‘हा आमच्या वेदनांचा विलाप आहे

हा आमच्या अस्वस्थतेचा हुंकार आहे

हा आमच्या विचारांचा उद्गार आहे

हा आमच्या विवेकाचा जागर आहे’

‘रिंगणनाटय़’ या आकर्षक दिसणाऱ्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेल्या या मजकुरातून.. अर्थात ब्लर्बमधून या पुस्तकाची अत्यंत रेखीव, पण कुतूहल जागृत करणारी ओळख वाचकाला मिळते. मात्र, त्यामुळे हे पुस्तक नक्की कशाबद्दल आहे, याबद्दल विविध कल्पना आपण करू लागतो. पुस्तक चाळताना सुबक मांडणी, आकर्षक रचना, भरपूर छायाचित्रं यांद्वारे पुस्तकाचं एक अत्यंत नेटकं व्यक्तिमत्त्व उभं राहिल्याने हे पुस्तकच आपल्याला ते वाचण्यासाठी ऊर्जा देऊन जातं. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), साधना प्रकाशन, अतुल पेठे यांच्याबद्दल काहीही माहीत नसलेल्या वाचकांसाठी या पुस्तकाची ही अशी ओळख त्याच्या प्रथम- दर्शनापासून सुरू होते. अतुल पेठे यांची माहिती असलेल्या वाचकांना मात्र पेठे यांचं यापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ आणि ‘रिंगणनाटय़’ यांच्या तोंडवळ्यामध्ये, रूप-स्वरूपामध्ये विलक्षण साधम्र्य जाणवेल. कथनातला अत्यंत प्रामाणिकपणा, दिखाऊ किंवा उत्सवी नव्हे, तर रसरशीत आत्मकथनाची ऊर्जा, आपल्याच कलाप्रवासाचं दस्तावेजीकरण करण्याची स्वाभाविक ऊर्मी आणि कथनशैलीतल्या कमालीच्या साधेपणासोबत अत्यंत बांधेसूद वैचारिक रचना ही या दोन पुस्तकांमध्ये असलेली आणि ‘रिंगणनाटय़’ पुस्तकात विशेष जाणवणारी काही वैशिष्टय़ं आहेत.

‘माझ्या वडिलांच्या मृत्यूचं मला दुख झालं आणि डॉ .नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनामुळं तीव्र शोक झाला. गेली तीन वर्ष मी शोकमग्नच आहे. मला डॉक्टरांचा खून होण्यानं खोलवर जखम झाली आहे. मी कलाकार माणूस आहे. या खुनाचा निषेध मला रस्त्यावर येऊन करायचा होता. तेव्हा दुखातून, व्याकुळतेतून, जखमेतून आणि शोकमग्नतेतून ‘रिंगण’ ही संकल्पना मला सुचली,’  ही अतुल पेठे यांची ‘रिंगणनाटय़’ या उपक्रमामागची भूमिका पुस्तकात स्पष्ट होते.. तेव्हापासून या पुस्तकाला एक ठोस दिशा प्राप्त झाल्यासारखं वाटू लागतं. या पृष्ठापाशी आपण येण्यापूर्वी हे पुस्तक म्हणजे समविचारी तरुणांसाठी अतुल पेठे व राजू इनामदार यांनी घेतलेल्या एका स्व-शोध कार्यशाळेचा धांडोळा असावा अशा खुणा दिसत राहतात. ते तसं आहेही. या पुस्तकात जिचा आढावा घेतला जातो, ती कार्यशाळा अंनिसच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या अनेक छोटय़ा-मोठय़ा कार्यशाळांच्या शीर्षस्थानी आहे असं म्हणता येईल. या कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांपासून ते कार्यशाळेच्या संपूर्ण कामकाजाची माहिती आपल्याला हे पुस्तक देत जातं. नाटय़प्रशिक्षण देण्याविषयी जे जे साहित्य जगभरात उपलब्ध असेल, त्यातही ‘िरगणनाटय़’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल. एका अत्यंत शोकाकुल करणाऱ्या घटनेने सुन्न होण्यातून सुरुवात झाल्यावर शोकमग्नतेच्या मार्गाने जात, विवेकी विचारांच्या मंथनातून आकारत गेलेल्या या उपक्रमाच्या अंतिम टप्प्यावर जे नाटय़प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिलं गेलं, त्याची ही कार्यशाळा होती. या कार्यशाळेतून वेदना, विचार नाटय़ात्म पद्धतीने व्यक्त करण्यासाठी ‘रिंगणनाटय़’ हा उपक्रम साकारला गेला. या कार्यशाळा उपक्रमाचा राजू इनामदार आणि अतुल पेठे यांनी सादर केलेला हा दस्तावेज आहे.

यात प्रशिक्षक म्हणून राजू इनामदार आणि अतुल पेठे यांच्या कार्यशाळेतील संपूर्ण बोलण्यासोबत, मधे मधे दिलेले कार्यविराम, शिबिरार्थीनी रचलेली गाणी, कविता, घोषणा यांसोबत संदेश भंडारे आणि अतुल पेठे यांनी काढलेल्या अत्यंत समर्पक अशा छायाचित्रांचा एक अल्बम आपल्यासमोर उलगडला जातो. याखेरीज या शिबिरात तयार केली गेलेली काही रिंगणनाटय़ं (पथनाटय़ांच्या बाजाची काही नाटकं) संहितास्वरूपात या पुस्तकात मुद्रित केली गेली आहेत. अर्थातच हा जो एका कार्यशाळेचा दस्तावेज आहे त्याचा ती अविभाज्य भागच बनतात आणि त्यामुळे ती या पुस्तकात समर्पकही आहेत. अतुल पेठे यांचं यापूर्वीचं पुस्तक ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हा प्रायोगिक नाटकांच्या अर्थकारणाचाच नव्हे, तर एकंदर व्यावहारिक उलाढालींचा, त्यामागच्या एकंदर जाणिवांचा लेखाजोखा म्हणून महत्त्वाचा ठरेल. यासाठीच मी त्याला ‘प्रयोगकारणा’चा लेखाजोखा म्हणतो. तर ‘रिंगणनाटय़’ हे पुस्तक मराठीच काय, तर एकंदरच साहित्यजगतात असाधारण महत्त्वाचं ठरणारं आहे. याची कारणं दोन.. एकतर मराठी साहित्याला नाटकासंदर्भात असं काही छापण्याची सवय नाही. आणि दुसरं हे- की ‘चळवळ’ या सदरात इतक्या व्यावसायिक सफाईचं दस्तावेजीकरणाचं काम बऱ्याचदा इंग्रजी भाषेतच होताना दिसतं. ते कामही बऱ्याचदा अनुदान देणाऱ्या संस्थेला पाठवण्याचा अहवाल या स्वरूपातलं असतं. पण स्वतंत्रपणे प्रकाशित होणाऱ्या, अन्य साहित्याचा बाणा घेत आणि तसा व्यावसायिक कणा मिरवत हे काहीशा तांत्रिक स्वरूपाचं मराठी पुस्तक अनेकांना याबाबतीत दिशा दाखवू शकेल. याची मांडणी, मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट जितकी उत्तम आहे, तितकाच काही ठिकाणी मजकुराला ‘अहवाला’ची कळा येण्याचा दोषही जाणवतो, हेही खरंच. अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या कार्यशाळेतील बोलण्यानिमित्ताने त्यांची जी मतं इथे व्यक्त होतात ती विशिष्ट विचारधारेला धरून आहेत. ती सर्व- विशेषत: आजच्या परिस्थितीत सर्वच वाचक आपलीशी करणार नाहीत, हे सत्य आहे. तरीही एखाद्या निषेधार्ह घटनेचा विचारांनी निषेध करण्याची प्रक्रिया किती खोल आणि बहुपेडी होत जाते, किंवा तिला किती प्रवाह येऊन मिळत जातात आणि त्या सर्वाचा मिळून एक मोठा स्रोत कसा तयार होतो, हे या प्रामाणिक कथनामध्ये जाणवतं. एक साधी कार्यशाळा म्हणून रिंगणनाटय़ाचं कार्य संपत नाही, तर ते शब्दांच्या आणि चित्रांच्या रूपात या पुस्तकात आपल्याला पुन्हा अनुभवता येतं. आणि हीच या पुस्तकामागची प्रेरणा महत्त्वाची वाटते.

एकंदरीत आजच्या सामाजिक वास्तवात विचारांना संघटित करून काही महत्त्वाचा बदल करू पाहणाऱ्या सर्वासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. नाटक म्हणजे केवळ करमणूक असा समज करून घेणाऱ्यांसाठीही विरुद्ध दिशेने हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल. ‘पोस्ट-ट्रथ’च्या झगमगाटाच्या नव्या दुनियेत मूलभूत फरक करू पाहणाऱ्या, काही मूल्यं रूजवू पाहणाऱ्या सामाजिक चळवळींना काही वेगळं करावं लागेल का, या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरक ठरेल.

कलेच्या प्रांतातली ‘रिंगणनाटय़’ ही चळवळ त्यातल्या कलाविष्कारांसोबत वाढत गेली. या पुस्तकाचं कारण ठरलेल्या कार्यशाळेतून तयार झालेल्या रिंगणनाटकांचे शेकडो प्रयोग ठिकठिकाणी झाले.. होत आहेत.. होत राहतील. हे नाटय़प्रयोग काही दूरगामी परिणाम साधतीलही. पण ते काळासोबत विरूनही जातील. मात्र, ‘रिंगणनाटय़’ या पुस्तकात रिंगणनाटय़ाच्या महत्त्वाच्या चळवळीचा एक दस्तावेज मूर्त स्वरूपात यापुढे नेहमी भेटत राहील.

‘रिंगणनाटय़’- अतुल पेठे / राजू इनामदार,

साधना प्रकाशन,

पृष्ठे- १७८, मूल्य- १५० रुपये.