राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बाहेरून बघणाऱ्यांना बऱ्याच वेळा गूढ वाटणारी, कित्येकांना आकर्षक वाटणारी, तर अनेकांना चिंतित करणारी संघटना म्हणून दाखवता येईल. आता शंभरीच्या उंबरठय़ावर असणाऱ्या या संघटनेचे विकासाचे आणि सार्वजनिक जीवनातील भूमिकेचे अनेक टप्पे आहेत. अनेक देशी-परदेशी अभ्यासकांनी संघाच्या अनेक बाजूंचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे. मात्र, असे अभ्यास प्राय: काही थोडय़ा वाचकांपुरतेच मर्यादित राहतात. त्यामुळेच या संघटनेच्या ‘राजकीय’ अस्तित्वाची चर्चा करणारे मराठीतले लेखन महत्त्वाचे ठरते. रा. स्व. संघ ही संघटना सार्वजनिक क्षेत्रात आणि चर्चाच्या चौकटीत नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. त्यामुळे मराठीतदेखील तिची ओळख एकतर गौरवपर लिखाणातून किंवा तडाखेबंद टीकेतून होत राहते. जयदेव डोळे यांनी लिहिलेले ‘आरेसेस!’ हे पुस्तक यापकी दुसऱ्या परंपरेतील आहे. डोळे यांनी मुख्यत: गेल्या दोनेक वर्षांमध्ये लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह असल्यामुळे स्वाभाविकच त्यातील चिकित्सेत आणि टीकेत समकालीन संदर्भ येतात आणि लेखकाच्या टीकेला वर्तमानाचे परिमाण प्राप्त होते.

रा. स्व. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे की राजकीय संघटना आहे, हा एक जुनाच वादाचा मुद्दा आहे. डोळे यांचे लेखन या मुद्दय़ाचा सतत परामर्श घेते आणि ‘संघ ही राजकीय संघटना आहे,’ हे विविध घटना, संघाच्या पदाधिकाऱ्यांचे लेखन इत्यादींच्या द्वारे ठसविण्याचा प्रयत्न करते. खरे तर हा वाद निर्थक आहे. कारण राष्ट्र आणि ते घडविण्याचे भिन्न मार्ग हे अस्सल राजकीय विषय आहेत. मग हा वाद इतका दीर्घकाळ चालला त्याचे कारण काय सांगता येईल? ‘राष्ट्र हे राजकारणाच्या पलीकडे असते,’ या भाबडय़ा आणि राज्यशास्त्रीयदृष्टय़ा अर्धवट आकलनावर मुळात हा दावा बेतलेला होता. पण नव्वदीच्या दशकापासून खुद्द संघ तरी हा दावा करतो का, याची शंकाच आहे. कारण तोवर राजकारणापासून सोवळे राहण्याची भूमिका संघाने बाजूला सारली होती. (अर्थात जयदेव डोळे दाखवून देतात त्याप्रमाणे असे बदल ‘अधिकृत’ घोषणेमधून औपचारिकपणे प्रचलित करण्याचा संघाचा स्वभाव नाही. त्यामुळे याला पुरावा काय, असे विचारले जाऊ शकते!) दुसरी बाब म्हणजे एकूण राजकारण म्हणजे निवडणुका, पक्षीय स्पर्धा आणि शासकीय सत्ता मिळविण्याचे प्रयत्न अशी काहीशी मर्यादित कल्पना अनेक जण बाळगून असतात. आणि त्यामुळे एखादी संघटना राजकारण करते की नाही, हे तेवढय़ावरच मोजले जाते.

Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

पण संघ राजकीय संघटना आहे की नाही, या संदेहाला संघाचे विरोधक आणि संघापासून दूर असणारे निरीक्षक हेसुद्धा जबाबदार आहेत.  गोळवलकरगुरुजींच्या काळात राष्ट्रीय चळवळ आणि अन्य राजकीय घडामोडी यांच्याबद्दल अधिक दुरावा बाळगून संघाची वाटचाल झाली खरी; पण त्याच काळात संघाने अनेकानेक सांस्कृतिक उपक्रम उभे केले. याला स्वत: संघ भलेही सांस्कृतिक आणि सेवाभावी कार्य म्हणत असेल, पण इतरांनी त्याला सांस्कृतिक का मानले? मूल्यकल्पना आणि सार्वजनिक वर्तनाचे आकृतिबंध या बाबी जितक्या सांस्कृतिक असतात, त्याहून जास्त त्या खोलवरच्या अर्थाने राजकीय असतात याचे भान आपण सहसा ठेवत नाही. विशेषत: मराठी ‘सांस्कृतिक’ विश्वात सांस्कृतिक म्हणजे काय, याबद्दल भोंगळ समजुती असतात. त्यातूनच कला म्हणजे काय, आणि विशुद्ध कला इत्यादी बाळबोध आकलने अस्तित्वात आली. मराठीतील एकेक सांस्कृतिक दैवते घेऊन त्यांच्या सांस्कृतिक भूमिका आपण तपासू लागलो की त्यांचे राजकारण लख्खपणे दिसते. पण सांस्कृतिक क्षेत्र आणि राजकारण वेगळे असतात, ही भाबडी समजूत आपण करून घेतो आणि त्यामुळे सण-उत्सव साजरे करणे, वाचनालये चालवणे, व्याख्यानमाला आयोजित करणे, किंवा इतिहासावर रसाळ आणि वीरश्रीपूर्ण लेखन करणे या सगळ्या गोष्टी राजकारणापलीकडच्या मानतो. सांस्कृतिक आणि राजकीय यांची सरमिसळ दृष्टीआड केल्यामुळे आणि संस्कृतीच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करण्यामुळे संघ किंवा तत्सम सार्वजनिक हस्तक्षेपांचे आकलन अपुरे राहते. हे पुस्तक त्या अपुरेपणावर मात करण्याचा एक प्रयत्न आहे.

संघाच्या यशाचा एक भाग म्हणजे गाभ्याच्या मुद्दय़ांव्यतिरिक्त इतर मांडणीविषयीची लवचीकता. राष्ट्र आणि त्याचा आधार म्हणून हिंदुत्व याविषयी तडजोड न करता हिंदुत्वाच्या बहुविध अर्थछटा आपल्याशा करणे, त्यांची भिन्न प्राधान्यक्रमाने मांडणी करणे, आणि त्याहीपलीकडे जाऊन आर्थिक मुद्दे आणि सामाजिक विषमतेचा मुद्दा यांच्याविषयी प्रतिपक्षीयांना गोंधळात टाकणाऱ्या भूमिका घेणे, या संघाच्या वैशिष्टय़ांवर डोळे यांचे पुस्तक बोट ठेवते. पण तरीही कधी कधी असे वाटते की, त्यांची दुटप्पीपणाची टीका अपुरी किंवा गरलागू आहे. याचे कारण आत्यंतिक कळीच्या मुद्दय़ांवर तडजोड केली जात नाही असे संघाचा सर्व इतिहास सांगतो. आणि त्या कळीच्या मुद्दय़ांच्या पलीकडच्या अनेक प्रश्नांवर मुळात संघाला ठाम भूमिका नसते, किंवा कोणतीच भूमिका ही त्याज्य नसते. यातून टीकाकारांना टीकेला साधन मिळते. पण त्याहीपेक्षा आपला प्रभाव विस्तारण्यासाठी संघाला मोठा अवकाश उपलब्ध होतो. त्यामुळे संघाने कधी कधी आर्थिक प्रश्नांवर भूमिका घेतल्याचे दिसते, तशीच कधी कधी पर्यावरणावरदेखील घेतलेली दिसेल. या भूमिका निसरडय़ा किंवा तात्कालिक असतात असे म्हणता येईल; पण त्यामधून नवे गट स्वत:शी जोडून घेणे संघाला शक्य होते.

किंबहुना, संघाचे राजकारण वर म्हटल्याप्रमाणे पक्षीय राजकारणाहून व्यापक असल्यामुळे समाजात स्वतच्या पुढाकाराखाली एक संमतीचे क्षेत्र निर्माण करणे आणि त्याद्वारे आपली स्वत:ची आणि आपल्या कळीच्या विचारांची प्रभुसत्ता प्रस्थापित करणे, या उद्देशाकडे संघ वाटचाल करू शकतो. असे धुरीणत्व किमान १९८० च्या दशकापर्यंत तरी संघाच्या आवाक्याबाहेर होते. परंतु गेल्या तीन दशकांत मात्र ते अचानक संघाच्या आवाक्यात आले आहे. संघावरील डोळे यांची तिखट टीका आणि त्याच्या ‘राजकीयपणा’वर त्यांनी ठेवलेले बोट यावरून डोळे यांना या उभरत्या प्रभुसत्तेची चाहूल लागली आहे असे वाटते. मात्र, सुटय़ा सुटय़ा लेखांच्या स्वरूपात लिहिल्यामुळे असेल कदाचित; पण संघाच्या या यशाची या लेखनात पुरेशी सद्धान्तिक किंवा राजकीय दखल मात्र घेतली गेलेली नाही, याची हुरहूर हे पुस्तक वाचताना वाटल्याशिवाय राहत नाही.

तसेच संघावर ‘परखड’ टीका करणे म्हणजे त्यांच्या विचार आणि कृतींचा झाडा घेणे, हे सदर- लेखनाचे मुख्य उद्दिष्ट असले तरी दोन महत्त्वाच्या स्थित्यंतरांकडे या लेखनात थोडे दुर्लक्ष झाले आहे असे हे पुस्तक वाचताना जाणवते. एक म्हणजे गोळवलकरांच्या काळातील संघ ते देवरसांच्या काळातील संघ ते आताचा संघ यादरम्यान विचार, संघटन आणि पक्षीय राजकारण या तिन्ही बाबतीत संघ ‘बदललेला’ आहे आणि त्या बदलांमध्ये त्याची आताची ताकद आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संघ बदलला असे म्हणणे हे त्याच्या टीकाकारांच्या दृष्टीने नेहमीच टीका पातळ करण्यासारखे मानले जाते. पण अशा कुशल बदलांमुळेच शाखांवर लपून बसलेला संघ आज देशाच्या सार्वजनिक जीवनात प्रकटपणे धुरीणत्वाच्या निकट येऊन पोहोचला आहे याची दखल घेणे अनिवार्य आहे.

दुसरे स्थित्यंतर म्हणजे कोणत्या सामाजिक शक्ती संघाच्या पाठीमागे आहेत, यात झालेले स्थित्यंतर होय. गेल्या तीन दशकांमध्ये पाहता पाहता संघ आणि त्याचे हिंदुत्व या दोहोंचा पगडा समाजाच्या मोठय़ा हिश्श्यावर पडला आहे. किती लोक संघात- म्हणजे शाखेत- जातात, यापेक्षा संघप्रणीत राजकीय संवेदना कोणी आणि किती प्रमाणात आत्मसात केल्या आहेत, याचा खरे तर विचार करायला हवा. दलित-आदिवासींमधील काही घटकांसह हिंदू सवर्ण समाजातील एका मोठय़ा समूहाला जर हिंदुत्वाच्या आधारे उभा राहणारा राष्ट्रवाद स्वीकारार्ह वाटायला लागला असेल तर संघाची १९६० आणि १९७० च्या दशकातील चिकित्सा दुरूस्त करायला हवी. डोळे यांच्या लिखाणात या स्थित्यंतराचे काहीसे भान दिसते आणि तरीही जुन्याच चौकटीमध्ये संघाच्या सामाजिक शक्तीचे आकलन करण्याचा आग्रहदेखील डोकावतो.

संघाचे गूढ उकलण्यासाठी जशी या पुस्तकासारख्या शैलीदार आणि थेट टीका करणाऱ्या लिखाणाची उपयुक्तता आहे, त्याच प्रमाणात किंबहुना त्याहून जास्त प्रमाणात साचेबंद चिकित्सेच्या पुढे जाऊन सभोवताली होणाऱ्या स्थित्यंतरांची समीक्षा होण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच प्रभुसत्ता बनू पाहत असलेल्या या गूढ आणि वादग्रस्त संघटनेची समकालीन चिकित्सा मराठीत पुन्हा एकदा सुरू करून देण्यासाठी जयदेव डोळे यांचे हे पुस्तक नक्कीच मोलाचे ठरावे.

‘आरेसेस!’- जयदेव डोळे,

लोकवाङ्मय गृह,

पृष्ठे- १९३, मूल्य- १५० रुपये.