विज्ञानकथा म्हटले की ती रहस्यकथेकडे वळण्याचा धोका असतो. अनेकदा जर त्याला वैज्ञानिक संकल्पनेची जोड नसेल तर ती साधी कथा उरते. ‘अंतराळातील मृत्यू’ व ‘संकरित’ हे दोन्ही विज्ञानकथासंग्रह मात्र याला अपवाद आहेत. पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले यांच्या या दोन्ही कथासंग्रहांत आपल्याला वेगवेगळय़ा विज्ञान संकल्पना उत्कृष्ट वर्णनशैलीसह कथासूत्रात गुंफलेल्या दिसतात. आजकाल विज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे, त्यामुळे वेगवेगळय़ा संकल्पना पुढे येत आहेत तसेच आगामी काळात शक्य असलेले विज्ञान व तंत्रज्ञानही अशा कथा लिहिताना विचारात घ्यावे लागते. विज्ञान कथा लिहिताना वाचक हे विज्ञानाचे जाणकार नसतानाही ती त्यांना समजली पाहिजे असे अपेक्षित असते व त्या कसोटीवर हे दोन्ही संग्रह उत्तम आहेत यात शंका नाही. विशेष म्हणजे प्रा. संजय ढोले सातत्याने विज्ञान लेखन करीत असल्याने त्यांना मराठीतील पारिभाषिक शब्दही माहीत आहेत व हे शब्द रुळवण्याचे कामही या विज्ञान कथांच्या रूपाने झाले आहे. डॉ. ढोले हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असले तरी जीवशास्त्रातील अनेक विषयही त्यांनी तितक्याच रंजक व वेधक पद्धतीने मांडले आहेत. त्यांच्या ‘संकरित’ या संग्रहात जीवशास्त्र व भौतिकशास्त्र यांची गुंफण असलेल्या कथाही वाचायला मिळतात. त्यांच्या विज्ञान कथा या कृत्रिम वर्णने नाहीत तर त्याला वेगवेगळय़ा मानवी व्यक्तिरेखांची डूब आहे. या कथा लिहिताना त्यांनी समाजातील ताणतणाव व इतर समस्यांचाही वेध तितकाच समर्थपणे घेतला आहे. ‘परिवर्तन’ या कथेत गुंड राजन याच्यावर गोळीबार होतो. त्याच्या हृदयात गोळय़ा लागतात. यात मग पुढे तो केवळ गुंड आहे म्हणून त्याला कशाला वाचवायचे असे होत नाही, किंबहुना तो माणूसच आहे म्हणून वैद्यकीय उपचार केले जातात आणि त्याच्याच शरीरातील बहुद्देशी मूलपेशी विकसित करून त्याला हृदय तयार केले जाते. ही कथा जीवविज्ञानातील प्रगत स्थिती माहीत असल्याशिवाय लिहिणे शक्य नाही. ग्रामीण भाग हा अप्रगत आणि शहरी भाग प्रगत किंवा जी काही हुशारी आहे ती शहरात, ग्रामीण भागात काही तसे नाही, हा समज डॉ. ढोले यांनी खोडून काढताना अनेक वैज्ञानिकांना प्रगत संशोधनानंतरही खेडय़ाकडे जाताना दाखवले आहे किंवा त्यांनी ग्रामीण भागाशी नाळ तुटू दिलेली नाही. ‘स्वदेश’ चित्रपटातील वैज्ञानिक खेडय़ात येऊन तेथील ग्रामस्थांमध्ये मिसळतो व तेथे काही प्रयोग करतो तसे काही कथापट त्यांच्या या कथासंग्रहामध्ये आहेत. ते आपल्याला वेगळेही वाटते. नाइलाजाने पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या लोकांना गावाकडची ओढ असते तशीच डॉ. ढोले दाखवतात आणि आपल्याला स्मरणरंजनात नेतात. आता दहशतवादाविरोधातील लढाई टिपेला पोहोचलेली असताना यात विज्ञानाची कशी मदत होऊ शकते याची जवळपास वास्तव संकल्पना ते मांडतात. त्यात बॉम्ब कुठे ठेवला आहे हे शोधण्याची यंत्रणा विकसित केली जाते. येथे आपल्याला पठाणकोट येथे बॉम्ब निकामी करताना प्राणार्पण करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल निरंजनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. यंत्रमानव केवळ जोखमीची कामे करू शकतो असे नाहीतर तो वैद्यक क्षेत्रातही उपयुक्त ठरतो. ‘अस्तित्व’ या कथेतील यंत्रमानव हा कोमात गेलेल्या व्यक्तीला परत जिवंत करतो. ‘अखेर तो परतला’ या कथेत स्मृती हरवलेल्या समीर वेलणकरला कृत्रिम स्मृतिपटल बसवले जाते व तो परत पूर्ववत होतो. आज ही गोष्ट अवघड वाटत असली तरी शक्य आहे. विज्ञानात अहंकारही चालत नाही आणि भाबडेपणाही चालत नाही. ‘उत्परिवर्तन’ या कथेत संशोधक असणारे डॉ. नेरकर व त्यांची विद्याíथनी प्राण गमावते तर ‘कोळिष्टक’ या कथेत एक गावकरी जीव गमावतो. ‘विचारवहन’ ही कथा सुंदरच आहे. दुसऱ्या माणसाचे विचार आपल्याला जाणून घेता आले तर किती बरे होईल, असा विचार आपल्या मनात येत असतो. अशी करामत योगायोगाने दाखवणाऱ्या व्यक्तीला आपण गंमतीने मनकवडा म्हणतो. मात्र ‘विचारवहन’ कथेत डॉ. बनकर दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखण्याचे तंत्रच विकसित करतात. या कथेत बनकरांना त्यांच्या मित्रांनीच रचलेला कट या विचार ओळखण्याच्या तंत्राने कळतो. यावेळी पोलीस वेळीच हस्तक्षेप करतात, त्यामुळेच ते हल्ल्यातून वाचतात. परंतु त्यांना घरी जाताना कारची धडक बसते व ते ठार होतात. एकीकडे विज्ञानाच्या मदतीने मृत्यूवर मिळवलेला विजय आणि नंतर पुन्हा नियतीच्या पुढे विज्ञान जाऊ शकत नाही हा अपुरेपणा, दोन्हीही एकाच कथेत त्यांनी प्रभावीपणे दाखवले आहेत. ‘सॉकर’ ही फुटबॉलच्या खेळाची पाश्र्वभूमी असलेली कथा असली तरी त्याचा विषय जनुकशास्त्राच्या मदतीने मनोवांच्छित संतती हा आहे. फुटबॉलमध्ये चिवटपणा आणि चपळता लागते. हे गुण आपल्या मुलांमध्ये आणण्यासाठी एक शास्त्रज्ञ कोळी व माकडाची जनुके मुलाच्या जनुकात मिसळतो. फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी नंतर या नावाजलेल्या फुटबॉलपटूची तपासणी करण्याचे ठरवतात. आता आपले भांडे फुटणार या भितीने वैज्ञानिक काळजीत पडतो, पण संघासह हा खेळाडू विमानाने जात असताना त्याला अपघात होतो व रहस्य तसेच राहते. परिणामी या तंत्राचा वापर पुढे होत नाही. ही कथा जनुकशास्त्रातील नीतिनियमांवर आधारित असून लेखकाने नतिकतेलाच उचलून धरले आहे. मनोवांच्छित संतती निर्माण करणे आता फार दूर नाही. ब्रिटनमध्ये इतर कारणांच्या निमित्ताने अशा तंत्रांना मंजुरीही मिळाली आहे, परंतु येथे श्रीमंत लोक हे तंत्र वापरून आपल्या मुलांना डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक बनवू शकतील आणि गरिबांची मुले नसíगक पद्धतीने जन्माला येऊन तशीच राहतील. येथे भेदाभेद अमंगळ विज्ञानाच्या मदतीने पुन्हा निर्माण होऊ शकतो. जनुकशास्त्राचाच विषय निघाला आहे तर जनुकीय पिकांमध्ये मोहरीच्या चाचण्यांचा वाद सध्या सुरू आहे. किरणोत्सर्ग, मूलद्रव्ये, समस्थानिके, गुणसूत्रे, मूळपेशी, संकरित कोशिका हे मराठी शब्द आपण कधी वापरत नाही, परंतु ते लेखकाने वापरले आहेत. यामुळे भाषाविकासात मोठी भर पडत असते. ‘अकल्पित’ या कथेत मालन ही किरणोत्सर्ग असलेल्या प्रयोगशाळेत काम करीत असते, तिथे पुरुषाशी मिलन न होताही ती गरोदर राहते व स्वयंक्लोिनग होते. त्यांच्या ‘अंतराळातील मृत्यू’ या कथासंग्रहातील कथाही अशाच रंजक, वेधक आहेत. त्यालाही रहस्याची डूब आहे आणि शेवटी सत्याचा शोध घेण्याची विज्ञानाची धडपड त्यातून दिसते. काही ठिकाणी खेडय़ातील वर्णने आहेत. कथेची घटनास्थळेही खेडय़ाचे निसर्गसौंदर्य लपेटून आली आहेत. काही गोष्टींचे रहस्य उलगडताना अनेकदा वैज्ञानिकांच्या प्राणावरही बेतते, परंतु संशोधन एका टप्प्यावरून दुसरी व्यक्ती पुन्हा पुढे नेते हा वेगळा क्रम त्यांच्या ‘प्रतिशोध’सारख्या कथांमधून सामोरा येतो. ‘अद्भुत प्रवास’ ही कथा वाचण्यासारखीच आहे. त्यातील नायक-नायिका, समाजातील चालीरीती, नायकाचे कृष्ण व श्वेतविवरांचा शोध घेताना समांतरित विश्वात जाणे आणि तेथे त्याला पुण्यातील पेशवेकाळाचा प्रत्यय येणे म्हणजे कालकुपीचाच प्रवास आहे. टाइम मशीनसारखीच ही संकल्पना आपल्याला आवडून जाते. नेहमीच आपल्याला भूतकाळात फेरफटका मारताना भविष्याचा वेध घेण्याची आस असते. येथे आपणही नायकाबरोबर नकळत भूतकाळाच्या विवरात शिरतो व रमून जातो. लेखकाने अनेक कथांचा शेवट नकारात्मक केला आहे, परंतु जर कटू सत्य सांगायचे असेल तर त्यात काही कारणाने आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीही घडू शकतात. चित्रपटातही आपल्याला आवडणारा शेवट आपल्याला हवा असतो, परंतु येथे लेखकाने केवळ लोकरंजनास्तव कथा लिहिलेल्या नाहीत तर त्यातून विज्ञानातील बरे-वाईट आपल्याला कळावे हा हेतू ठेवलेला आहे. धूमकेतूवर उतरणाऱ्या यानात प्राणाची बाजी लावून बसणारे डॉ. चेतन धोंडे ही व्यक्तिरेखाही अशीच वेगळी आहे. वैज्ञानिकांतील परस्परांवर कुरघोडी, मत्सर असे मानवी पलूही ते उलगडतात. ‘अंतराळातील मृत्यू’ ही कथा विज्ञानकथा असली तरी जास्त आकर्षक मांडणीने सजलेली आहे. यातील कॅ. सतीश, डॉ. मंजिरी, डॉ. नितीन या व्यक्तिरेखा उत्तम रंगवल्या आहेत. काळाच्या वेगळय़ा महतीमुळे आपला नवराच आपला जावई होणार हे पाहून डॉ. मंजिरी स्तब्ध होतात ही कल्पना अशीच आगळीवेगळी. या कथेला दिलेले वळण त्यामुळे अनपेक्षित आहे. अलीकडेच तामिळनाडूत वेल्लोर येथे उल्कापाषाण कोसळून एक जण ठार झाला. अवकाशातून येणारे धोकेही यातून ध्यानात येतील.‘वलय’ या कथेत गारगोटीएवढय़ा गोळय़ाने केलेली हानी, नंतर ते गूढ उलगडणे हे सगळे कथा नव्हेतर सत्य वाटावे असेच आहे. काही कथांमधून ते अंधश्रद्धांवरही प्रहार करतात. ‘आविष्कार’ या कथेत माणूसच जैविक अस्त्र बनू शकतो हे दाखवले आहे. तर ‘अंधारातील तीर’ या कथेत वैज्ञानिकाने नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर काय होते हे कळते. ‘प्रगाढ’ ही कथाही तशीच वेगळय़ा संकल्पनेवर आधारित आहे. यात एका वेगळय़ा तंत्राने वैज्ञानिकातील वैर आणि त्यावर मात करण्यासाठी डॉ. कावेकर यांच्या मेंदूची क्षमताच काढून घेतल्याने त्यांची झालेली फजिती ही कल्पना आणि त्यातील कथनशैलीही वेगळी आहे. एकूणच डॉ. संजय ढोले यांना या कथा लिहिताना आताच्या काळातील विज्ञान व आधीचे विज्ञान या दोन्हींचा अभ्यास असल्याने खूप विविधता आणता आली आहे.
‘अंतराळातील मृत्यू’,
पृष्ठे-१५०, मूल्य- १९५ रुपये.
‘संकरित’,
पृष्ठे-१७४, मूल्य- १९५ रुपये,
दोन्हीचे लेखक- डॉ. संजय ढोले,
मेहता पब्लिशिंग हाऊस.

राजेंद्र येवलेकर