारंवार पाहायला मिळेल का?’ बोरकर गुरुजींनी क्षणाचीही उसंत लावली नाही. म्हणाले, ‘ही मी तुम्हाला दिली. कायमची.’ आम्ही सगळे हतबुद्ध झालो. आठवडय़ाने बोरकर गुरुजींकडे जाऊन ती पेटी ताब्यात घेतली. घेताना मी गुरुजींना नमस्कार करून म्हटलं, ‘गुरुजी, तुम्ही म्हणालात- ‘तुमची सुकन्या सुस्थळी पडली. पण पुन्हा एकदा ती स्वगृहीही आली आहे. आचरेकरांची सुकन्या आचरेकरांच्याच घरात आली आहे. निश्चिंत रहा.’

प्रिया आचरेकर  priyaachrekar@gmail.com

(पं. तुळशीदास बोरकर, सुलभा भार्गवराम आचरेकर, गिरीश भार्गवराम, पं. मुकुल शिवपुत्र  यांनी या लेखासाठी तपशील पुरवले.)