खासगी पत्रव्यवहार नंतर पुस्तकस्वरूपात येणं ही नावीन्याची गोष्ट नाही. इंग्रजी साहित्यात ‘डिअर थिओ’ ही चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग आणि त्याचा जिवलग भाऊ थिओ यांच्यातील पत्रसंवादरूपी आत्मकथनात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. तसंच ऑस्ट्रियन कवी रेनर मारिया रिल्केची ‘लेटर्स टू ए यंग पोएट’ ही पुस्तकं आठवतात. नामवंतांच्या पत्रांची नंतर पुस्तकं झाली तरी त्यातील उत्स्फूर्ततेचा निखारा शाबूत राहतो. पत्रांवर जरी काळाची राख जमलेली असली तरी प्रतिभावान व्यक्तींचा पत्रव्यवहार वाचणं वाचकाला आवडतं, कारण या पत्रांमध्ये गोठलेला काळ असतो. त्यात संबंधित व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व असतं. पत्रं म्हणजे जणू त्या नातेसंबंधांचं शाब्दिक स्मारक असतं. पत्रसंस्कृती लयाला जायला सुरुवात होऊन फार काळ झालेला नाही. मराठी साहित्यामध्ये पत्रसंस्कृतीच्या बहराच्या काळातील काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील महत्त्वाचं नाव म्हणजे जी. ए. कुलकर्णी. जी. ए. आणि सुनीताबाई देशपांडे यांचा पत्रव्यवहार ही वाचकांना पर्वणी होती.

‘एक धारवाडी कहाणी’ हे पुस्तक संपादक आणि लेखक यांच्यातील पत्रव्यवहाराचं आहे. अर्थात ते केवळ संपादक-लेखक यांच्यातल्या रूक्ष नात्याचा लेखाजोखा मांडणारं नाही. कारण इथं संपादक आहेत अनंत अंतरकर आणि लेखक आहेत जी. ए. कुलकर्णी. तीस वर्षांपूर्वी झालेला हा पत्रव्यवहार आनंद अंतरकरांनी वाचकांसाठी ‘एक धारवाडी कहाणी’ या पुस्तकातून आता खुला केला आहे.

या पुस्तकात तीन भाग आहेत. उपोद्घातामध्ये जी. ए. आणि अनंत अंतरकर यांचा पत्रव्यवहार आहे. यात जी. एं.नी अनंत अंतरकरांना पाठवलेली पत्रं आहेत. त्यात ‘सत्यकथे’चा अनिवार्य उल्लेख येतो. या भागातील एका पत्रात जी. ए. म्हणतात, ‘‘माझे पुष्कळसे लेखन ‘सत्यकथे’त आले, याचे एक कारण तिला अयशस्वी लेखनाची भीती वाटत नाही; Experimental writing विषयी तिरस्कार वाटत नाही.’’ अशावेळी एक लेखक म्हणून  वर्तमानकाळात ‘सत्यकथा’सारखं माध्यम नाही याचं दु:ख जाणवतं. अनंतरावांचं संपादक म्हणून असलेलं कणखर व्यक्तिमत्त्व पत्रांतून जाणवतं. साहित्यावर असलेलं प्रेम आणि साहित्याचा व्यवसाय करणं यासंबंधी त्यांची निखळ, स्वच्छ, ठाम मतं होती. लेखकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाबाबत निश्चित आणि आग्रही विचार होता; जो सध्याच्या काळातील संपादकांनी विशेष लक्षात घेण्याजोगा आहे. जेव्हा व्यवसाय हा निव्वळ व्यवसाय म्हणून न करता त्यात पॅशन असते तेव्हा असे संपादक आणि त्यायोगे असं साहित्य तयार होतं. अनंतरावांनी हा वारसा पुढे आनंद अंतरकर यांच्याकडे सुपूर्द केला.

‘आनंद अंतरकर पर्व’मध्ये आनंद अंतरकर यांची मोजकी पत्रं आहेत आणि बरीचशी जी. एं.ची पत्रं आहेत. प्रत्येक पत्राची पाश्र्वभूमी आनंद अंतरकर नीट विस्तृतपणे उलगडून दाखवतात. यात आनंद अंतरकरांची डौलदार भाषा जाणवते. अनेक र्वष शेकडो पुस्तकं वाचून आणि संपादन करून अशी भाषा संस्कारित होते. पुस्तकाचा हा भाग साहजिकच अधिक वाचनीय आहे. हा सर्वच पत्रव्यवहार ज्या काळात घडला तो जी. एं.च्या लेखनकर्तृत्वातील भराचा काळ होता. ‘काजळमाया’ या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळणं आणि जी. एं.नी तो पुरस्कार परत करणं हे प्रकरणदेखील तेव्हाच घडलं आहे. जी. एं.सारख्या लेखकाचा बहारीचा काळ या पत्रांमध्ये शब्दबद्ध झाला आहे. नंतर जी. एं.ना आलेला ‘रायटर्स ब्लॉक’ आणि प्रकृतिअस्वास्थ्यामुळे लेखन थांबत जाणं, हा काळदेखील या पत्रलेखनात येतो.

उपसंहारात जी. एं.च्या मृत्यूनंतर आनंद अंतरकरांच्या त्यांच्याविषयीच्या हृद्य भावना प्रकट झाल्या आहेत. स्वाभाविकपणेच हा भाग अतिशय भावनिक आणि हळवा झाला आहे.

जी. ए. कुलकर्णीचं पहिलं लिखाण प्रकाशित केलं अनंत अंतरकर यांनी. आणि त्यांचं अखेरचं लेखन प्रकाशित केलं अनंत अंतरकरांचे पुत्र आनंद अंतरकर यांनी. आनंद अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या वयात एका पिढीचं अंतर होतं. तुलनेनं कमी वयातच संपादक म्हणून आनंद अंतरकर यांना ‘हंस’ मासिकाचं काम पाहावं लागलं. याचं कारण वडील अनंत अंतरकरांचं झालेलं आकस्मिक निधन. अनंत अंतरकरांशी खंडित झालेला पत्रव्यवहार जी. एं.नी आनंद अंतरकरांशीही सुरू ठेवला. त्याला ‘दूत’ या कथेचं निमित्त होतं. आनंद अंतरकरांवर एक व्यक्ती म्हणून आणि संपादक म्हणूनही जी. एं.चं गारुड होतं. आणि ते अजूनही कायम आहे, हे या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासून शेवटच्या शब्दापर्यंत सतत जाणवत राहतं. तरीही संपादक म्हणून कथा नाकारायचा त्यांचा अधिकार त्यांनी ‘रत्न’ या कथेबाबत बजावला आहे. जी. ए. नकाराची तयारी कायमच ठेवत असत. त्यासाठी ते लिखाणासोबत पोस्टेजसहित कोरं पाकीटही पाठवीत. लिखाण नाकारलं तरी चालेल, पण लिखाणात बदल करायचा नाही- असा ‘जी. ए. दंडक’ होता.

पत्रव्यवहाराच्या सुरुवातीच्या काळात जी. ए. मानधन वाढवण्याची अपेक्षा अतिशय सौम्य शब्दांत व्यक्त करतात. नंतर काही काळानं प्रकाशकाच्या आíथक स्थितीच्या काळजीपोटी आलेले हक्काचे चेक्सही ते वटवीत नाहीत. यातून जी. ए. आणि आनंद अंतरकर यांचं वाढत गेलेलं मधुर नातं जाणवतं. ‘साहित्यिक व्यवहारा’त असं नातं निर्माण होणं ही एक देखणी घटना होय.

अनुवादाचं काम जी. ए. अतिशय प्रेमानं आणि जीव तोडून करीत असत. चांगला अनुवादक हा लेखकाचाच उद्गार असतो, असं त्यांचं मत होतं. सुदैवानं आनंद अंतरकरांसारखा अनुवादाचा आदर करणारा संपादक जी. एं.ना लाभला होता. पण अनुवादाच्या श्रेयासंदर्भात जी. ए. कुलकर्णी यांचा व्यवहार विचित्र होता. प्रकाशित अनुवादावर त्यांचं नाव टाकायचं नाही, हा त्यांचा आग्रह असे. संपादक म्हणून आनंद अंतरकरांना तो पटत नसे. अशावेळी एका अनुवादित कथेवर अंतरकर अनुवादकाच्या जागी सरळ ‘???’ टाकून मोकळे होतात. तर एका अनुवादित कथेवर ‘‘या कथेच्या भाषेचा धारवाडी खणासारखा पोत आणि एकंदर किनखापी वीण पाहून हे नाव कोणत्या लेखकाचं आहे हे ‘हंस’चे चाणाक्ष वाचक ओळखतीलच..’’ असं चतुर विधान करतात. लेखक-संपादकातील ही चुरस बघताना मनोरंजन होतं. फेसबुकवरून दुसऱ्याचं लेखन चोरून ते व्हॉट्स अ‍ॅपवर स्वत:च्या नावावर खपविण्याच्या आजच्या उथळ काळात हे सगळं वाचणं चमत्कारासारखंच भासतं.

जी. ए. कुलकर्णीचं व्यक्तिचित्र नेहमीच गंभीर, एकांतप्रिय, विक्षिप्त असं चितारलं गेलं आहे. जी. एं.चं विनोदाचं अंग या पुस्तकात अनेकदा दिसतं. हे या पुस्तकाचं एक वैशिष्टय़ म्हणायला हवं.

एक कथा विशेष आवडली म्हणून आनंद अंतरकर ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त मानधन पाठवतात तेव्हा जी. एं.ना ती नजरचूक वाटते. तेव्हा पाठवलेल्या पत्रात जी. ए. म्हणतात, ‘‘ही दीपावली तुम्हाला समाधानाची आणि ऐश्वर्याची जावो. (या इच्छेत स्वार्थ आहे, हे मुद्दाम सांगायला नकोच!)’’ इथं कंसातील वाक्यातून दिसणारा मिश्कील खोडकरपणा जी. ए. करू शकतात यावर अट्टल जी. ए.-रसिक कदाचित विश्वास ठेवणार नाहीत.

‘‘संपादक या व्यक्तीविषयी अद्यापही माझ्या मनात असे जबरदस्त पूर्वग्रह आहेत, की तसला एखादा माणूस खळखळून हसला किंवा आतडय़ानं बोलला तर प्रथम मी अतिशय घाबरा होतो,’’ असं जी. ए. एका पत्रात म्हणून जातात तेव्हा तेही ‘मन की बात’ एका संपादकाला सांगत आहेत, यातील मजेशीर विसंगती जाणवल्याशिवाय राहत नाही.

लेखनाव्यतिरिक्त जी. एं.चं प्राध्यापक म्हणून जीवन होतं. या पुस्तकात काही वेळा त्या जीवनाचा उल्लेख होतो. कारण वरकरणी हा पत्रसंवाद औपचारिक संपादक-लेखक नात्यात होत असला तरी त्यातून निर्माण झालेल्या मत्रीचे पडसाद सतत जाणवत राहतात. जी. एं.चं वैयक्तिक रूप दिसतं तेव्हा त्यांच्या काळ्या चष्म्याआड दडवलेला आतला मऊ माणूस दिसतो. कवितेविषयी जी. ए. म्हणतात, ‘‘मी इतकी र्वष टीका शिकवायचा धंदा करतो, पण त्या कवितेत ‘पाय टाकुनी जळात बसला ऐसा औदुंबर’ ही ओळ येताच मनावर एक थरकावा का येतो हे मला अद्याप समजले नाही.’’ त्यातून जी. ए. आणि ग्रेस यांचाही पत्रव्यवहार आठवतो. कवितेविषयी जी. एं.ना विशेष ममत्व होतं. कवी व्हायचं असताना आपल्याला ते जमणारं नाही असं जी. एं.नी ठरवलं आणि मराठी कथेचं भाग्य उजळलं. कवितेचं प्रेम जी. एं.च्या पत्रलिखाणातून अनेकदा व्यक्त होतं. या वरच्या वाक्यामधील ‘थरकावा’ हा शब्द खास ‘जी. ए. टच्’ आहे.

जी. एं.च्या अशा अनेक बारीकसारीक गोष्टी या पुस्तकात सापडतात आणि त्यातून जी. एं.चं व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहतं. या सगळ्यातून ‘एक धारवाडी कहाणी’ या पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित होतं.

याआधी जी. एं.चं व्यक्तिमत्त्व त्यांनी लिहिलेल्या कथांसारखंच दु:खाचं ऑब्सेशन असणारं, गूढ, मानवी प्रवृत्तीतील अनाकलनीय सत्यांचा वेध घेणारं, करुण घटनांचे साक्षी असेल असं वाटतं. पण इथं जी. ए. भेटतात ते हास्यविनोद करणारे, स्वत:च्या आवडीनिवडी ठासून सांगणारे, प्रेमळ आणि मायाळू, मोकळेढाकळे, स्वत:च्या नावडीविषयी स्पष्टपणे अतिटोकाला जाऊन लिहिणारे. विशेषत: जी. एं.नी मांजराविषयी लिहिलेलं पत्र हा एक वेगळा, गमतीशीर ललितलेखच आहे.

कथेसाठी टुमणं लावलेल्या या चिवट संपादकाला ‘‘कथेवर बलात्कार करण्याची माझी प्रथा नाही,’’ असं जी. ए. एका पत्रात सहज म्हणून जातात. हे वाचून कथा पाडणारे अनेक बनचुके लेखक आपल्याला आठवतात आणि जी. एं.विषयी वाटणाऱ्या आदरात भर पडते.

एकूणच साहित्याकडे बघण्याची जी. एं.ची दृष्टी विस्तारित होती. ते स्वत: अफाट क्षमतेचे वेचक वाचक होते. त्यांची मराठी वाचकांकडून असणारी अपेक्षा बहुधा पूर्ण होत नसावी. ‘‘आम्हाला वामकुक्षीनंतर पडल्या पडल्या कथा वाचायची सवय झाली आहे व ज्या ठिकाणी स्वत: थोडे श्रम घ्यावे लागतात त्या ठिकाणी दुबरेध म्हणून हात झटकून मोकळे होतो. मला फार दिवसांपासून एका गोष्टीचं नवल वाटत आलं आहे. गणितातील एक प्रमेय समजलं नाही की आपणाला गणितच समजत नाही, असं नम्रपणे सांगून सामान्य माणूस कबुली देतो. पण एखादी कथा किंवा कविता समजली नाही की दोष मात्र कथा-कवितांत शोधतो..’’ असं जेव्हा जी. ए. पत्रात म्हणतात तेव्हा वरील वाक्यांमधील सत्य आणि उपरोध स्पर्शून जातो.

आनंद अंतरकर आणि जी. एं.ची प्रत्यक्ष भेट मात्र कधी झाली नाही याची खंत एक संवेदनशील माणूस म्हणून वाटते. ‘‘मी थोडासा चित्रकारपण होतो,’’ असं जी. ए. एका पत्रात म्हणतात. पोस्टकार्डावर जी. ए. आनंद अंतरकरांना दिवाळी ग्रीटिंग तयार करून पाठवतात. या ग्रीटिंग कार्डमागची भावना अधिक देखणी आहे. हे सगळं वाचून डिजिटल पिढीतील आपल्याला वस्तूंना होणाऱ्या मानवी स्पर्शाची आसुसून गरज जाणवते. आजच्या डिजिटल युगात या सगळ्याचं महत्त्व आपल्याला कळण्यापलीकडचं आहे. पानशेतच्या पुरात अनंत अंतरकरांचा बराचसा पत्रव्यवहार नष्ट झाला होता. साधी झेरॉक्सची सोय नसलेला तो काळ होता. फोन संभाषण ही दुर्मीळ गोष्ट होती. तशात पोस्ट खात्यानं ‘हंस’ मासिकाची जी. एं.ना पाठवलेली पहिली पत्रं गहाळ करण्याचा जवळपास विक्रमच केलेला होता.

संवादासाठी प्रत्येक व्यक्ती अगदी सतत हाताशी काही बटणांवर, एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या आजच्या काळात आपण हे पुस्तक वाचताना काळाच्या कुठल्यातरी वेगळ्याच तुकडय़ातून जग बघत आहोत असा काहीसा अनुभव येतो.

तुम्ही जी. ए. कुलकर्णीचे चाहते असाल तर ‘एक धारवाडी कहाणी’ हे पुस्तक तुम्हाला विशेषच आवडेल. तुम्ही जी. ए. कुलकर्णीचे चाहते असाल तर जी. एं.चा तरुणपणीचा, काळा गॉगल न लावलेला, चक्क डोळे दिसणारा फोटो बघून तुम्ही चकित व्हाल. केवळ तेवढय़ासाठीही हे पुस्तक घेण्याचा मोह होऊ शकतो. आणि तुम्ही जी. ए. कुलकर्णीचे चाहते नसलात तरी मराठीतील एक अतिशय महत्त्वाचा लेखक आणि संपादक यांचा हा पत्रसंवाद वाचणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे, हे निश्चित!

‘एक धारवाडी कहाणी’- आनंद अंतरकर,

मॅजेस्टिक प्रकाशन,

पृष्ठे- १७५, मूल्य- २००  रुपये

जुई कुलकर्णी