स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत भारताची राज्यघटना राबविताना  राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांच्यात मानवी तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धी यांतील समन्वयच हरवलेला आहे. देशाच्या संस्थात्मक जीवनात आंतरिक सर्जनशील जोम भरण्याचं काम गेली ६६ र्वषे झालेलं नाही. आज तर परिस्थिती अशी आहे, की ‘आंतरिक सर्जनशील जोम भरणं’ म्हणजे काय, हेही सांगण्याची गरज निर्माण झाली आहे या देशात. तर्कबुद्धी आणि सृजनशीलता यांनी हातात हात घालून ही कोंडी भेदणे गरजेचे आहे.

इंग्लंडचा युनियन जॅक देशभर खाली उतरवला गेला आणि त्या जागी फडकू लागला भारताचा तिरंगा.   त्या घटनेला ६९ र्वष पूर्ण होतील आता. तिला आम्ही स्वातंत्र्यदिन मानलं. देशभर १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंग्याभोवती आम्ही एकत्र जमलो. तिरंग्याला वंदनही केलं. परंतु तेव्हा स्वत:पेक्षा, आपली जातपात, संप्रदाय, जमातवाद, भाषा-प्रांत यांच्यापेक्षा देशहित मोठं, असं किती जणांना खरोखरच वाटत होतं? लोकसंख्येनं व्यापलेली भूमी आणि सुसंघटित राष्ट्र यांतील फरक किती जणांना ठाऊक होता तेव्हा? आज जर ते प्रश्न शिल्लक नसतील तरच त्यावेळीही ते प्रश्न नव्हते असं खात्रीलायकपणे म्हणता येईल.
परंतु आज केंद्रीय मंत्रिमंडळ बनवताना जेव्हा जात-संप्रदाय-भाषा-प्रांत आदी संकुचिततांचा विचार करावाच लागतो, तेव्हा संविधान अस्तित्वात येऊनही त्याभोवती आम्ही एकवटलेलो नाहीत हे स्पष्ट दिसतं. मग याचं कारण काय असावं? एक कारण असं दिसतं, की पारतंत्र्य आणणारी पोकळी आणि संविधानानं निश्चित केलेला राष्ट्र-अवकाश यांतील फरक आम्हाला स्पष्ट दिसला नाही. ओघानंच संविधान म्हणजे ‘राष्ट्र-अवकाशाची जडणघडण शाबूत राखणारी सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणा’- ही भूमिका आमच्यापाशी राहिली नाही. संविधानाबाबतचं वैचारिक अभिसरण घडवून आणण्यात भारतातले संविधान-तज्ज्ञ मानले गेलेले विचारवंत कुठंतरी कमी पडले. ते फक्त तर्कबुद्धीनिष्ठ वा विज्ञाननिष्ठ असल्यामुळं असं घडलं का? असा प्रश्न पडतो आज. खासकरून आर्थन शॉपनहॉर (१७८८-१८६०) या जर्मन मानस-सौंदर्यशास्त्रज्ञाचं पुढील विधान वाचल्यानंतर! ते विधान असं : ‘‘मानवी तर्कबुद्धी मजबूत पायावर उभी असते, पण ती आंधळी असते. तर मानवी सृजनबुद्धी पांगळी असूनही तिला सृजनदृष्टी लाभलेली असते. अशा सृजनबुद्धीला जर तर्कबुद्धीच्या खांद्यावर जागा लाभली तर तर्कबुद्धीला योग्य निर्णय घेण्याची दिशा सापडते.’’
भारताची राज्यघटना राबवताना मात्र राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्षीयांपाशी वरील विधानात सूचित झालेला मानवी तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धीचा समन्वयच हरवलेला राहिला. ओघानेच लोकसभा- राज्यसभा या संविधानाने दिलेल्या संस्था सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणाद्रोही राजकारणाच्या रिंगणाप्रमाणे भासू लागल्या. त्या संस्थांकडून संविधानानं निश्चित केलेल्या देशाच्या संस्थात्मक जीवनात आंतरिक सर्जनशील जोम भरण्याचं काम गेली ६६ र्वष झालं नाही. आज तर अशी परिस्थिती आहे, की ‘आंतरिक सर्जनशील जोम भरणं’ म्हणजे काय, हेही सांगण्याची गरज आहे भारतात.
त्यासाठी भारताच्या सुदैवानं टिकून असलेल्या भारतीय अभिजात रागसंगीताकडे थोडं वळूयात. आपल्याला समजून येईल की, मुळात ‘राग’ ही एक सुरचना असते. परंतु तिच्यात सर्जनशील जोम भरला जातो, जेव्हा त्या रागाच्या सुरावटीला तालबद्ध शब्द-काव्याच्या शिस्तीत आणले जाते. म्हणजेच तालाच्या कुठल्या मात्रांवर कुठली स्वराक्षरं हे निश्चित केलेलं असतं. यालाच रागात भरलेला सर्जनशील जोम किंवा ‘बंदिश’ म्हटलं जातं. ही बंदिश जेव्हा बंदिशीची शिस्त पाळत तालासोबत मुक्तपणे गायली जाते तेव्हा भारदस्त असा श्राव्य-सौंदर्यानं समृद्ध केलेला ‘ख्याल’ श्रोत्यांसमोर उभा राहतो.. श्रोत्यांना आंतरिक समाधानाच्या उच्च पातळीवर पोचवतं!
भारताचं दुर्दैव असं, की संविधानरूपी रागाच्या सुरेल, तालबद्ध व राष्ट्रहितैषी बंदिशी बांधणारे राजकारणी ६६ वर्षांत खूपच कमी निर्माण झाले. त्यामुळेच लोकशाहीचं रूपांतर सृजनहीन राजकारणप्रधान व्यवस्थेत झालं. सदर व्यवस्थेत वस्तू-नवनिर्माणातून आर्थिक संपन्नता देणारा राष्ट्र-अवकाश उभा करणं भारताला जमलं नाही. राजकारण खेळून पैसा कमावण्याच्या रीती शोधण्याचा मार्ग समाजात उतरू लागला. समाजातली रसिक बनवण्याची प्रक्रियाही मंदावत राहिली. प्रथम इतरांसाठी अडचणी निर्माण करायच्या आणि त्यांतून सोडवणूक करण्यासाठी पैसे उकळायचे, ही रीत भारतीयांनी प्रच्छन्नपणे आचरणात आणली. साथीच्या रोगासमान तिचा प्रसार वाढत गेला. याच्या सोबतीला आला ‘धर्मनिरपेक्षता’ हा व्यापक अधर्म वाढवणारा शब्द! या धोकादायक शब्दानं ‘सेक्युलॅरिझम्’ या विदेशी शब्दाला ‘राष्ट्रधर्मसापेक्षता’ किंवा ‘संविधानसापेक्षता’ हे पर्यायी शब्द वरच येऊ दिले नाहीत.. जणू एका व्यूहरचनेतून!
वास्तविक सेक्युलॅरिझम् म्हणजे ‘सुरचना (डिझाइन), सुव्यवस्था (ऑर्डर) आणि सुयंत्रणा (सिस्टम) या ऐहिक संकल्पनांच्या आसक्तीचा समाजमनावरील संतुलन-ताबा!’ बहुतेक प्रगत, उत्पादक लोकशाही देशांत तो जाणवतो. तर धर्म म्हणजे सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणाभक्तीचा समाजमनावरील संतुलनताबा. इथं लक्षात घ्यायचं ते असं, की कधीकाळी आम्ही सुरचनाकाराला ‘सुखकर्ता’ म्हणत होतो. सुव्यवस्थाकाराला ‘दु:खहर्ता’ आणि सुयंत्रणाकाराला ‘विघ्नविनाशक’ म्हणत होतो.. ‘गणपती’ म्हणत होतो! सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणांचे संस्कार लाभलेल्या जनांना ‘गण’ म्हणत होतो आणि योग्य त्या प्रशिक्षणातून गणपती घडविणाऱ्या ऋ षींना ‘गणाचार्य’ म्हणत होतो. या जन-गण-गणपती आणि गणाचार्यामधून तयार होणाऱ्या प्रणालीला ‘गणतंत्र’ म्हणत होतो. याचा पुरावा म्हणजे ‘गणतंत्रदिन’ हा आजचा शब्द. भारताच्या राष्ट्रगीतातही जन-गण-गणपतीचा- म्हणजेच अधिनायकांचा जयजयकार आहे.
आता संविधानाने दिलेल्या संस्थात्मक जीवनात आंतरिक सर्जनशील जोम भरणं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांनी राजकीय मतभेद विसरून लोकहिताची विधायके त्वरित अमलात आणणं. हे काम गेल्या ६९ वर्षांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षीयांनी एकत्र करावयास हवं होतं आणि आताही ते त्यांनीच करावयाचे आहे. त्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांत सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणांच्या बांधिलकीला धर्म आणि सेक्युलॅरिझम् मानून महत्त्वाचं स्थान द्यावं. त्या बांधिलकीतून तयार होणाऱ्या पवित्र संपत्तीनिर्माण संस्कृतीला ‘भारतीय संस्कृती’ म्हणून संविधानिक मान्यता द्यावी. आज अशी ‘संविधानिक बंदिश’च देशवासीयांना नववस्तू-निर्माणाचे.. प्रॉडक्ट इनोव्हेशनचे ‘ख्याल’ उभे करण्याच्या प्रेरणा देईल. यातून भारतीय लोकशाही सुरचना-सुव्यवस्थाभक्त बहुजनांच्या गुणवत्ताशाहीचं रूप धारण करेल. गत ६९ वर्षांत असं घडलेलं नाही. कारण सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणाद्रोही वैचारिक धारणाच राजकारणाचा खेळखंडोबा करत राहिल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत सुसंवादाचा अंशही नाही. सुरक्षा दलं आणि नोकरशाहीत उच्च-नीचतेचा संघर्ष अखंडपणे चालू राहिलेला आहे. हे सारं मिळून जे काही उभं आहे त्यातून संविधानद्रोहाच्या प्रेरणाच बाहेर पडत आहेत. काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्सवादी मंडळी असोत, नक्षलवादी-माओवादी मंडळी असोत किंवा चीन- पाकिस्तान-अमेरिका आदी राष्ट्रं असोत; त्यांना आजची क्षीण संविधानामुळे निर्माण झालेली पोकळीच सहाय्यभूत होत आहे.
ती पोकळी संपवायची असेल तर पोकळीच्या जागी राष्ट्र-अवकाश  निर्माण होणं गरजेचं आहे. अमेरिकेने एक मजबूत राष्ट्र-अवकाश २० व्या शतकात निर्माण केला. रचनासौंदर्याबद्दलची आसक्ती अमेरिकेला सुव्यवस्था-सुयंत्रणांच्या नवनिर्मितीकडे घेऊन गेली. ‘प्रॉडक्ट इनोव्हेशन’ अमेरिकेला विज्ञानातून नवं वास्तव निर्माण करण्यापर्यंत घेऊन गेलं. आंतरिक सृजनदृष्टी आंधळ्या तर्कबुद्धीला संपत्तीनिर्माणाचा रस्ता दाखवत गेली. अमेरिका साम्यवादाला लढाई न करता हरवून मोकळी झाली.. महासत्ता बनली!
तिकडे भारताच्या दक्षिण-पूर्वेस असलेल्या सिंगापूरने १९६५ ते २००० या वर्षांत तिसऱ्या जगातून पहिल्या श्रेणीच्या जगात स्थान मिळवण्याचा चमत्कार केला.. सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणांची जोड ‘कन्फ्युशियन’ मूल्यांना देऊन! अवघ्या ३६ वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाचा दरडोई उत्पन्नदर गाठण्याचा पराक्रम करून दाखवला. त्या पराक्रमामागचं सूत्र होतं- कन्फ्युशियन मूल्यभक्त बहुवांशिकांची गुणवत्ताशाही! सिंगापूरनं राष्ट्रभाषा म्हणून ७४ टक्के चिनी मंडळींची मँडरीन ही भाषा न निवडता इंग्रजीला तो दर्जा दिला. आणि शेती वा जड उद्योगांसाठी आवश्यक तो भूमीविस्तार जमेस नसूनही फक्त आदर्श पर्यटन व्यवसाय आणि कार्यक्षम बंदर यांद्वारे अतुलनीय प्रगती करून दाखवली.
राष्ट्रनिर्मिती ही नेहमीच संविधानातील संस्थांत आंतरिक सर्जनशील जोम सातत्याने भरूनच होत असते. तरच जमातवाद निर्माण करणारे संप्रदाय, जमातवाद, भाषावाद, प्रांतवाद, बहुसंख्याकवाद, अल्पसंख्याकवाद यांची सद्दी आटोक्यात राहते आणि विकासाचा रथ दौडत राहतो. राष्ट्र-ऐक्य मजबूत बनते. दुरितांना आकाशाएवढा विकास-अवकाश लाभतो. ‘याहूनही करावे विशेष, तरिच म्हणावे पुरुष’ हे राष्ट्रीय सर्जनशील सामर्थ्यांचं ब्रीद ठरतं.
हे हिंदवी ब्रीद देशभर पसरवण्याची जबाबदारी महाराष्ट्रानं ओळखली नाही. आणि त्या ब्रीदाशिवायच पुरोगामी ठरण्याचा, म्हणवून घेण्याचा मार्ग महाराष्ट्राने धरला. त्या मार्गावर महाराष्ट्राच्या डोईवर आलं ४,००,००० कोटी रुपयांचं कर्ज. परंतु मुख्य मुद्दा तो नाही. तो आहे सुरचना-सुव्यवस्था-सुयंत्रणा तत्त्वांची बांधिलकी सर्वोच्च मानणाऱ्या धर्म-सेक्युलॅरिझमला संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांत एकत्र गुंफण्याचा. आणि त्यातून प्रॉडक्ट इनोव्हेशन आणि संपत्तीनिर्माण-संस्कृतीला आकार देण्याचा! या संपत्तीनिर्माण-संस्कृतीतच देशातील सर्व राष्ट्रद्रोही संकुचितता संपवण्याची ताकद आहे.. सामाजिक न्याय, सर्वसमावेशकता आणि उदारमतवाद आणण्याची शक्ती आहे. फक्त त्यासाठी तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धी यांचा समन्वय आम्ही साधायला हवा. म्हणूनच अत्यावश्यक तो ‘कोंडीभेद’ आम्ही करणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.
रवी परांजपे raviparanjape@gmail.com