जुन्या जमान्यातल्या पाश्र्वगायिका मुबारक बेगम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी गायलेल्या यादगार गीतांचा.. विशेषत: ‘तुम्हारी याद आएगी..’ या त्यांच्या अजरामर गीताच्या पाश्र्वभूमीचा मागोवा घेणारा लेख..
जुन्या जमान्यातल्या गाजलेल्या पाश्र्वगायिका मुबारक बेगम गेल्या, ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि काही क्षणांतच ‘कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आएगी’ या गाण्याचा व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर फिरू लागला. विकिपिडीयावरची त्यांची नोंद अपडेट झाली. वर्तमानकाळातल्या नोंदी भूतकाळात जमा झाल्या. पत्र व मीडिया पंडितांना त्याचा मोठाच आधार मिळाला. १९४९ च्या ‘आईये’पासून १९८१ च्या ‘नई इमारत’पर्यंत एकूण ११५ बोलपटांची यादी पाहायला मिळाली. त्यांच्या १७८ चित्रपटगीतांपकी १७४ गाण्यांची सूची तिथे दिलेली आहे. त्यातली सदाबहार व लोकप्रिय १४ गाण्यांची यादी स्वतंत्रपणे नोंदलेली आहे. त्यात ‘मुझको अपने गले लगा लो ऐ मेरे हमराही’ (‘हमराही’- १९६३) पहिल्या नंबरवर आहे. यादी वाचली तर तीन-चारच गाणी पटकन् आठवतात आणि त्यांची चालही डोक्यात वाजायला लागते. त्यातली काही गाणी अशी..
‘नींद उड जायेगी तेरी, चनसे सोनेवाले’ (‘जुआरी’- १९६८), ‘वो ना आऐंगे पलटके’(‘देवदास’- १९५५), ‘हम हाल-ए-दिल सुनाऐंगे’ (‘मधुमती’- १९५८), ‘वादा हमसे किया दिल किसीको दिया’ (‘सरस्वतीचंद्र’- १९६८), ‘बे मुरव्वत बेवफा बेगाना ए दिल आप है’ (‘सुशीला’- १९६६), ‘हमे दम दे के सौतन घर जाना, बरन घर जाना’ (आशा भोसलेसह. ‘ये दिल किसको दूँ’- १९६३), ‘देवता तुम हो मेरा सहारा’ (मोहम्मद रफीसह. ‘दायरा’- १९५३), इ.
‘हमारी याद आएगी’ बोलपटाचे संगीतकार स्नेहल भाटकर यांचा आणि आमच्या ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’च्या सभासदांचा दाट स्नेह होता. आमच्या भालचंद्र मेहेर यांच्या दादरच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पांकरता आणि जुन्या रेकॉर्ड्स पाहण्याकरता ते पुष्कळदा येत असत. अशाच एका मफिलीत आम्ही ‘हमारी याद आएगी’ या सिनेमातल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकांचा विषय काढला. हरमंदिरसिंग हमराजजींच्या गीतकोशाप्रमाणे ७८-गतीच्या एकूण चार रेकॉर्डस्पकी दोनवर बोलपटाचं नाव ‘जवाँ मोहब्बत’ असं आहे, तर उरलेल्या दोनवर ‘हमारी याद आएगी’ असं आहे. हा काय प्रकार आहे, असं विचारता भाटकर मिश्किलपणे हसले व म्हणाले, ‘‘आमच्या फिल्मवाल्यांची ही अजब दुनिया आहे. मी काम सुरू केलं ते ‘जवाँ मोहब्बत’साठीच. केदार शर्मा या बोलपटाचे सबकुछ. सगळी गाणी त्यांचीच. एकेक गाणं आणून द्यायचे आणि मी चाली करून ऐकवत असे. एक दिवस रेकॉìडग स्टुडियोत चाली बांधत बसलो होतो. ‘कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आएगी’ या गाण्याचा मुखडा व एक कडवं घेऊन ते गडबडीतच आले आणि तातडीनं याचं ध्वनिमुद्रण हवं म्हणून मागं लागले. मी ताबडतोब चाल लावली. ती त्यांना आवडली. लताजींनी ते गावं असं माझ्या मनात होतं. पण त्यांचीही काही सवड पाहावी एवढा धीर केदारजींकडं नव्हता. म्हणून दुसऱ्याच एका गाण्याच्या तालमीकरिता स्टुडियोत आलेल्या मुबारक बेगमकडून मी ते गाणं गाऊन घेतलं. गाण्याचा जीव चिमुकला असल्यानं बरंच संगीत वापरून व मुखडा रिपीट करून कसंबसं ते अडीच मिनिटांचं बनवलं. ध्वनिमुद्रण केलं आणि ते विसरूनही गेलो. त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे बोलपटाच्या आधीच गाण्यांच्या रेकॉर्डस् निघत व सिनेमा हॉल व रेडियोवर पूर्वप्रसिद्धीसाठी वाजवल्या जात. या ध्वनिमुद्रिकाही तशाच वाजायला लागल्या व केदारजी बोलपट पुरा करायच्या मागे लागले. या गाण्यानं काय जादू केली कळेना, पण एकदम हिट् झालं. सगळीकडं  वाजायला लागलं. रेकॉर्ड  तडाखेबंद खपायला लागली. मुबारकचं नाव तर झालंच! कुणालाच हे गाणं एवढं लोकप्रिय होईल असं वाटलं नव्हतं. हे यश पाहून केदार शर्मानी बोलपटाचं नाव अखेरच्या क्षणी बदललं- ‘जवाँ मोहब्बत’ बदलून त्या जागी आलं- ‘हमारी याद आएगी’! अशी आहे त्यामागची कहाणी!
त्यामुळे संगीतकार म्हणून स्नेहल भाटकरांच्या नावावर दोन बोलपट लागले- ‘जवाँ मोहब्बत’ व ‘हमारी याद आएगी.’ ‘हमारी याद आएगी’ हे तीनच शब्द; पण त्यांनी एका पाश्र्वगायिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं. आज हा बोलपट युटय़ुबवर पाहायला मिळतो. अ‍ॅडम व इव्हच्या कथेवरून तो सुचला. त्यात आनंद कुमार हा केदार शर्माचा मुलगा हीरो, तर नवोदित तनुजा हीरॉइन होती. संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं. याचं शूटिंग उदयपूर येथे झालं होतं. या सगळ्या गोष्टी कदाचित काळाच्या ओघात विसरल्या जातील, पण या गाण्याचं तसं नाही. कानसेनांच्या श्रवणसृष्टीत व मनात त्यानं एक अढळ स्थान पटकावलेलं आहे. अशी काय जादू आहे बरं त्यात? सिनेसंगीताचे गाढे अभ्यासक व अभिजात संगीतातली विद्वान मंडळी यथावकाश त्याचा धांडोळा घेतीलच; पण सर्वसामान्य रसिकानं काय केलं आहे ते नोंद घ्यावी असंच आहे.
‘मस्तकलंदर’ नावाच्या युटय़ुबवरच्या खातेदारानं आदरांजली म्हणून हे गाणं १९ जून २००९ रोजी अपलोड केलं आहे आणि ते चार मिनिटांहून अधिक वाजतं. त्यात मुबारकजींच्या उत्तरायुष्यातल्या कार्यक्रमांतले खूप फोटो आहेत. ते मुळातूनच पाहावेत असे आहेत. गाण्यासोबतच्या टिपणात मदतीचं आवाहन असून मुबारकजींचा पत्ता व बँक खात्याचा तपशीलही दिलेला आहे. किती जणांनी मदत पाठवली माहीत नाही, पण गेल्या सात वर्षांत ८,८०,९९२ जणांनी ते पाहिलं व ऐकलं आहे आणि ६०६ जणांनी त्यावर कॉमेंट्स लिहिल्या आहेत. त्यातून बरीच माहिती दर्शकांना मिळते. हे गाणं मालकंस रागात बांधलं आहे, असं एकजण लिहितो, तर भीमपलास व झिंजोटीचे हे स्वर वाटतात, असं दुसरा रसिक म्हणतो. ‘तनहाई’ म्हणजे एकटेपणा ही या गाण्याची थीम असल्यामुळेच ते एवढं भिडतं व मुबारकजींच्या आवाजात ते अमर व अढळ झालं आहे, असं तर प्रत्येकजणच म्हणतो. त्यांची स्मृती हे एकच गाणं सदैव जागती ठेवील, अशी प्रत्येक गानरसिकाची भावना आहे.
सुरेश चांदवणकर chandvankar.suresh@gmail.com

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…